Skip to main content

मदत हवी आहे -- गोडा मसाला -

लेखक निवेदिता-ताई यांनी बुधवार, 06/04/2011 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
मला गोडा मसाल्याची कॄती हवी आहे...एकदम झक्कास झाला पाहिजे.. पाहुयात कुणाकुणाच्या काय काय पद्धती आहेत.....हा...मसाला बनवण्य़ाच्या.

वाचने 8701
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

In reply to by पंगा

नक्कीच.. साहित्य : १. थोडा वेळ २. स्कूटी, किंवा तत्सम कोणतीही दुचाकी किंवा ११ नंबरची बस (दुकान किती लांब वा जवळ आहे त्याप्रमाणात) ३. पैसे/रूपये (किती मसाला घ्यायचा आहे त्यावर ठरवावे) ४. पिशवी कृती : १. शक्यतो ..साधारण दुपारी चार नंतरची वेळ घ्यावी कारण तेव्हा जरा दुकानांमध्ये गर्दी कमी असते. २. मग स्वतःचे आवरून (ड्र्रेस , केस इ.) चप्पल/बूट घालून बाहेर पडावे. ३. दुकान जवळ असेल तर चालतच जावे. दुकान लांब असेल तर दुचाकीला किक मारावी आणि तिच्यावर स्वार होण्या आधी ओढणी, पदर नीट घट्ट बांधला आहे ना याची खात्री करून घ्यावी. ४. नेहमीचे किराणा मालाचे दुकान अथवा सुपर मार्केट गाठावे. ५. दुकानात असेल तर दुकानदार मारवाड्याला "ओ भैया/भाऊ, चाचा.." अशा नावानी संबोधावे. ६. सुपर मार्केट असेल तर कार्ट घेऊन मसाले, लोणची इ. असलेल्या आईल मध्ये जावे.. ७. दुकानात असाल तर त्या दुकानदाराला "एक बेडेकर गोडा मसाल्याहे पॅक द्या..!" असे म्हणावे. तो किती ग्रॅम वगैरे विचारेल. किती हवा आहे त्याप्रमाणे त्याला सांगून ते पॅकेट घ्यावे. त्याचे पैसे त्याला द्यावेत. ८. सुपर मार्केटात असाल तर दिसणार्‍या वेगवेगळ्या मसाल्याच्या पॅकेट्स मधून बेडेकरांचे गोडा मसाल्याचे हव्या त्या वजनाचे पॅकेट उचलावे, कार्ट मध्ये टाकावे. चेक आउट काऊंटर ला जाऊन त्याचे बिल चुकते करावे ९. ते पॅकेट स्वतः जवळ असलेल्या पिशवीत टाकावे. ती पिशवी दुचाकीला लावावी/सिट खालच्या डिक्कित टाकावी. १०. घरी यावे.. ११. हवी ती भाजी करून , त्यात ते गोडा मसाल्याचे पॅकेट उघडून त्यातला मसाला जितका हवा तितका, त्या भाजीत घालावा. भाजी झाली की जेवावे. हा का ना का. सूचना : दुकान निवडताना तिथे बेडेकरांची उत्पादने मिळतात याची खात्री करून घ्यावी. तुम्ही हे करून पहा.. आणि मसाला घरी आणल्यावर कसा वाटला हे आवश्य कळवा. :) - (आईकडचा गोडा मसाला उचलून आणणारी)प्राजु

In reply to by प्राजु

... बर्‍याच अंशी अशीच आहे. फक्त:
२. स्कूटी, किंवा तत्सम कोणतीही दुचाकी किंवा ११ नंबरची बस (दुकान किती लांब वा जवळ आहे त्याप्रमाणात)
आम्ही चारचाकी वाहन वापरतो.
३. पैसे/रूपये (किती मसाला घ्यायचा आहे त्यावर ठरवावे)
आम्ही क्रेडिट कार्ड वापरतो.
१. शक्यतो ..साधारण दुपारी चार नंतरची वेळ घ्यावी कारण तेव्हा जरा दुकानांमध्ये गर्दी कमी असते.
आम्ही शनिवारी किंवा रविवारी दुपारची वेळ निवडतो.
९. ते पॅकेट स्वतः जवळ असलेल्या पिशवीत टाकावे. ती पिशवी दुचाकीला लावावी/सिट खालच्या डिक्कित टाकावी.
आम्ही दुकानदाराकडून मिळालेली प्लॅपि वापरतो. प्लॅपि चारचाकी वाहनाच्या ट्रंकमध्ये टाकतो. असे काही मामूली फरक आहेत. ज्याचीत्याची पद्धत निराळी, नाही का?

म्हणजेच काळा मसाला. साहित्य १/२ कि. धने, २०० ग्रॅम जिरे, १०० ग्रॅम काळे तीळ (कारळे नव्हे), १० ग्रॅम प्रत्येकी मिरी, लवंगा, शहाजिरे, दालचिनी, हिंग १५/२० तमालपत्रे, २/३ दगडफुले, एकेक चमचा मोहरी आणि मेथी, आणि २ सुक्या खोबर्‍याच्या वाट्या. भाजण्यासाठी जरासे तेल. कृती: सर्व वस्तू तेलावर स्वतंत्रपणे भाजाव्यात. तीळ खोबरे कुटावे, इतर भाजलेल्या वस्तू कुटाव्यात (कुटण्याऐवजी मिक्सर मधे बारीक करू शकता) सगळे एकत्र करून थोडे मीठ घालून बरणीत भरून ठेवा.

In reply to by पैसा

म्हणजेच काळा मसाला.
'गोडा मसाला म्हणजेच काळा मसाला' अशीच आमचीही समजूत होती. पण यावरून येथे आधीही बरेच वाद झालेले आहेत. विदर्भाचे बाजूस वेगळ्याच कशालातरी 'काळा मसाला' म्हणतात, आणि तो मांसयुक्त पदार्थ शिजवण्याकरिता वापरतात, असे कळते.

In reply to by पंगा

नावात काय आहे? आम्ही कोकणी लोक यालाच गोडा मसाला आणि काळा मसाला म्हणतो! निवेदिताला मांसाच्या पदार्थात घालायचा मसाला नकोय!

In reply to by पैसा

...दम आहे.
आम्ही कोकणी लोक यालाच गोडा मसाला आणि काळा मसाला म्हणतो!
आम्हीही म्हणतो. बाकी चालू द्या.

In reply to by पैसा

बाजारातून आणलेला (आणि आईनी प्रेमाने करून दिलेलाही) मसाला लवकरच खवट होतो. त्यामुळे मी खोबरे सोडून बाकी वस्तू घालून हा मसाला बनवतो. सुक्या खोबर्‍याची पूड मग स्वयंपाकाच्या दिवशी मिसळून घालायची. ताजा छानच लागत असणार. अगदी कमी प्रमाणात (एका दिवसाच्या आमटीसाठी) पाकृची प्रमाणे मिळाली तर हवी आहेत. (जर १/२ किलो धन्यांना १० ग्रॅम लवंगा... तर दोन चमचे धन्यांना किती? हे गणित पटकन होत नाही. त्याऐवजी २ चमचे धने, १ चमचा जिरे, १/२ चमचा तीळ... पुढे काय? दोन लवंगा, दोन मिरी, चिमुटभर शहाजिरे....?)

In reply to by धनंजय

एक वाटी सधारण १००/१२० ग्रॅम तर एक चमचा ५/७ ग्रॅम चा असतो. त्यावरून प्रमाण ठरवा. २ चमचे म्हणजे १०/१५ ग्रॅम धने असतील तर लवंगा वगैरेच तुमचं प्रमाण बरोबर आहे. चव आणि वासात दर वेळेला थोडा थोडा फरक होईल एवढंच!

In reply to by धनंजय

माझ्याकडचा मसाला तरी खवट नाही झाला इतक्या वर्षात! सुके खोबरे मंद आचेवर सोनेरी भाजून घेतले की झाले. दरवेळी भारतातून आणते (घरी केलेला) पण एकदोनवेळा संपला मग इथेच करणे सुरु केले. चांगला होतो. आई आली की तीही जाण्याआधी मसाला करून ठेवते.;)

In reply to by रेवती

रेवती, तु मसाला तयार करण्यासाठी नेहमीचा मिक्सर वापरतेस का? की कोणता स्पेशल? मी इथे काही लोकांकडुन ऐकले होते की काही दुकानात भारतीय पद्धतीचा सुमीतचा मिक्सर मिळतो, २००-२५० डॉलर्सला :(. इतके पैसे त्याच्यावर घालणे योग्य वाटत नाही, त्यातुन जर जास्त वापरला नाही तर काय करायचे हा प्रश्नही आहेच.

In reply to by पैसा

२/३ दगडफुले म्हणजे आपल्याला बादेलफूल किंवा बादयान (अ‍ॅनिस्टार) म्हणायचे आहे का? माझ्या अल्प माहितीप्रमाणे दगडफुले २/३ अशी मोजता येत नाहीत. ती विशिष्ट दगडावरची सुकलेल्या शेवाळासदृश पातळ साल असते. जाणकारांनी खुलासा करावा.

साहित्यः-अर्धा किलो धणे,पाव किलो जिरे,पाव किलो तिळ्,पाव किलो सुके खोबरे,२५ ग्रॅम शहाजिरे,प्रत्येकी १० ग्रॅम दगडफूल्,दालचिनी,लवंगा,मसाला वेलदोडे,नागकेशर्,मिरी,लाल मिरच्या,हळकुंड,१ चमचा मेथी दाणे,१ खडा हिंग,थोडे मिठ. कॄती:-तिळ नुसतेच भाजा.खोबर्याची वाटी गॅसवर काळी भाजुन घ्या.तेलावर हिंग भाजुन काढा.मेथी सोनेरी तळा. बाकी गरम मसाला जरा जास्त परता.धणे थोडे तेल घालुन परता.जिरे तेलावर थोडे काळसर परता.सर्व कुटून त्यात थोडे मिठ घाला. हिंगाचा एक खडा नुसताच मध्ये ठेवा.म्हणजे वास चांगला येईल्.बरणीत भरुन ठेवा.मिठ घातल्यामुळे खोबर्याला वास येणार नाही.

गरम-काळा-साधा-कांदा मसाले, हळद , तिखट,मेतकूट, पापड, लोणची, सांडगे, पापड्या, कुरडया, उपासाच्या चकल्या, कोकमे-आमसुले,छुंदा, साखराआंबे- मुरांबे -दगडांबे, सरबते, शिलाजीत-प्रवाळ्युक्त गुलकंद, इ इ इ येउद्या @ ज्योति प्रकाश तुम्ही मालवणी मसाला बद्दल लिहा .

धन्यवाद...सगळ्यांना....आपण गोडा मसाला बनवणे व आणणे ... हे अगदी छान सांगीतले...ह तर आता ११ नं ची बस म्हणाल तर ती नाहीये आमच्या इथे पण एक तत्सम दुचाकी आहे...आजच आणते....

चकली ब्लॉगची रेसिपी वाढणी: साधारण पाऊण किलो साहित्य: १/२ किलो धणे, १०० ग्राम जिरे, १०० ग्राम तिळ, १५० ग्राम सुके खोबरे, ५ ग्राम काळी मिरी (साधारण १०-१२ मिरे) ५ ग्राम लवंगा (साधारण १०-१२ लवंगा),५ ग्राम दालचिनी (४ इंचाच्या २ काड्या), ५ ग्राम तमालपत्र (५ ते ६ पाने) १० ग्राम खडा हिंग, २ चमचे मिठ, १/४ कप तेल कृती: १) खोबरं किसून घ्यावे व कोरडेच खमंग भाजून घ्यावे. भाजलेले खोबरे बाजूला एका ताटात काढून ठेवावे. तिळ आणि जिरे वेगवेगळे खमंग भाजून घ्यावे. दोन्ही भाजताना आच मध्यम ठेवावी म्हणजे खोबरे किंवा तिळ जळणार नाही. २) कढईत तेल गरम करून १० ग्राम खडा हिंग तळून घ्यावे व एका वाडग्यात काढून ठेवावे. ३) नंतर त्याच तेलात लवंग, दालचिनी, तमालपत्र, आणि मिरी वेगवेगळे तळून घ्यावे. हे मसाले बाजूला काढून घ्यावे. ४) उरलेल्या तेलात धणे चांगले खमंग भाजून घ्यावे. ५) तळलेले जिन्नस (लवंग, दालचिनी, तमालपत्र, आणि मिरी) खलबत्त्यात कुटून घ्यावेत आणि मिक्सरमध्ये एकदम बारीक करावेत. धणे मिक्सरमध्ये बारीक करावेत. हिंग पूड होईस्तोवर कुटावे. जिरे मिक्सरमध्ये बारीक करावे. बारीक केलेले हे सर्व जिन्नस बारीक चाळणीतून चाळून घ्यावे. चाळणीत उरलेला जाडसर भाग परत कुटून घ्यावा आणि चाळावा. ६) भाजलेले खोबरे आणि तिळ वेगवेगळे कुटून अथवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. ७) चाळलेल्या मिश्रणात भाजून कुटलेले खोबरे व तिळ मिक्स करावे. मिठ घालून निट मिक्स करून घ्यावे. तयार मसाला हवाबंद डब्यात भरून ठेवावा.

In reply to by RUPALI POYEKAR

चकली ब्लॉगची रेसिपी प्रमाणे केला गोडा मसाला.... मस्त झालाय..धन्यवाद....त्याबरोबर तेल व भाकरी असे खावुनही झाले...