Skip to main content

अपेक्षा २०११ कडून

लेखक समीरसूर यांनी शुक्रवार, 31/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
२०११ कडून माफक अपेक्षा
  • कांदे तोळ्यावर विकत घेण्याची वेळ येऊ नये. अगदी तशीच वेळ आल्यास कांद्यांचा तोळ्याचा भाव सोन्याच्या भावापेक्षा कमी असावा.
  • पेट्रोल रु. ११२/लीटर होऊ नये. तशीच वेळ आल्यास 'वर्क फ्रॉम होम' चा फतवा सरकारने जारी करावा. सगळ्यांनी घरूनच काम करावे, अगदी चितळे बंधूंनी सुद्धा!
  • डाळी, धान्ये विकत घेण्यासाठी बँकेचे कर्ज घेण्याची वेळ येऊ नये.
  • सुरेश कलमाडींचे राजकीय पुनर्वसन होऊ नये. त्यांचे राजकीय पुनर्वसन करायचेच असल्यास त्यांना 'एनएसयुआय' च्या श्रमदान समितीमध्ये सदस्य म्हणून घ्यावे. तिथे त्यांची प्रगती बघून मग कालांतराने त्यांना 'पिवळे कार्ड' द्यावे.
  • पुतळे बनवण्याच्या व्यवसायासाठी स्पेशल परवान्याची व्यवस्था करावी. कुठलाही पुतळा बनवण्याआधी भारतातल्या कमीत कमी ७७% जनतेची परवानगी असल्याशिवाय पुतळे बनवता येणार नाहीत असा कडक कायदा व्हावा.
  • दादोजी कोंडदेवांचे नावही मुखातून काढणार्‍या व्यक्तीला विनाचौकशी तुरुंगात डांबण्याचा अधिकार काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना मिळावा.
  • 'लवासा सिटी' उभारतांना नकळतपणे झालेल्या अतिक्षुल्लक चुकांची शिक्षा म्हणून 'लवासा सिटी'च्या अर्ध्या जमिनीवर वृक्षारोपण करण्याचा आदेश निघावा. राहिलेल्या अर्ध्या जमिनीवर 'लवासा सिटी'ला भेळ-पाणीपुरीची दुकाने लावण्यास परवानगी द्यावी.
  • ए. राजा या महान माजी मंत्र्यावर फोन वापरण्यास आजीवन बंदी घालावी.
  • 'आदर्श' घोटाळ्यात अतुल्य कामगिरी बजावणार्‍या सगळ्या लोकांना एक वर्ष शासकीय 'रिमांड होम' मध्ये राहण्याची सक्ती व्हावी. तिथून बाहेर आल्यावर त्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार व्हावा आणि त्यांना सन्मानाने 'पद्मश्री' बहाल व्हावी.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावरची खेळ स्पर्धा आयोजित करावयाची असल्यास कमीत कमी चाळीस वर्षांनंतरच्या स्पर्धेचे आयोजकत्व घ्यावे असा कडक कायदा व्हावा. तरीही तयारी पूर्ण न झाल्यास आयोजन समितीच्या सदस्यांना शिक्षा म्हणून सलग एक वर्ष रोज सकाळी ८ ते संध्याकाळी ६ पर्यंत विटीदांडू खेळण्यास भाग पाडावे. लंचब्रेक ५ मिनिटांचा देऊन फक्त हजारांच्याच नोटांची बंडले लंचमध्ये द्यावीत.
  • भारतातल्या तमाम राजकारण्यांकडे कायदेशीररीत्या गोळा झालेल्या लक्षावधी कोटी रुपयांचा हिशेब लावण्यासाठी एक गुप्त समिती नेमली जावी. तिचे अध्यक्षपद अर्थातच माननीय शरद पवारांकडे द्यावे. त्यांच्या नजरेतून कुठलीच चूक सुटणं केवळ अशक्यच! या समितीचे काम हे माहितीच्या अधिकाराखाली येणार नाही असा महाकडक कायदा करावा. सगळा हिशेब व्यवस्थित लागल्यानंतर प्रत्येक राजकारण्याच्या भविष्याची सोय म्हणून प्रत्येकाच्या नावाने एक-एक पीपीएफ खाते उघडावे.
  • सगळ्या शासकीय कर्मचार्‍यांना महिन्यातून एक दिवस खरंच मनापासून काम करण्याचे आव्हान राष्ट्रपतींनी करावे.
  • आणि शेवटी, रस्ता खराब आहे अशी तक्रार दिल्यावर ताबडतोब रस्ता दुरुस्त करायला महापालिकेची माणसे आलेली आहेत आणि दोन दिवसात रस्ता करीना कपूरच्या फिगरसारखा नीटनेटका झालेला आहे असे स्वप्न वर्षभरात एकदा तरी पडावे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1552
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

दोन दिवसात रस्ता करीना कपूरच्या फिगरसारखा नीटनेटका झालेला आहे असे स्वप्न वर्षभरात एकदा तरी पडावे. वॉव ....

In reply to by स्पा

त्यांनी नीटनेटका लिहिलंय, वळणदार नव्हे. असो. श्री.समीरसूर ह्यांसि, आपल्या अपेक्षा अत्यंत स्पृहणिय (म्हणजे काय कोण जाणे! ल्ह्यायला भारी वाट्टं.) आहेत. आपले हे विचार खरेतर अनागोंदीच्या वादळात भरकटलेल्या देशतारुसाठी दीपस्तंभासारखे आशादायक, आधार असे आहेत. अशीच प्रगती करत राहिलात तर पुढच्या निवडणुकीत एखादे मलिदा खाते नक्की मिळेल. ;) अवांतर (की खरी प्रतिक्रिया?): उत्तम तिरकस लेखन! खरं तर अति झालं, अन हसु आलं असा प्रकार घडलाय आता. ज्या गोष्टींचा राग यावा, अशा गोष्टी आता हसण्यावारी नेतोय आपण. तरी हे देशाच्या झाडाला चिकटलेले बांडगुळ सुधारायचे नाहीतच.

In reply to by धमाल मुलगा

--->>> ज्या गोष्टींचा राग यावा, अशा गोष्टी आता हसण्यावारी नेतोय आपण. तरी हे देशाच्या झाडाला चिकटलेले बांडगुळ सुधारायचे नाहीतच. अगदी सहमत ... लिखाण आवडले समीरजी !! :-)

मस्त

सगळ्यांना मनापासून धन्यवाद! :-) समीर