Skip to main content

सदसद्विवेक बुद्धी

लेखक यनावाला यांनी रविवार, 27/02/2011 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
पं.महादेवशास्त्री जोशी यांचे आत्मपुराण हे चरित्रात्मक पुस्तक आहे. त्यांनी सुरू केलेल्या ज्योतिष कार्यालयासंबंधीची हकीगत त्या पुस्तकात आहे. त्यांतील काही भाग त्यांच्याच शब्दांत असा:--- "पणजीत मध्यवस्तीत जागा मिळवली आणि पाटी झळकवली :- ’ज्योतिष कार्यालय: इथे ज्योतिषविषयक सर्व कामे केली जातील.’ पाटी पाहून लोक यायला लागले.पत्रिका करू लागलो.त्यांतील ग्रहांचे लाभयोय, त्रिकोणयोग,नवपंचमयोग,युती ,प्रतियुती तसेच गोचरीतल्या ग्रहांचे जन्मपत्रिकेतील ग्रहांशी योग हे सगळे लक्षात घेऊन जातकशास्त्रानुसार भविष्य सांगू लागलो. थोड्याच दिवसांत लक्षात आले की माझी भविष्यवाणी खरी उतरत नाही.जेमतेम पंचवीस टक्के जमायचे.तसेच शास्त्राच्या नियमांविषयीं सुद्धा शंका निर्माण झाली.लग्नी रवि असेल तर माणूस उंच हे शास्त्र.पण लग्नी रवि असलेला एखादा उंच, एखादा मध्यम तर काही बुटके आढळू लागले. माझा आत्मविश्वास ढळला. गोव्यात एक ख्यातनाम ज्योतिषी होते.त्यांच्याकडे माणसांची रीघ लागलेली असायची. त्यांना भेटून शिष्यस्तेSहम् म्हटले.ते पृच्छकाशी कसे बोलतात ते लक्षपूर्वक ऐकू लागलो. ते नेमके उत्तर कधीच देत नसत.पृच्छ्काला बोलके करीत. प्रश्न विचारून त्याच्याकडूनच सगळी माहिती घेत. मग तेच सगळे मोठ्या चतुराईने सांगून आपण अचूक भविष्य वर्तविले असे भासवीत.वायदे देत ते षण्मासीचे:-तुझे काम नक्की होणार .पण तीन महिने लागतील. ग्रहदशा बदलली की अडचणी संपतील.सध्या वक्री असलेला मंगळ तेवढा सरळ होऊं दे. मग सगळे सुरळीत होईल. हे ऐकून आशा पल्लवित झालेला पृच्छक मान डोलवायचा. त्या भास्कराचार्याला एक भाबडी शंका विचारली,"...पण यांत जातकशास्त्र येतेच कुठे?" "जातकशास्त्र? तुम्ही ग्रंथाधारे भविष्य सांगायला गेलात की मेलात.इथे शब्दजंजाळच कामी येते.समोरच्या माणसाचे बारीक निरीक्षण करायचे.भविष्य सांगायचे ते चांगलेच सांगायचे.त्याला आशेच्या घोड्यावर बसवून पाठवून द्यायचे.अहो,हा धंदा आहे. यांत तुमचे वाक्चातुर्य जितके प्रभावी तितके भविष्यकथन अचूक.शास्त्राला धरून भविष्य वर्तविणे म्हणजे स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेणे आहे." मी हिरमुसला होऊन परतलो.छे:, हे असले भविष्यकथन आपल्याला बापजन्मी जमायचे नाही.किती दिवस मी लोकांना आणि स्वत:लाही फसवीत राहू?.मला जाणवले की ज्योतिष हा माझा जीवन व्यवसाय होऊ शकणार नाही.मग एके दिवशी निर्धार करून ज्योतिषकार्यालयाची पाटी स्वहस्ते खाली काढली. त्या दिवसापासून आजपावेतो कोणताही ज्योतिषग्रंथ उघडला नाही.फलज्योतिष या विषयावर मी कायमचा पडदा टाकला." .... फलज्योतिषशास्त्रावर पूर्ण विश्वास ठेवून,त्याचा सांगोपांग अभ्यास करून मोठ्या उमेदीने ज्योतिष व्यवसाय सुरू करणार्‍या शास्त्रीबुवांचा हा सत्य अनुभव आहे."किती दिवस मी लोकांना आणि स्वत:लाही फसवीत राहू?" अशी अंत:प्रेरणा झाली ती सदसद्विवेकबुद्धी जागृत असल्यामुळे. ती नसती आणि जीवनव्यवसाय म्हणून सोडा पण जोडधंदा म्हणून ज्योतिष कार्यालय सुरू ठेवले असते तरी पं.महादेवशास्त्री जोशी हे गोव्यातील जनमान्यताप्राप्त विख्यात ज्योतिषी होऊ शकले असते.आर्थिक प्राप्ती ही चांगली झाली असती.मात्र सदसद्विवेक दडपून टाकल्याची टोचणी सतत राहिली असती. ते चांगल्या चित्रपटकथा लिहू शकले नसते.भारतीय संस्कृतिकोशाची रचना झाली नसती. ................................................................................................................................ कृपया कोणताही पूर्वग्रह न ठेवता या सत्य अनुभवावर विचार करावा.मग जे काही बुद्धीला पटेल ते मानावे. **********************************************************************************

वाचने 35419
प्रतिक्रिया 79

प्रतिक्रिया

In reply to by मूकवाचक

स्थळ, काळ आणि परिस्थितीचे संदर्भ लक्षात घेतल्यावरच मला तो प्रसंग विनोदी वाटला. असो. या धाग्यावर हा माझा शेवटचा प्रतिसाद.

In reply to by आत्मशून्य

भवीष्य वर्तवता येते की नाही इतपतच वीशय मर्यादीत ठेवूया (टायपो सोडल्यास ;) ) सहमत.

In reply to by यनावाला

भविष्यकथन सत्य असते असा अनुभव असल्याचे कांही सदस्यांनी लिहिले आहे.त्यांना विनंती की त्यांनी आपल्या अनुभवाची चिकित्सा करावी.अनुभव कोणता आला,कसा आला, किती वेळां आला याचा तटस्थपणे आणि स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहून विचार करावा. - हे सगळे करूनही असे अनुभव नाकारता येत नाहीत.

सामना टाय होणार असे भाकीत केले होते. आणी ते खरे ठरल्या पासून तो कोणते नंबर लॉटरीखेळताना लावतोय याला प्रचंड मागणी आली आहे.

In reply to by आत्मशून्य

"Can't believe my prediction 7/8 hours ago was right - tie !! Classic, didn't think it would happen but hey-not bad !!!! 2011-my year ! Lol" "Before u think there was something untoward re prediction of a tie, thought it was going to be a cracker-tie was tongue in cheek-but right" -Shane warne(Twitter) 27 feb.

In reply to by Nile

मला इंग्रजी कळले नाही, तूम्हाला या वर काही टेपणी करायचीअसेल तर मराठीत अनूवादा. अवांतरः शेन वॉर्न ऊत्कृश्ठ ज्योतीशी आहे असे आम्ही म्हणतो असा गैरसमज नसावा.

In reply to by आत्मशून्य

इंग्रजी कळत नाही? अरे रे. म्हणजे तुम्हीच वर म्हणल्याप्रमाणे, कुणावर(ही) तरी विश्वास ठेवता का? असो. सर्व प्रश्नांचा उलगडा झाला.जाउ दे जाउ दे. मी दिलेले उत्तर फक्त मेंदुची कवाडं उघडी असलेल्यांकरता आहे, ज्यांच्या विवेकात नीरक्षीरक्षमता आहे त्यांच्यासाठी. त्यांना याहुन अधिक टिप्पणीची आवश्यकता नाही.

In reply to by Nile

मी दिलेले उत्तर फक्त मेंदुची कवाडं उघडी असलेल्यांकरता आहे, ज्यांच्या विवेकात नीरक्षीरक्षमता आहे त्यांच्यासाठी
दूसर्‍यांदा ह.ह.पू.वा. ज्यांच्या विवेकात नीरक्षीरक्षमता आहे ते तूमचे लेखन गांभीर्याने घेतात हा तूमचा गोड समज कसा तयार झाला झाला या वीशयी धमाल ऊत्सूकता..... बाकी तूम्ही प्रतीसाद लीहला म्हणजे तूम्ही वर म्हटल्या प्रमाणे आमच्या कमेंटमध्ये उत्तरदेण्यासारखं काहीतरी विचारपुर्वक लिहलं आहे तर.... पू.ले.शू.