Skip to main content

दत्तजयंतीच्या निमित्ताने...

लेखक अवलिया यांनी सोमवार, 20/12/2010 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
२० डिसेंबर २०१० ही दत्तात्रेय जयंती. या दिवसाचे निमित्त साधून, पुढील गोष्टिचे निरुपण माझ्या बुद्धीने देत आहे. हे निरुपण असेच असेल किंवा असावे असा आग्रह नाही. हे निरुपण तुम्ही मानावेच असाही आग्रह नाही. मानल्यास माझी हरकत नाही. या विषयावर चर्चा करण्यास माझी ना नाही.. मी त्यात भाग घेईलच असे नाही. असो. सदर निरुपण मिपावर अंधश्रध्दा फैलावणारे आहे असा संपादकांचा समज होत असल्यास सदर लेखन उडवले तरी माझी हरकत नाही. ही कथा माझ्याकडे असलेल्या पुस्तकांतून जशीच्या तशी उतरवली आहे. पुस्तकाचे नाव आहे - "चरित्र चिंतन -प प श्रीमदवासुदेवानंदसरस्वती (टेंबे) स्वामी महाराज". या पुस्तकाचे लेखक आहेत - डॉ वासुदेव व्यंकटेश देशमुख. कथा ठळक टाईपात असुन त्यावरचे माझे निरुपण नेहमीच्या ठशात आहे याची नोंद घ्यावी. एका प्रसंगी आंबेजोगाईच्या परिसरात काही ब्राह्मण दत्तदर्शनाच्या इच्छेने तप करत होते. समर्थांना ओळखून त्यांनी आपला हेतू सांगून त्यांचे साह्य मागितले. समर्थांनी त्यांना "भाव दृढ करा" असे सांगून ते ही त्यांचेजवळ बसले. कोणताही मनुष्य देवभक्ति ज्या अनेक हेतुंनी करत असतो त्यात देवाचे दर्शन, देवाची माहिती त्याचप्रमाणे मनातल्या सुप्त इच्छांची पूर्ती, कुठे द्वेष भावनेवर आधारीत कुणाचे वाईट व्हावे ही इच्छा तर कुठे सगळ्यांचे चांगले व्हावे ही इच्छा असते. मनातील अनेक भावनांचा विचार करता मनुष्य ज्या काही विविध इच्छा मनात बाळगतो त्या सर्वांचे प्रतिबिंब देव भक्ति या भावनेच्या आविष्कारात आढळते. परंतु वरकरणी मनुष्य मला देवदर्शनाचीच आस आहे, बाकी ऐहिक सुखाची लालसा अजिबात नाही असेच दाखवत गुरुला मार्ग विचारतो. गुरु अशा विविध पद्धतीच्या साधकांना चांगला ओळखुन असल्याने त्यांच्यातले योग्य साधक कोणते हे परिक्षेने ठरवतो. याकथेत सुद्धा हे रुपकाच्या माध्यमातुन सुचवले आहे. गुरुकडे शरण आलेल्यांकडे हौशे, गवसे, नवसे असतात. त्यातले नक्की कसे कोण आहेत हे काही काळ गेल्यावर समजते. गुरु सर्व साधकांना, शिष्यांना परमेश्वरापाशी भाव दृढ करा असे सांगतात. स्वतः त्यांच्याबरोबर असतात. विविध दृष्टांत आणि कथांच्या सहाय्याने मुल तत्वज्ञानाचा उपदेश देतात. कित्येक शिष्य अशा प्रसंगी आपण गुरुला विचारले काय आणि गुरु सांगतो काय या विचाराने गडबडून जातात. देव आपल्याला शक्ती देईल, आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करेल या आशेने आपण आलो पण इथे गुरुने ही तर वेगळीच पोपटपंची लावली असा अनेक शिष्यांचा ग्रह होतो आणि ते शिष्य अशा गुरुला सोडून जातात. मात्र खरा गुरु त्यांचे सुद्धा भलेच होवो असाच आशीर्वाद देतो. कसे घडते हे आता आपण रुपककथेत पाहू. एक प्रहर रात्र उलटल्यावर दत्तप्रभू गारुड्याच्या रूपात पत्नी, पाच मुले, हल्यावर लादलेली गोणी,हातात पाच कोंबडे व बोकड अशा परिवारासह तेथे येऊन थांबले. गुरु शिष्याला या विश्वाचे रहस्य, जीव कोण, ईश्वर कोण आहे हे सांगणार आहे. पण त्याची तयारी आहे का हे पण पाहिले पाहिजे. केवळ काही ऐहिक वस्तुंच्या लालसेने देवाची भक्ती करणारा शिष्य यथार्थ स्वरुप समजुन घेण्यास पात्र नसतोच पण त्याला स्वस्वरुप सांगून काही उपयोग नसतो. म्हणून गुरु त्याला मायेचे स्वरुप समजावुन सांगायचा प्रयत्न करतो. कधी कैवल्याद्वैताच्या मायावादाच्या सहाय्याने किंवा कधी सांख्ययोगाच्या सहाय्याने गुरु समजावुन सांगतो. गारुड्याचे रुपक वापरुन गुरु मूळ पुरुष गारुडी असुन त्याची पत्नी ही प्रकृती आहे असे रुपक मांडतो. पंच ज्ञानेंद्रिये म्हणजे कोंबड्याचे रुपच. कधी कोंबडा पाहीला आहे... दिसेल त्या कोंबडीशी संग करत सतत खाणे, हिंडणे यातच वेळ घालवणारा. पण दुसरा कोंबडा तिथे येताच भांडण करणारा. मनुष्याची पंचेद्रिये विषयांचा भोग घेण्यासाठी अशीच सदैव आतुर असतात. त्यात आडकाठी आली की भडकतात. अजुन हवे अजुन हवे हा सतत घोष चालू असते. कधीही तृप्त न होणारी इंद्रिये अगदी त्या कोंबड्याप्रमाणेच असतात. माणसाचे मन मोठे विचित्र असते. मी केले मी करेन या अहंभावनेने सदैव ग्रासलेले मन अतिशय अहंकारी आणि उद्दाम असते. कर्तृत्वाचा डांगोरा पिटतांना मूळ स्वभावाशी फारकत घेत मी माझे यात मनुष्य अगदी बोकडाप्रमाणे वर्तन करतो. आपल्याच मस्तीत मश्गुल, संपूर्ण रस्ता स्वत:च्याच बापाच्या मालकीचा आहे हा उद्दाम पणा अंगी बाळगत, उग्र दर्प सोडत बोकड रस्त्याने जातांना बघा म्हणजे तुम्हाला पटेल नक्की काय म्हणायचे आहे ते ! पाच मूले म्हणजे पंचतत्वे. ज्यांच्या सहाय्याने हे विश्व आकाराला आले आहे ते स्थुल आणि सुक्ष्मपंच तत्वे. हल्या हे प्रपंचाचे प्रतिक असुन त्यावर लादलेल्या गोण्या म्हणजे मनुष्याच्या इच्छा आकांक्षाची असलेली गोळाबेरीज. त्या वेळी बरोबरच्या स्त्रीला "भूक लागली" असे म्हणून स्वयंपाक करायला सांगीतले. गुरु त्याच्याकडे आलेल्या शिष्याला जगाचे स्वरुप रुपकाच्या माध्यमातुन सांगत आहेत. मूळ पुरुष जेव्हा प्रकृतीच्या सहाय्याने स्थुल आणि सूक्ष्म पंचतत्वाच्या सहाय्याने शरीररुपाने जगात येतो तेव्हा पंचेद्रियांच्या आणि मनाच्या कचाट्यात सापडून त्याचा ठिकाणी कामना जागृत होते. भुक लागली या वाक्याने मला हे हवे, मला ते हवे ही मनुष्याच्या मनात जागृत होणारी सुप्त इच्छा जी पुढे विचार बनुन कृतीला प्रेरणा देते ती जागृत होते असे सांगतो. तिने एक चूल मांडून तीवर एक हंडी चढविली व कोंबडे , बोकड त्यात कापून घातले तरी हंडी भरत नाही असे पाहून क्रमाक्रमाने तो हल्या व पोरेही कापून त्यात घातली. जेव्हा मनुष्य आपली इच्छापुर्ती व्हावी म्हणुन धडपडू लागतो तेव्हा विषयांचा भोग घेता घेता त्याला त्यातच गोडी वाटु लागते. भोग संपता संपत नाहीत आणि इच्छा कधीच पूर्ण होत नाहीत. एक इच्छा पूर्ण होते न होते तोच दूसरी इच्छा आ वासून उभी रहाते. अक्राळ विक्राळ असा इच्छेचा हा पगडा जणू समस्त प्राणीजगतावर अनादी अनंत काळापासून आहे. इच्छा पूर्ण झाली असे वाटुन सुख वाटते तोच दुसरी इच्छा पूर्ण नाही म्हणुन दु:ख वाटु लागते. ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा तो पहिलीचे सूख संपते आणि त्यातले दु:ख समोर येते. एक धरावे तर दुसरे सुटते. अक्षरशः जीवाचे रान करावे आणि हातात शून्य यावे अशी अवस्था होत जाते. स्वामी विवेकानंदांच्या शब्दात सांगायचे तर जे तरुण आहेत, ज्यांच्या डोळ्यासमोर भव्य दिव्य स्वप्ने आहेत त्यांना हे लक्षात येणार नाही, पण ज्यांनी चार पावसाळे पाहिले आहेत त्यांना कळेल मला काय म्हणायचे आहे ते. हीच माया. सगळ्यांना जखडून टाकणारी पण त्याचवेळी कर्म करण्यास प्रवृत्त करणारी माया ती हीच. तरी हंडी भरेना तेव्हा ते पलिकडे बसलेले परदेशी (तपाला बसलेले ब्रह्मण) आहेत असे त्याचे बोलणे ऐकून ब्राह्मण पळून गेले. अशा प्रकारे गुरु जगाचे स्वरुप सांगतात पण देवभक्ती, गुरुभक्ती केवळ ऐहिक लालसे पोटी आणि काही तरी लाभ व्हावा याच हेतुपोटी करणारे भक्त अशा गुरुला काही कामाचा नाही असे समजुन सोडून जातात. पळून जातात. त्यांना देवाला भेटायचे नसते. देवाचे यथार्थ स्वरुप त्यांना जाणून घ्यायचे नसते. त्यांना हवे असते फक्त इंद्रियांना सुखावणारे सुख. त्याचसाठी ते देवाची भक्ती करत असतात. खरोखर जगात असेच कितीतरी भक्त असतात देवा मला हे दे, देवा मला ते दे असे म्हणत त्याच्याजवळ याचना करणारे. पण देवा मला तु भेटच अशी आर्त विनवणी करणारे किती दुर्मिळ असतात हे आपण जाणतोच. समर्थ मात्र शांतपणे बसून राहीले, कारण हे कोण आहेत हे त्यांनी ओळखले होते.तेव्हा ते सर्व दृष्य नाहीसे होऊन तिथे श्री दत्तस्वरूप प्रकट झाले. त्यावेळी समर्थांनी त्या ब्राह्मणांनाही दर्शन द्यावे अशी प्रर्थना केली.पण ते सकाम भक्त आहेत त्यांची आत्मसाक्षात्काराची योग्यता नाही असे दत्तप्रभूंनी सांगीतले.पुढे श्रीसमर्थांच्या वाक्यास्तव त्या ब्राह्मणांचे स्वप्नात समाधान केले असे वर्णन आहे. समर्थांच्या रुपाने एका खर्‍या भक्ताची, ज्ञानी मनुष्याची आपल्याला ओळख पटते. मायेचे यथार्थ स्वरुप जाणुन सृष्टीतील मिथ्यात्व जाणून लपलेल्या सत्य तत्वाची ओळख अशा भक्ताला पटते. आणि मग मागे लपलेले तत्व त्याला कुणी ब्रह्म म्हणते, कूणी ईश्वर म्हणते, कूणी देव तर कुणी अल्लाह म्हणते ते समोर येते. नव्हे ते काय आहे हे जाणले जाते. समजणे आणि जाणणे ह्या खूप भिन्न गोष्टी आहेत. असा भक्त परमदयाळू असतो, त्याला असे वाटते मला जे समजले, मी जे जाणले ते इतर लोकांना कळावे. भले त्यांच्या इच्छा, आकांक्षा ऐहिक जगातील असु द्या पण त्यांना हे परम तत्व जाणवावे, आकळावे. पण जोपर्यंत मन बाह्य विषयात गुंतले आहे तोपर्यंत हे तत्व जाणवणार नाही. केवळ दिव्यातील तेल संपले म्हणुन जशी ज्योत शांत झाली तसेच केवळ मनातील भावनांना खतपाणी न घालुन संयम केला मन शांत होते. आणि जोपर्यंत मन शांत होत नाही तोपर्यंत मूलतत्व समजणे अतिशय अवघड आहे. अशक्य आहे.
***
संत एकनाथ दत्ताचे स्वरुप सांगतात. हा दत्त म्हणजे सत्व, रज, तम या त्रिगुणांनी युक्त, निर्माता ब्रह्मदेव, रक्षण कर्ता विष्णू आणि लयकर्ता शिव यांचे एकत्रित रुप आहे. हा संपूर्ण विश्वाचा नियंता, राजा असून ह्याच्यापाशी अज्ञान अजिबात नाही. असे म्हटले जाते की ते अद्वितीय, अनादी अनंत चैतन्य म्हणजेच विश्वाचे सत चित् आनंद स्वरुप कसे आहे हे विचारले की श्रूती केवळ हे नाही हे नाही असे नकारार्थी उत्तर देते कारण ते कसे आहे याचे वर्णन करण्यास मानवी वाणी असमर्थ आहे. तेव्हा मानवी वाणीतुन उगम पावलेली श्रुती हे नाही हे नाही असेच सांगते. पण याच्यापाशी असे अज्ञान नाही इतकेच काय याचे स्वरुप कसे आहे हे देव, मुनी, योगी यांना ध्यान वा समाधीतुन सुद्धा कळत नाही. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेति नेति शब्द न ये अनुमाना सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥१॥ बाह्य विश्वात आणि आंतर विश्वात तुच केवळ आहेस. पण मी अभागी आहे मला हे समजत नाही, उमजत नाही. विचारांचे सुक्ष्म स्वरुप मनात उगम पावते आणि तिथेच त्याच्यापासुन निरस्त होत मूल स्वरुपाची ओळख न पटल्याने जन्म मरणाच्या फेर्‍यात अडकुन जातो. अज्ञान हेच जन्ममरणाचे कारण आहे. विवेकाने ज्ञान प्राप्ती झाली की जन्म मरणापासुन मुक्ती मिळते. पण हा विवेक सहजसाध्य नाही. सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त अभाग्यासी कैसी न कळे ही मात पराही परतली तेथे कैचा हा हेत जन्म मरणाचा पुरलासे अंत ॥२॥ असा दत्त अचानक माझ्या समोर आला आहे. निर्गुण निराकार परब्रह्म मला सगुण रुपाने समोर दिसल्याबरोबर माझ्या मनाच्या सर्व शंका फिटल्या. त्याने प्रसन्न होऊन मला आशीर्वाद दिला आणि माझा जन्ममरणाचा फेरा संपवला. ज्ञानाने, विवेकाने ते निर्गुण निराकार ब्रह्म माझ्या डोळ्यासमोर साकार झाले. आता कुठला जन्म कुठला मृत्यु ! अनादी मी अनंत मी ! दत्त येऊनिया उभा ठाकला भावे साष्टांगेसी प्रणिपात केला प्रसन्न होउनी आशीर्वाद दिधला जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥३॥ मात्र ते निर्गुण निराकार माझ्यासमोर साजिरे रुप घेउन आले आणि आता मला त्याचीच गोडी लागली आहे. माझे मन आता जागृत्,स्वप्न, आणि सुषुप्ती या तीनही अवस्थांच्या पलिकडे गेले आहे. या अवस्थेत माझे मन उन्मन झाले आहे. यात आता माझे तुझे मी तू हा विषय विषयी हा भेदच उरला नाही. जे जे चेतन असो वा अचेतन, जीव असो वा जड ते सर्व मीच आहे हा भाव आता माझ्या ठि़काणी एकवटला आहे. आणि माझ्या मनात केवळ दत्त असुन त्याचेच निरंतर ध्यान करत आहे. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मी तू पणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान ॥४॥ असे हे सर्व घडले ते केवळ त्या गुरुदेव दत्तामुळे. चला त्याची आरती करु त्याला ओवाळु ! आपल्या सर्व प्रपंच्याच्या चिंता त्याच्यामुळे हलक्या होतील, लयाला जातील यात संशय नाही. जय देव जय देव जय गुरुदत्ता श्री गुरुदत्ता , आरति ओवाळिता हरली भवचिन्ता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ! श्री गुरुदेव दत्त !!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 19865
प्रतिक्रिया 89

प्रतिक्रिया

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

+१
तेव्हा आधुनिक बाबा, बुवा, गुरूजी, माता, देवाचे दलाल, बडवे, पुजारी, उत्पात, निरूपणाचार्य, कीर्तनकार हे लोकं नवीन गोष्टी का नाही हुडकून काढत किंवा बनवत?
त्याचे काय आहे, हजारो वर्षांपूर्वी कोणीतरी काहीतरी लिहून ठेवले ते केवळ धर्मग्रंथात लिहिले या एका कारणाने त्यावर स्वत:चा विचार न करता "परंपरा जपायच्या" या गोंडस नावाखाली त्याच त्याच गोष्टी पिढ्यानपिढ्या चालू ठेवण्यात लोक धन्यता मानतात.अशा गोष्टींना साधे क्वेश्चन करणारे लोक पाखंडी आणि हिंदूविरोधी समजले जातात.म्हणजे कोण हिंदू समर्थक आणि कोण विरोधी हे ठरवायचा अधिकार अशा ठराविक मंडळींना दिलेला असतो (की कोणीही न देता तो त्यांनी स्वत:कडे घेतलेला असतो)." असे त्यांना अडचणीत टाकणारे प्रश्न विचारणाऱ्यांना "हिंदूविरोधी" म्हणणारे लोकच मोठ्या तोंडाने "आमचा हिंदू धर्म किती सहिष्णू" असेही म्हणतात. अशा वातावरणात कोण नवीन काही निर्माण करायला जाईल?तेव्हा अशा स्वयंघोषित हिंदू समर्थकांकडे दुर्लक्षच केलेले इष्ट.

In reply to by क्लिंटन

.अशा गोष्टींना साधे क्वेश्चन करणारे लोक पाखंडी आणि हिंदूविरोधी समजले जातात.म्हणजे कोण हिंदू समर्थक आणि कोण विरोधी हे ठरवायचा अधिकार अशा ठराविक मंडळींना दिलेला असतो (की कोणीही न देता तो त्यांनी स्वत:कडे घेतलेला असतो).
वा!
अशा स्वयंघोषित हिंदू समर्थकांकडे दुर्लक्षच केलेले इष्ट.
सहमत (हिंदू) आजानुकर्ण

In reply to by क्लिंटन

असे त्यांना अडचणीत टाकणारे प्रश्न विचारणाऱ्यांना "हिंदूविरोधी" म्हणणारे लोकच मोठ्या तोंडाने "आमचा हिंदू धर्म किती सहिष्णू" असेही म्हणतात.
क्लिंटनराव, क्या बात है! नुकतंच कुणाच्यातरी सहित असलीच काहीतरी बरळ वाचल्यासारखं वाटतंय. ;-)

In reply to by सहज

स्पष्ट मत - सगळा शब्दछल आहे. लिहणारे पण तेच, अर्थ समजवणारे पण तेच. पुन्हा जुने शब्द / मत खोडून कालानुरुप नवे मत सांगणारे पण तेच.
अगदी योग्य मुद्यावर बोट ठेवलंत. चांगलं म्हणजे काय व वाईट म्हणजे काय हे समजावून सांगणाऱ्या लेखनात मुळातच संदिग्धता असता कामा नये. जर दोन अर्थ निघत असतील तर चांगला तेवढा घ्यावा व वाईट सोडून द्यावा असं म्हटलं तर काय अर्थ आहे? द्वयर्थी अश्लील लेखनात 'चांगला तेवढा घ्यावा' असं म्हणता येतं का? संस्कृतीचे रक्षक स्वतः वाईट अर्थ घेऊन बोंब मारणारच. शेवटी 'सोयीस्कर अर्थ घ्यावा व तो अर्थ सांगण्याचा मक्तादेखील सोयीस्करपणे स्वतःकडे घ्यावा' हेच खरं.

In reply to by सहज

सहजकाकांची एंट्री आवडली, आमचे प्रतिसाद टंकायचे कष्ट वाचवल्याबद्दल आभार. नाना ह्या बुवावाजीच्या धंद्यात उतरले* तर बक्कळ पैसा कमावतील असे भविष्य त्यांच्या नाड्या हातात न घेता वर्तवतो. *मुळात आहेत की नाहीत हे आपल्याला ठावुक नाही ब्वॉ.

In reply to by Nile

नाना ह्या बुवावाजीच्या धंद्यात उतरले* तर बक्कळ पैसा कमावतील असे भविष्य त्यांच्या नाड्या हातात न घेता वर्तवतो.
सहमत आहे. नानांकडे ते कौशल्य चांगले आहे.

In reply to by Nile

सहमत आहे. स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याप्रमाणे भारतीय तत्वज्ञानावर व्याख्याने देण्याचा विचार आहे. आता ही उल्लेख केलेली मंडळी बुवाबाजी करत होती का ते माहित नाही. आणि त्यातुन त्यांना किती आर्थिक लाभ होत होता ते माहित नाही.

ती गोष्ट सहा आंधळ्यांची आहे. रामदासकाकानी त्यात सातवा आंधला अ‍ॅड केलाय. पण त्या सातव्या आंधळ्यामुळे हत्तीने त्या सर्वाना पायतळी तुडवले

In reply to by विजुभाऊ

मुळात आंधळेच असणार्‍यांना आपल्यासोबत अजून तीन आंधळे आहेत , चार आहेत की पाच हेही पटकन कळणे अवघड. त्यामुळे संख्या चुकू शकते.. आम्हाला चारच वाटले. ;)

अवलियाच्या (दत्तप्रभूना अवलिया ही म्हणतात) रसाळ निरुपणानंतर खरंतर काही लिहायला नको पण, दत्त महाराजांच्या आई वडिलांबद्द्ल थोडे लिहावेसे वाटले. आईचे नाव अनसुया आणि वडील अत्रि. अन्-असूया आणि अ-त्रि. थोडी फोड केल्यावर लक्षात येते की, दत्त कोणापोटी जन्म घेतात? जिला अजिबात असूया वाटत नाही तिच्या आणि अ त्रि म्हणजे जे त्रि-तीन गुणांच्या पलिकडे गेलेले आहेत अशा वडिलांच्या पोटी. जरी वर त्रिगुणात्मक असे म्हटले असले तरी दत्त महाराज हे त्रिगुणातीत आहेत. ब्रह्मदेव रज, विष्णू सत्त्व आणि शंकर तमोगुणाचे स्वामी आहेत. आणि अर्थातच स्वामी हा नियंता /नियंत्रण करणारा अशा अर्थाने वापरला आहे. दत्त हे या तिन्हीचे मिळून रुप असल्याने साहजिकच ते तिन्ही गुणांचे अधिपती आणि त्रिगुणावतार अशा अर्थाने म्हटले गेले आहेत. शिवाजी दुसर्‍याच्या घरी जन्मावा अशी इच्छा असणार्‍या लोकांसाठी परमार्थ नाही. रोख ठोक मामला. पेहले इस्तेमाल करे फिर विश्वास करे सारखा आणि अत्यंत व्यक्तिगत. मला कोणाबद्द्ल किती असूया वाटते आणि मी कुठ्ल्या गुणाच्या (सत्व, रज, तम) प्रभावाखाली (दारुडा दारुच्या असतो तसे) आहे हे न जाणून घेता, दुसर्‍या व्यक्ति, मत,विचारधारा यांवर झोड उडवणारे लोक बघितले की कीव येते. दत्त आहेत का, खरे की खोटे या प्रश्नाआधी किमान दुसर्‍या बद्दल असूया मत्सर द्वेष नसणे एवढे मिळाले तरी पुरे. अवांतरः बाकी मोर नाचताना त्याचा फुललेला पिसारा बघायचे सोडून मागे जाऊन त्याचा पार्श्वभाग बघणार्‍यांबद्दल काय बोलावे....????

In reply to by प्यारे१

पार्श्वभाग बघणार्‍यांबद्दल काय बोलावे....????>>>> ...मला वाटते हल्ली सर्वांगीण विचार या अशाच कृतीला म्हणतात.

In reply to by कवितानागेश

सर्व संत्री-मंत्री "वाह वा, काय सुंदर आहे राजाचा अंगरखा" असं म्हणत असताना "राजा नागडा आहे" असं ओरडणर्‍या मुलाची गोष्ट आठवली. तिरळ्या राजाचं सुंदर चित्र काढण्याची जबाबदारी खांद्यावर पडलेला चित्रकार, राजा एक डोळा बंद करून बाण सोडण्याचा तयारीत आहे, असं चित्र काढतो अशीही एक गोष्ट आहे. =================================================== 'प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट' का 'जो बात तुझ में है तेरी तस्वीर मे नही' हा फक्त दृष्टीकोनाचाच मुद्दा असतो. नसणार्‍या मोराचा नसलेला पिसारा बघणं सोपं नसावं.

In reply to by प्यारे१

बाकी मोर नाचताना त्याचा फुललेला पिसारा बघायचे सोडून मागे जाऊन त्याचा पार्श्वभाग बघणार्‍यांबद्दल काय बोलावे....????
पार्श्वभाग दाखवुन नाचणार्‍या गाढवाकडे पाहुन काय उमदा घोडा आहे असे म्हणणारे निराळेच.

श्री गुरुदेव दत्त! फार सुरेख विवेचन, मस्त निरूपण. याच धर्तीवर अजून लेखन करावे ही मनापासून विनंती!

In reply to by गुंडोपंत

हेच म्हणतो..

वाहवा छान चर्चा चालली आहे. चांगले वैचारीक वाचायला मिळाले. नानासाहेबांचे निरुपण तर क्लासच. वर अजून कोणीतरी अत्रि -अनसूया यांच्याबद्दल लिहीलेले पण छानच आहे. पटले. =================================================== 'प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट' का 'जो बात तुझ में है तेरी तस्वीर मे नही' हा फक्त दृष्टीकोनाचाच मुद्दा असतो. नसणार्‍या मोराचा नसलेला पिसारा बघणं सोपं नसावं पण पार्श्वभाग बघणं असावं. कारण तसे करताना अनेक लोक दिसतात.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आध्यात्मिक (रूपक) कथेची कोडी सोडवण्यासाठीची किल्ली. खरेतर सर्व (अंतर्मुख व बहिर्मुख) शास्त्रांच्या अभ्यासात हा प्रश्न पडतो व सोडवता यावा लागतो (च). टिंगल तर सर्वच गोष्टींची करता येते. असो.

वा