Skip to main content

फुकट ते पौष्टिक?

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 14/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
"सर, यू हॅव बीन सिलेक्‍टेड फॉर ए फ्री गिफ्ट व्हावचर...' लाडिक आवाजातल्या एका "तरुणाचा' दोन दिवसांपूर्वी फोन आला होता. सहसा अशा फोनना काय उत्तर द्यायचं, त्याला आता मी सरावलोय. पण इथे जरा माझ्या इंटरेस्टचा विषय होता. चकटफु पर्यटनाचा. "क्‍लब महिंद्रा'कडून हा फोन होता. त्यासाठी आम्हा दोघांना जोडीनं त्यांच्या हापिसात गिफ्ट व्हावचरचा आहेर साकारण्यासाठी जायचं होतं. रविवारचा दिवस ठरला. दुपारी साडेबाराला बोलावलं होतं, बाणेर रोडवर दुपारच्या उन्हात बोंबलत तो पत्ता शोधेपर्यंत एक वाजला. एक तासाचं प्रेझेंटेशन ऐकावं लागणार, ते कुठल्या तरी मेंबरशिपची गळ घालणार, कशात तरी अडकवण्यासाठी भुलवणार, सगळं ठाऊक होतं. पण काहीही घ्यायचं नाही, असं आधीच ठरवलं होतं. अर्थात त्यांच्याच ऑफिसात त्यांच्या गळ घालण्याला बळी न पडता त्यांच्याकडून गिफ्ट व्हावचर घेऊन बाहेर पडण्यासाठी जरा जास्तच निगरगट्टपणा हवा होता. तेवढा आजच्या पुरता अंगी आणला होता. प्रेझेंटेशन म्हणजे त्यांच्या योजनेचं आणि कंपनीचं दुकान लावण्याचा कार्यक्रम होता. पर्यटन किती वेळा करता, कधी करता, किती खर्च करता, कसं करायला आवडेल, परवडलं तर फाइव्ह स्टार हॉटेल आवडेल का वगैरे प्रश्‍न विचारून झाले. वरवरची अशी माहिती घेण्यात काहीतरी गौडबंगाल आहे, हे लक्षात येत होतंच. पण आमचा अंतिम निर्णय आधीच तयार असल्यानं फारशी चलबिचल होत नव्हती. माहिती देणाऱ्या माणसानं चार-पाच कोऱ्या कागदांची चवड सोबत घेतली होती. त्यावर गिरबटावून तो आम्हाला कायकाय समजावून देत होता. अर्थातच तुम्हाला काय आवडतं आणि त्याचा स्टॅंडर्ड एवढ्याच पैशात वाढवून मिळाला, तर आवडेल का, हे विचारण्यावर भर होता. आमची बहुतांश उत्तरं सकारार्थीच होती. शेवटी दीडेक तासांनी त्यांनी मुद्द्याला हात घातला. "क्‍लब महिंद्रा'च्या मेंबरशिपची ती ऑफर होती. या ऑफरमध्ये दोन प्रकार होते. एक स्पेशल ऑफर आणि दुसरी साधी ऑफर. साध्या ऑफरमध्ये ज्या दिवशी मेंबरशिप घेऊ, त्याच दिवशी दर वर्षी त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी फिरायला जायची अट होती. ते ठिकाण देखील ते तीन दिवस आधी सांगणार. त्यात आपण प्रवास वगैरे सगळी व्यवस्था करायची. म्हणजे ही ऑफर फक्त दिखाऊच होती. कुणी घेऊ नये अशीच. स्पेशल ऑफर आकर्षक होती. त्यात फाइव्ह स्टार हॉटेलात राहण्याची सोय दिवसाला हजार रुपये या दरानं करून देण्याचं प्रलोभन होतं. तिकीटांची व्यवस्था, आणायला-जायला टॅक्‍सी सेवा, तिथल्या आणखी सुखसोयी, अशी काय काय व्यवस्था होती. त्यासाठी सगळ्यात स्वस्ताची ऑफर अशी होती - दर महिन्याला 4085 रुपये चार वर्षं भरायचे. ही रक्कम साधारण दोन लाखांपर्यंत जाते. त्यांनी दाखविलेल्या एकूण भरायच्या रकमेत मात्र एक लाख 60 हजार दाखविले होते. शिवाय त्याच्या दहा टक्के म्हणजे 16 हजारांची रक्कम आजच्या आज, ताबडतोब भरायची होती. व्हिसा, मास्टर कार्ड चालणार होतं.! अर्थातच, याची कल्पना आम्हाला आधी देण्यात आली नव्हती. बहुधा मी पंधरा-वीस हजार रुपये शिशात घेऊन फिरणारा मालदार माणूस असावा, अशीच त्यांची अपेक्षा असावी. असो. त्याशिवाय दर वेळी भारतात किंवा परदेशात पर्यटनाला जाताना "फक्त' 9 हजार भरायचे होते. म्हणजे या नऊ हजारांत सात दिवसांची हॉटेलची राहण्याची सोय होणार होती. साधारणपणे दिवसाला साडेनऊशे रुपयांत फाइव्ह स्टार हॉटेल! म्हणजे, असा त्यांचा दावा होता. त्याआधी भरलेल्या दोन लाखांचा हिशेब ते जमेत धरत नव्हते. सगळ्यात महत्त्वाची मेख म्हणजे ही स्पेशल ऑफर त्या-त्या दिवसापुरतीच लागू होती! घरी जाऊन विचार करू, मग सांगू वगैरे काही नाही! आज, आत्ता, ताबडतोब!! म्हणजे 16 हजार त्यांच्या ताब्यात द्यायचे, चार वर्षे दर महिन्याला 4 हजार रुपये भरायचे. शिवाय दर वेळी फिरायला जाऊ, तेव्हा 9 हजार भरायचे. राहण्याची व्यवस्था, इतर सवलती हे सगळं झकास होतं. मला खटकल्या त्या दोन गोष्टी. एक तर आजच्या आज 16 हजारांचं डाऊन पेमेंट करायची सक्ती आणि चार वर्षांसाठीचा ईएमआय. दोन लाख रुपये भरून 25 वर्षांसाठी ही योजना वापरता येणार होती. पण आपले पैसे अडकणार होते, एवढी रक्कम दर महिन्याला परवडणार नव्हती, हे तर होतंच. शिवाय आपण पुढे-मागे खपलो, तर काय? 25 वर्षं पर्यटन करू, असं कुणी बघितलंय? भले आपलं कार्ड ट्रान्सफर करण्याची किंवा विकण्याची सवलत असली, तरी त्यासाठीचं गिऱ्हाईक कोण शोधून देणार? शिवाय आपण आधीच पैसे भरून टाकलेले असताना त्याच्या घशात फुकटात हे कार्ड कशाला घालायचं? असे बरेचसे प्रश्‍न मला पडले. शिवाय ताबडतोब निर्णय घेण्याच्या सक्तीबाबतही मनात शंकेची पाल चुकचुकली. वेळ आणि पैशांनुसार जमेल तेव्हा जमेल तिथे फिरायला जायची आपली पद्धत. यांच्यासाठी फाइव्ह स्टारमध्येच जाऊन राहा आणि त्यासाठी आधी पैसे भरा, हे उद्योग कुणी सांगितलेत? मला ताबडतोब 16 हजार वगैरे भरणं परवडणारं नव्हतं आणि दर महिन्याचा ईएमआयही. त्यातून त्यांची ही घाई म्हणजे लपवाछपवीचाच उद्योग वाटला. आम्ही त्यांना सप्रेम नकार देऊन आणि अर्थातच, फुकटातलं व्हावचर घेऊन बाहेर पडलो. येऊन-जाऊन साडेतीन तास गेले होते. दुपारचे साडेतीन वाजल्यानं सहचारिणीनंही स्वयंपाकघरावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली होती. त्यामुळं हाटिलातच हादडावं लागलं. तिथे ते फ्री गिफ्ट व्हावचर पाहताना लक्षात आलं, की तीन दिवस दोन रात्री फुकटात राहण्याची ऑफर मिळवण्यासाठीदेखील सगळ्यात जवळचं ठिकाण कुर्ग (कर्नाटक) हे होतं. "सहा महिन्यांसाठी ही ऑफर व्हॅलिड आहे,' असं सांगणाऱ्यांनी त्याच्या मागे मात्र तीनच कालावधी नमूद केले होते. त्यातला एक 20 मार्चपर्यंतचा होता, जो अशक्‍य होता. दुसरा जुलैच्या तिसऱ्या आठवड्यातला आणि तिसरा असाच कुठलातरी. म्हणजे सहा महिन्यांत जाऊ शकता, ही ऑफरही फसवीच ठरली. तुम्हाला कुणाला आलेय का अशी ऑफर? तुम्ही काय केलं त्या वेळी? की खरंच आहे काही त्यात तथ्य? प्रतिक्रियांची वाट पाहतोय. या वेळी फक्त अनुभव लिहिण्याबरोबरच दुसऱ्यांचे अनुभव कळावेत, ही मनापासूनची इच्छा आहे....तेव्हा लिहा प्लीज!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3684
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

सुमारे ८-१० वर्षांपुर्वी मलाही असेच फोन करुन फ्री गिफ्ट (दिल्ली मेड डिनरसेट) घ्यायला चेंबुरला कुठल्याश्या हॉटेलात बोलवले होते. सोबत चेकबुकही आणायला सांगितले होते (त्याकाळी डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड असला प्रकार फारसा नव्हता). बिनडोकसारखा तेही घेऊन गेलो. सगळा तोच प्रकार - छान छान ब्रोशर, वर्तमानपत्रातिल फोटो, नेत्यांबरोबर फोटो वगैरे. कंपनीचे नाव मात्र वेगळे (आता आठवत नाही); महिंद्रा तेव्हा अस्तित्वात आली नव्हती. थोडा फरक एवढाच कि काही रोखे मिळाले होते. त्याच दिवशी २५ हजाराचा चेक भरायचा होता आणी नंतर काहीहि भरावे लागणार नव्हते. पैसे भरले आणी सगळा खेळ संपला. फोन नंबर, वेबसाईट कसलाच पत्ता लागला नाही. रोखे सुद्धा काही क्लु देत नाही. २५ हजाराचे आज किती झाले असते :( कोणीही अश्या प्रलोभनाला बळी पडु नका. स्वतः केले ले पर्यटन प्लानिंग कधिही चांगले असते.

कोणीही अश्या प्रलोभनाला बळी पडु नका. स्वतः केले ले पर्यटन प्लानिंग कधिही चांगले असते. +१ मला पुण्याच्या कोहिनूर एक्झिक्युटिव्ह मधे बोलावले होते (फ्री गिफ्ट घेण्यासाठी) चेकबूक बरोबर घेउन ;) इतके फोन आले की एकदा कंटाळून जाउन आलो. (वडिलांची कृपा ) ऑफर घ्यायचीच नाही हे मनाशी पक्के ठरवून गेले की पुढचे कष्ट वाचतात. काय फिल्म दाखवात ते पाहिली, विविध बोर्ड्स दाखवले ते पाहिले, कॉफी प्यायलो, कान बंद करुन एका टेबलावर त्यांच्या सेल्स एक्झिक्युटिव्ह कडून बड्बड ऐकली. भाबीजी आपको कैसे पसंत आ रही है ना ये स्कीम ? असे मधूनच तो बायकोला विचारायचा. मग मधूनच "अरे वा ! असे का? छान ! " असे म्हणत गेलो. बाजूच्या टेबल वरुन अमक्या अमक्याने ही ऑफर घेतली म्हणून टाळ्या वाजवल्या गेल्या तेण्व्हा टाळ्या पिटल्या . मग चेक देताय ना ? अशी विचारणा झाल्यावर सव्वा फुट चेहरा करुन म्हणालो 'विचार करुन उद्या सांगतो'. त्याबरोबर तो म्हणला ' ही स्किम आजच्या साठीच आहे.' मी विचारले ' अरे पण तुमचा प्रेसेंटेशन २ दिवस चालणार आहे ना ?' तर मला असे समजले की ती ऑफर फक्त माझ्याच साठी आजच्याच दिवस त्यांनी होल्ड करुन ठेवली आहे. मग नाईलाज झाल्यासारखा तिथून उठलो, तर दारापर्यंत तो आमच्या मागे मागे येत होता. अखेरीस मी उद्याच सांगू शकेल असे १०-१५ वेळा म्हणाल्यावर त्याची खात्री पटली. मग त्याने हातात गिफ्ट ठेवली. आणि उद्यापण तुमच्यासाठी ऑफर होल्ड करुन ठेवतो अशे आश्वासन घेउन तिथून बाहेर पडलो. आणि पुन्हा फोन आले तेण्व्हा अजुन विचार करतो आहे उद्या सांगतो असे उत्तर पुढच्या ८ दिवस रोज देत होतो. पुन्हा असल्या कार्यक्रमाला जायचे तर तुझा तू जात जा असा बायको कडून सज्जड दम मिळाल्यावर ही एकदा गंमत म्हणून एकटाच "अनुभव प्लांटेशन च्या" सागाची झाडे २५ वर्षानी जबर फायदा या प्रेसेंटेशन ला एकटाच जाउन आलो. पण यावेळी निर्ढावलेला असल्याने बरेच प्रश्न विचारले.इतके की बरोबर बसलेल्याना वाटले मी कंपनीचाच माणूस आहे. ;) पण मला पटवा पटवीचा हा अनुभव नविन होता तरी आवडला. ब्रेनवॉश करायचा प्रयत्न छान असतो. ज्यानी अनुभव घेतला नसेल त्यांनी एकदा तरी अवश्य जाउन यावे.(जाताना बायको आणि चेकबुक आठवणीने घरी ठेवावे)

कोणीच काहीच फुकट देत नसतं आमच्या बिल्डींगमध्य एक काकू त्यांच्या एका १८-२० वर्षाच्या मुलाला घेऊन गेल्या होत्या असल्याच एका प्रेझेन्टेशनला...चेम्बुरला.. तिथे त्यांनी बळी पडून २०००/- चेक दिला आणि घरी आल्यावर चूक लक्षात आली...मग पळापळ करून ब्यांकेत जाऊन चेक थांबवला....अशा ठिकाणी जाऊच नये हे उत्तम.

तुम्ही क्लब महिंद्रावर विश्वास ठेवू शकता..जर ही स्किम घ्यायची इच्छा असेल तर.. पण मुळात काही प्रश्न येतातच.. १) स्किमप्रमाणे वर्षातून काही हॉटेल ५ स्टार हॉटेलमध्ये रहाण्याची सोय होते तर त्यावेळी ९००० का भरायचे? २) समजा एखाद्या वर्षी जायला नाही जमले तर? ३) बर्‍याच वेळा ही लो़कं हॉटेल फ्री ठेवतात पण खाणे/पिणे याचे सॉलिड बील लावतात..तसे असेल तर एवढा पैसा खर्च करून काय उपयोग? बाकी बरेचसे प्रश्न तुम्ही विचारले आहेतच..

In reply to by योगी९००

>> १) स्किमप्रमाणे वर्षातून काही हॉटेल ५ स्टार हॉटेलमध्ये रहाण्याची सोय होते तर त्यावेळी ९००० का भरायचे? भरायचे कारण फिरण्याची आणि ५ स्टार हॉटेलमध्ये रहाण्याची हौस कोणाची, तुमची :) >> २) समजा एखाद्या वर्षी जायला नाही जमले तर? त्या वर्षीचे सुट्टीचे दिवस कॅरी फोर्वर्ड होतात >> ३) बर्‍याच वेळा ही लो़कं हॉटेल फ्री ठेवतात पण खाणे/पिणे याचे सॉलिड बील लावतात..तसे असेल तर एवढा पैसा खर्च करून काय उपयोग? प्रश्न क़्र. 1 चे उत्तर

१२/१३ वर्षांपूर्वी असेच गेलो होतो सेमिनारला. मी फसणारच होते पण नवरा जाम अडून राहीला नशीबाने आणि ती ऑफर घेतली नाही. मी मात्र बरीच आशा लावली असावी भोळसटपणामुळे कारण त्यांचा मॅनेजर जाता जाता खूप उपरोधिक बोलायला लागला आणि चिडल्यासारखा झाला होता म्हणजे जरा त्याच संतुलन जरा ढासळल्यासारखच वाटू लागलं होतं मला.

मागच्या वर्षी डिसेंबरला गोव्याला सुट्टीला गेलो असताना अश्याच एका प्रलोभनाला बळी पडून कुठल्याश्या रीसॉर्ट्च्या स्कीम साठी गेलो होतो. कळंग़ुट बीचवर त्या रीसॉर्टचे सेल्स्मन "फ्री गिफ्ट व्हावचर" घेउन बकरे शोधत होते. मी आपला 5-6 बीयर डाउन असा तरंगत-तरंगत त्यांच्या जाळ्यात अडकलो. एकाने अतिशय कौशल्याने एक "फ्री गिफ्ट व्हावचर" मझ्या गळ्यात मारले. (माझ्यासठी माझी बायको खूप लकी आहे त्यामुळे मी असे सॉलीड गिफ्ट व्हावचर जिंकले असा जावइशोध त्याने लावल्यामुळे बायको खुष आणि मग त्या मुड्मधे माझी 5-6 बीयर डाउन कंडीशन बायकोकडून माफ म्हणून मीही खूष) गीफ्ट वाउचर वरची गीफ्ट्स: 1. आयपॅड - टच 2. लेनोवो लॅपटोप 3. फ्री ट्रिप (4 दिवस 3 रात्री) ही गिफ्ट्स वाचुन मीही "फुकट ते पौष्टिक" या मायाजालात अडकलो आणि रीसॉर्ट वर गेलो. पण तीथला अनुभव शब्दशः तुमच्या वर्णनाप्रमाणेच. फसवलो गेल्याच्या भावनेमुळे, टाळके सरकले होते, तेवढ्यात एक फॉरेनर तसलेच ग़िफ्ट वाउचर घेउन आला. त्याला मॅनेजरने अटेंड केले. त्याला विचारले "Are you intrested in Gift or our 1 hour session"? अर्थातच तो गिफ्ट म्हणाला आणि त्याला गिफ्ट देउन परत पाठवले. मला मात्र "तुम्हाला 1 तासाचे सेशन अटेंड करावेच लागेल" असे सांगुन ताटकळत ठेवले होत्ते तेही एका साध्या क्लार्कने. :) मी सटकलो होतो कारण आता बायकोच्या चेहेर्यावर ठेवणीतले हसु आले होते आणि ते फार टोचत होते ;) मी त्या फडतूस क्लार्कला मॅनेजरला भेटायचे असे म्हणालो. तो म्हणाला की मॅनेजर बिझी आहे आणि भेटू शकणार नाहि. मग मात्र मी जीभ सैल केली आणि सरळ गावठी भाषेत सुरु झालो. लगेचच "रिसेप्शनीश्ट ललना" मॅनेजरला घेउन आली. मॅनेजर इंग्रजीत चालू झाल्या-झाल्या त्यालाही एक गावठी भाषेचा नामूना दाखवला, लगेचच त्याने मलाही गिफ्ट देण्याची तयारी दाखवली. मला एका दूसरया खोलीत नेण्यात आले. जाता जाता मीही मग बायकोवर तेच ठेवणीतले हसु फेकले. ( इथेच माणूस चुकतो, पुढ्चे 2 दिवस नो बीयर;) ) मला "फ्री ट्रिप (4 दिवस 3 रात्री)" हे गीफ्ट मिळेल असे सांगण्यात आले, ठिकाण तेच फडतुस रीसोर्ट होते (जे त्यांच्या मते 4-स्टार होते) जीथे मी फसवलो गेलो होतो . मागच्या महीन्यात "क्‍लब महिंद्रा'कडून फोन आला. कुठल्याश्या पेट्रोल पंपावर भरलेल्या लकी कूपनच्या कृपाप्रसादाने मी "फ्री गिफ्ट व्हावचर" चा हकदार झालो होतो. फोनवर आम्हा दोघांना जोडीनं त्यांच्या हापिसात गिफ्ट व्हावचर घेण्यासाठी यावे लागेल असे सांगण्यात आले. गोव्याच्या अनुभावाने मी आता शहाणा झालोय.(हे माझे मत, त्यावर बायको सहमत नाही) मी उत्तर दिले, "फ्री गिफ्ट व्हावचर" घरी कुरीअरने पाठवा यायला वेळ नाही. समोरून मग बरेच पटवण्याचे प्रयत्न झाले पण शेवटी "सर तुम्ही एक फार मोठी संधी मीस करताय असे" हताश उत्तर आले आणि फोन कट झाला. सारांश: There are no FREE LUNCHES, जगात फुकट काहीही नसते आणि चुकून असलेच तर पौष्टीक तर त्याहुन नसते :)

अजिबात जाऊ नका, पैसेही घालवू नका. अशा अनेक कंपन्या आल्या आणि गेल्या आहेत. व्हाऊचरचा लोभ तरी कशाला? निट पाहिले तर ते ही परवडत नसतेच. कशाला वेळ घालवता? निर्णय घेण्याचा 'पुश' जेथे दिसतो, तेथे निर्णय लांबवावाच! देयर इज बेस्ट ऑफर ऑन मार्केट एव्हरी डे हे लक्षात ठेवा!

In reply to by निनाद

निर्णय घेण्याचा 'पुश' जेथे दिसतो, तेथे निर्णय लांबवावाच! +१ पण तिथे जाउन निर्लज्जपणाचा एकदा तरी अवश्य अनुभव घ्यावा .

फार अ‍ॅरोगंट असतात ही लोक, महिन्द्रा क्लबनच आम्हाला एकदा बोलवुन पुरे पाच तास पकवल होत. शेवटी मीच त्याला' थांब तुझ्या भाषेतच सांगते ' म्हंटल्यावर गप राहिला तो. जबरदस्त पुशी!! एकुण काय स्वस्त मे मस्त कधी काही नसत हे लक्षात घ्या, गप योग्य अन परवडतील तेव्हढ्या दमड्या खर्चा अन मोकळेपणाने मजा करा.

हम्म आम्हाला पण आला होता महिन्द्रा क्लब चा फोन्...पण जोडी ने यायचे मस्ट होते...त्यांना म्हटल आम्ही शिंगल आहोत तर त्यांचे सर नही शिंगल अलाऊड नाही..म्हटल ओके..i am not elligible so leave it..तर ते म्हणतात करा काही adjust.. फोन कट केला.या लोकांना काय बोलायच याच काहीच वाटत नाही.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

त्यांनाच विचारायचे, तुम्हीच देता का ही सोय म्हणून.
देत असतील तर किती दिवसांची व्हॅलिडिटी आहे हेही विचारुन घ्या.

क्लब महिन्द्राकडूनच. ४-५ दिवस आम्हाला पटविण्याचे प्रकार चालू होते पण आमचे नवरोजी अजिबात बधले नाहित म्हणून आम्ही वाचलो

आपण तर बॉ 'काही खायची प्यायची व्यवस्था आहे का ?' असे फोनवरच लगेच विचारतो :) ह्या प्रश्नावरुनच आमच्या विषयी योग्य तो अंदाज बांधुन आम्हाला रद्द केले जाते.

आमच्या एका (पूर्वी) अतिश्रीमंत (सध्या नुसतेच श्रीमंत;)) असलेल्या नातेवाईक कुटुंबाने ही मेंबरशीप घेतलेली आहे. आपण वर उल्लेख केलेल्या दोन प्रकारांपैकी होती कि नाही माहित नाही. त्यात परदेश प्रवासही होता. मेंबरशीप नवी असताना सगळे कुटुंब वर्षातून एकदा छोटी ट्रीप आणि वर्षातून एकदा मोठी (परदेश) ट्रीप मारायचे. नंतर नंतर बिझिनेसच्या कामामुळे कधी एखादा वगळला जायचा. साताठ देश आणि पुण्याच्या आजूबाजूची थंड (?) हवेची ठिकाणे पाहून होइपर्यंत मुले मोठी झाली आणि त्यांनी (टीनएजर असल्याने) आईवडीलांबरोबर, आजी आजोबांबरोबर फिरायला जाण्यास नकार दिला. आता सासरेबुवा नाहीत आणि आजीबाईंना वयोमानानं चालणं जमत नाही. मुलं येत नाहीत अश्या परिस्थितीत केवळ पैसे भरलेत तर जाऊया म्हणत पळापळ करीत जात असतात. परदेश प्रवासात एकदा अमेरिकेतही येऊन गेले. त्यावेळेस अमूक इतक्या दिवसातच ट्रीप 'उरकायचे' बंधन होते. सगळी पळापळ झाली, त्यांची आणि आमचीही.;)

अश्या लोकांविषयी कायदा काहीच करू शकत नाही का ? आम्हाला एकदा सागाची झाडे लावण्यासंबंधी स्कीम सांगीतली होती

असा फोन आला तर मी सुरुवातीलाच सरळ दमदाटी करतो. माझा नंबर तुला (डायरेक्ट एकेरीच उल्लेख करावा) कुठून मिळाला, कसा मिळाला. कारण नसताना मला फोन केलायस. मी पोलिसात तक्रार केली तर काय होईल माहित्येय का असे प्र्श्न विचारले की सहसा फोन ठेवून देतात.