पुढचं पाऊल (१९५०) – पण नंतर काय?
नंदा खरे यांचा मानसपुत्र 'अंताजी'विषयीच्या या धाग्यावर नुकतीच झालेली चर्चा ताजी असतानाच योगायोगानं १९५० सालचा ‘पुढचं पाऊल’ हा चित्रपट अंशत: पाहण्यात आला आणि पुन्हा एकदा त्या चर्चेची आठवण झाली. चित्रपटाचं ढोबळ कथासूत्र इथे वाचता येईल. त्यात मांडलेला विचार आणि तो मांडण्याची पद्धत रोचक वाटते. प्रमुख पात्र असणारा गावातला किसना महार सालस, गुणी, कष्टाळू पण भडक माथ्याचा असतो. गावात झालेला अपमान सहन न होऊन तो पैसे कमवायला मुंबईत येतो. पैसे कमवून गावी जमीन घ्यावी आणि मग आपल्या हक्काची शेती पिकवण्यात खुशाल आपला घाम गाळावा, असा त्याचा विचार असतो. तिथं एका हॉटेलमालकाशी त्याची ओळख होते. ‘मामा काणे’ धाटणीचा हा ‘मामा चिपळूणकर’ असतो. त्याच्यामुळे किसनाला जेवणखाण मिळतंच, पण एक हितचिंतकसुद्धा मिळतो. वरवर कठोर आणि हिशेबी वाटणारा हा मामा आतून खोबऱ्यासारखा गोड असतो. किसनाला तमाशात ढोलकी वाजवण्याचं काम मिळतं, पण तमासगीर बाई त्याला फसवते. त्यानं तमाशात कमावलेले पैसे तमासगीर बाई हडपते. किसना रस्त्यावर येतो. तेव्हा एक चवलीही न घेता हा मामा त्याला आपल्या हॉटेलात रहायला जागा देतो आणि त्याच्या जेवणाची सोय करतो. इतकंच नव्हे, तर पेचात पडलेल्या आणि निराश किसनाला सल्लाही देतो की कोणताही धंदा हलका नसतो; त्यामुळे किसनानं तमाशात काम करणं यात काहीही गैर नाही. पण काही माणसं वाईट असू शकतात आणि ती कोणत्याही धंद्यात असू शकतात. किसना शिकलेला असता आणि थोडा सावधपणानं वागता तर त्याचे पैसे असे गेले नसते. त्यामुळे किसनाला हुरूप येतो. पुरेशी कमाई करून तो गावी जातो. अखेर सगळं काही चांगलं होतं.
चित्रपट अर्थात सामाजिक आशय मांडणारा आहे: महारानं आपला स्वाभिमान आणि सचोटी सोडू नये; शिक्षण घ्यावं; मग तो नाडला जाणार नाही. सर्व व्यवसाय प्रतिष्ठेचे असतात. शहरात खेड्याइतकी जातपात पाळली जात नाही; शहरात संधी असतात; कुणीही तिथं येऊन मेहनतीची कमाई करू शकतं. पण मग शहरात येऊन पैसा आणि शहाणपण कमावलेल्या अशा माणसांनी पुन्हा खेड्यात जाऊन तिथली परिस्थिती बदलावी, वगैरे शिकवण चित्रपटाच्या माध्यमातून दिलेली आहे. शहरात महाराला मदत करणारा, माया देणारा आणि व्यवहारोपयोगी सल्ला देणारा मामा ब्राह्मण असतो. म्हणजे ब्राह्मणानं आपलं शहाणपण इतरांना दिलं की अंत्योदय होतो आणि मग एकंदर समाजाची प्रगती होते. थोडक्यात, पुरोगामी, उदारमतवादी आणि सर्वसमावेशक विचार चित्रपटात मांडलेला आहे.
या चित्रपटाच्या निर्मितीमागे कोण कोण होतं हे पाहिलं तर काही गोष्टी अधिक प्रकर्षानं लक्षात येतात. किसना महाराची मुख्य भूमिका पु.लं.नी केली आहे. मामाच्या भूमिकेत राजा परांजपे आहेत. तेच दिग्दर्शक आहेत. शिवाय किसनाच्या भावाच्या भूमिकेत विवेक (बहुधा अभ्यंकर; चू.भू.दे.घे.) हा तेव्हाचा लोकप्रिय नट आहे, तर किसनाचे विशालहृदयी वडील ग.दि.माडगूळकर आहेत. गीतं त्यांनीच लिहिली आहेत. संगीत सुधीर फडके यांचं आहे. पटकथा बहुदा व्यंकटेश माडगूळकरांची असावी. बाकी फक्कड करमणुकीसाठी हंसाबाई वाडकर तमासगीर आहेत. ‘झाला महार पंढरीनाथ’ सारख्या भजनाबरोबर दिलखेचक ‘जाळीमंदी पिकली करवंदं’, शेतावर रोमॅन्टिक युगलगीत ‘मोट चालली मळ्यामंदी’ वगैरे सर्व लोकप्रिय मालमसाला यात आहे. एकंदर हा मुख्य प्रवाहातला, रंजक आणि आता बाळबोध वाटू शकेल असा साधासरळ चित्रपट आहे; समांतर किंवा प्रायोगिक चळवळीतला गहन वगैरे चित्रपट नाही.
अंताजीच्या धाग्यावर शिवाजीच्या राजवटीतली जी लोकहितकारक सर्वसमावेशकता उल्लेखली होती, ती पुन्हा इथे १९५०साली अवतरलेली दिसते. सर्वसमावेशक भारतीय स्वातंत्र्यलढा आणि महाराष्ट्रातली प्रबोधनाची चळवळ हे यामागचे कारणीभूत घटक असावेत असं वाटतं. पण मग हे पहाता काही प्रश्न पडतात:
गदिमा-सुधीर फडके-पुलं-राजा परांजपे अशी सगळी मंडळी आजही मराठी समाजमनाच्या ‘गेले ते सोनेरी दिवस’छाप स्मरणरंजनात वंदनीय असणारी नावं आहेत. पण पुरोगामी, उदारमतवादी वगैरे आज शिव्या असाव्यात असं मराठी संकेतस्थळं, ब्लॉग वगैरे पाहता वाटत राहतं. हिंदू संस्कृती, अंधश्रद्धा, परप्रांतीय, स्त्रिया, वगैरे अनेक गोष्टींबाबत अजूनही अत्यंत बाळबोध स्वरूपाचे आरोप-प्रत्यारोप आणि वाद-प्रतिवाद घडत शतकी प्रतिसादांचे धाग्यांमागून धागे इथे (म्हणजे या आणि इतर संकेतस्थळांवर) निघत रहातात. म्हणजे शिवाजीच्या काळात गिरवलेला धडा आपण उत्तर पेशवाईत विसरलो (आणि मग त्याचा फायदा इंग्रजांना झाला,) तसंच आता पुन्हा होत आहे का? की प्रतिगामी ते पुरोगामी आणि मग पुन्हा प्रतिगामी अशा आवर्तनांत आपण फिरत राहतो? पण मग समंजस, सर्वसमावेशक जनहितात आपलं दीर्घगामी हित होतं (शिवाजीचं स्वराज्य, स्वातंत्र्यचळवळ वगैरे) हे आपण पुन्हापुन्हा विसरतोय का? आणि तसंच असेल तर मग इतिहासापासून धडे घेण्यात मराठी माणूस कमी पडतो असा सरसकट निष्कर्ष काढावा का?
यावर इथल्या इतर वाचकांना काय वाटतं हे जाणून घ्यायला आवडेल.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
साडेतीन टक्के
उत्तम विचारांना खतपाणी
मिस्सेलॅनियस
उपक्रमविषयक मी वेगळं लिहीलं
चॅलेंज ?
चोप्य पस्ते करा.
"ते पुढे गेले"
पण पुरोगामी, उदारमतवादी वगैरे
हमे (वैचारीक) गरिबी हटानी है!
कोणताही माणूस पूर्ण प्रतिगामी
व्यत्यास
आणखी काही मुद्दे.
अवांतर वाटेल पण ...
हा लेख खूपच निराशावादी वाटला.
काही मुद्द्यांना प्रतिसाद
प्रतिसाद
आपल्याइथली सामाजिक ठेवण,रचना
आज जालावर जे प्रतिगामी वाटतात
कालपरत्वे बदल...
खांडेकर
काही मुद्दे अधिक स्पष्ट
"मेनेस्ट्रीम"
असं
+१
शून्यात ब्रह्मांड
चांगली चर्चा व मुद्दे
+१
एक विस्कळित विचार
९२ पुर्विचा समाज व नंतरचा
छान चर्चा...
प्रबोधन कोण करणार?
थोडीशी असहमती
इतका गहन गंभीर विषय व
वाचतो आहे
समाजमान्य पुरोगामी
नंदनला प्रतिसाद