Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by नगरीनिरंजन on Fri, 12/31/2010 - 09:12
आज लवकरच ती कामाला लागली. पोराला काखोटीला मारून आणि नायलॉनचं मळकट पोतं घेऊन ती नेहमीप्रमाणे त्या रस्त्यावर आली तेव्हा सगळीकडे कागदांचा खच पडला होता. काल संध्याकाळी तिथून गेलेल्या भव्य मोर्चात उधळलेल्या हँडबिलांनी इतरवेळी सुबक नेटका वाटणारा तो रस्ता आता मातीत खेळून आलेल्या वांड पोरासारखा दिसत होता. पोराला रोजच्यासारखं नंदूच्या टपरीच्या वळचणीला ठेवून ती भराभरा कागद गोळा करायला लागली. नेहमीपेक्षा निम्म्या वेळातच तिचं पोतं कागदांनी गच्च भरून गेलं आणि रस्ताही बर्‍यापैकी मूळ स्वरुपात आला. सगळे कागद आता संपले होते तरी ती शोधकपणे थोडा वेळ इकडे तिकडे पाहत हिंडत राहिली. बर्‍याच ठिकाणी मोर्चातल्या लोकांच्या सुटलेल्या धडक्या तुटक्या चपला आणि कंगवे वगैरे सटर फटर वस्तू पडलेल्या होत्या. ती उगिचच त्या वस्तुना पायाने एका बाजूला लोटत राहिली आणि मिळतील तेवढे तुरळक कागद गोळा करत राहिली. तास-दीड तासाने हळू हळू रस्ता जागू लागला आणि वाहनांची वर्दळ थोडी थोडी सुरू झाली. मग ती जायला वळली आणि तेवढ्यात धुळीत पडलेलं कोणाचं तरी पैशांचं पाकीट तिला दिसलं. तिचे डोळे लकाकले. आजचा दिवस तिच्यासाठी फारच चांगला निघाला होता. कोणी पाहत नाही असं पाहून तिने झटकन पाकीट उचललं आणि मग ती मागे वळून न पाहता पोतं घेऊन नंदूच्या टपरीकडे आली. पोतं भिंतीला टेकवून ठेवलं आणि भिंतीकडेच तोंड करून तिने गुपचूप पदराआड पाकीट उघडलं. आत दहाच्या चार पाच आणि पन्नासची एक नोट होती. एवढे पैसे पाहून तर ती घबाड मिळाल्यासारखी हरखून गेली. पटकन ते पैसे तिने कनवटीला लावले आणि पाकीट दिलं पोराला खेळायला. तिने समाधानाने एक खोलवर श्वास घेतला. रोज तिला त्रास देणारा गरम बटाटेवड्याचा आणि मिसळीचा वास आज तिने आनंदाने छाती भरून घेतला. कित्येक दिवसांनी तिला आज नुस्त्या वासावर समाधान न मानता प्रत्यक्ष चव चाखायला मिळणार होती आणि तीही पोटभर खाऊन. ती टपरीजवळ गेली आणि पाच-सहा रुपये खर्चून तिने गरमागरम वडे, पाव आणि मिसळीचा झणझणीत रस्सा घेतला. तिथेच पडलेला कालचा शिळा पेपर तिने उचलला आणि पुनः पोत्याजवळ येऊन बसली. थोडी भिंतीला आणि थोडी कागदाच्या पोत्याला असं थाटात रेलून बसून तिने पेपर खाली अंथरला आणि त्यावर खाद्यपदार्थ ठेवले. तिने मिसळ पावाचा एक घास घेतला आणि डोळे मिटून त्या चवीचा तवंग सर्वांगावर पसरताना पाहत राहिली. तिने डोळे उघडून पाहिलं तेव्हा पोरगं पाकीटात सापडलेल्या लॉटरीच्या तिकीटाशी खेळत होतं. शंभर रुपयांच्या नोटेपेक्षाही मोठं आणि रंगीबेरंगी तिकीट निरखून पाहण्यात ते गुंगून गेलं होतं. तिने त्याला हाक मारली तेव्हा त्याची तंद्री भंगली आणि आई काहीतरी खायला बोलावतेय हे पाहून हातातलं तिकीट टाकून ते आईकडे पळालं. त्याला तिने एक घास भरवला आणि दोघं एकमेकांकडे पाहून समाधानाने हसली. अंथरलेल्या पेपरमध्ये नुकत्याच टाकून दिलेल्या तिकीटाचा नंबर छापून आला आहे हे त्यांच्या गावीही नव्हतं. (पूर्वप्रकाशित)
  • Log in or register to post comments
  • 6512 views

प्रतिक्रिया

Submitted by गवि on Fri, 12/31/2010 - 09:50

Permalink

काल संध्याकाळी तिथून गेलेल्या

काल संध्याकाळी तिथून गेलेल्या भव्य मोर्चात उधळलेल्या हँडबिलांनी इतरवेळी सुबक नेटका वाटणारा तो रस्ता आता मातीत खेळून आलेल्या वांड पोरासारखा दिसत होता. .... रोज तिला त्रास देणारा गरम बटाटेवड्याचा आणि मिसळीचा वास आज तिने आनंदाने छाती भरून घेतला. .... तिने मिसळ पावाचा एक घास घेतला आणि डोळे मिटून त्या चवीचा तवंग सर्वांगावर पसरताना पाहत राहिली. अहा.... काय विलक्षण वाक्यरचना ब्रिलियंट.. बाकी कथेतलं नाट्य तर अफलातून आहेच.. अत्यंत अत्यंत आवडले. नेहमीच तुमचं लिखाण / कथा आवडतात खूपच.
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक बेलापुरे on Fri, 12/31/2010 - 09:56

Permalink

छान !!

तिने त्याला हाक मारली तेव्हा त्याची तंद्री भंगली आणि आई काहीतरी खायला बोलावतेय हे पाहून हातातलं तिकीट टाकून ते आईकडे पळालं. त्याला तिने एक घास भरवला आणि दोघं एकमेकांकडे पाहून समाधानाने हसली. अंथरलेल्या पेपरमध्ये नुकत्याच टाकून दिलेल्या तिकीटाचा नंबर छापून आला आहे हे त्यांच्या गावीही नव्हतं. ________________________________________________________________ एक माणूस प्रत्येक दगड उचलून हातातल्या लोखंडाला लावून परीस शोधत होता पण त्या यांत्रिक क्रियेमधे मधेच कुठेतरी लोखंडाचे सोने झाले होते. त्याची आठ्वण झाली.
  • Log in or register to post comments

Submitted by मुलूखावेगळी on Fri, 12/31/2010 - 10:07

Permalink

छान लिहिलय अंथरलेल्या

छान लिहिलय अंथरलेल्या पेपरमध्ये नुकत्याच टाकून दिलेल्या तिकीटाचा नंबर छापून आला आहे हे त्यांच्या गावीही नव्हतं. >>> अडानि असन्यातच खरे/जास्त सुख आहे कळुन चुकलेली --अर्धशिक्षित
  • Log in or register to post comments

Submitted by मी_ओंकार on Fri, 12/31/2010 - 10:44

Permalink

मस्त

मस्त कथा. - ओंकार.
  • Log in or register to post comments

Submitted by चाणक्य on Fri, 12/31/2010 - 11:10

Permalink

स्फुट पण सुंदर लिखाण

वरिलप्रमाणे स्वाक्षरी-
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Fri, 12/31/2010 - 14:14

Permalink

छान लेखन..आवडलं.

छान लेखन..आवडलं.
  • Log in or register to post comments

Submitted by मितान on Fri, 12/31/2010 - 14:24

Permalink

छान ! आवडलं

छान ! आवडलं :)
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Fri, 12/31/2010 - 15:48

Permalink

सुंदर

तुमचं लिखाण नेहमीच फार सुंदर असतं.
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Sat, 02/23/2013 - 16:07

Permalink

अत्यंत सुंदर लघुकथा..

प्रचंड आवडली.. अखेरच्या वाक्यात दिलेली कलाटणी तर जबराटच...
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Sat, 02/23/2013 - 16:18

Permalink

अतिशय जबरी लिखाण. कथेचा तवंग

अतिशय जबरी लिखाण. कथेचा तवंग हळूहळू मनावर पसरून अखेरीस मनात शिरली कथा खोलवर !!!
  • Log in or register to post comments

Submitted by लौंगी मिरची on Sat, 02/23/2013 - 23:43

Permalink

सुरेख .

सुरेख .
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Sun, 02/24/2013 - 00:02

Permalink

सलाम ननि

केवळ अप्रतिम ननि. हि विलक्षण शब्दरचना, त्यातून एखाद्या अ‍ॅनिमेशनच्या स्टोरीबोर्डप्रमाणे व्हिजुअलाइझ होणारे कथानक आणि शेवटची ती परफेक्ट डिनुमेन्ट. या प्रत्येकाला आणि तुम्हाला सलाम.
  • Log in or register to post comments

Submitted by NiluMP on Sun, 02/24/2013 - 00:17

Permalink

कथा

छोटीशीच पण लई भारी.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Tue, 02/26/2013 - 19:16

Permalink

मस्त !

ननिशेठ एकदम सुपर्ब हो.
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Tue, 02/26/2013 - 19:25

Permalink

दैव देतं कर्म नेतं..

दैव देतं कर्म नेतं.. :) लघुकथा आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Tue, 02/26/2013 - 19:31

Permalink

करुण

एवढासा प्रसंग पण काय फुलवलायत ननि!
  • Log in or register to post comments

Submitted by नक्शत्त्रा on Wed, 02/27/2013 - 13:25

Permalink

सुन्दर

कथा आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Wed, 02/27/2013 - 13:30

Permalink

आयला एक चांगला धागा कसा

आयला एक चांगला धागा कसा नजरेतुन सुटला म्हणे? उत्तमच लेख. ननिंचे लेख नेहमीच चांगले असतात असे आवर्जुन नमूद करायला हवे.
  • Log in or register to post comments

Submitted by रश्मि दाते on Wed, 02/27/2013 - 14:17

Permalink

कथा आवडली,लीहीत राहा

कथा आवडली,लीहीत राहा
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com