मदत
नमस्कार मंडळी,
आज आपल्या मदतीची, मार्गदर्शनाची, आणि प्रोत्साहनाची मदत प्रकर्षाने जाणवतेय. त्याचसाठी हा पत्रप्रपंच!
आधी थोडी पार्श्वभूमी सांगतो. मी गेली ६.५ वर्षे तंत्रलेखन (टेक्निकल रायटिंग) या क्षेत्रात काम करत आहे. पुण्यातील एका नामवंत सॉफ्टवेअर कंपनीमध्ये मी गेली ६.५ वर्षे या क्षेत्रात काम करत असून सध्या मी सीनियर काँटेंट लीड या पदावर कार्यरत आहे. त्या आधी मी जालन्यातील एका कंपनीमध्ये आणि पुण्यातील एका मॅन्युफक्चरिंग कंपनी मध्ये मेंटेनन्स इंजिनीयर म्हणून, नंतर एका छोट्या वितरण कंपनीमध्ये सेल्स इंजिनीयर म्हणून काम केलेले आहे. आतापर्यंत माझा एकूण अनुभव साधारण ९ वर्षे आहे.
मी विद्युत अभियांत्रिकी पदवी चा अभ्यासक्रम २००० साली कराड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून पूर्ण केलेला आहे. लिखाणाची आवड असल्याने मी तंत्रलेखन या क्षेत्रात शिरलो. हे काम करत असतानाच मी बाकीचे इंग्रजी-मराठी लिखाण देखील बर्याच प्रमाणात केले. माझ्या या क्षेत्रात ग्राहकाशी आणि संगणकप्रणाली विकसित करणार्या निरनिराळ्या गटांशी सतत संपर्क साधून त्यांच्याकडून माहिती गोळा करून लिखाणाचे काम करावे लागते. चौकस विचार, उत्तम संभाषण कौशल्य, माहितीचे पृथ्थकरण करून तिचे चटकन आकलन करून घेणे, मग अतिशय सोप्या भाषेत त्या माहितीला कागदावर मांडणे इत्यादी (आणि बरीच) कौशल्ये या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असतात. (मी ही कौशल्ये बर्यापैकी विकसित केलेली आहेत असे म्हणायला किंचित वाव आहे. :-))
कालानुरुप आता एखाद्या पुढच्या क्षेत्रात जाऊन तिथली आव्हाने पेलावीत असा विचार आता डोक्यात घोळत आहे. तंत्रलेखन या क्षेत्रात एका ठराविक पातळीपुढे जाण्यास अडचणी असतात शिवाय कामाचे स्वरूप जवळपास सारखेच असल्याने आता पुढे जाण्याची वेळ आलेली आहे असे प्रकर्षाने वाटतेय. हळू-हळू तंत्रलेखन हे क्षेत्र कमॉडीटाईझ्ड (मराठी शब्द माहित नाही) होत असल्याने आणि स्वतः संगणक क्षेत्रातली मंडळी लिखाणात तरबेज होत असल्याने आमच्या क्षेत्रातल्या संधी दिवसेंदिवस कमी होत आहेत असा एक समज पसरला आहे. कुठलीही प्रणाली विकसित झाल्यावर ग्राहकानुभव (युजर एक्स्पिरीयन्स) अत्यंत उच्च दर्जाचा असल्यास लिखित स्वरूपातल्या माहितीचे स्थान दुय्यम होते असा एक मतप्रवाह सध्या प्रचलित होत आहे. अर्थात हे सगळे अगदी दृष्य स्वरूपात दिसण्यासाठी बराच कालावधी जावा लागेल हे नक्की. पण आतापासूनच पुढच्या १० वर्षात होऊ शकणार्या बदलामुळे पोटापाण्याची जरा चांगली सोय करणे चांगले असा विचार करून मी इतर क्षेत्रांचा विचार सुरु केला आहे. :-)
ब्रँड मॅनेजमेंट किंवा जाहिरात किंवा बिझनेस अॅनॅलिसिस ही क्षेत्रे मला खुणावत आहेत. ब्रँड मॅनेजमेंट आणि जाहिरात ही क्षेत्रे जरा आवडीची वाटतात. विविध ब्रँडसचा अभ्यास करणे, त्याबद्दल वाचन करणे, जाहिरातींचा अभ्यास करणे, कॉपी लिहिणे, संकल्पनांचा विचार करणे इत्यादी गोष्टी मी आवड म्हणून (स्वतःपुरत्या) करत असतो. आवडीच्या क्षेत्रात पाऊल टाकल्यास यशाची शक्यता वाढते असे म्हटले जाते. बिझनेस अॅनॅलिसिस हे क्षेत्र पण आव्हानात्मक आहे. ग्राहकाशी संपर्क साधून आणि सतत संपर्कात राहून गरजा जाणून घेणे आणि त्या माहितीचे वहन घडवून आणणे हे या क्षेत्रातले मुख्य काम असे माझ्या ऐकीवात आहे. पण या क्षेत्रात जाण्यासाठी डोमेन ज्ञान, प्रमाणपत्रीकरण (सर्टिफिकेशन) इत्यादी बाबी पूर्ण असणे आवश्यक आहे असेही ऐकले आहे. माझ्या तंत्रलेखनाच्या नोकरीत कामाच्या स्वरूपामुळे डोमेन ज्ञान असे काही मिळवण्याच्या संधी फारशा उपलब्ध झाल्याच नाहीत.
या क्षेत्रातील कुठलाच अनुभव नसल्याने या क्षेत्रांत प्रवेश मिळवणे तसे अवघडच. शिवाय प्रापंचिक जबाबदार्या असल्याने 'अ' पासून सुरुवात करण्याची हिंमत होत नाही. माझ्या क्षेत्रात मी आत्मसात केली कौशल्ये या क्षेत्रांत देखील कामात येतील असे मला वाटते.
आपणापैकी कुणी किंवा आपण ओळखता अशांपैकी कुणी जर या किंवा अशा क्षेत्रात काम करत असाल तर कृपया मदत करू शकाल का? आपले अनुभव, माहिती, काही उपाय, सल्ला अशी कुठलीही मदत स्वागतार्ह आहे. शिवाय या क्षेत्रांपेक्षा अजून कुठली क्षेत्रे माझ्यासाठी योग्य असू शकतात याचीही माहिती पुरवल्यास मी अत्यंत आभारी राहीन. कुठे तरी सुरुवात करण्याच्या संधींबद्दल माहिती देखील खूप उपयुक्त ठरेल.
आपणास माझ्याविषयी अजून काही माहिती हवी असल्यास कृपया मला संदेशातून नक्की विचारा.
प्रतिसादांच्या अपेक्षेत.
धन्यवाद,
समीर
वाचने
1835
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
पहा
अॅनॅलिष्ट
नवीन क्षेत्रे !!
धन्यवाद!
तुम्ही जर वर्ष-सव्वावर्ष शिक्षणासाठी काढू शकत असाल तर