Skip to main content

उत्प्रेक्षा

लेखक शरद यांनी गुरुवार, 30/12/2010 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
उत्प्रेक्षा उपमा आणि उत्प्रेक्षा यात फ़रक काय ?. प्रस्तुत आणि अप्रस्तुत यातील साम्य दाखविणे हा दोघांचाही उद्देश. उपमेमध्ये सादृश्यवाचक शब्द सम, परी, प्रमाणे , जैसे वगेरे असतात. उत्प्रेक्षेमध्ये हे जणुं काही, कीं , भासे असे असतात. वरवर पहाता हा फ़रक किरकोळ वाटेल. तर मग थोडॆ खोलात जाऊं. उपमेय हे जणु काय उपमानच आहे अशी जेव्हा संभावना केलेली असते तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो. संभावना म्हणजे उत्कट कोटीचा संदेह.असे बघा, कोणत्याही वस्तूच्या स्वरूपाचे ज्ञान तीन प्रकाराचे असू शकते. [१] निश्चित ज्ञान. खरे असेल वा खोटे, पण शंकेला वाव नाही. [२] संदिग्ध. दोनही बाजू ख़या असतील वा खोटया असतील असे वाटते. मनाचा कल कोठे नक्की नसतो. [३] संभावना. हेही असेल, तेही असेल अशी संदिग्धता असते पण मनाचा कल मात्र एका बाजूला झुकलेला असतो. उपमेय हे उपमेयच आहे किंवा उपमानच आहे .. निश्चित ज्ञान. उपमेय हे उपमेयही असेल वा उपमानही असेल असे वाटते.... संदिग्ध ज्ञान. पण उपमेय हे जणु काय उपमानच आहे असा संदेह उत्कट प्रतीचा असेल तर संभावनात्मक ज्ञान. हा संदेह काव्यात्मक असेल तर उत्प्रेक्षा. साध्या शब्दात सांगावयाचे म्हणजे हा संदेह खराखुरा नसून कवीने प्रतिभेने निर्माण केलेला असतो. या अलंकारात की, जणु काही, भासे, इत्यादी संदेह निर्माण करणारे शब्द वापरलेले असतात. उत्प्रेक्षा चार विभागात सांगितली आहे. [१] स्वरुपोत्प्रेक्षा प्रस्तुत पदार्थ किंवा क्रिया जणु काय अप्रस्तुत पदार्थ किंवा क्रिया आहे असे वर्णन असते, सरित्पात्र तें स्वच्छ तैसे विशाल, तदा भासले कीं दुजे अंतराल; तशी त्यावरी शोभली दीपिकांची, उदेली जणो पंक्ति कीं तारकांची. माधवानुज नदीचे स्वच्छ व विशाल पात्र हे जणु काही आकाश आहे व त्यात सोडलेले दिवे हे जणु काही तारका आहेत अशी नदीच्या स्वरुपाबद्दल कल्पना केली असल्याने स्वरुपोत्पेक्षा. [२] हेतूत्प्रेक्षा एखादी गोष्ट कवीप्रतिभाकृत कारणाने घडून आली असे जेव्हा वर्णन असते तेव्हा हा अलंकार होतो. कैसा ॠतु मातविता नलिनीचें आलिंगनु न सोडी सविता भणवोनि मज पांता . दीसु वडीले होती शिशुपालवध-- भास्करभट्ट. काय बहारदार कल्पना आहे पहा. वसंत ॠतूत दिवस मोठा होता याचे कवीप्रतिभानिर्मित कारण बघा. वसंतात सर्वांप्रमाणे सूर्यालाहे उन्माद चढतो, त्यास नलिनीचे आलिंगन सोडवत नाही ! वाहवा, निसर्गावर मानवी भावनांचा आरोप. कालिदासाची आठवण झाली ना ? [३] फ़लोत्प्रेक्षा वस्तुस्थितीपासून कोणते तरी कवीप्रतिभानिर्मित फ़ल इष्ट आहे असे वर्णन असते तेव्हा फ़लोत्प्रेक्षा होते. येथे संभावना प्रयोजनासंबंधी असते. नोहेच नाभि तरि काय सुरुंग आहे, रोमावळी गमतसे मज श्रृं खळा हे, राया तिचे स्तन असे गड घ्यावया तो, राजा मनोभव उपाव जणो करितो. दमयंतीस्वयंवर --- नाभी हा सुरुंग व रोमावळी ही श्रृंखला या गोष्टी, जणु काय दमयंतीचे स्तन हेच गड सर करण्याच्या हेतूने मदनाने योजिल्या आहेत, ही फ़लोत्प्रेक्षा.[ पहिल्या व तिसऱ्या ओळीतले अलंकार ओळखा] [४] मालोत्प्रेक्षा जेव्हा उपमेय एक व संभावना अनेक असतात तेव्हा हा अलंकार होतो. घांट पाट हा जणु शोभेचा वहात आला दिसे, कांची वनदेवीची वसे; शूर शिपाई अपुला म्हणुनी सृष्टी ज्या देतसे, असा हा पट्टा गिरिचा असे; कीं भांग सृष्टीच्या विगलत वेणीतला, कीं अंत :पाट हा गिरिदरियुग्मातला, हा कुंकुम पडुनी ईषदरुण जाहला, वर खालीं वा जाण्यापथ हा नरजन्माचे परीं, इकडे पर्वत इकडे दरी ! पर्वतरोहण --- टिळक वाई-महाबळेश्वर घाटातील रस्त्यावर शोभेचा वाहणारा पाट, वनदेवीची कांची, --- नरजन्मशा विविध संभावना केल्या आहेत. उत्प्रेक्षा आणि उपमा दोनीतही भिन्न वस्तुतले साम्य दाखविले असते.उपमेत जसे, सारखे या सारखे दुसरे शब्द स्पष्ट किंवा सुचित असतात. उत्प्रेक्षेमध्ये जणुं काय, भासे वा य़ा अर्थाचे शब्द असतात. उपमेमध्ये दोन वस्तुंमधील साम्य दाखविण्याचा उद्देश असतो. उत्प्रेक्षेमध्ये कवीप्रतिभेचा विलास दाखवावयाचा असतो. आज शब्दालंकार ही मालिका येथेच थांबवू. खरे म्हणजे श्री. वाचक्नवी, श्री. यनावाला , श्री.धनंजय इत्यादी अभ्यासू तज्ञांनी यावर लिहले असते तर त्यांच्या अधिकारवाणीने आपल्या सर्वांना फायदा झाला असता. पण असो. परत एकदा शालेय वातावरणात आपण गेलो, काय कमी फायदा आहे ? शरद
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2183
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

सुंदर आणि अत्यंत सोप्या पद्धतीने समजावत आहात. साला शाळेत अशा छान पद्धतीने शिकवले असते तर काय धाड भरली असती आमच्या शिक्षकांना ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

+१ मला आठवतय, माझ्या मराठीच्या बाई तोर्यात यायच्या, व्याकरण कस बस उरकायच्या आणि निघुन जायच्या! बाकि शरद राव, तुमचे मनापसुन आभार! :)

किती सुंदर उदाहरणे अणि अतिशय छान माहिती .. खुप खुप आवडली .. आधीच्या भागाच्या लिंक पण देत चला ना.. अवांतर : शाळेत हे सगळे अलंकार होते का ?

वाह शरदराव, धन्यवाद. उपमा, उत्प्रेक्षा यातले खरे सौंदर्य आज कळले. शाळेत शिकलो ते मारुन मुटकून आज खरोखर जाणले. चला या अनुभवातून मला तर एक कळले की मराठी टिकायला पाहीजे असेल तर माझ्या मुलांना मराठी कशी शिकवली पाहीजे. शाळेची पद्धत ही अत्यंत टुकार पद्धत आहे. आम्हाला भाषेची गोडी थोडीफार लावणारे मेढेकर सर एखादा धडा शिकवायचा असेल तर तो धडा ज्या पुस्तकातला आहे त्यातून तो वाचून दाखवत. थोडीफार पुढची मागची प्रकरणे वाचून दाखवत. घरी जाऊन ती पुस्तके लायब्ररीतून आणून वाचा असे सांगत. पण हे सर आमच्या वर्गाला १० वीला आले. आधी आले असते तर कदाचित १०वीला रसग्रहणे अधिक चांगली लिहीली असती. असो. शेवटी "जाण येणं" ही काय चीज असते ते आज कळलं.