‘बालगंधर्व’ आणि आमचं शंकेखोर मन
पूर्वपीठिका: नटरंग आणि आमचं शंके़खोर मन
‘बालगंधर्व’ चित्रपट पाहून भारून गेलेले अनेक लोक भेटले आणि तशी अनेक परीक्षणं विविध ठिकाणी वाचली. चित्रपट पाहून आमच्या शंकेखोर मनात आलेल्या काही शंकांचं निरसन तरीही झालेलं नाही, म्हणून रसिक मायबाप वगैरे समस्त मराठीजनांची क्षमा मागून आमच्या त्या शंका इथे दिलेल्या आहेत:
संगीत आणि तेही विशिष्ट काळातलं, विशिष्ट जातकुळीचं संगीत (पक्षी: बालगंधर्व आणि त्यांच्या काळातलं नाट्यसंगीत) हाच ज्याचा आत्मा आहे अशा चित्रपटात एकता कपूरच्या टिनपाट टी.व्ही. मालिकांतल्यासारखं पार्श्वसंगीत सतत का वाजत असतं? प्रेक्षकांना प्रसंगातलं कारुण्य वगैरे समजायला संवाद (तेही अमुक-तमुक व्यक्ती मेली, अमुक लाखांचं कर्ज फेडा वगैरे टाईपचे; म्हणजे सूचक वगैरे नाहीत बरं) आणि त्या जोडीला पडद्यावरच्या सर्वांनी गाळलेली टिपं पुरेशी नाहीत असं दिग्दर्शकाला वाटतं का काय? की एकंदरीत आजच्या प्रेक्षकाला असलंच संगीत लागतं अशा समजातून हे आहे? पण मग हे असलं भावनांना हातघालू संगीत सतत वापरणं हा बालगंधर्वांचा आणि त्यांच्या संगीताचा अपमान नाही होत का?
हे निव्वळ पार्श्वसंगीत म्हणून नाही, तर अगदी ‘धर्मात्म्या’च्या प्रसंगातल्या करुण गाण्यातदेखील कसलीतरी भयंकर (आणि त्या काळात नसणारी) वाद्यं कानठळ्या बसेपर्यंत का वाजत रहातात? अशा वाद्यांनी प्रसंगातलं कारुण्य गहिरं वगैरे होण्याऐवजी अगदी नाहीसं होतं हे ज्यांना कळत नाही त्यांना संगीतातलं नक्की काय कळतं?
एकंदरीत बालगंधर्वांविषयी किमान आस्था असणाऱ्या पुष्कळ लोकांना माहीत असतील असे किस्से किंवा एखाद्या चरित्रकोशात सहज सापडतील असे त्यांच्या आयुष्यातले ठळक प्रसंग एखाद्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमधल्या बुलेट पॉईंटसारखे टाकत गेलं की पटकथा झाली असं पटकथालेखकाचं मत आहे का? म्हणजे टिळक आले त्यांना ‘अरे हा तर बालगंधर्व’ म्हणून गेले; गडकरी आले त्यांना ‘एकच प्याला’ देऊन गेले; केशवराव भोसले आले आणि धैर्यधर झाले; शांताराम आले आणि धर्मात्मा बनवून गेले अशी नुसती माणसांची आणि प्रसंगांची जंत्री चित्रपटात येत राहते.
याउलट कोणत्याही संदर्भग्रंथात सहज सापडतील अशा तपशीलांपलीकडचे बालगंधर्व चित्रपटात दिसतच नाहीत. उदा. असं सांगतात की गाण्यातलं शास्त्रशुद्ध तंत्र (हा अमुक ताल, तो तमुक राग वगैरे) गंधर्वांना फारसं कळत नसे पण त्यांची संगीताची जाण मात्र अतिशय चकीत करणारी होती आणि गळ्यातून हवे ते काढण्यात ते वाकबगार होते. अशा माणसाला संगीताबद्दल, इतर गायकीबद्दल काय वाटतं हे चित्रपटात कुठेच येत नाही. नुसतं एकामागून एका प्रसंगात त्यांना गाताना दाखवलं आणि त्यांची व्यवहारी जगाविषयीची निरागसता दाखवली की व्यक्तिचित्रण झालं असं दिग्दर्शकाला/पटकथालेखकाला वाटतं का?
चित्रपटात दोन प्रसंग कराचीत घडतात. पहिल्या प्रसंगात तशी पाटी येते आणि दुसऱ्या प्रसंगात पात्रं आणि संवादातून ते कळतं. मग दोन्ही प्रसंगांत मागे उगाच बांग का? म्हणजे कराचीत तेव्हा २४ तास बांग ऐकू यायची असा कुणाचा समज आहे की काय? की जिथे बांग ऐकू येते अशी ठिकाणं ही आताच्या पाकिस्तानातच असणार असं काहीसं प्रेक्षकांना वाटावं अशी इच्छा आहे? आणि मग इतर ठिकाणी उगाचच मागे मोटारींचे वगैरे आवाज का येत रहातात? म्हणजे मोटारी असतील तर त्या कराचीत नाहीत तर उर्वरित भारतातच (म्हणजे तेव्हापासून ‘आपण’ पुढे वगैरे) असं काही म्हणायचं आहे का?
एकंदरीत संवाद आणि पटकथेत चुकून झालेले विनोद तर फारच आहेत. उदा: गंधर्वांशी लग्न झालं तेव्हा त्यांच्या बायकोचं वय नक्की काय होतं? ती घोडनवरी होती की काय? कारण विभावरी देशपांडे अभिनेत्री म्हणून कितीही गुणी असली तरीही त्या काळात घोडनवरी ठरली असती अशा वयाची दिसते (आणि आहेच). लग्नाच्या आणि पहिल्या रात्रीच्या प्रसंगात ती थोराड दिसते हा काही तिचा दोष नाही; ती कास्टिंगची ढोबळ चूक वाटते.
गंधर्वांच्या नाटकांना आलेली आणि पहिल्या रांगांत बसलेली म्हणून जी काही प्रेक्षकमंडळी दिसतात ती ठेवणीतले कपडे-दागिने घालून, बग्ग्यांमधून वगैरे येणारी, गंधर्वांच्या उच्चभ्रू, लब्धप्रतिष्ठित चाहत्यांपैकी आहेत असं त्यांच्याकडे पाहून काही वाटत नाही. मग या गोष्टींना (श्रीमंतीचं प्रदर्शन वगैरे) दिग्दर्शकाचा काही तात्त्विक विरोध वगैरे आहे की काय अशी शंका वाटू लागते. याउलट स्टेजवर नसतानाची नाटक मंडळी पाहून वाटतं. म्हणजे यांचे कपडे सारखे परीटघडीचे, कडक, कोरे कसे दिसतात असा प्रश्न पडतो. एवढ्या लोकांना रोज किती कामं असतात आणि त्यात त्यांचा कसा पिटटा पडतो याची कल्पना ज्यांचा फिरत्या नाटक मंडळींशी संबंध आला असेल त्यांना असेल. मग तरीही त्यांचे कपडे असे सदासर्वकाळ कोरे का? त्या लोकांना काही कामंधामं करायला लागत नसत का?
निव्वळ मिशा लावल्यानं राहुल देशपांडे मर्दानगीचा निखळ नमुना वगैरे दिसतो हे आम्हाला तरी फारच विनोदी वाटलं. त्यात केशवराव भोसल्यांचे धैर्यधराच्या वेशातले फोटो पाहिलेले असल्यामुळे तर आम्ही वाईट परिस्थितीत सापडलो.
एकंदरीत असले सिनेमे पाहून मराठी संगीत नाटकातला सुवर्णकाळ जिवंत होतो आणि जाताजाता मराठी चित्रपटसृष्टीतही नवा सुवर्णकाळ उदयाला येतोय असं आमच्या बालबुद्धीला तरी वाटलं नाही. उलट अनेकांना प्रिय असणारे बालगंधर्व जरा जास्तच सस्ते झालेत असं आम्हाला वाटू लागलंय. आता आम्ही पडलो शंकेखोर म्हणून आमचं रडगाणं सोडून द्यायचं, का आमच्या मुद्द्यांत तथ्य वाटतं असं म्हणायचं ते तुमचं तुम्हीच ठरवा. खिशाला फार तोशीस मात्र पडू देऊ नका असा आमचा एक पुणेरी सल्ला.
निव्वळ मिशा लावल्यानं राहुल देशपांडे मर्दानगीचा निखळ नमुना वगैरे दिसतो हे आम्हाला तरी फारच विनोदी वाटलं. त्यात केशवराव भोसल्यांचे धैर्यधराच्या वेशातले फोटो पाहिलेले असल्यामुळे तर आम्ही वाईट परिस्थितीत सापडलो.
एकंदरीत असले सिनेमे पाहून मराठी संगीत नाटकातला सुवर्णकाळ जिवंत होतो आणि जाताजाता मराठी चित्रपटसृष्टीतही नवा सुवर्णकाळ उदयाला येतोय असं आमच्या बालबुद्धीला तरी वाटलं नाही. उलट अनेकांना प्रिय असणारे बालगंधर्व जरा जास्तच सस्ते झालेत असं आम्हाला वाटू लागलंय. आता आम्ही पडलो शंकेखोर म्हणून आमचं रडगाणं सोडून द्यायचं, का आमच्या मुद्द्यांत तथ्य वाटतं असं म्हणायचं ते तुमचं तुम्हीच ठरवा. खिशाला फार तोशीस मात्र पडू देऊ नका असा आमचा एक पुणेरी सल्ला.वर्गीकरण
प्रतिक्रिया
क्या बात है
+ १
+१
संपादन
व्यक्तीगत हलाल हल्ला!
व्वा!
बिपिन
कोणत्याही इताहासातील
चांगली चर्चा
एकुणच रथी महारथी लोकांच्या
अरारा
त्रुटी = गरीबी, पण कसली?
- >>खूपश्या प्रसंगातले पार्श्वभूमीवरचे आवाज आणि पडद्यावर चाललेला प्रसंग यांचा परस्परसंबंध कळालाच नाही. (बहुतेक नसावाच.)
- >> त्यांच्या जीवनातल्या ठळक घटना नुसत्या ओळीने मांडल्या आहेत. त्यात परस्परसंबंध ठेवून किंवा एक सुसंगती आणून त्याचा एकच एक सलग पट तयार करणे (हे माझ्या अल्पज्ञानानुसार) हे पटकथेचे काम. इथे अभिराम भडकमकर नावाच्या मातब्बर नावाने संपूर्ण निराशा केली.
- >> हा चित्रपट त्या सगळ्याच व्यक्तिरेखांशी अनभिज्ञ असणारा प्रेक्षक बघत असेल तर त्याला कसे कळणार?
- >> चित्रपट हे एक स्वयंपूर्ण एकक आहे असे समजून त्या चौकटीच्या आत, महत्वाच्या व्यक्तिरेखा तरी नीट उभ्या करायला नकोत? ते झालेच नाहीये.
- >> पण मग त्या प्रसंगाचा शेवट करताना 'मर्द का बच्चा' वगैरे तद्दन फिल्मी डायलॉग्ज वापरून त्या पूर्णच प्रसंगाला एकदम टुकार पातळीवर आणले. काय गरज होती? माहित नाही.
आता यातल्या प्रत्येक त्रुटीमागे पुरेसं आर्थिक पाठबळ नव्हतं असं मानून दोष त्याच्या माथी मारता येईल का? बरं चित्रपट तसा स्वस्तात बनवलेला नक्कीच वाटत नाही. मग तथाकथित गरीबीमागे लपून आणि मी दुसऱ्या एका प्रतिसादात वर म्हटल्याप्रमाणे अल्पसंतुष्ट वृत्ती बाळगून आपण आपल्याच संस्कृतीला कद्रू करतो आहोत का? कल्पनादारिद्र्य म्हणतात ते हेच का?एक वाचनिय चीरफाड!