Skip to main content

चिकन मोमो

लेखक Mrunalini
Published on शनीवार, 12/02/2011
मोमो, एक खास तिबेटीयन पाकृ आहे. तिबेटसह हा खाद्यप्रकार संपुर्ण ईशान्य भारत, नेपाळ व हल्ली मुंबई, पुण्यासारख्या शहरात देखील झपाट्याने प्रसिद्ध होत आहे. मी ह्या पाकृ मधे चिकन वापरले असले तरी तुम्ही त्या जागी पोर्क, बीफ, मटण किंवा हे पुर्णपणे शाकाहारी देखील बनवु शकता. साहित्यः चिकन खिमा - ५०० ग्रॅम मैदा - २ वाटी कांदा - १ वाटी बारीक चिरलेला कोबी - १/२ वाटी कांद्याची पात - १/२ वाटी ढोबळी मिरची - १/४ वाटी आले, लसुण - २ चमचे बारीक चिरुन काळी मिरी पावडर - १ चमचा सोया सॉस - १/२ चमचा व्हिनेगर- १/२ चमचा मिठ चवीनुसार कृति : १. मैदा थोडे मिठ टाकुन पोळीच्या कणिक प्रमाणे मळुन घ्यावा. २. चिकन खिमा स्वच्छ धुवुन १५-२० मिनिटे निथळत ठेवावा. ३. कांदा, कांद्याची पात, कोबी, ढोबळी मिरची, आले, लसुण हे सर्व बारीक चिरुन घ्यावे. ४. कढईत तेल गरम झाल्यावर आले, लसुण टाकुन परतुन घ्यावे. ५. आले, लसुण परतल्यावर कांदा टाकुन परतावा. ६. त्या मधे कोबी, ढोबळी मिरची टाकुन परतावे. ७. थोडा वेळ परतल्यावर त्यात चिकन खिमा टाकुन चांगले परतुन घ्यावे. ८. खिमा थोडा शिजल्यावर व चिकनला सुटलेले पाणी पुर्णपणे आटल्यावर त्यात सोया सॉस, व्हिनेगर व काळी मिरी पावडर टाकुन मिक्स करावे. ९. चवीप्रमाणे मिठ व चिरलेली कांद्याची पात टाकुन निट हलवावे. हे तयार झालेले सारण ताटली मधे काढुन थोडा वेळ थंड होउ द्यावे. १०. मैदाच्या बनवलेल्या कणके मधुन एक छोटा गोळा घेउन त्याची छोटी पुरी लाटुन घ्यावी. ११. करंजीला सारण भरतो, त्या प्रमाणे वरील गार झालेले चिकनचे सारण भरावे. १२. फोटो मधे दाखवल्याप्रमाणे जर चुन्या घालता येत असतील तर त्या घालाव्यात किंवा त्याला तुम्ही मोदकां सारखा आकार देउ शकता. तेही न जमल्यास करंजी सारखा आकार द्यावा. १३. हे मोमो तुम्ही deep fry किंवा मोदकां प्रमाणे उकडुन घेउ शकता. १४. हे मोमो शेजवॉन सॉस सोबत गरम serve करावे. टिप: १. मोमो करताना तुम्ही मैद्या एवजी गव्हाचे पीठ वापरु शकता. खाली दिलेल्या फोटो मधे मी गव्हाचे पीठ वापरल्यामुळे त्याचा रंग brown आला आहे. २. शाकाहारींसाठी ह्या सारणा मधे चिकनच्या जागी मश्रुम, sweet corn वापरु शकतील. momos

वाचन संख्या 14335
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

In reply to by Mrunalini

sorry. मी इथे चुकुन dumplings मधे Italian stuffnig असते असे लिहले आहे. italian stuffing हे ravioli मधे असते आणि dumplings मधे साधारण वरील चिकनच्या सारणा प्रमाणेच असते.

मस्त दिसत आहेत मोमो..! एखादा कट करून दाखवला असता तर खिम्याचे पण दर्शन झाले असते. करून बघायला हवेत..

ताटात कुंकवाचा ठिपका ठेवल्या सारखा दिसतोय :) मोमो कसे लागतील ह्या कल्पनेने तोंड मात्र लाळावले :) - कामापुरता चिकन मोमो

मस्त दिसताय मोमोज !करुन बघावे लागतील.

छान दिसतायत. अगदी निगुतीने चुण्या घातल्यात आणि मांडणीही छान. मी फक्त एकदा व्हेज मोमोज् खाल्लेत. त्यात हिरवे मूग आणि कांद्याची पात होती हे आठवते आहे.

डम्प्लिंग हे चायनिज असतात माझ्या मते.. :) आणि बहुधा ते राईस फ्लोर मध्येच असते. (चु.भु.द्या.घ्या.) वरील प्रकार ही चांगला वाटतो आहे. मी उकडीच्या मोदकाचा फोटो ऑर्कुट वर टाकलावर माझ्या एका पंजाबी मैत्रीणीने फोन वर "वोह क्या ड्म्प्लिंग्ज बनाये है??" असं विचारलं होतं.. :(

यांनाच चिकन (किंवा पोर्क, बिफ, व्हेजी) पॉट्स्टीकर असेही म्हणतात. तसेच चायनिज लोक यांना ग्योझा असे म्हणतात. पाकृ सारखीच आहे. http://frolickingfoodie.blogspot.com/2008/03/gyoza-chicken-and-ginger.html http://healthy-eating-plans.com/snack-recipes-chicken-vegetable-dumpling-gyoza/ आणि हे काही जालावरचे फोटो. http://healthy-eating-plans.com/wp-content/gallery/snack-recipes-kids/chicken-vegetable-dumpling-gyoza.jpg आणि हे अमेरिकेत तयार मिळतातः http://heateatreview.com/2006/12/02/trader-joes-chicken-gyoza-potstickers/

एकदा एका हाटेलातील वेटरने 'खाऊनच बघा' असा आग्रह केल्याने उकडलेले शाकाहारी मोमो खाल्ले होते..पदार्थ आवडला नसल्याचे त्याला त्वरीत सांगितले होते..आठवण झाली प्रसंगाची :)

उकडीचे कोंबडीचे मोदक म्हणा की सरळ! बरंय म्हणा मोमो म्हंटलं की अगदी सात्विक असं वाटत नाही. मग समीष खायला मोकळे! हे नाव पूर्वी मुमो म्हणजे मुर्गी के मोदक असे होते काहो? ;) असो, छान आहे.

In reply to by गुंडोपंत

याला मी चायनीज मोदक म्हणतो. गणपतीबाप्पाचे डोळे लहानच असल्याने चीनशीही त्याचे काही नाते असावे आणि त्याला हे मोदक चालत असावेत, असेही मला कधीकधी वाटते. (गणेशभक्त)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

मजेदार उत्तर - आवडले! चीनमध्ये अनेक मंदिरे आहेत म्हणे. एका प्रांतात तर अननसदेवीचे मंदिर आहे असे ऐकून आहोत. गणपतीचीही मंदिरे तेथे असावीत. पण कम्युनिस्ट कालौघात...

आज कणकेचे मोमोज / डंपलिंग्स करुन पाहिले. तसे लागतात चांगले पण "आडजीभ खाय आणि पडजीभ बोंबलत जाय" प्रकार आहे. भरपुर वेळ असताना आणि अजिबात भुक नसताना करुन पहाण्याचा पदार्थ! momo

In reply to by पिलीयन रायडर

हाहाहाहा.. अगं जास्त करायचे ना.. मी करते तेव्हा जेवायलाच करते. मोमो करुन ठेवायचे आणि आयत्यावेळी सगळे एकत्र उकडुन घ्यायचे.

त्या चुण्या कशा घालायच्या हे कोणी शिकवू शकेल का? मला "खोट्या चुण्या" घालता येतात. म्हणजे करंजी साध्या पद्धतीने बंद करायची आणि मग 'शिवणी'वर फोर्कची मागची बाजू दाबून नक्षी काढायची. दिसतं छान, पण चुण्यांचं मूळ कार्य (तळताना उकलू नये) पूर्ण होतंच असं नाही.

In reply to by आदूबाळ

मलाही सांगा. ते दिसतं फार सुंदर पण अजिबात जमत नाही. माबोवर दिनेशदांनी नुकतीच जी मोमोज ची पाकृ टाकली आहे, त्यातही फार सुंदर दिसत आहेत ते मोमोज..