सैयॉं निकस गये
नवरा-बायकेतील भांडणे तर आदि काळापासून चालत आलेली आहेत. कधी बायको रुसून बसते तर कधी नवरा घराबाहेर चालता होतो.
बर्याच वेळी हे कपातले वादळ असते. काही वेळाने मिटते; दिलजमाई होते. पण दरवेळी हा तिढा सहजपणे सुटतोच असे नाही. तो नाहीच आला तर मग घरातील नातेवाईक, आजूबाजूच्या आयाबाया जमा होतात आणि.... आणि दोष तिचाच असणार हे गृहीत धरले जाते. तिला जीव तोडून पटवावयाचा प्रयत्न करावा लागतो .... " प्रियकर गेला खरा पण मी काही भांडण काढले नव्हते. काही बोलले नाही, बोलाचाली झाली नाही; मी तर मान खाली करून गुपचुप उभी होते." कोणाचा विश्वास बसत नाही असे पाहिल्यावर ती सखीची साक्ष काढावयाचा प्रयत्न करते ... " माझ्यावर विश्वास नाही तर सखीला विचारा, चादर घेऊन मी पलंगावर पडलेली होते." आता सगळे चर्चा करावयास लागतात, हा गेला तरी कसा असेल ?" मग तिच्याकडे चौकशी. बिचारी म्हणते " या रंगमहालात इतके दरवाजे, खिडक्या; कसे कळणार कसा गेला ?" शेवटी हताश होऊन एवढेच म्हणते " या असल्या ताटातुटीपेक्षा लग्नच झाले नसते, कुमारी राहिले असते, तर बरे झाले असते."
सैयॉं निकस गये मै ना लढी थी !!
ना कछु बोली, ना कछु चाली
सरको झुकायें मै तो चुपके खडी थी !!
मेरा गर ना मानो तो सहेलिसे पुछो
चादर औढे मै तो पलंगा पडी थी !!
रंगमहलके दस दरवाजे
न जाने कौनसी खिडकी खुली थी !!
कहे कमाली, कबीरकी बेटी
ऐसे रिहाईसे तो कुवॉरी भली थी !!
आपल्याकडे कुटुंबातील सगळे सभासद काव्य करतात अशी दोन उदाहरणे. पहिले नामदेव व दुसरे चोखामेळा. उत्तरेत कबीर,कबीराचा मुलगा कमाल व मुलगी कमाली या सर्वांच्या नावावरील काव्य उपलब्ध आहे. वरील शोकगीत कमालीचे. पण ... नुसतेच एक शोकगीत लिहावयास कबीराचा वारसा सांगणे योग्य दिसत नाही. कमाली तर येथे "कबीरकी बेटी " असा स्पष्ट उल्लेख करत आहे. काय असावे ?
हे तर एक रुपक दिसते. जीव (आत्मा) व कुडी. बघा. कुडी किती तळमळीने सांगत आहे; किती हताश झालेली दिसते आहे. जीव आहे, त्याच्या आधिपत्याखाली बिचारे शरीर गुपचुप, मान खाली घालून उभे आहे.तो गेला. आजूबाजूचे म्हणणारच " ऑ, असा कसा मेला ? " साक्ष काढावयाची ती आजुबाजूंच्या लोकांचीच. शेवटी चादर पसरून देह पलंगावर पडला पण त्यालाही जीव कसा गेला, कां गेला, काही काहीच कळणारे नाही.
दस दरवाजे. लगेच लक्षात येणार नाही. शरीराच्या नेत्र, कर्ण, नाक, मुखादी नऊं रंध्रांमुळे शरीराला नेहमी "नवद्वारा" म्हटले जाते. इथे मात्र कमाली "दस दरवाजे" म्हणत आहे. हा दहावा दरवाजा म्हणजे "ब्रह्मरंध्र". अध्यात्मशास्त्रात, विषेशत: योगमार्गात, डॊक्याच्या टाळूच्या जागी एक रंध्र आहे असे समजले जाते. त्याला म्हणतात "ब्रह्मरंध्र". य़ॊग्याचा, संन्याशाचा प्राण या रंध्रातून बाहेर जातो. कित्येक संन्याशांच्या पंथात सन्याशी मेल्यावर त्याच्या डोक्यात खिळा मारून एक भोक पाडले जाते ! तर कमाली म्हणते आहे, " हे असेच होणार होते तर मग मी जन्माला आलेच नसते तर काय बिघडले असते ?
कै. शोभा गुर्टु यांचा आवाज फार कोमल, गोड म्हणता यावयाचा नाही. पण त्याला एक "दर्द " होता. त्यांची मराठी गाणी, "माझिया प्रियाला," "त्यानीच छेडले ग, " आठवा. त्या आवाजाला पर्याय नाही. त्यांनी "सैया निकस गये " मैफलीत म्हणावयास सुरवात केली आणि मग ते भजन त्यांचा ट्रेडमार्कच झाला. भारावून जावे असाच तो अनुभव असे. भजन येथे ऐका
शरद
वाचन संख्या
4314
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
पण त्याला एक "दर्द " होता.
उत्तम रसग्रहण ...
In reply to पण त्याला एक "दर्द " होता. by चिंतामणी
मैत्र, रंगी सारी गुलाबी चुनरिया रे
In reply to उत्तम रसग्रहण ... by मैत्र
छान रसग्रहण. घरी गेल्यवर
व्वा...!
लता बाईंच्या आवाजात
>>ऐसे रिहाईसे तो कुवॉरी भली
वाह वाह... छान छान. रसग्रहण
केव्हढी माहिती!! अन रसग्रहण
वाह्ह!!! अप्रतिम !
सुरेख
छान रसग्रहण
छान लेख..! शोभाताईंची एक खास
अप्रतिम
मस्त
अप्रतिम .. दुसरे शब्दच नाहित
शोभा ताईंची सहज गायकी आणि
रसग्रहण आवडले -याबद्दल थोडेसे अधिक