Skip to main content

फायनान्सची तोंडओळख (भाग ०): जादूगार राम कुमार आणि जादुच्या छड्या

लेखक क्लिंटन यांनी शनिवार, 12/02/2011 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
रामपूर हे एक छानसे छोटेखानी गाव होते. त्या नगरात राम कुमार नावाचा जादूगार राहत होता.राम कुमारला भाऊ तीन-- लक्ष्मण कुमार,भरत कुमार आणि शत्रुघ्न कुमार. तर सीता कुमारी ही त्याची पत्नी. राम कुमारकडे एक विलक्षण कौशल्य होते.त्याला जादुच्या छड्या तयार करता येत असत.आणि या छड्या साध्यासुध्या नव्हत्या.तर ती छडी ज्या मालकाकडे असेल त्या मालकाच्या बॅंक खात्यात ती छडी जगाच्या अंतापर्यंत दर वर्षाच्या १ जानेवारीला १०० रूपये आपोआप जमा करत असे. राम कुमारकडे अशा अनेक छड्या होत्या आणि त्यातून त्याला भरपूर पैसे मिळत असत. छड्या कशा बनवायच्या याचे रामने गुपित पाळले होते आणि ते त्याने आपल्या भावांना किंवा पत्नीलाही शिकविले नव्हते.तसेच एकही छडी रामच्या बंगल्याबाहेर कधीही गेलेली नव्हती की इतर कोणीही त्या छडीला कधीही हातही लावला नव्हता. राम कुमारला अचानक एक लहर आली आणि त्याने डिसेंबर २०१० मध्ये पेपरमध्ये जाहिरात देऊन केवळ १ जानेवारी २०११ रोजी आपण त्या छड्या लोकांना विकायला तयार आहोत असे जाहिर केले. कोणी आपली छडी रामकडून विकत घेऊन ती इतर कोणालाही विकली तरी ते चालण्यासारखे होते. छडी नव्या मालकाच्या बॅंक खात्यात पैसे जमा करू लागणार होती. रामकडून विकत घेतलेली छडी १ जानेवारी २०१२ पासून दर वर्षी जगाच्या अंतापर्यंत मालकाच्या बॅंक खात्यात १०० रुपये आपोआप जमा करणार! छडी विकत घेताना एकरकमी पैसे रामला द्यायचे आणि राम त्या बदल्यात तुम्हाला छडी देणार ही बोली होती. छडी विकत घेणाऱ्याला रामने घेतलेली रक्कम राम कधीही परत करणार नाही. केवळ छडी दर वर्षी १०० रुपये मालकाच्या बॅंक खात्यात जमा करणार! सुमारे दोनशे छड्या विकल्या जातील असा रामचा अंदाज होता. आपल्याला या उद्योगातून किती पैसे मिळतील याचा हिशोब करायला राम बसला तेव्हा त्याच्या लक्षात आले की जाहिरातीत छडीची किंमत द्यायला तो विसरलाच! मग नफ्याचा हिशोब कसा करावा? इतके दिवस राम छड्या स्वत:साठीच बनवत असल्यामुळे त्याला छडीची किंमत किती हा विचार करायची गरज लागली नव्हती. राम कुमार विचार करू लागला. काही केल्या त्याला उत्तर सापडेना. तेव्हा त्याने हे वाचत असलेल्या प्रत्येकाला फोन केला आणि प्रश्न सोडवायला मदत करायची विनंती केली. त्या बदल्यात तो उत्तर देणाऱ्याला एक छडी मोफत द्यायला तयार झाला. तेव्हा प्रश्न: तुम्ही राम कुमारचा प्रश्न सोडवू शकाल का? हा प्रश्न सोडवायला आपण योग्य ती गृहितके धरू शकता.मात्र ती गृहितके काय हे सांगूनच उत्तर लिहावे ही विनंती नाहीतर ते उत्तर बरोबर आहे की नाही हे सांगता येणार नाही. डिस्क्लेमर: हा भाग ’फायनान्सची तोंडओळख’ या लेखमालेची सुरवात करणारा असला तरी या भागात फायनान्सचे कोणतेही तत्व सांगितले नसल्यामुळे या भागाला ’भाग शून्य’ म्हणत आहे. हा भाग या लेखमालेची सुरवात करण्यासाठी आहे.तसेच जादूगार राम कुमार आपल्याबरोबर राहणार आहे. तेव्हा त्याचीही ओळख करून देणे हा या भागाचा उद्देश आहे.

वाचने 25436
प्रतिक्रिया 82

प्रतिक्रिया

दरवर्षी शंभर रुपये मिळणार. मी म्हणेन की आत्ता मला इतरत्र तेवढे पैसे मिळवण्यासाठी किती गुंतवावे लागतील? म्हणजे सद्यपरिस्थितीत पैशाचा बाजारभाव किती आहे? दुसरा विचार असा करायला हवा, की हा रामकुमार सांगतो खरं की ही छडी काम करेल, पण त्यावर माझा किती विश्वास आहे? थोडक्यात माझी रिस्क किती आहे. समजा पुढची अनेक वर्षं मला दीर्घमुदतीच्या अतिसुरक्षित गुंतवणुकींतून (सरकारी बॉंड्स, सीडी इ.) ४ टक्के उत्पन्न मिळतं व दीर्घमुदतीच्या अतीव रिस्की गुंतवणुकींतून वर्षाला ८ टक्के उत्पन्न मिळतं. पैशाचा बाजारभाव व मला वाटणारा धोका या दोन्ही गोष्टी एकत्र केल्या तर या छडीची किंमत सुमारे २५०० रुपये (छडी सुरक्षित आहे - ४ टक्के = १००) ते सुमारे १२५० रुपये (छडी धोकादायक आहे - ८ टक्के = १००) यामध्ये कुठेतरी यावी. छडीच्या सुरक्षिततेविषयी कल्पना बदलल्या किंवा ती १०० रुपयांऐवजी कमी अथवा जास्त पैसे जमा व्हायला लागले तर छडीची किंमत बदलेल. किंमत = १०० * (१००/ अपेक्षित रिटर्न्सची टक्केवारी) (हे अ‍ॅप्रॉक्झिमेशन आहे, कारण आपण टक्केवारी ही मर्यादित काळच्या गुंतवणुकींवरून काढतो, जिथे त्या काळानंतर मुद्दल परत मिळतं)

क्लिटंन भाउ.. तुमच्या लेखमालेची सुरुवात वाचुन रिचेस्ट मॅन ऑफ बॅबिलॉन या पुस्तकाची आठवण झाली. पुढचे भाग वाचुन प्रतिसाद देत राहीनच

केवळ सोपे होण्यासाठी उदाहरण म्हणूनच जादूची छडी. प्रत्यक्षात जादूने काहीच होत नाही हे गृहीत आहे. दरवर्षी १०० रुपयेच काय, पण १ पैश्याची सुद्धा भर निर्माण करण्यासाठी रामकुमारला (तोंडावर जादू असली तरी, पडद्यामागची हातचलाखी म्हणून) काहीना काही सव्यापसव्ये करावी लागतील आणि त्यात पैसे खर्चावेच लागतील. शून्यातून पैसे उभे करणारी छडी आणि ती विकली की मूळ मालकाशी कोणताच संबंध नसताना आणि कोणी काही न करता ती पैसे अ‍ॅड करतच राहते हे उदाहरण कन्सेप्ट शिकण्यापुरतेही मला तरी योग्य वाटत नाही..

शून्यातून पैसे उभे करणारी छडी आणि ती विकली की मूळ मालकाशी कोणताच संबंध नसताना आणि कोणी काही न करता ती पैसे अ‍ॅड करतच राहते हे उदाहरण कन्सेप्ट शिकण्यापुरतेही मला तरी योग्य वाटत नाही..
बरं. मी माझ्या परिने या सगळ्या वरकरणी किचकट वाटणाऱ्या संकल्पना सोप्या करून सांगता याव्यात या उद्देशाने हे गोष्टीरूपात लिहिले आहे.ते त्याहून कसे सोपे कसे करता येईल याबद्दल आपले मत काय?चर्चेत आपल्याला सहभाग घ्यायचाच असेल तर अशा स्वरूपाचा रचनात्मक सहभाग घ्यावा ही विनंती. अवांतर: तुम्ही लहानपणी पंचतंत्र किंवा इसापनिती कधीच वाचले नाहीत का?त्यात सिंह, कोल्हा असे प्राणी माणसासारखे बोलतात असे म्हटले आहे याची कल्पना तुम्हाला असावी.आणि हे प्राणी प्रत्यक्षात बोलत नाहीत हे पण तुम्हाला माहित असावे.तरीही त्या गोष्टीतून काहीतरी वेगळे तात्पर्य सांगितलेले असते. आता ते तात्पर्य घ्यायचे की अरे सिंह बोललाच कसा असे म्हणून पहिल्यांदाच शंका उत्पन्न करायची हा ज्याचात्याचा प्रश्न.तसेच काहीसे याविषयीही.

In reply to by क्लिंटन

संकल्पना सोप्या करून सांगता याव्यात या उद्देशाने तुम्ही लिहिलंय हे मी आधीच म्हटलं. त्यामुळे वादासाठी वाद नव्हेच हा. मीही तुमच्या लेखविषयात तो वाचताक्षणापासूनच इंटरेस्ट घेऊ लागलो..अनेक मते वाचून आणि खूपदा परत परत विचार करुनही अजून कॉमेंट टाकली नाही कारण उगीच एक पिंक टाकण्याचा उद्देश नव्हता. पण आता जे वाटलं ते लिहीलं. मी सांगतो उदाहरण काय असावे याबद्दल माझे मत. राम एक खास हायब्रीड केलेलं रोप आपल्याला लावून देतो आणि दरवर्षी १००० आंब्यांची खात्री देतो. त्या झाडाच्या वाढीसाठी खते वगैरे आणि निगा यांची जबाबदारी रामची आहे. (याचा अर्थ सोपेकरणाच्या भरात कुठे मूळतत्व हे की "सतत उत्पन्न देत राहणार्‍या साधनात सतत काहीतरी इन्पुट सदृश करावे लागते, देऊन टाकून नामानिराळे राहून चालत नाही. रनिंग कॉस्ट असतेच आणि ती रामलाच बेअर करावी लागेल" तेच बाजूला पडू नये म्हणून सजेशन..) इसापनीती वगैरेमधे वेगळे असते. त्यात प्राणी वगैरे उपमा असतात पण मूळ तत्व टिकवलेले असते. सिंह बोलला कसा ही आचरट शंका इथे उपस्थित केलेली नसून, समजा एखाद्या गोष्टीत सिंह बोलता बोलता असं म्हणतोय की तो गेली दहा वर्षे काही न खाता पिता उपाशी जिवंत राहिला... तर असा कसा जिवंत राहिला बुवा?? .. अशा स्वरुपाचा हा रिलेव्हंट प्रश्न होता आणि त्या अनुषंगाने उत्तर अपेक्षित होते. अगदी स्पष्ट म्हणजे पुनःपुन्हा रामला काहीच गुंतवणूक / कष्ट / हस्तक्षेप लागू नये अशी "गिव्ह अवे" टाईपची छडी हे उदाहरण काल्पनिक म्हणूनही सुयोग्य वाटले नाही. असो..मुख्य उद्देश हे सांगण्याचा की काहीतरी मुद्दा काढून ताशेरे ओढण्याचा माझा हेतू नव्हता आणि कधीच नसतो. क्षमस्व.

In reply to by गवि

बाँड किंवा इतर कोणत्याही रोख्याचे प्रतीक म्हणून जरी ही छडी असेल तरी त्या रोख्याच्या प्रवर्तकाला तो विकून नामानिराळे होता येत नाही..जर दरवर्षी १०० देतो असं वचन त्यात दिलेलं असेल तर रोख्याचा प्रवर्तक पक्षी राम, याला लाँग टाईम रनिंग कॉस्ट सतत लावून १०० प्रतिरोखा निर्मिती करत रहावी लागेल. तुम्ही मात्र छडीची कॅपेक्स, ओपेक्स सगळीच शून्य करून टाकलीत. आणि नियमित उत्पन्न मात्र कायमचे. प्रतीक म्हणूनही त्या छडीला काही मेंटेनन्स, पॉलिश पाणी करावे लागते, ती टिकवून ठेवण्यासाठी ठराविक खर्च करुन प्रक्रिया करावी लागते असं तरी दाखवायचं ही सजेशन होती. .. बाकी काही नाही.

In reply to by गवि

बरं तुमच्या समाधानासाठी असं समजा की राम कुमारचा डायरेक्ट कुबेराकडे वशीला आहे आणि कुबेर राम कुमारवर अत्यंत प्रसन्न असल्यामुळे (का ते विचारू नका) तो स्वत: छडीच्या मालकाच्या खात्यात दरवर्षी शंभर रूपये जमा करणार आहे. या भागातून जे तत्व सांगायचे आहे त्यात ते पैसे कोणीही भरले (कुबेर,बिल गेट्स, रॉकफेलर,मित्तल,अंबानी) तरीही त्या तत्वात काहीही फरक पडणार नाही.ते तत्व कोणते हे पुढील भागात सांगणार आहे. आणि बाकी fixed costs, variable costs या सगळ्यांची काळजी सध्या करू नका.अजून ३-४ भाग वाट बघा.त्यात हे सगळे सांगणार आहे.

In reply to by गवि

बरं तुमच्या समाधानासाठी असं समजा की राम कुमारचा डायरेक्ट कुबेराकडे वशीला आहे आणि कुबेर राम कुमारवर अत्यंत प्रसन्न असल्यामुळे (का ते विचारू नका) तो स्वत: छडीच्या मालकाच्या खात्यात दरवर्षी शंभर रूपये जमा करणार आहे. या भागातून जे तत्व सांगायचे आहे त्यात ते पैसे कोणीही भरले (कुबेर,बिल गेट्स, रॉकफेलर,मित्तल,अंबानी) तरीही त्या तत्वात काहीही फरक पडणार नाही.ते तत्व कोणते हे पुढील भागात सांगणार आहे. आणि बाकी fixed costs, variable costs या सगळ्यांची काळजी सध्या करू नका.अजून ३-४ भाग वाट बघा.त्यात हे सगळे सांगणार आहे.

In reply to by गवि

माझी ही असव्था असीच आहे .. लवकर लिहा .. क्लिंटनः फायनान्स आम्हाला कळतच नाही, आपल्या या लेखमालेमुळे नक्कीच आवड निर्मान होयील.

फायनान्स चा 'फ' ही कळत नसताना ५५० रु किंमत असेल त्या छडीची असे वाटते. १०० रु प्रमाणे १० वर्षामध्ये १००० रुपये रामभाउंना मिळणार असतात, परंतु प्रत्येक वर्षामध्ये त्या शंभर रुपयाचे मुल्य कमी होत जाईन .. समजा दुसर्या वर्ष्यासाठी ९०, तिसर्‍या वर्ष्यासाठी ८० .. शेवटी १० असे राहिन .. म्हणजे त्यांना १० वर्शाच्या वॅल्यु नुसार त्यांना एकुन ४५० रुपये कमी येतील.. म्हनजे जर आताच्या ५५० रुपये या भावा मध्ये त्यांनी छडी विकली तर ती दहा वर्षाच्या १००० रुपये येव्हद्या किमतीची असेन. आणि विकत घेणार्या माणसाने ही २-३ वर्षे समजा ती छडी आपल्या कडे ठेवली तरी नंतर तो विकताना ही त्याची किंमत त्या ५५० च्या आसपासच असेन.( माझ्या गणितानुसार ३ वर्षाने ५२० रुपये असेन त्या छडीची किंमत बाजारात)म्हणजे ३०० रुपये कमवुन ५२० रुपये मिळतील त्या व्यक्तीस ती छडी विकल्यास. त्याने ती निर्मिलेली नव्हती त्यामुळे ना नफा ना तोटा यामध्ये त्याने २७० रुपये ३ वर्षात कमवलेले असतील. म्हणुन राम ना नफा ना तोड बेस वर ५५० ला व्यवहार डन करतील असे वाटते. रामला १० वर्षांची किंमत आताच मिळते आहे म्हणुन तो ही खुष आणि कस्टमर ला ना निर्मीती ना काही.. १०० रुपये चालु आणि पुन्हा ती छडी विकल्यावर मुळ किंमत मिळतेच आहे म्हणुन तो ही खुष.

In reply to by गणेशा

चर्चेत सहभागी झालेल्या सर्वांचा आभारी आहे.मी आताच पुढच्या भागाला फिनिशिंग टच दिले आहेत आणि उद्या सकाळी तो भाग अपलोड करत आहे.