Skip to main content

झाशीच्या राणीवरील अन्याय

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 05/04/2011 07:54 या दिवशी प्रकाशित केले.
झी टिव्ही वरील झांसी की रानी ही मालिका मी बर्‍यापैकी नियमितपणे पहातो. पुण्यात राहून शाळेच्या पुस्तकात किवा इतर माध्यमातून झाशीच्या राणीच्या कर्तृत्वाचा यथार्थ परिचय कधिच झाला नव्हता. शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकात दोन-चार ओळीत तिला गुंडाळण्यात आले होते. टिव्ही वर चालू असलेली मालिका इतिहासाचे reconstruction आहे, हे मला मान्य आहे. त्यामुळे काही ठिकाणी (प्रसंगात) विशेषत: संवादामध्ये ही मालिका दर्जा घसरून हिंदी सिनेमा प्रमाणे संवंग बनते. त्यामुळे तपशीलाचा अपवाद केला तर मालिकेत चित्रीत केलेल्या घटना या अस्सल असाव्यात ( म्हणजे कपोलकल्पित नसावेत). कारण तसं झाल असत तर इतिहास बदलला म्हणून टिकेची झोड उठवायला लोकांनी कमी केले नसते. काल या मालिकेत एक महत्वाची घटना दाखवली गेली. ती म्हणजे नेल्सन नावाच्य ईस्ट इंडिया कंपनीच्या क्रूर अधिकार्‍याला झाशीच्या राणीने हत्तीच्या पायी दिले. झाशीच्या राणीच्या कारकिर्दीतील ही घटना मला तिच्या लढयातील कळसाध्याय वाटली. कारण ब्रिटिशांच्या सत्तेला इतका मोठा झटका एका स्त्रीने दिला याचे कौतुक वाटते. अफझलखानाच्या वधानंतर आपल्या इतिहासात वध सांगितला जातो तो चाफेकरांनी केलेला रॅण्ड्चा. पण त्याच वेळेस महाराष्ट्रातील इतिहासकारानी झाशीच्या राणीच्या अतुल्य शौर्यावरून जो बोळा फिरवला आहे त्याचे दू:ख झाले.

वाचने 3839
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

झाशीच्या राणीच्या कारकिर्दीतील ही घटना मला तिच्या लढयातील कळसाध्याय वाटली. कारण ब्रिटिशांच्या सत्तेला इतका मोठा झटका एका स्त्रीने दिला याचे कौतुक वाटते. अफझलखानाच्या वधानंतर आपल्या इतिहासात वध सांगितला जातो तो चाफेकरांनी केलेला रॅण्ड्चा. पण त्याच वेळेस महाराष्ट्रातील इतिहासकारानी झाशीच्या राणीच्या अतुल्य शौर्यावरून जो बोळा फिरवला आहे त्याचे दू:ख झाले. १०० % सहमत नुसते इतिहासकार नव्हे तर लेखक/कवी यांनासुद्धा तिचा पराक्रम अपवादानेच दिसला. मराठीत भा.रा.तांबे यांचे " रे हिंद बांधवा थांब या स्थळी अश्रू दोन ढाळी" आणि सुभद्राकुमारी चौहान यांच्या "खूब लढी मर्दानी वो तो झासीवाली रानी थी" (कवितेत त्यांनी राणीच्या बालपणाचे, लग्नाचे, वैधव्याचे, ब्रिटिशांच्या मुजोरीचे, राणीने शर्थीने दिलेल्या झुंजीचे आणि तिच्या बलिदानाचे यथार्थ वर्णन केले आहे) या व्यतिरीक्त साहित्य रचना डोळ्यासमोर येत नाहीत.

युयुत्सु कोणत्याही स्त्री वर कोणत्या ही प्रकार चा अन्याय होतो/झाला.... असा लेख काढत आहेत्..हे बघून मी झीट येऊन पडले आहे.

In reply to by सविता

+१ बेशुद्ध पडलो आहे!! युयुत्सुंचा आयडी हॅकला असावा अशी एक शंका येऊन गेली! बेशुद्धावस्थेत होतो तरी शंका आली! जाणकारांनी शंकानिरसनाचा उजेड पाडावा! --असुर

>>महाराष्ट्रातील इतिहासकारानी झाशीच्या राणीच्या अतुल्य शौर्यावरून जो बोळा फिरवला आहे त्याचे दू:ख झाले. मालिकेत दाखवलेला एखादा प्रसंग बघून इतके सरधोपट आणि अन्यायकारक विधान करणे चांगले नाही. झाशीच्या राणीवर कुणीही अन्याय केलेला नाही. तिचा पराक्रम वादातीत आहे. म्हणूनच आजही एखादी धाडसी आणि आक्रमक स्त्री दिसली, की तिला 'झाशीची राणी' असे कौतुकाने म्हटले जाते. चांदबीबी, जिजाऊ, कित्तूरची राणी चन्नमा, अहिल्याबाई होळकर आणि राणी लक्ष्मीबाई या इतिहासातील 'पराक्रमी पंचकन्या' असल्याचे प्रत्येकाला लहानपणापासून माहीत असते. गोडसे भटजींच्या अगदी जुन्या प्रवास वर्णनात राणी लक्ष्मीबाईचे प्रत्यक्ष वर्णन, शौर्य, तत्कालीन सामाजिक व राजकीय स्थितीचे यथार्थ विवेचन आहे. इतिहासकारांनी ते अस्सल आणि प्रमाणभूत मानले आहे. मग 'अतुल्य शौर्यावरुन बोळा फिरवला' इतके टोकाचे विधान कशाला? नेल्सनला शिक्षेसारखे आणखी प्रसंग समजले तर राणी लक्ष्मीबाईचे चित्र परिपूर्ण होत जाईल, हे खरेच, पण म्हणून आजवर रेखाटलेले चित्र काळेकुट्ट आणि बदनामीकारक मुळीच नाही. महाराष्ट्रातील इतिहासकारांवर काही विशिष्ट संघटना विखाराने तुटून पडल्या आहेतच. आपणही भलताच मुद्दा घेऊन 'एक पत्थर तो तबियत से उछालो यारो!' म्हणत कशाला हात धुऊन घ्यायचा?

In reply to by योगप्रभू

"गोडसे भटजींच्या अगदी जुन्या प्रवास वर्णनात राणी लक्ष्मीबाईचे प्रत्यक्ष वर्णन, शौर्य, तत्कालीन सामाजिक व राजकीय स्थितीचे यथार्थ विवेचन आहे. इतिहासकारांनी ते अस्सल आणि प्रमाणभूत मानले आहे." हे पुस्तक आपल्या वाचनात आले आहे काय? असल्यास, ते कुठे मिळेल इतके कृपा करून सांगा...खूप वर्ष झाली हे पुस्तक हवे आहे.

In reply to by इष्टुर फाकडा

ते पुस्तक गोडसेभटजींचं, "माझा प्रवास". http://res0.esnips.com/doc/12bcba04-2236-469f-9d18-30ef5e62fc1f/majha-p… इथे पीडीएफ आणि डाऊनलोड करण्यासाठी फाईल आहे.

पण त्याच वेळेस महाराष्ट्रातील इतिहासकारानी झाशीच्या राणीच्या अतुल्य शौर्यावरून जो बोळा फिरवला आहे त्याचे दू:ख झाले.
भयानक सहमत आहे. युयुत्सु ह्यांनी आता ह्या अन्यायाची जाणिव झाल्यामुळे तातडीने झाशीच्या राणीचे चरित्र महाखंडात लिहुन जनतेसमोर आणावे अशी विनंती.

"पण म्हणून आजवर रेखाटलेले चित्र काळेकुट्ट आणि बदनामीकारक मुळीच नाही." "आजवर रेखाटलेले चित्र काळेकुट्ट आणि बदनामीकारक" आहे असे मी कुठे म्हटले. मी एव्हढेच म्हटले की तीच्या कर्तृत्वावरून बोळा फिरवला गेला आहे. मी त्याची यथायोग्य कारणेही दिली आहेत. स्वातंत्र्यसंगामातील ब्रिटिश अधिकार्‍यांच्या हत्या ज्या प्रमाणात स्फूर्तीच्या कथा बनल्या त्या अंगाने बघता ही तर आद्य हत्या ठरते पण तीचा उल्लेख ही आजवर केला गेलेला नाही. हा अन्याय कुणावर आणि कुणि केला स्वत:शीच याचे उत्तर द्या.

झी टिव्ही वरील ही मालिका स्वतःच झाशीच्या राणीवर एक घोर अन्याय आहे. अनेक कॉमेडी मालिका येतात त्यात ही एक कॉमेडी मालिका म्हणुन आम्ही सोडुन दिली . असो .. :)

In reply to by टारझन

हेच म्हणायला आलो होतो..... असाच अन्याय बाजीरावावर नितीन देसाईंनी केल्याचे स्मरते. बहुदा अजुनही चालु असावा.

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

+ १

टीव्ही मालिका हा झाशीच्या राणीवर अन्याय आहे. पण युयुत्सुनी एका महिलेची बाजू घेतल्याबद्दल त्याना जोरदार पाठिंबा!

झाशीची राणी पराक्रमी असणारच याबाबत शंका नाही. पण आम्हाला इतिहासात फक्त ,ती तटावरुन घोडा फेकून पळाली ,एवढेच वाचल्याचे आठवते आहे. तिची, प्रत्यक्ष लढाईत मर्दुमकी गाजवल्याची वर्णने वाचायला आवडतील. इतिहासतज्ञांनी दुवा द्यावा. त्यामुळे लहानपणी नुसती पळून जाणारी स्त्री शूर कशी, हा बाळबोध प्रश्न आम्हाला पडला होता.

तीच्या कर्तृत्वावरून बोळा फिरवला गेला आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई शूर आणि धाडसी होती यात शंकाच नाही. पण इतिहासाने तिच्या कर्तृत्वाची दखल घेतली आहे. खरा अन्याय झालाय तो तिच्या घोड्यावर...:) त्याने जर तटावरून उटी मारायला ऐनवेळी नकार दिला असता तर राणी काय करणार होती? आपसूक इंग्रजांच्या हातात सापडली असती.... आपल्य जीवावर उदार होऊन (आणि पाठीवर दीड माणसांचं वजन घेऊन!!) तटावरून जंप घेणं सोपं नाही महाराजा!!!‍ त्या घोड्याच्या कर्तृत्वावरून बोळा फिरवला गेला आहे याबद्दल इतिहासाचा नि‍षेध!!!! :)

झाशीच्या राणीचे माहित नाही पण हा चर्चाप्रस्ताव टाकून युयुत्सुंनी त्यांच्या मिपा कारकिर्दीवर बोळा फिरवला आहे. :(

शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकात दोन-चार ओळीत तिला गुंडाळण्यात आले होते. अर्रर्र! त्यावेळच्या एखाद्या स्रिद्वेष्ट्याचे हे काम तर नव्हे? (हा प्रश्न आहे.) महाराष्ट्रातील इतिहासकारानी झाशीच्या राणीच्या अतुल्य शौर्यावरून जो बोळा फिरवला आहे तसा त्यांनी बर्‍याचजणांच्या शौर्यावरून बोळा फिरवलाय. ते सगळं जाऊ दे......हा धागा युयुत्सुंचा आहे यावर विश्वास बसत नाही.