नव्या यमांची नवीन भाषा

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
13 Mar 2011 - 8:38 am

नव्या यमांची नवीन भाषा

मला कळाली पुन्हा नव्याने, नव्या पिकांची नवीन भाषा
कठीण मातीत रूजणार्‍या, नव्या बियांची नवीन भाषा

पुन्हा नव्याने नवीन फुटली, अबोलतेला नवीन वाचा
नवीन दृष्टी, नवे इरादे, निरक्षरांची नवीन भाषा

नभात झेपावण्यास देती, ढगांस टक्कर, विजेस चटके
नवीन किलबिल, नवीन कुजबुज, नव्या पिलांची नवीन भाषा

नशीब आहे विचित्र मोठे, कुणास रुजण्यास खडक-धोंडे
कठोर पाषाण भेदणार्‍या, नव्या मुळांची नवीन भाषा

अता मुखातून शोषितांच्या, ज्वलंत हुंकार बोलताहे
नवीन शस्त्रे, नव्या मशाली, अहिंसकांची नवीन भाषा

कुणास बाहूत घेत मृत्यू, विभागतो देह चिंधड्यांनी
यमास थोडी दया न उरली, नव्या यमांची नवीन भाषा

श्रमास मातीत गाडण्याला, नव्या दमाचा विरोध आहे
नवीन शाई, नवे मनसुबे, अभय जनांची नवीन भाषा

गंगाधर मुटे
.........................................................................

कवितागझल

प्रतिक्रिया

प्रकाश१११'s picture

13 Mar 2011 - 8:55 am | प्रकाश१११

गंगाधर मुटेजी-खूपच छान आशय असलेली कविता
नभात झेपावण्यास देती, ढगांस टक्कर, विजेस चटके
नवीन किलबिल, नवीन कुजबुज, नव्या पिलांची नवीन भाषा

नशीब आहे विचित्र मोठे, कुणास रुजण्यास खडक-धोंडे
कठोर पाषाण भेदणार्‍या, नव्या मुळांची नवीन भाषा

छान मस्त ....!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Mar 2011 - 9:27 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुंदर कविता. '' अता मुखातून शोषितांच्या... '' ओळ तर एखदम खास वाटली.
अजून येऊ द्या.....!

-दिलीप बिरुटे

sneharani's picture

13 Mar 2011 - 9:41 am | sneharani

मस्त कविता!

वाह. एकदम सुंदर मुटे जी. गहन रचना.