क्रॅनबेरी चटणी
येत्या गुरवारी इथे थॅक्सगिव्हिंग आहे. या थॅक्सगिव्हिंगच्या टेबलवर क्रॅनबेरी सॉस हवेच. आमच्या इथे मात्र या सॉस पेक्षा क्रॅनबेरीची चटणीच आवडते. जालावर शोधल्यास बर्याच कृती सापडतील. आमच्याकडे केला जाणारा काहीसा देशी अवतार इथे देतेय.
साहित्य :
१२ औस क्रॅनबेरीज
१/२ सफरचंद तुकडे करुन ; मी ग्रॅनी स्मिथ वापरते.
मूठभर मनुका किंवा बेदाणे (नसले तरी चालेल)
१/४ कप ब्राऊन शुगर ; नेहमीची पांढरी साखर चालेल
२ टी स्पून जीरे पावडर.
१/२ टी स्पून ऑल स्पाईस पावडर (नसल्यास १/४ टी स्पून दालचिनी पावडर + १/४ टी स्पून लवंग पावडर)
१/४ कप सायडर विनेगर, रेड वाईन, लिंबू रस या पैकी जे काही असेल ते
१ टी स्पून तिखट देशी चव हवी असल्यास
साखर, जीरे पावडर, तिखट, लवंग,दालचिनीचे प्रमाण आवडीप्रमाणे कमीजास्त करु शकता.
कृती :
क्रॅनबेरीज आणि सफरचंदाचे तुकडे फूड प्रोसेसर/ चटणीच्या भांड्यातून भरड वाटून घ्यावेत. जाड बुडाच्या पातेल्यात वाटलेले मिश्रण आणि बाकीचे सर्व जिन्नस एकत्र करुन मध्यम आचेवर शिजवत ठेवावे. अधुन मधुन ढवळावे. १५-२० मिनिटानी मिश्रणातून बुडबुडे येऊ लागले की आच मंद करुन अजुन १०-१५ मिनिटे झाकण ठेऊन शिजवावे. खाली लागू नये म्हणून अधुन मधुन ढवळावे. चव घेऊन आवडीप्रमाणे साखर, तिखट वगैरे कमी वाटल्यास घालून नीट ढवळून आचेवरुन खाली उतरवावे. गार झाले की बाटलीत भरून फ्रीज मधे ठेवावे.
१०-१२ दिवस छान राहते. आमच्या कडे २-३ दिवसात संपते.
ही चटणी खाण्यासाठी बरोबर टर्की हवीच असे काही नाही. चिकन बरोबर किंवा ब्रेड ला लावूनही छान लागते
वाचन
6117
प्रतिक्रिया
0