देवा परमेश्वरा,
आज सकाळीच ते अत्यवस्थ असल्याची बातमी कानावर आली..!
देवा, आता पुरे झालं. ने त्यांना आता तुझ्या घरी. अगदी शांतपणे, त्रास न होता डोळे मिटू देत..!
ते वयोवृद्ध आहेत, गलितगात्र आहेत, खूप आजारी आहेत. गेल्या बर्याच काळापासून अक्षरश: अंथरुणातच आहेत.
माझ्यासारखे त्यांचे सामन्य भक्त, प्रशंसक, सगेसोयरे, हितचिंतक सारे त्यांच्या भोवती आहेत रे, पण तरीही ते मात्र पूर्णत: परावलंबी आहेत, असहाय्य आहेत..
आता अश्या अवस्थेत नाही पाहावत त्यांना..!
याचसाठी केला होता अट्टाहास,
शेवटचा दिस गोड व्हावा..!
त्यांच्या या अभंगाचे स्वर कानी घोळताहेत..!
दहा वर्षाचा एक मुलगा कलेचं वेड घेऊन घरातून पळाला. खूप खस्ता खाल्या, अपार कष्ट केले. पुढे त्याचं फळ मिळालं, त्याचा वेलू गगनावेरी गेला. अक्षरश: न्हाऊ घातलं सर्वांना त्या अलौकिक सुरांनी.
'भारतरत्न..' या पदवीचा सन्मान झाला..!
'एकामेवाद्वितिय..', 'परंतु या सम हा..' ही सारी बिरुदं रोजचीच झाली, सवयीची झाली..!
या वेदशास्त्रसंपन्न महामहोपाध्यायांनी 'सवाईगंधर्व संगीत महोत्सव..' हा संगीताचा महायज्ञ सुरू ठेवला. पन्नास वर्षांहून अधिक काळ..!
लौकिकार्थाने आयुष्यभर एखाद्या बादशहासारखे, सम्राटासारखे वावरले ते...! परंतु व्यक्तिगत जीवनात मात्र तेवढेच साधे आणि सादगीभरे राहिले..!
परंतु आता मात्र नको हा वनवास, नकोत त्या अंथरुणातल्या हालअपेष्टा..!
काहीच दिसांपूर्वी त्यांच्या दर्शनाकरता गेलो होतो त्यांच्या घरी..!
देवा, विश्वास ठेव, मला काय म्हणाले माहित्ये?
" परमेश्वराने माझी क्रूर थट्टा चालवली आहे...!"
देवा, थांबव आता ही क्रूर थट्टा..!
देवा, लोकांना कदाचित माझी ही प्रार्थना आवडणार नाही. दुषणं देतील मला लोकं..! परंतु पर्वा नाही. कारण माझं त्यांच्यावर अत्यंत प्रेम आहे अन् त्याहूनही अधिक निस्सीम अशी डोळस श्रद्धा आहे...!
"अणुरणिया थोकडा.." लिहिंणार्या तुकोबांकरता देवा तू विमान पाठवलं होतंस..
त्याच ओळीतल्या भावार्थात आणि त्यातल्या मालकंसाच्या दैवी सुरात कोट्यावधीच्या जनसमुदायाला डोलायला लावणार्या, समाधीस्त करणार्या भूतलावरच्या एका योग्याकरताही विमान पाठव..
येऊ देत आता अजून एक विमान...!
-- तात्या.
वाचने
6194
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
तात्या.. भावना एकदम खर्या
आमेन !
हेच!
In reply to आमेन ! by मितान
हेच!
In reply to हेच! by बिपिन कार्यकर्ते
आमेन
In reply to हेच! by मेघवेडा
आजच सकाळी ती बातमी
In reply to आमेन by विनायक पाचलग
"जो भजे हरि को सदा....सो ही
स्तब्ध.
(विषय दिलेला नाही)
आज सकाळीच बातमी वाचल्यावर तात्यांची आठवण झाली.
डायरेक्ट विमान कशाला?
पण त्या दाखवण्याच्या नादात
In reply to डायरेक्ट विमान कशाला? by आदिजोशी
तात्या तुम्ही आम्हाला रडवलेत
भीमसेन
शब्द नाहीयेत. देवा, जे काही
(विषय दिलेला नाही)
पं. भिमसेन जोशी
च्या मायला... २०११ काय नुस्त
हे बर नाही
तात्या..