स्नेहाच्या ठिकाणाचे कामसंबंध
"स्नेहाच्या ठिकाणीच कामसंबंध येणार, बाळीशा." काड्यापेटीतली काडी तंदूरी चिकन चघळावं तशी चघळत हणम्या म्हणाला. "ही पुनरावृत्ती आहे. टॉटॉलॉजी. स्नेह नसेल तर कामसंबंध कसे येणार? आणि आले तरी त्रास नाही का होणार?"
"हणम्या, काही भलतंसलतं वाचू नकोस. तुला 'काम' या शब्दाचा एकच अर्थ माहिती आहे, हा लेका तुझा दोष आहे. काम म्हणजे कर्म. मराठीत सांगायचं तर वर्क. इथं अर्थ हा असा आहे."
हणम्यानं काडी उलटी करुन तोंडात घातली आणि काडीवरचा गूल लॉलिपॉपसारखा चोखायला लागला. हणम्याबरोबर जगायचं म्हणजे अशा गोष्टींची सवयच करुन घ्यावी लागते. पण हणम्याचे हे असे 'वन ट्रॅक माईंड' आहे. 'काम' या शब्दाचा त्याला एकच अर्थ ठाऊक आहे. मध्ये एकदा औषधांच्या दुकानात ''जेलुसिल' द्या' च्या ऐवजी हणम्या 'कामसलील द्या' असं म्हणाला होता. केमिस्टची तीन दिवस दातखीळ बसली होती .
"केवढी गरज असते व्यक्तीला स्वतःविषयी बोलत राहाण्याची. कुणी ऐको वा न ऐको, बोलत राहाणे महत्त्वाचे." माझ्या मागे उभा राहून हणम्या वाचत होता. मला बिडी आणि कांद्याच्या संमिश्र 'कंदर्प' ची आठवण करुन देत. " हम्म . हे बरोबर आहे, बाळीशा. आपल्या 'सपना बार अॅन्ड रेस्टॉरंटचं'च उदाहरण घे की. जो तो साला 'आता माझंच बघ ना' याशिवाय बोलायला तयार नाही. तिसर्या पेगला माणसे हिंदीवर येतात. 'तू एकबार बोलके देख यार, सारी दुनिया की वाट लगा दूंगा..' हे ऐकू आले की बिल मागवण्याची वेळ झाली, हे अप्पा वाघालाही ठाऊक आहे. आणि अप्पा कधी बील तरी देतो काय?" हणम्या म्हणाला.
"अप्पाचा काय संबंध इथे, हणम्या? आपण जेव्हा गप्पा मारतो, मन उघडं करतो तेव्हा, कोणीतरी आपलं बोलणं सहानुभूतीपूर्वक ऐकावं असं आपल्याला वाटतं, असं लिहिलंय इथं." मी करवादून म्हणालो.
"मन उघडं करणं म्हणजे? " हणम्यानं तोंडातली काडी थुंकून टाकली. "आपण पूर्वी जवाहरमध्ये प्यायला जायचो, तेंव्हा तिथे काय उघडं व्हायचं आठवतंय ना तुला? शिवाय मंगलोरच्या 'टेक ऑफ' बार मध्ये. तिथे तर साल्या अप्पाने माझा फोटो पण काढला होता. नंतर परत दिला म्हणा, त्यालाच लाज वाटायला लागली म्हणून. पण मन उघडं म्हणजे?"
"हणम्या, हे तुझ्या कुवतीपलीकडचं आहे रे. कोणाबरोबर तरी विचारांची देवाण्-घेवाण व्हावी, वादविवाद व्हावेत आणि विरंगुळ्याचे ४ क्षण आपल्या वाट्याला यावेत , आपल्या बरोबर समोरच्या व्यक्तीचादेखील विकास व्हावा हीच प्रत्येकाची इच्छा असते असं म्हटलंय इथे. "
"वादविवादातून विकास काय? विकास? विकास?"
"जपून हणमंतराव, जपून शब्द वापरा. अशा शब्दांचा रटाळ लिखाणाशी संबंध लावतील लोक..." मी म्हणालो.
"पण वादविवादातून विकास? म्हणजे इथे बराच काळ प्रतिबंधित राहिलेल्या आणि अलीकडेच जनप्रवाहात सहभागी होण्याची परवानगी मिळालेल्या एका लोकप्रिय सदस्याला सगळ्यांचा विकासच साधायचा होता म्हण की. सदरहू गृहस्थांचे जे काही तथाकथित वाद झाले, त्यामागे 'समोरच्या व्यक्तीचा विकास' यापलिकडे काय कारण असू शकते? 'गुणग्राही संपादक' म्हणून नावारुपाला आलेले दुसरे एक प्रतिभावंत पाहा. 'वादातून विकास' या कल्पनेची त्यांनी इतकी जबरदस्त कास धरली की बिचार्यांना अखेर वाचनमात्र व्हावे लागले. तेच ते कवनदुष्ट, परपुष्ट पण तूर्तरुष्ट कुमार. या सगळ्यांना विकासच करायचा आहे म्हण की."
"काय की बुवा. तीच गोष्ट भेटवस्तूंची असंही इथं म्हटलंय. अर्थात तुला हणम्या काय फरक पडतो म्हणा. तू आयुष्यभर दुसर्यांच्या वस्तू बिनदिक्कत वापरत आला आहेस. त्यातून तुझी सगळ्यात आवडती भेटवस्तू म्हणजे 'नारंगी' ची क्वार्टर. ती मिळाली की तुला आनंद तर होतोच, पण ती चपटी पोटात गेली की मग तुझं जे काही होतं, ते बघूनच इतरांनाही अवर्णनीय आनंद होतो.
"चल." हणम्या उठला.
"अरे, थांब, थांब. सात तरी वाजू देत.तोपर्यंत हे पुढचं वाच. नोकरी करणार्या व्यक्तींबद्दल मला नेहमी एक जाणवतं ते म्हणजे केवळ नोकरीच्या निमित्ताने त्यांना मिळणारी - समाजाभिमुखता आणि लोकसंग्रह. नोकरीमुळे पैसा मिळणे हा फायदा होतोच होतो पण मला विचाराल तर अजून एक महत्त्वाचा फयदा होतो तो म्हणजे - मानसिक स्वास्थ्य उत्तम रहाणे. अर्थात काय आहे, हणम्या, यातलं तुला काही ठाऊक असण्याचा प्रश्नच येत नाही..." मी म्हणालो.
"म्हणून काय झालं? नोकरी करणार्या तुमच्यासारख्यांचं काय होतंय ते मी बघतो आहेच की. लोकांनी पैसे बुडवणे, बॉसने त्याच्या वशिल्यातल्या माणसांना प्रमोशन देणे, आपल्या मऊपणाचा फायदा घेऊन आपल्या सहकार्यांनी आपल्यावर कामाची गाठोडी टाकून स्वतः टिंग्या मारत हिंडणे .... मनस्वास्थ्य टिकवण्याचे कित्ती कित्ती हे मार्ग गं बाई!"
"कुजकटासारखं बोलू नकोस माणूसघाण्या. चांगले सहकारी मिळाले आणि बाँडींग झालं तरच. परस्पर-संबंध (सोशल इंटरॅक्शन) ही अर्थातच दुधारी तलवार असते. "वळलं तर सूत नाही तर भूत" असे सहकारी देखील क्वचित मिळतात. पण प्रत्येक संबंधामधून सामाजिक पैलू (सोशल नॉर्म्स) हे शिकायला मिळतातच मिळतात, हे माहिती आहे का तुला?
"संबंधांतून काय शिकायला मिळतं म्हणालास?" हणम्यानं दुसरी काडी उचलली.
"काही नाही. एलनला मूल नाही म्हणे."
"हे असंच होणार बघ. संबंधातून शिकायचा ध्यास घेतला तर लोकांना मुलं कशी होणार?" हणम्या खिदळला.
"मूर्ख आहेस तू हणम्या. स्नेहाच्या ठिकाणाचे कामसंबंध नव्हे, कामाच्या ठिकाणाचे स्नेहसंबंध."
"तेच ते.प्रत्येकालाच याची गरज असते नाही का?"
मी कॉम्प्युटर बंद केला. "चल.." मी चपला सरकवत म्हणालो. हणम्या तर एव्हाना जिन्याच्या पायर्या उतरायलाही लागला होता.
प्रतिक्रिया
अब तेरा क्या होगा सन्जोप?
* त्या प ण ती !!बाकी
जवाहर
जवाहर? बाळीशाचं आणि हणम्याचं
''जेलुसिल' द्या' च्या ऐवजी
+१
मस्त
सन्जोपराव तो चिमटा काढायची
प्रभावी
कांटां लगा .. हाय लगा ...
"मराठी संकेतस्थळावरील महिला-
हॅहॅहॅहॅ हॅहॅहॅहॅहॅ
मस्त विडंबन. काही कोपरखळ्या
छान!
(विषय दिलेला नाही)
स्फुर्ती घेउन लिहीले
मस्त