Skip to main content

उ. न. क. - नवा अध्याय

लेखक आदिजोशी यांनी बुधवार, 12/01/2011 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
काही महिन्यांपूर्वी महिलांना ३३% आरक्षण देणार्‍या विधेयकाला संमती मिळाली. ह्या आरक्षणाचे भविष्यात होणारे भयानक परिणाम ओळखून लालू प्रसाद यादवांसारख्या काही द्रष्ट्या नेत्यांनी ह्याला विरोध केला, पण मध्यंतरी बराच काळ ते नुसतेच बोलविते धनी असल्याने त्यांचा आवाज लोकांपर्यंत पोहोचला नाही. ह्या आरक्षणाचा आणि महिला मुक्ती चळवळीचा फार जवळचा संबंध आहे. महिला सक्षमीकरणाची चळवळ साधारण ७० च्या दशकात सुरू झाली. पण त्या आधीही आपल्याला अनेक ठिकाणी लाक्षणिकरित्या सक्षम आणि भक्कम महिला दिसतंच होत्या. असो. आजचा मुद्दा हा नव्हे. महिला मुक्ती चळवळी इतकाच, किंबहुना त्याहूनही जुना इतिहास पुरूषमुक्ती चळवळीला आहे. ह्या चळवळीची बीजे जेंव्हा पहिल्या पुरूषाने विवाह केला तेव्हाच रोवली गेली. त्यानंतर ह्याविरूद्ध ब्र काढण्याइतपत हिंमत गोळा कराण्यातच पुरूषांची हजारो वर्ष गेली. त्यामुळे अशा पिडीत, दु:खी आणि पिढीजात गुलामगिरीची जाणीव घेऊन जन्मास येणार्‍या समस्त पुरूषांसाठी आम्ही मुक्काम पोस्ट बंगळूरू इथे असताना आमचं लग्न व्हायच्या आधीच मोठ्या दुरदृष्टीने उ. न. क. म्हणजेच 'उपेक्षीत नवरे कमिटी' ह्या अखील भारतीय समितीची स्थापना केली. कारण आमच्याही नाकात वेसण आणि हातात दळणाची पिशवी देण्याचं कुटील कारस्थान घरी शिजत होतंच. न जाणो पुढे मागे आपणांसही गरज पडेल हा हेतूही ह्या संस्थेच्या स्थापने मागे होताच. आज ह्या कमिटीच्या स्थापनेला अजून एक दिवस पूर्ण झाला. अर्थात लोकांना ह्यात काही विशेष वाटणार नाही पण सचिनने काढलेली प्रत्येक धाव जसा एक नवा विक्रम प्रस्थापीत करते तसंच मावळणार्‍या प्रत्येक दिवसागणिक आमच्या समितीच्या आयुर्मानात भर पडते. अल्कोहोलीक अ‍ॅनॉनिमस संस्थेचे सदस्य जसे लपून छपून भेटतात तसेच आमचेही सदस्य जीव मुठीत घेऊन चोरून भेटतात. अपेयपान करणारी माणसंही आजकाल देवळात शिरल्यासारखी उजळ माथ्याने गुत्त्यात शिरतात आणि आमच्या संस्थेच्या सभासदांवर मात्र असं दिवाभितासारखं जगायची पाळी येते ह्यासारखं दुर्दैव नाही. पण मुळातच मान खाली घालून जगायचं पक्कं ट्रेनींग घरूनच मिळाल्याने आमच्या सभासदांना ह्यात काही विशेष वाटत नाही ही बाब वेगळी. आज सांगण्यास अत्यंत आनंद होतो की आम्ही रोवलेल्या बिजाला पहिला अंकूर फुटला आहे, आमच्या बाळाने पहिला ट्यॅहॅ केला आहे, आम्ही घातलेल्या अंड्याला पहिला तडा गेला आहे. नुकतीच आमच्या उ. न. क. च्या मुंबई शाखेची पहिली बैठक पार पडली. त्यात काही अत्यंत ज्वलनशील मुद्द्यांना हात घालण्यात आला. सामाजिक, आत्मीक, भावनीक अशा सर्व प्रकारच्या जाणीवा जागृत व्हायच्या ह्या काळात आमच्या सदस्यांच्याही जाणीवा, बंद दाराच्या आत का होईना, जागॄत होत आहेत हे पाहून अस्मादिकांस संतोष जाहला. तर, बैठकीत चर्चीले गेलेले काही ठळक मुद्दे मी इथे मांडत आहे. १ मुंबई शाखेच्या पहिल्याच बैठकीत एका सभासदाने संस्थेच्या नावात बदल सुचवला. एकाच नावात उपेक्षीत आणि नवरे हे दोन समानार्थी शब्द ठेवण्याऐवजी नुसतंच नवरे कमिटी अथवा उपेक्षीत कमिटी असं नाव असावं असा प्रस्ताव मांडण्यात आला. २ आई म्हणून आपल्या लेकरांवर जिवापाड प्रेम करणारी स्त्री जेंव्हा बायकोच्या भुमीकेत शिरते तेंव्हा हा प्रेमळ स्वभाव अचानक कुठे गायब होतो असा सवाल उपस्थित करण्यात आला. ३ हुंड्याचा प्रश्न सद्ध्या फार बिकट होत आहे. हुंडा दिला नाही म्हणून आमच्या एका सदस्याला त्याच्या बायकोने चक्क स्वतः बनवलेला चहा दिला आणि तो संपवायलाही लावला. ह्या अन्यायाविरूद्ध कुठल्या कलमाखाली तक्रार नोंदवावी? ४ लेडीज डब्याशेजारच्या डब्यातील लोकांनी बायकांच्या गप्पांचा त्रास होतो म्हणून त्या आवाजवर कडी करण्यासाठी भजनी मंडळ सुरू केले. त्यास प्रत्युत्तर म्हणून लेडीज डब्यातील बायकांनी बसल्याबसल्या आपल्या खड्या आवाजात ह्या भजनांचे निरूपण करण्यास सुरूवात केली. त्यामुळे, ह्या अशा निरूपण मंडळांबर बंदी आणावी अथवा लेडीज स्पेशल गाड्यांची संख्या वाढवावी अशी आम्ही रेल्वे प्रशासनास विनंती करतो. ५ सगळीकडे ३३% आरक्षण मागणार्‍या बायका लग्नानंतर काही महिन्यातच घरातल्या एकुलत्या एका बेडचा जवळजवळ ६७% भाग व्यापतात ह्यावर कुणाकडे उपाय आहे का? मोठा बेड घ्यावा हा उपाय विचारात घेतला जाणार नाही. ६ जेवणाव्यतिरीक्तही नवर्‍यांना तोंड उघडण्याची संधी द्यावी ह्या मुद्द्यावर लवकरच देशव्यापी आंदोलन छेडण्यात येईल. बोलायची सवय नसल्याने ह्या आंदोलनात कुठल्याही घोषणा दिल्या जाणार नाहीत, फक्त फलक नाचवले जातील. ७ घरातल्या कपाटात ३३% नव्हे तर किमान १०% तरी आरक्षण मिळावे ह्यासाठी लवकरच जेल भरो सारखं कपाट खाली करो हे देशव्यापी आंदोलन छेडण्यात येईल. आम्ही स्वतः बंगळूरूहून मुंबईस येऊन महिना झाला तरी आमचे कपडे त्याच बॅगांमधून काढतो आणि धुवून आल्यावर घड्या घालून पुन्हा बॅगेत ठेवतो ह्यावरून ह्या समस्येचं गांभिर्य लक्षात यावं. ८ पुरूषांसाठी टिव्ही वर चार दिवस सासर्‍याचे, कारण सासराही कधी काळी जावई होता अशा फँटसी मालिका सुरू कराव्या. ९ टिव्ही वरून अजून एका मेंबरला एक नवकल्पना सुचून रिमोटवरील म्यूट बटणाचा उपयोग घरातल्या इतर जिन्नसांवर करता येऊ शकेला का ह्यावर संशोधन करायचे ठरले. १० हा कागद वाचून झाल्यावर तो लगोलग नष्ट करून टाकावा. तर मित्रांनो, अशा रितीने आपल्या उपेक्षीत नवरे कमिटीच्या मुंबई शाखेचे कामकाज मोठ्या जोमाने सुरू झाले आहे. पुढल्या बैठकीची वेळ, तारीख आणि जागा लवकरच तुम्हाला सांकेतीक भाषेत कळवण्यात येईल. जगलो वाचलो तर भेटूच पुढल्या वेळी. आपला उपेक्षीत, ऍडी जोशी
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5595
प्रतिक्रिया 40

प्रतिक्रिया

कालची चर्चा वाचुन या 'उतार्‍याची' वाटच पहात होतो रे अ‍ॅड्या. एकदम खुसखुशीत :D

मुंबई शाखेच्या पहिल्याच बैठकीत एका सभासदाने संस्थेच्या नावात बदल सुचवला. एकाच नावात उपेक्षीत आणि नवरे हे दोन समानार्थी शब्द ठेवण्याऐवजी नुसतंच नवरे कमिटी अथवा उपेक्षीत कमिटी असं नाव असावं असा प्रस्ताव मांडण्यात आला.
जबर्‍यादस्त रे अ‍ॅडीभौ ह्यावरुन आम्हाला 'They call our language the mother tongue because the father seldom gets to speak' हे सुप्रसिद्ध वाक्य आठवले.

रोफ्ल ... =)) अ‍ॅड्या च्या लेखात जर थोडं तरी सत्य असेल तर बाकी ठिकाणच्या प्रतिसादांना काय अर्थ उरतोय ? ;) मस्त रे अ‍ॅडॅ

In reply to by टारझन

टार्‍या कुणाचा बाजार कसा उठवेल हे सांगता येत नाही. अर्थात कुणी कसे वागावे हे त्याला सांगण्याचा हक्क मला नाही, पण एक निरीक्षण नोंदवले. या मताशी काही जण असहमत असण्याची शक्यता नाकारता येत नाही

In reply to by अवलिया

श्री. अवलिया, तुम्ही मात्र संघ बदललेला पाहून मौज वाटली. अर्थात कुणी कसे वागावे हे त्याला सांगण्याचा हक्क मला नाही, पण एक निरीक्षण नोंदवले.

In reply to by परिकथेतील राजकुमार

श्री नाना संघ बदलुन युवरास पार्टीत गेले काय ? अर्थात कुणी कसे वागावे हे त्याला सांगण्याचा हक्क मला नाही, पण एक निरीक्षण नोंदवले.

मुंबई शाखेच्या पहिल्याच बैठकीत एका सभासदाने संस्थेच्या नावात बदल सुचवला. एकाच नावात उपेक्षीत आणि नवरे हे दोन समानार्थी शब्द ठेवण्याऐवजी नुसतंच नवरे कमिटी अथवा उपेक्षीत कमिटी असं नाव असावं असा प्रस्ताव मांडण्यात आला.
दणका! पयल्याच बॉलवर सिक्स! दणदणीत रे अ‍ॅडीभौ! अजून येव्दे..

किती मुद्दे कट-कॉपी करुन त्यांच्यावर "कडक", "कहर", "जबरा", शॉल्लेट" लिहावं, हेच सुचेना हो अ‍ॅडीभौ.. :-) बेहद्द सुपर्ब, राजे.. मानला. अवांतर : सदस्यत्व कसे मिळवावे, हे कळवा. नवरा झालोच आहे, उपेक्षीत व्हायला कितीसा वेळ लागतो आता !! ;-)

उ. न. क मधे उ = उपेक्षित असं आहे का ? पण उ = उनाड किंवा उ = उचापति असेही होऊ शकेल ना? अर्थात काही फरक पडत नाही म्हणा ....

झकास.........यासदृश विषयांवर लिहिताना तुमच्या लेखणीला धारच चढते जशी काय..........हहपुवा..

In reply to by निशदे

घरी संचारबंदी आणि उच्चारस्वातंत्रबंदी लागू झाली की लेखणीचीच धार उरते. जिभेची धार दाखवायची हिंमत केल्यास जीभच कलम करण्यात येते. चालायचंच.

एकाच नावात उपेक्षीत आणि नवरे हे दोन समानार्थी शब्द ठेवण्याऐवजी
घरातल्या कपाटात ३३% नव्हे तर किमान १०% तरी आरक्षण मिळावे
हे दोन तर खासच. अजून असं खुसखुशीत लेखन येऊ द्यात.

अ‍ॅडीभौ... तुझ्या ह्या लेखावरुन एक विनोद आठवला... In a quarrel of husband and wife, one is always right and other is husband... काय एकसे एक चौकार टाकले आहेत राव.. >>सगळीकडे ३३% आरक्षण मागणार्‍या बायका लग्नानंतर काही महिन्यातच घरातल्या एकुलत्या एका बेडचा जवळजवळ ६७% भाग व्यापतात ह्यावर कुणाकडे उपाय आहे का? ...कायद्याचं बोलासारखं आल्याडलं शिवार माझं नी पल्याडलं तुझं असं करुन पहा शेठ... - (बेडच्या) कडेवर मुटकुळं करुन झोपणारा - वाटकुळं

मस्त आणि खुसखुशीत.

झक्कास षटकारांनी शेंचुरी मारली आहेस, नेहेमीप्रमाणे! पण एक (नेहेमीप्रमाणे) शंका आहे.
आम्ही स्वतः बंगळूरूहून मुंबईस येऊन महिना झाला तरी आमचे कपडे त्याच बॅगांमधून काढतो आणि धुवून आल्यावर घड्या घालून पुन्हा बॅगेत ठेवतो
तू खरंच तुझ्या कपड्यांच्या घड्या घालतोस? आणि धुवून आल्यावर म्हणजे कपडे धुतं कोण? मशीन कपडे धूत असेल तर कपडे मशीनमधे कोण टाकतं?

हा हा हा. मस्त बैठक. :) एकाच नावात उपेक्षीत आणि नवरे हे दोन समानार्थी शब्द ठेवण्याऐवजी .... हे बेष्ट ! पुरूषांसाठी टिव्ही वर चार दिवस सासर्‍याचे, कारण सासराही कधी काळी जावई होता अशा फँटसी मालिका सुरू कराव्या. +१ :) ;)

कपाटातले आरक्षण फारच आवडले. :) लेख एकदम खुसखुशीत.

In reply to by चित्रा

उपेक्षित व्हायचे नसले तर - अक्षय कुमारचा हा सल्ला माना. " alt="" />

बरेचदा बापमंडळी आपल्या पोरांना चांगलेच फैलावर घेतात व पोरगं पार कोलमडून जाते तरी बापाचा राग कमी झाला नसतो मग आई किंवा कोणी शेजारची व्यक्ती येउन 'जौ द्या हो, आता किती माराल लेकराला" म्हणत पोराची सुटका करते. आजुबाजूची काका लोक पण जेव्हा त्या बापाला शांत व्हायला सांगतात तेव्हा तो लोकलज्जेस्तव शांत होतो. वर "काही नाही हो तसा शहाणा आहे पण कधी कधी असे करावे लागते म्हणत उगा पोरावर माया आहे असे दाखवतो व आवेश कमी करतो. अगदी त्याचप्रमाणे अन्य दोन चार धाग्यात "पाशवी" शक्तींचा भयंकर उसळलेला जोर, त्यांनाच जाणावला असे वाटते आहे म्हणून की काय ह्या धाग्यात "पाशवी" शक्तींनी स्वताहून 'हॅ हॅ हॅ चान चान' असे प्रतिसाद दिले आहेत हो आदिभौ! तुम्ही त्यातला खरे-खोटेपणा जाणताच म्हणा!! पुढच्या भागात "पाशवी" शक्तीच्या ह्या दुटप्पी वागण्याचा समाचार नक्की घ्या बरे!! बाकी लेख छान! :-)

घरातल्या कपाटात ३३% नव्हे तर किमान १०% तरी आरक्षण मिळावे ह्यासाठी लवकरच जेल भरो सारखं कपाट खाली करो हे देशव्यापी आंदोलन छेडण्यात येईल ये इल्जाम सर आखोपे !! मान्या !मान्या !!मान्या!!! हम वाइफी लोग बहोत खतर्नाक तरिकेसे कपडे इकठ्ठा करते है । क्या करे, फेकनेका मन ही नही होताभाय। समझा करो।

In reply to by स्वानन्द

दिया। खुले दिल से सवलत दिया। जाइये और एक कपाट खरीद के लाइये, आपकी पसंद का हा इसबार॥ खुश?

हॅ हॅ हॅ.... बाकी आमच्या "इकडुन" मात्र काहीच तक्रार नसते कधीच हे पण सांगु इच्छीते.

In reply to by शिल्पा ब

त्यासाठीच मुद्दा क्रमांक ६ हा चर्चेत घेण्यात आला असावा. :) ६ जेवणाव्यतिरीक्तही नवर्‍यांना तोंड उघडण्याची संधी द्यावी ह्या मुद्द्यावर लवकरच देशव्यापी आंदोलन छेडण्यात येईल. बोलायची सवय नसल्याने ह्या आंदोलनात कुठल्याही घोषणा दिल्या जाणार नाहीत, फक्त फलक नाचवले जातील.

बाकी आमच्या "इकडुन" मात्र काहीच तक्रार नसते कधीच हे पण सांगु इच्छीते. >>>\ त्यांना आपण कधी चान्स दिलात का ?

डोळे भरून आले हो. माझ्याकडून समस्त पुरूषवर्गावर होत असलेल्या अत्याचारांची लाज वाटली. पुरूषांवरच्या अत्याचाराविरुद्ध बायका एखादी '' मावा" सारखी संस्था काढणार असतील तर मी तिच्यात सामील व्हायला तयार आहे. शुभकामांची सुरूवात घरापासूनच म्हणून आज उठताच नवर्‍याला आणि मुलाला सांगितलं,' जा,आजपासून तुम्ही दोघंही मुक्त' माझ्याहातचा चहा प्यायचा पाशवी अत्याचारही मी केला नाही त्यांच्यावर. :) बाय द वे, त्या दोघांनी तुम्हाला "धन्यवाद " कळवले आहे भाऊ.

उतारा आवडला (उताराच बरे का ! पाण-उतारा नव्हे ,) अ‍ॅड्या भौ, फक्त दहाच प्रस्ताव आले. पुढची मिटिंग कवा ?

उनक हे योग्य नाव नाही. पिनक (पिडीत नवरे कमिटी) असे नाव जास्त समर्पक वाटते. बायकोकडून उपेक्षीत हा शापापेक्षा वरदानच असू शकेल. कारण मग नवरा गाव हिंडायला ऑफीशियली मोकळा की!. पिडीत नवरे कमिटी - पिनक हे नाव, सभासदांना एका जबरदस्त उतार्याची आठवण करून देते, हा आणखी एक फायदा आहे! बाकी चालू द्या!

खोदकाम करताना सापडला . लय भारी लेख आन प्रतिसाद. उनक बरोबर उबॅक हि इनंती . (उबॅक- उनाड बॅचलर कमेटी) मीच पयला मेंबर -जेपी