मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तुम्ही तुमच्या मुलांना कोणत्या माध्यमातुन शिक्षण देत आहात कि॑वा द्याल

गणा मास्तर · · कौल

वाचने 2421 वाचनखूण प्रतिक्रिया 42

गणा मास्तर Wed, 05/21/2008 - 05:58
हल्ली इंग्रजीतुन शिकण्याचे फॅड वाढत आहे. मायबोलीतुन शिकलो तर इंग्रजी येणार नाही , नोकरी मिळणार नाही अशा भितीने पालक मुलांना इंग्रजी माध्यमात घालत आहेत. माझ्या मते मराठीतुन शिकल्याने विषय व्यवस्थित समजतात. स॑वादासाठीचे इंग्रजी सहज शिकता येते. इंग्रजीची भिती बाळगायची गरज नाही. या विषयावर चर्चा व्हावी म्हनुन हा कौल.

बेसनलाडू Wed, 05/21/2008 - 10:14
मुख्य कारणे दोन - १. मराठी ही ज्ञानभाषा होईस्तोवर माझ्या मुलांची मुले किंवा त्यांचीही मुले झाली असण्याइतका वेळ गेलेला असू शकतो. आणि नसेल तर तेव्हाही मराठीचे ज्ञानभाषा म्हणून अस्तित्त्व असेल की नाही याबद्दल साशंक आहे. २. मराठी माध्यमातून शिक्षण देणार्‍या नामांकित शाळांची सध्याची स्थिती, त्यांच्या नामशेष होण्याच्या वाटेवरची स्थिती याचि देही याचि डोळा पाहिल्याने मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकवायचा विचार प्रबळ झाला आहे. मराठी माध्यमाच्या शाळाच उरल्या नसतील, तर कसे बरे शिकवायचे मुलांना मराठी माध्यमातून? (विचारशील)बेसनलाडू

limbutimbu Wed, 05/21/2008 - 10:44
केवळ इन्ग्रजी नीट बोलता यावे याकरता मला माझ्या मुलान्ना "देशी इन्ग्रज" बनवायचे नाहीयेत इन्ग्रजीच काय, कोणतीही भाषा शिकायला तिचा अभ्यास करणे महत्वाचे अस्ते, पण आयुष्यातली महत्वाची शालेय जीवनातली वर्षे परक्या भाषेच्या जोखडाखाली माझ्या मुलान्नी काढावीत असे मला वाटत नाही जीवनविषयक आणि सन्स्क्रुती विषयक बाबी मात्रुभाषेतूनच शिकल्यागेल्या पाहिजेत, तर त्याला अर्थ हे! अन्यथा परक्या भाषेचा स्विकार हे जवळपास "परक्या राष्ट्राचा स्विकार करण्यायेवढे" महा पातक ठरू शकेल सबब मराठी अर्थात मात्रुभाषेचे माध्यम! लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P

ईश्वरी Wed, 05/21/2008 - 11:55
मी युएस मधे असल्याने इंग्लीश की मराठी असा पर्यायच नाहीये. जेव्हा केव्हा भारतात परत जाऊ तेव्हा मुलांना मराठी माध्यमातून शिकणे जड जाईल. त्यामुळे भारतात परतणे झाले तर मुलांना इंग्लीश माध्यमाच्याच शाळेत घालावे लागणार. ईथे आम्ही घरात मराठीच बोलतो. मुले सुध्दा छान मराठी बोलतात. शिवाय मी त्यांना घरी मराठी लिहायला व वाचायला शिकवत आहे. अक्षर ओळख झालेली आहे. येत्या उन्हाळी सुट्टीत बाराखडी शिकवायचे ठरवले आहे. बाकी बेसनलाडू यांनी वर सांगितलेच आहे....त्यांच्या मताशी सहमत त्यामुळे जरी मी भारतातच असते तरी मुलांना इंग्लीश माध्यमाच्या शाळेत घातले असते . माझ्या मते मराठीतुन शिकल्याने विषय व्यवस्थित समजतात -- असहमत. मला तरी असा अनुभव नाहीये की मराठीतुन शिकल्यानेच विषय व्यवस्थित समजतात्..ईग्लीश मधुन शिकल्याने डोक्यावरुन जाते. आणि मुलांच्या बाबतीतही असा अनुभव नाहिये.. ईश्वरी

In reply to by ईश्वरी

गणा मास्तर Sat, 05/24/2008 - 06:00
तुम्ही मुलांना घरी मराठी लिहायला वाचायला शिकवता वाचुन आनंद वाटला. मात्रुभाषेतुन शिकल्याने विषय चांगले समजतात असे भाषातज्ञ आणि शिक्षण तज्ञांचे मत आहे. आणि माझा अनुभव पण आत्ता या क्षणी संदर्भ देता येत नाही पण सकाळमध्ये पुर्वी लेख प्रसिद्ध झाल्याचे आठवते.

माझी दोन्ही मुले मराठी तुन च शिकत आहेत. आज जेव्हा माझा ८ वर्षाचा मुलगा फास्टर फेणे, श्यामची आई, बोक्या सातबंडे अगदी माण्देशी माणसं वाचतो, त्यावर स्वतःचे मत मांडतो, दिलीप प्रभावळ्करांना पत्र लिहुन दाद देतो ,तेव्हा वाटतं निर्णय योग्य आहे.. पण लोकांच्या प्रतिक्रिया मात्र अनेकदा कमी लेखणार्‍या, मुर्ख ठरवणार्‍या असतात हा अनुभव. योग्य-अयोग्य काळ च ठरवतो, पण निदान मी मुलांना आयुष्यातली महत्वाची शालेय जीवनातली वर्षे परक्या भाषेच्या जोखडाखाली घालवायला लावली नाहीत याचे समाधान.

In reply to by पद्मश्री चित्रे

आनंदयात्री Wed, 05/21/2008 - 12:19
छान प्रतिसाद फुलवाराव पण असहमत. >>योग्य-अयोग्य काळ च ठरवतो, पण अहो असे झाले तर अडाणी माणुस म्हणेल की "आमी कुठं शिकलो, आम्ही काय कमवत नाही मिठ मिरची ?" >>आयुष्यातली महत्वाची शालेय जीवनातली वर्षे परक्या भाषेच्या जोखडाखाली अजिबात जोखड वैगेरे नाही हो, जसे वर काही लोकांनी आपल्या मुलांना स्वतः मराठी शिकवण्याचा उपक्रम अवलंबला आहे, तश्या मताचा मी आहे. >>स्वतःचे मत मांडतो, दिलीप प्रभावळ्करांना पत्र लिहुन दाद देतो खुप छान, पोरगा चुणचुणीत दिसतो. सर मी जर इंग्रजी माध्यमात शिकलो असतो ना तर मी जेव्हा वुडहाउस पहिल्यांदा वाचला तेव्हा खुप छान समजला असता, अगदी वेगळी मजा अनुभवता आली असती असे वाटत असते कधीकधी, असो.

In reply to by आनंदयात्री

>>अजिबात जोखड वैगेरे नाही हो, जसे वर काही लोकांनी आपल्या मुलांना स्वतः मराठी शिकवण्याचा उपक्रम अवलंबला आहे, तश्या मताचा मी आहे. भाषा शिकणे आणि भाषेतुन शिकणे यात फरक आहे ना आनंदयात्री? >>अहो असे झाले तर अडाणी माणुस म्हणेल की "आमी कुठं शिकलो, आम्ही काय कमवत नाही मिठ मिरची ?" अडाणी रहा असे कुठे म्हटले मी? >>खुप छान, पोरगा चुणचुणीत दिसतो.-धन्यवाद. आणि हो, मी फुलवा "राव " नाही :))

In reply to by पद्मश्री चित्रे

आनंदयात्री Wed, 05/21/2008 - 12:44
>>भाषा शिकणे आणि भाषेतुन शिकणे यात फरक आहे ना अगदी हेच्च म्हणतोय मी फुलवाताई (राव साठी माफी द्यावी) .. अहो पोरगा त्या भाषेतुन शिकला तर लहानपणाच्या तीव्र आकलनशक्ती मुळे तो ती भाषा उत्तम जाणेल, त्यात त्याला उत्तम गती येईल. उद्या किती चॅलेंजेस आहेत, आजुबाजुला सगळे लोक थोड्या फार फरकाने सारख्याच कॅपॅबिलिटीचे असतात हो, गती महत्वाची, जो गतिमान तो पुढे जाईल ! चुक भुल द्या घ्या. (थोडक्यात ठोकु नका :) ) आपलाच - कासवयात्री

वेलदोडा Wed, 05/21/2008 - 13:28
--अहो पोरगा त्या भाषेतुन शिकला तर लहानपणाच्या तीव्र आकलनशक्ती मुळे तो ती भाषा उत्तम जाणेल, त्यात त्याला उत्तम गती येईल. उद्या किती चॅलेंजेस आहेत, आजुबाजुला सगळे लोक थोड्या फार फरकाने सारख्याच कॅपॅबिलिटीचे असतात हो, गती महत्वाची, जो गतिमान तो पुढे जाईल ! ह्या आनंदयात्री यांच्या मताशी पूर्णपणे सहमत. --आज जेव्हा माझा ८ वर्षाचा मुलगा फास्टर फेणे, श्यामची आई, बोक्या सातबंडे अगदी माण्देशी माणसं वाचतो, अहो फुलवा ताई, शामची आई , फास्टर फेणे एकवेळ मुलाने नाही वाचले तर त्यामुळे व्यावहारीक दुनियेत मुलाचे काही नुकसान होणार नाही. शेवटी घरातून होणारे सन्स्कार महत्वाचे असतात. इंग्लीश भाषेतही उत्तम साहित्य आहे. इंग्लीश माध्यमातील मुले ईंग्लीश साहित्य वाचतील. विषयाचे आकलन होणे महत्वाचे. माझी मुलगी (वय ७ वर्ष) ईन्ग्लीश पुस्तके वाचते. मराठी सध्या घरी शिकत आहे. त्यामुळे मराठी पुस्तके मी तिला वाचून दाखवतो. कालांतराने ती मराठी ही वाचू लागेल. तिला दोन्ही भाषा चांगल्या समजतात. द्वैभाषिक ( bilingual) म्हणून परिचितांनाही तिचे कौतुकच वाटते. सध्या सर्वत्र जागतीकरणाचा जोर वाढत आहे. ज्ञानाच्या अनेक शाखा उदयास येत आहेत. अत्याधुनिक ज्ञान सध्या तरी ईन्ग्लीश भाषेत उपलब्ध आहे. ज्ञानभाषा म्हणून ईन्ग्लीश येणे ही काळाची गरज बनली आहे. मराठी माध्यमाच्या शाळेत ईन्ग्लीश मराठी तून शिकवले जाते. म्हणजे तास ईन्ग्लीश विषयाचा पण शिक्षक- मुले यांचा संवाद मराठीतून. जर मराठी माध्यमात शिकलेला मुलगा शालेय शिक्षण पूर्ण होऊन बाहेर पडल्यावर ईन्ग्लीश मध्ये सहज बोलत असेल.. ईन्ग्लीश मध्ये व्यवस्थित वाचन लिखाण करी त असेल, त्याच्या मनात ईन्ग्लीश ची भिती राहीलेली नसेल तर आमचीही मराठी माध्यमात मुलांना शिकवायला ना नाही. पण असे होताना दिसत नाही. उलट मराठी माध्यमातील मुलांना शाळेतून बाहेर पडल्यावर कॉलेजमध्ये वा नोकरी च्या ठिकाणी इन्ग्लीश fluently बोलण्यासाठी , समजण्यासाठी जादा परिश्रम घ्यावे लागतात.

In reply to by वेलदोडा

>>मराठी सध्या घरी शिकत आहे. त्यामुळे मराठी पुस्तके मी तिला वाचून दाखवतो. कालांतराने ती मराठी ही वाचू लागेल-मी इन्ग्लीश वाचुन दाखवते ,हाच फरक आहे. तो ही वाचेल नन्तर. ईन्ग्लीश ची भिती -ही आपणच निर्माण केलेला बागुलबुवा आहे. आजकाल, सर्व मराठी शाळांत ५ वी पासुन सेमी-इन्ग्लीश आहे,त्यामुळे एवढा मोठा प्रश्ण येणार नाही. गरज आहे, आपली मानसिकता बदलण्याची. >>शामची आई , फास्टर फेणे एकवेळ मुलाने नाही वाचले तर त्यामुळे व्यावहारीक दुनियेत मुलाचे काही नुकसान होणार नाही.>> या ला काही अर्थ नाही! जे काही ही वाचन करत नाहीत , त्यांचे ही व्यावहारीक दुनियेत काही नुकसान होत नाही ,हो!

विसुनाना Wed, 05/21/2008 - 16:01
माझी दोन्ही मुले इंग्रजी शाळेतच शिकत आहेत. पण घरात मराठीचे दृढ संस्कार असल्याने काही नुकसान होत नाही. आज जेव्हा माझा ११ वर्षाचा मुलगा एकीकडे एनसायक्लोपेडिया, रोशन दलालांचे 'पफिन हिस्टरी ऑफ इंडिया' , इंग्रजी वृत्तपत्रे वाचतो , समग्र हॅरी पॉटर वाचून त्यावर आपले मत मांडतो तर दुसरीकडे फास्टर फेणे, श्यामची आई, बोक्या सातबंडे, गोट्या, चिंगी, खडकावरला अंकुर, बंडखोर बंड्या वाचतो - स्वतःचे मत मांडतो, मराठी बालनाट्यात भाग घेतो, तेव्हा वाटतं निर्णय योग्य आहे... ज्ञानभाषा आणि मातृभाषा यांचा समतोल कुटुंबियांकडून सांभाळला गेला तर मराठीला दुय्यम स्थान मिळणार नाही.

भाई Wed, 05/21/2008 - 17:26
महाराष्ट्रात असेन तर मराठी माध्यमच. १. शाळांच्या गुणवत्तेचा मुद्दा विनाधार आहे. इंग्लिश शाळांची सरसकट गुणवत्ता जास्त चांगली आहे हे कशावरून मांडले? वस्तुतः आजकाल शाळा काढणे हा मोठा पैसे कमावण्याचा धंदा झालेला आहे आणि इंग्लिश माध्यमाच्या शाळा तर सोन्याची अंडे देणारी कोंबडी. पुण्यात यावर्षी आलेल्या नविन शाळा काढण्यासाठीच्या अर्जाचे आकडे काय सांगतात? हे सारे लोक समाजसेवा म्हणून या शाळा काढत आहेत असे मानायला आधार नाही. २. चीन, जपान, कोरीया इ. पूर्वेकडील व जर्मनीसह सर्व युरोपियन देश यातील मुलांना इंग्लिश माध्यमाची गरज पडत नाही. ते देश बहुतेक सर्व बाबतीत भारतापेक्षा प्रगत आहेत, राहतील असेही दिसत आहे. तिथेही कित्येक मुले इंग्लिश शिकतात पण भाषा म्हणून. ३. मातृभाषेतून शिक्षण घेतलेले खूप मोठे व यशस्वी लोक होत आलेत. गुजराती व मारवाडी समाज इंग्लिशच्या मदतीशिवायच सर्वत्र यशस्वी ठरलेला आहे. यशस्वी होणारे लोक त्यांच्या अंगच्या इतर गुणांमुळे यशस्वी होतात तर अयशस्वी लोकांपैकी काही लोक खापर फोडायला भाषेची सबब पुढे करतात. ४. इंग्लिश भाषा येण्यासाठी ती इतर विषय शिकण्याचे माध्यम म्हणून कशाला लागते? इतिहास हा विषय इंग्लिश माध्यमातून शिकण्याचा उपयोग नक्की काय? ५. भारतात इंग्लिश माध्यम हे प्रतिष्ठेचे लक्षण म्हणून पाहीले जाते, अंगभूत गुणांमुळे नाही. हा सामजिक प्रश्न झालेला आहे. वरचा वर्ग इंग्लिश माध्यमाच्या शाळेत जातो मग मध्यम वर्गाला वाटते मराठी माध्यमात 'खालच्या वर्गाचे लोक' जातात. आपले मूल त्या वातावरणात नको. ६. भारतात अनेक भाषा असूनही लोकांचे इतर भाषिक प्रांतांमध्ये सहज स्थलांतर होते आणि त्याचाही इंग्लिश माध्यमांच्या गरीमेला हातभार लागतो. ७. इंग्लिश माध्यमातून शिकलेली मुले पुढे जाऊन मराठी साहित्यनिर्मिती करतात? जर तसे नसेल तर सद्य कल पाहता लवकरच मराठी साहीत्य निर्मिती प्रभावीत होणार या शंकेला वाव आहे. नविन साहित्य निर्मितीविना भाषा किती काळ जगू शकते? मुळात भाषेची आवश्यकता जर संपायला लागलेली असेल तर ती भाषा किती काळ तग धरू शकेल? घरात मराठी शिकविणे पुरेसे ठरणार नाही असा माझा कयास आहे. जर तो चुकीचा ठरला तर मला फार आनंद वाटेल. वूडहाउस वाचणारी इतर मुले आहेत त्यामुळे वुडहाउसची काळजी नाही. पु. ल. किती दिवस वाचला जाईल? आणि उपयुक्ततावादाच्या सध्याच्या काळात "पु.ल. (किंवा तसे इतर साहीत्य) नाही वाचले तर काय फरक पडतो" असे ऐकायला नक्कीच मिळेल. हा र्‍हास लगेच दिसत नाही. जेव्हा त्याचे परीणाम दिसायला लागतात तेव्हा इतका उशीर झालेला असतो की ती प्रक्रिया सहजासहजी थांबवता येत नाही. जेव्हा सर्वसामान्य माणूस मराठीला दूर लोटतोय. आता शि़क्षणाच्या माध्यमाची पाळी आहे की जी सुरुवात आहे. इंग्लिश माध्यमातून शिकलेल्या मुलांना मराठीची गरज कशाला वाटेल? संस्कृत का मृत झाली याबद्दल मला निश्चित माहीती नाही पण मराठीचे आयुष्य लोकभाषा म्हणून फार नाही असे या सर्व प्रवाहाकडे पाहून वाटते. भाई

In reply to by भाई

मी देखील वूडहाऊस वाचायचा प्रयत्न केला. नाही कळले इतके. कुठे बिघडते? पु.ल. वाचून अनुभवता आले हे काय कमी आहे? आणि इंग्रजी शाळांमधे जाणारी किती मुले शेक्सपियर किंवा वूडहाऊस वाचतात. मी माझ्या एका कॉन्व्हेंटी मित्राला विचारले कि 'तू वाचले आहेस का रे वूडहाऊस' तर तो म्हणे 'नाही रे. होमवर्क मधून वेळच नाही मिळत.' आता घरच्या अभ्यासाला होमवर्क म्हणावे लागते. प्रश्न राहीला मराठी ज्ञानभाषा बनण्याचा. ती तर कधीच बनू शकेल असे वाटत नाही. कारण त्यासाठी इच्छाशक्ती लागते आणि ती मराठी माणसाकडे नाही. पूर्वी मराठीला ज्ञानभाषा बनविण्याचे प्रयत्न झाले असतील त्यामुळे बर्‍याच इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द आले असावेत. पण आता ते शब्द वापरणे म्हणजे मागास पणाचे लक्षण मानले जाते. मराठी शाळा काढली आणि त्याला मुलेच मिळाली नाहीत तर करणार काय? कदाचित सर्वाना आपापल्या मुलाना ज्ञानभाषेत शिकवायचे असेल तर कशाला पाहीजे मराठीचा अभिमान, मातृभाषा वगैरे सर्वकाही. जर आपली मातृभाषा आपण आपली ज्ञानभाषा बनवू शकत नसू तर कसले आम्ही मातृभाषेचे अभिमानी..? पुण्याचे पेशवे

चतुरंग Wed, 05/21/2008 - 19:13
मुलगा शाळेत इंग्लिश व्यतिरिक्त स्पॅनिशही शिकतोय. आम्ही घरी प्रामुख्याने मराठीच बोलतो त्यालाही मराठी चांगले बोलता येते/समजते. अजून देवनागरी लिपीची ओळख करुन दिलेली नाही, लवकरच देणार आहे. लहान वयात मुले अनेक भाषा सहज आत्मसात करतात त्याचा फायदा घ्यायचा प्रयत्न राहील. सध्या तरी इंग्लिश ही व्यवहारासाठी ज्ञानभाषा आहे हे वास्तव नाकारुन चालणार नाही. भारतात इंग्लिश माध्यमाच्या कित्येक शाळा हे पैसे कमाऊ कुरण झाले आहे तसेच कित्येक नामवंत मराठी शाळा दैन्यावस्थेत गेल्या आहेत/जात आहेत तेव्हा योग्य तो व्यावहारिक निर्णय त्या वेळच्या परिस्थितीवरच अवलंबून असेल. बहुतांशी भारतात परतल्यावरही मी इंग्लिश माध्यम कायम ठेवेन कारण सुरुवातीची बरीच वर्षे त्यातूनच शिकलेला असणार पण मराठीची नाळ तुटणार नाही ह्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न राहील. भ्रष्ट नक्कल करुन इंग्रजाळलेले असणे आणि इंग्लिश माध्यमातून शिक्षण घेतलेले असणे ह्याचा अर्थाअर्थी संबंध असतोच असे नाही. आणि हे बर्‍यापैकी वेळा पालकांच्या वागणुकीवर अवलंबून असते. पुढे मोठा झाल्यावर काय वाचायचे अशा गोष्टींबद्दल आडाखे बांधणे अवघड असते. त्यामुळे अमूकच वाच अट्टाहास नाही. पण इंग्लिशबरोबरच मराठीतले उत्तमोत्तम साहित्य त्याला आस्वादता आले तर आनंदच असेल. चतुरंग

प्रियाली Wed, 05/21/2008 - 19:31
माझी मुलगी अमेरिकेत असल्याने इंग्रजी शाळेत शिकते. तिला मराठी अक्षरांची ओळख स्वतःचे नाव लिहिण्यापुरती आहे. बरेचदा सुट्टीत लहान शब्द लिहिता येतात पण नंतर विसरून जायला होते आणि फक्त नावे लिहिण्यापुरती मराठी आठवते. आम्हाला भारतात परतायची इच्छा नाही त्यामुळे इंग्रजीतूनच शिकणार.

चित्रा गुरुवार, 05/22/2008 - 00:57
आमची मुलगी इंग्रजी शाळेत शिकते अमेरिकेत असल्याने. भारतात असले तरी मुद्दाम मराठी शाळेत घालेन असेही नाही. कधीतरी तिच्या लक्षात आले की तिला लिहीलेले मराठी कळत नाही / वाचता येत नाही, त्यामुळे अहंकार दुखावला गेला असल्याने हल्ली मराठी शब्द "लावून" वाचण्याचा प्रयत्न करते. मराठी व्यवस्थित बोलते. मराठी उच्चार बर्‍यापैकी "मराठी" आहेत. पूर्वी मला मराठी माध्यमातूनच महाराष्ट्रातील मुलांनी शिकावे असे वाटे. अजूनही वाटते. भाषेमुळे समाजाशी संबंध राहतो. ज्या समाजात राहतो त्या समाजाची भाषा येत नसली तर ते चुकीचे आहे. तसेच मराठी शाळेत घातले की मराठी येतेच असे नाही, मराठी वाचण्या-लिहीण्याची आवड कशी निर्माण करतो त्यावर सर्व अवलंबून आहे असे वाटते. असेच इंग्रजीचे. ---शाळेत घातले की ---- येतेच असे नाही, --- वाचण्या-लिहीण्याची आवड कशी निर्माण करतो त्यावर सर्व अवलंबून आहे असे वाटते - हे असे कुठच्याही भाषेसाठी लागू होईल. आमची मुलगी मोठी झाल्यावर इंग्रजी किंवा मराठी यापैकी कुठच्याही भाषेतून काही उत्तम लिहू शकली तर आम्हाला आवडेल.

धनंजय गुरुवार, 05/22/2008 - 03:27
(१) स्वतः मराठी माध्यमिक शाळेत शिकलात का असा कौल, आणि (२) हा वरील कौल एकत्रित घेतला तर माहितीपूर्ण वाटतो. प्रथम कौल रोचक वाटला होताच. पण त्यातून निघणारा अर्थ इतपत होता: मराठी संकेतस्थळावर येणारे बहुतेक सर्वजण मराठी माध्यमिक शाळेत शिकलेले आहेत. याचा समाजाला नेमका कसा अर्थ लावायचा हा विचार थोडा क्लिष्ट होता. आंतर्जाल वापरणार्‍या मराठीभाषकांपैकी किती लोक मराठी स्थळांवर येतात, हे ज्ञान माझ्यापाशी नाही. कदाचित मराठीभाषकांच्या इंग्रजी स्थळांवर कौल लावला असता तर वेगळी काही आकडेवारी दिसली असती. तो कौल मात्र येथील कौल साठी संदर्भ पुरवतो. असे दिसते की बहुतेक मराठी माध्यमात शिकलेले संकेतस्थळ-वापरणारे मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवतात. याचे दोन पैलू आहेत : १. संस्थळ वापरणारे मराठी-माध्यम-सुशिक्षित महाराष्ट्र सोडून अन्यत्र जातात, तिथे मराठी शाळा उपलब्ध नसतात. (पण या कारणाने पूर्ण हिशोब लागत नाही.) २. संस्थळ वापरणारे मराठी-माध्यम-सुशिक्षित महाराष्ट्रात राहातात, तेही काही प्रमाणात मुलांना इंग्रजी माध्यमात शिकायला पाठवतात. मुद्दा २. हे वैयक्तिक स्वातंत्र्य आहे खरे, पण एकत्रित आकडा म्हणजे बाजारशास्त्रीय/सामाजिक पाहाणीही आहे. लोकांना स्वतःचे "सफल" उदाहरण गाठीशी असून सुद्धा आजूबाजूला इंग्रजी माध्यमातली "सफल" उदाहरणे जास्त दिसतात का? असा प्रश्न मनात येतो. अथवा मराठी माध्यमिक म्हणून स्सफल""सफल" असलो, तरी आजूबाजूला अधिक मराठी माध्यमिक "असफल" लोक दिसतात का? ("सफल" हे "-" मध्ये टाकले, कारण केवळ बाजारू साफल्याबद्दल बोलत आहे.) मराठी माध्यमिक शिक्षण दर्जेदार असूनसुद्धा मराठी माध्यमाचा र्‍हास होत आहे, होत राहील असे भाकीत करण्यास धजावतो. थोडे वाईट वाटते आहे. कौल अर्थात पूर्णपणे वैज्ञानिक नाहीत, तरी त्यांतून काही माहिती मिळते. दोन्ही कौल टाकणार्‍यांना धन्यवाद.

गणा मास्तर गुरुवार, 05/22/2008 - 06:49
२. मराठी माध्यमातून शिक्षण देणार्‍या नामांकित शाळांची सध्याची स्थिती, त्यांच्या नामशेष होण्याच्या वाटेवरची स्थिती याचि देही याचि डोळा पाहिल्याने मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकवायचा विचार प्रबळ झाला आहे. मराठी माध्यमाच्या शाळाच उरल्या नसतील, तर कसे बरे शिकवायचे मुलांना मराठी माध्यमातून? आपणच आपल्या मुलांना मराठी शाळांत पाठवले नाही तर त्या कशा उरतील बरे. आपण पुढे होउन परिस्थिती बदलली पाहिजे.

In reply to by गणा मास्तर

बेसनलाडू Fri, 05/23/2008 - 09:24
तुम्ही येथे ठळकावलेला दुसरा मुद्दा पहिल्या मुद्द्याशी निगडीत आहे. त्यावर काही ठाम भाष्य करत असाल,तरच पुढे चर्चा करण्यात अर्थ उरतो. (सुस्पष्ट)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

गणा मास्तर Sat, 05/24/2008 - 06:12
मराठी ज्ञानभाषा होने कठीण आहे. आज आपला व्यापार परकीय देशांशी जास्त चालतो त्यामुळे ईन्ग्रजीची गरज भासनारच . पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही मराठी माध्यमातुन शिकलात तर तुम्हाला ईंग्रजी भाषेतुन कधीच बोलता येणार नाही. ईंग्रजीची भीती न बाळगता मराठी माध्यमांच्या शाळांत ईग्रजी संवाद कौशल्य शिकवणे गरजेचे आहे फक्त. बाकी भाईंची प्रतिक्रिया या विषयच्या सामाजीक कारणांवर चांगला प्रकाश टाकते. आपला अनिकेत

In reply to by गणा मास्तर

बेसनलाडू Sat, 05/24/2008 - 08:59
मराठी ज्ञानभाषा होने कठीण आहे. आज आपला व्यापार परकीय देशांशी जास्त चालतो त्यामुळे ईन्ग्रजीची गरज भासनारच . --- मराठी ज्ञानभाषा होणार नाही ना? तुम्हीच म्हणताय ते इथे. मग का शिकवू मुलांना मराठी माध्यमातून? आणि ज्ञानभाषा केवळ व्यापारापुरतीच मर्यादित नसते, असे (निदान मला तरी)वाटते. शास्त्रीय संशोधन; सामाजिक,सांस्कृतिक व वैचारीक मूल्यांचे आदानप्रदान;अभ्यास या सगळ्याशी ती फार जवळून निगडीत असते. आणि आज तुम्ही म्हणताय तो व्यापार किंवा मी म्हणतोय ते संशोधनादी संवाद यांपैकी काहीही केवळ महाराष्ट्र पातळीवर राहिलेले नाही, वैश्विक झाले आहे. आणि विश्वाची ज्ञानार्जनाची व संवादाची भाषा इंग्रजी आहे, हे आता तरी स्वीकारा! माधव त्र्यंबक पटवर्धनांनी उगाचच इंग्रजीला वाघिणीचे दूध म्हटले काय? मराठी शाळांचा आग्रह धरणारे शालेय शिक्षणोत्तर वाटचालीतही मराठीतूनच शिकायचा,परीक्षा द्यायचाघ्यायचा आग्रह का धरीत नाहीत? कारण ते किती अव्यवहार्य आहे, हे त्यांनाही चांगलेच(!) माहीत असावे! ईन्ग्रजीची गरज भासनारच --- हो ना? मग शिकवा की मुलांना इंग्रजी माध्यमातून! प्रॉब्लेम काय आहे?मध्यंतरी कुठेतरी एका अतिशय चांगल्या उपवर मुलाला केवळ त्याचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे, म्हणून मुलीने नकार दिल्याचे मिसळपाववरच वाचनात आले आणि त्यावरची मनोरंजक चर्चाही. त्या मुलीचा निर्णय चूक की बरोबर वगैरे मुद्दे थोडा वेळ बाजूला ठेवू. पण (या बाबतीत दुर्दैवाने झाले तसे) मातृभाषेतून झालेले शिक्षण हे उच्च शिक्षण, सामाजिक प्रतिष्ठा, नोकरीचाकरी व अर्थार्जन यांच्याही पलीकडे जाऊन जोडीदार निवडानिवडीतही नाक खुपसू लागले तर झक् मारली आणि मराठी मिडिअममधून शिकलो, असा एखाद्याचा ग्रह झाल्यास नवल वाटू नये. ऐन उमेदीच्या काळात असा न्यूनगंड निर्माण होणे खचितच चांगले नाही. अर्थात, तो तसा होऊ नये यासाठी मानसिकदृष्ट्या कोण किती सक्षम इ. बाबी मुद्दा मांडताना वगळल्या आहेत. 'वर्स्ट केस'मध्ये तो मुलगा तितका कणखर नाही व 'ऍवरेज केस'मध्ये तो मुलगा बंडखोर किंवा लोकापवाद नाही, असे मानूया. सामाजिक राजकारणाबाबत मांडले गेलेले अनेक मुद्दे अतिशय वास्तविक आणि विचार करण्याजोगे आहेत. जाताजाता इतकेच म्हणवेसे वाटते की संस्कार,जीवनशैली,ज्ञानार्जन,स्वसंस्कृतीबद्दल प्रेम व आदर,सर्वांगीण प्रगती या बाबी मराठी किंवा कोणतीही मातृभाषा - फक्त यांवरच - अवलंबून नसतात. त्याहीपेक्षा महत्त्वाचा असतो तो आत्मविश्वास, व्यापक व सर्वसमावेशक नि डोळस दृष्टिकोन. आणि त्यासोबत वैयक्तिक आचारविचार नि आवडीनिवडी व सद्सद्विवेकबुद्धी. मराठीचा आग्रह धरा नक्कीच पण त्याचे रुपांतर दुराग्रहात होऊ देऊ नकात.मराठीतीलच एक ख्यातनाम साहित्यिक दत्तो वामन पोतदार यांचा 'बहुभाषक व्हा' हा संदेश येथे उधृत करायचा मोह आवरत नाही. याबद्दल अधिक ऊहापोह येथे वाचता येईल. (सविस्तर)बेसनलाडू

फटू Fri, 05/23/2008 - 07:23
मी जर महाराष्ट्रात राहत असेन तर माझी मुलं मराठी माध्यमाच्या शाळेतुनच शिकतील... माणसाचं आयुष्यात पुढं जाणं हे तो कुठल्या माध्यमाच्या शाळेतुन शिकला यावरच मुळीच अवलंबुन नसतं. तसंच ते तो कुठल्या वातावरणात शिकला यावरही अवलंबुन नसतं. तसं असतं आज माझ्यासारखी शेतकरी कुटुंबात वाढलेली, गावांमधल्या मराठी माध्यमाच्या शाळांमधून शिकलेली मुलं कधीच आयुष्यात काही करू शकली नसती... आयुष्यात काही मिळवायचं असेल तर आवश्यक असते गती... येणार्‍या अडीअडचणीन्वर मात करून पुढे जाण्याची जिद्द.. आज सारेच ओरडत आहेत की मराठी माध्यमाच्या शाळांमधला शिक्षणाचा दर्जा खूप खालावला आहे. काही ठिकाणी काही प्रमाणात ते खरं आहे सुध्दा (उदाहरणार्थ मुंबई महानगर पालिकेच्या मराठी शाळा - पोरं सातवी आठवीत जातात तरी एक वाक्य न अडखळता वाचता येत असेल तर शप्पथ). पण मराठी माध्यमाच्या चांगल्या शाळा सुद्दा आहेत... मराठी शाळांमध्ये शिकवत नाहीत अशी जे खोटी बॉम्ब मारतात, त्याना त्यांच्या मूलाना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवायचं असतं... कारण तो त्यांच्या 'स्टेटस' चा सवाल असतो... जर शिक्षणाच्या माध्यमाने काही फरक पडत नसतो तर का आपण मूलाना मराठीतून शिकवू नये ? किंवा इंग्रजीतूनच शिकवण्याचा अट्टाहास का ? पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

विजुभाऊ Fri, 05/23/2008 - 10:26
अनिकेत भौ तुमचे नाव अनिकेतकेदारी हे अगदी त्या सारे कळतनकळतच घडते सारखे वाटते.

प्रभाकर पेठकर Fri, 05/23/2008 - 14:37
परीस्थितीत झपाट्याने बदल झाला आहे. आमच्या काळी कॉन्व्हेंट किंवा इंग्रजी माध्यमातून शिकणे तितकेसे 'कॉमन' नव्हते. त्याला कारण.... १) अशा शाळांची न परवडणारी फी २) घरी मुलांचा इंग्रजीतून अभ्यास घेण्याची पालकांची (विशेषतः आयांची) असमर्थता ३) स्थानिय क्षेत्रा बाहेरील नोकर्‍यांचे अनाकर्षण आणि ४) सर्वसाधारण मध्यम वर्गातील सर्व मुले मराठी शाळेतच जात असल्यामुळे आपणही तसेच करण्याचा कल. इत्यादी. आता परिस्थिती खूप बदलली आहे. १) आमदनीतील भरमसाठ वाढ. इंग्रजी माध्यम शाळा परवडण्याच्या आवाक्यात आल्यात. २) नवरा-बायको दोघेही ग्रॅज्युएट्/उच्चशिक्षित असल्यामुळे इंग्रजीतून घरचा अभ्यास घेणे ही समस्याच उरली नाही. ३) टीव्ही आणि इतर प्रसार माध्यमांनी विविध क्षेत्रातील संधींच्या उपलब्धतेवर सततचा टाकलेला प्रकाशझोत मध्यमवर्गालाही आकर्षित करीत आहे. ४) इंग्रजी माध्यमाक्डे वळणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येत झालेली भरमसाठ वाढ, आपले पाल्य ह्या स्पर्धेत मागे तर पडणार नाही नं! ही भिती. ५) सर्व समाज, (देशीय-आंतरदेशीय) एकमेकात मिसळ्यामुळे पुर्वी नव्हते इतके इंग्रजी भाषेला महत्त्व प्राप्त झाले आहे. इंग्रजीतून प्रभावी संभाषण करू शकणार्‍यांची छाप लगेच पडते ही सामजिक मानसिकता/वास्तविकता आहे. इंग्रजी भाषा येणं ही भावी यशाची पहिली पायरी समजली जाते. 'जो बोलतो त्याच्या शेणीसुद्धा विकल्या जातात जो बोलत नाही त्याचे मोती पण विकले जात नाहीत' असे म्हणतात. त्यात फक्त 'इंग्रजी' हा शब्द जोडला तर ती आजची परिस्थिती आहे असे म्हणायला हरकत नसावी. मातृभाषा, राष्ट्रभाषा आणि जगाची भाषा ह्यात पहिल्या दोन सहज जमतात तिसरी शिकून घ्यावी लागते. ह्यातली कुठलीही एक शिकल्यामुळे दुसरी भाषा मागे पडते असे नाही. त्यामुळे इग्रजी शिकल्याने मराठी मागे पडते आहे, मराठीचे नुकसान होते आहे असे म्हणणे गैर आहे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करून नये. इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेताना मातृभाषाही तोंडवळणी पाडून घ्यावी. इंग्रजी साहित्याबरोबरच मराठी साहित्यही वाचावे. गरज असेल तिथे इंग्रजी आणि इतर वेळी मातृभाषेचा वापर आवर्जून करावा. दोन्ही भाषांच्या शुद्धतेचा आग्रह धरावा. धेडगुजरी भाषा बोलून दोन्ही भाषांवर अन्याय करू नये. इंग्रजांकडून आपण पँट-शर्ट घेतले ते आपल्या आंगवळणी पडले. त्याने आपले मराठीपण कुठेही डागाळले नाही. पण पँट-शर्टावर आपण पागोटे-मुंडासे बांधत नाही. धोतर नेसून त्यात शर्ट खोचत नाही. एका पायात चप्पल आणि दुसर्‍या पायात बुट वापरत नाही. मग भाषेतच धेडगुजरीपणा का असावा? जी भाषा वापराल तीही शक्यतो शुद्धच असावी. हेच संस्कार स्वतःवर आणि मुलांवरही प्रयत्नपुर्वक केले तर मराठी भाषा, मराठीपण मरणार नाही. आपल्या मुलांना/पाल्यांना इंग्रजी माध्यमातून शिकवणारे सर्व मराठी भाषेचे शत्रू ही भूमिका बाळगू नये. उलट आज मराठी माणूस मी आणि माझं शहर्/खेडं ह्यातून बाहेर पडून 'ग्लोबल' होत आहे ह्याचा अभिमान बाळगावा. त्याच बरोबर मराठी पुस्तके 'विकत' घेऊन वाचावीत. लग्नकार्यात, मुंजीत, वाढदिवसाला किंवा सहजही वाचनिय मराठी पुस्तके एकमेकांना भेट द्यावी. खेळणी, पुष्पगुच्छ आणि 'बंद पाकिटं' देण्यापेक्षा हे कितीतरी चांगले कार्य होईल्.मराठी नाटके, सिनेमा, काव्यवाचन आदी कार्यक्रम पाहून त्यावर घरात/मित्रांमध्ये चर्चा करावी. बाहेर भेटणार्‍या प्रत्येक अनोळखी माणसाशी प्रथम मुद्दाम मराठीतून बोलावे. त्याला समजले नाही तर (आणि तरच) हिन्दी/इंग्रजी भाषेत बोलावे. मी मराठीला कमी लेखत नाही पण इंग्रजी माध्यमातून शिक्षणाचे समर्थन करतो. मी आणि माझी पत्नी आम्ही मराठी माध्यमतून शिकलो आहोत. आमचा मुलगा इंग्रजी माध्यमातून शिकला आहे. पण त्याला आम्ही नुसते मराठी शब्द आणि वाक्य शिकवत नाही तर 'मराठी भाषा' शिकविण्याचा प्रयत्न करतो. भाषेचे सौंदर्य समजाऊन देतो. साहित्याचे रसग्रहण शिकविण्याचा प्रयत्न करतो. मराठी भाषेची कठोरता, कोमलता आणि लवचिकता शिकविण्याचा प्रयत्न करतो. असो. बर्गर्/पिझ्झा खाल्ला म्हणून झणझणीत मिसळ-पाव विसरत नाही.

गणा मास्तर Sat, 05/24/2008 - 06:43
पेठकर काका आपले भाषेच्या जतनाबाबतचे विचार पटले. ईंग्रजी काळाची गरज आहे हेही खरेच. पण त्यासाठी ईंग्रजी माध्यम हाच एक पर्याय आहे असे नव्हे. मराठी माध्यमांच्या शाळांत ईग्रजी संवाद कौशल्य शिकवले तर ईंग्रजी सहज बोलता येईल. भाषा धेडगुजरी बोलली जाउ नये हेही खरे पंण ते होताना दिसत नाही. सगळेच पालक आपल्यासारखे सुजाण नसतात. तसे असते तर किती बरे झाले असते. ईंग्रजी माध्यमातली मुले जास्त धेडगुजरी बोलतात. बाजरतुन पायनापल आणले . मी मिल्क पिले आम्ही अंदमान आयलंडला गेलो होतो. ही काही प्रातिनिधिक उदाहरणे. वारांची नावे ,भाज्यांची नावे ही बर्याचदा ईंग्रजीत घेतली जातात. माझ्या एका मित्राला तर "महासागर" हा शब्दच माहीत नव्हता. म्हणुन मराठीतुन शिकु आणि भाषा म्हणुन ईम्ग्रजी व्यवस्थित शिकावी असे वाटते. धंनजय प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. लोकांना स्वतःचे "सफल" उदाहरण गाठीशी असून सुद्धा आजूबाजूला इंग्रजी माध्यमातली "सफल" उदाहरणे जास्त दिसतात का? हाच प्रश्न मलाही पडलाय. आणि खरेतर माझ्या आजुबाजुला इंग्रजी माध्यमातली "असफल" उदाहरणेही आहेत बरीच ज्यांना धड ईंग्रजीही येत नाही आणि मराठीही. माणुस स्वतच्या हुशारीवर पुढे जातो हेच खरे. जी मंडळी आपल्या मुलांना परदेशात राहुनही मराठी शिकवत आहेत त्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे.

In reply to by गणा मास्तर

प्रभाकर पेठकर Sun, 05/25/2008 - 23:46
ईंग्रजी माध्यमातली मुले जास्त धेडगुजरी बोलतात. मला असे वाटत नाही. इंग्रजी माध्यमात शिकलेल्या कितीतरी मुला-मुलींना मी चांगले (उत्कृष्ट नाही) मराठी बोलताना पाहिले आहे. इंग्रजी माध्यमातून शिकल्यावर मराठी मुद्दामहून आत्मसात करावे लागते. त्या साठी त्यांना काही अवकाश द्या. मराठी माध्यमातून शिकलेला विद्यार्थी कॉलेजात जाऊन फाडफाड इंग्रजी बोलतो का? त्याला फाडफाड इंग्रजी येण्यासाठी कॉलेज नंतरही खूप काळ जावा लागतो. तो शिकतो आणि बोलतोही. तसेच इंग्रजी माध्यमातून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांचे आहे. त्यांना मराठी शिकायला थोडा अवकाश हा लागणारच. आपण (मराठी माध्यमवाले) इंग्रजी बोलायला मुद्दामहून शिकतो. कारण ऑफिसात, बाहेरच्या जगात, व्यवहारात त्याची आपल्याला पदोपदी गरज भासते. पण, मराठीचे तसे होत नाही. मराठी येत नसेल तरी ऑफिसात, बाहेरच्या जगात, व्यवहारात आपले विशेष काही अडत नाही. त्यामुळे इंग्रजी माध्यमवाले मराठी शिकतात, ती आपली मातृभाषा आहे म्हणून. कदाचीत भाषेवर प्रेम आहे म्हणून. पण विशेष काही अडत नसल्यामुळे मराठी भाषा शिकण्याची गती बरीच मंद असते. असो. बाजरतुन पायनापल आणले . 'पायनॅपल' इंग्रजी शब्द आहे तर, 'अननस' अरबी (की इराणी?) शब्द आहे. अरबी आणि इराणी दोन्ही भाषात 'अननस' शब्द आहे. मग, शुद्ध मराठी शब्द काय आहे? आपण सॉरी, थँक्यू, रेल्वे, स्टेशन, पँट, शर्ट, बूट, शूज, सॉक्स, पँट-पिस, शर्ट-पिस्, मटन, फिश करी, ऑम्लेट, सिग्नल, ट्रॅफिक, पोलीस, कोर्ट, जज्, कार, बाईक, स्कूटर असे अनेक शब्द वापरतो. मग एखाद्याने पायनॅपल शब्द वापरला तर त्यालाच फक्त 'चूक' असे का म्हणावे? मी मिल्क पिले वरील मुद्दा इथेही लागू होतो. पण अजूनही 'दूध' 'कॉमन वर्ड' असल्यामुळे जरा विचित्र वाटते. पण मला तर 'पिले' हा शब्दही चुकीचा वाटतो. तो 'प्यायले' असा असावा असे वाटते. असो.

In reply to by प्रभाकर पेठकर

गणा मास्तर Mon, 05/26/2008 - 06:01
बाजरतुन पायनापल आणले कदाचित अननस आपल्याकडे अरबस्थानातुन किंवा इराणमधुन आले असावे, म्हणुन त्याला अननस म्हनत असावेत असा अंदाज आहे. मग एखाद्याने पायनॅपल शब्द वापरला तर त्यालाच फक्त 'चूक' असे का म्हणावे? ही चुक नाही असे म्हटले तर भाषा धेडगुजरी बनत नाही का? दोन्ही भाषांच्या शुद्धतेचा आग्रह धरावा. धेडगुजरी भाषा बोलून दोन्ही भाषांवर अन्याय करू नये. हे तुमचेच मत ना? आपण सॉरी, थँक्यू, रेल्वे, स्टेशन, पँट, शर्ट, बूट, शूज, सॉक्स, पँट-पिस, शर्ट-पिस्, मटन, फिश करी, ऑम्लेट, सिग्नल, ट्रॅफिक, पोलीस, कोर्ट, जज्, कार, बाईक, स्कूटर असे अनेक शब्द वापरतो. हे मराठीत रुळलेले शब्द आहेत. त्यासाठी कठीण मराठी प्रतिशब्द वापरणे चुकिचे वाटते. पण मला तर 'पिले' हा शब्दही चुकीचा वाटतो. तो 'प्यायले' असा असावा असे वाटते बोली भाषेत `पिले` पन बरोबर आहे असे वाटते. इंग्रजी माध्यमवाले मराठी शिकतात, ती आपली मातृभाषा आहे म्हणून. कदाचीत भाषेवर प्रेम आहे म्हणून. पण विशेष काही अडत नसल्यामुळे मराठी भाषा शिकण्याची गती बरीच मंद असते काका फार कमी लोकांचे प्रेम असते हो मायबोलीवर. .... ह्या सगळ्या मुद्द्यात "मराठी शाळांमध्ये शिकुन ईग्रजी संवाद कौशल्य विकसित करता येणार नाही का" हा मुद्दा दुर्लक्षित रहातोय असे वाटते.

In reply to by गणा मास्तर

प्रभाकर पेठकर Mon, 05/26/2008 - 15:08
दोन्ही भाषांच्या शुद्धतेचा आग्रह धरावा. धेडगुजरी भाषा बोलून दोन्ही भाषांवर अन्याय करू नये. हे तुमचेच मत ना? होय माझेच मत. पण शुद्धतेच्या हव्यासापायी बोली भाषा बोजड (अग्नीरथ आवक्-जावक सुचक पट्टी सारखे) करू नये असेही माझे मत आहे. इंग्रजांची शर्ट-पँट आपण स्विकारली आहेच त्यामुळे छोट्या गोष्टींचा बाऊ करू नये. असे मला म्हणायचे आहे. 'अननसा' ऐवजी कोणी 'पायनॅपल' म्हणाले म्हणून लगेच भुवया उंचावू नये. असे मी म्हणतो. पण त्याच बरोबर 'बघ नं आई! हा सारखा सारखा चेअर वरून खाली जंपतो' असे संवाद अंगवळणी पडू नयेत. हा एका लहान मुलीचा संवाद होता. तसेच, 'तुमच्या घरी यायचे म्हणजे चार जिने चढावे लागतात. फार श्रम्स् पडतात' हे एका कॉलेजकन्यकेचे वाक्यही चुकीचे आहे. बोली भाषेत `पिले` पन बरोबर आहे असे वाटते. बोली भाषेतही 'पिले' आणि 'पन' हे चूकिचेच आहे, असे माझे मत आहे.

वेलदोडा Sat, 05/24/2008 - 23:32
पेठकर काका, अगदी मुद्देसूद तुम्ही तुमचे विचार मांडले आहेत. इंग्रजी शाळांबद्द्ल पूर्वग्रह असणार्‍यांना तुमचे विचार वाचून इंग्रजी भाषेचे महत्व समजायला हरकत नाही. धन्यवाद त्या बद्द्ल. शेवटी अनिकेत केदारी यांनी पण हे मान्य केले की इंग्रजी काळाची गरज आहे . >>बाजरतुन पायनापल आणले . मी मिल्क पिले ...असे बोलणारे काही असू शकतील. पण इंग्रजी शाळेत शिकणार्‍या सर्वाना हे सरसकट लागू होत नाही. घरात वा मराठी वर्तूळात व्यवस्थित मराठी आणि जिथे इंग्रजी बोलण्याची गरज आहे तिथे व्यवस्थित इंग्रजी बोलणारे माझ्या बघण्यात भरपूर जण आहेत. मराठी माध्यमांच्या शाळांत ईग्रजी संवाद कौशल्य शिकवले तर ईंग्रजी सहज बोलता येईल. हेच मी माझ्या आधीच्या प्रतिक्रिये मध्ये लिहीलेले आहे. पण असे होताना दिसते काय? सध्या तरी उत्तर नाही असेच आहे. मराठी शाळेत इंग्रजी मराठी मधुन शिकवतात. संवाद कौशल्य शिकवण्यावर तर अजिबातच भर नसतो. >>मराठी शाळांमध्ये शिकवत नाहीत अशी जे खोटी बॉम्ब मारतात, त्याना त्यांच्या मूलाना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवायचं असतं... कारण तो त्यांच्या 'स्टेटस' चा सवाल असतो... इथे सवाल स्टेटस चा नाहीचये. हा मुद्दा चुकी चा आहे. काळाची गरज आणि म्हणून ज्ञानभाषा आत्मसात करणे ही कारणे या मागे आहेत. तहान लागल्यावर विही र खणण्यात काही अर्थ नाही. शालेय शिक्षण संपल्यावर इन्ग्लीश येण्यासाठी मराठी माध्यमातील मुलांना जादा परिश्रम घ्यावे लागतात. हल्लीच्या गतिमान जीवनात प्रत्येकाकडेच वेळ असेल असे नाही. शिवाय प्रत्येक मूल हे हुशार असेलच असे नाही. काहींना हे जमले म्हणजे सरसकट सर्वांना जमेलच असे नाही. पण लहान वयातच ईन्ग्लिश सम्वाद्कौशल्य व्यवस्थित शिकले तर मोठेपणी त्याचा जास्तीत जास्त फायदाच होणार आहे. >>मराठी माध्यमांच्या शाळांत ईग्रजी संवाद कौशल्य शिकवले तर ईंग्रजी सहज बोलता येईल. ह्यासाठी स्वतः अनिकेत केदारी काय प्रयत्न करणार आहेत?

In reply to by वेलदोडा

गणा मास्तर Sun, 05/25/2008 - 14:24
माझा असा विचार चालु आहे की आपण जवळ्च्या मराठी शाळांमध्ये जाउन ईग्रजी संवाद कौशल्य शिकवण्याबाबत विनंती करावी. आणि सक्रीय सहाय्य करावे. जसे की स्वत: जाऊन शिकवणे वगैरे. तुमच्या काही कल्पना असतील तर जरूर सांगा. शेवटी या चर्चेतुन आपल्या मायबोलीला जिवंत ठेवण्यासाठी मार्ग शोधले पहिजेत. स्टेटसचा मुद्दा मात्र चुकिचा नाही. भाईंनी लिहिल्याप्रमाणे "भारतात इंग्लिश माध्यम हे प्रतिष्ठेचे लक्षण म्हणून पाहीले जाते, अंगभूत गुणांमुळे नाही". ईग्रजी संवाद कौशल्याच्या मुद्द्यशी तुम्ही सहमत आहात हे ऐकुन बरे वाटले. धनंजयनी म्हटल्याप्रमाणे "आपण असफल उदाहरणे बघतो स्वतःचे सफल उदाहरण बघत नाही" जे मराठीतुन शिकले पण मुले मागे पडू नयेत म्हणुन मुलांना ईंग्रजी माध्यमात घालतात. ते लोक असा विचार का करत नाहीत की आपण जसे ईंग्रजी स्वताहुन शिकलो तसे मुलेही शिकतील. मुले ८-१०वीत गेल्यावर ईंग्रजी संवाद कौशल्यासाठी मदत करावी. सोबत थोडा सराव करावा. असे केले तर मराठी शाळा पण टिकतील, मराठीपण टिकेल आणि ईंग्रजीची भितीपण वाटणार नाही.

In reply to by गणा मास्तर

>>माझा असा विचार चालु आहे की आपण जवळ्च्या मराठी शाळांमध्ये जाउन ईग्रजी संवाद कौशल्य शिकवण्याबाबत विनंती करावी. आणि सक्रीय सहाय्य करावे. जसे की स्वत: जाऊन शिकवणे वगैरे. तुमच्या काही कल्पना असतील तर जरूर सांगा हल्लि जवळ जवळ सर्व मराठी शाळांत 'conversational english' हा शाळेतर्फे पण बाहेरिल संस्थेकडुन चालवला जाणारा उपक्रम आहे. यात ४ ग्रेडस असतात. शिक्षणाचा दर्जा ही चांगला आहे. यात सार्वजनिक ठिकाणी -हॉटेल इ. कसे बोलावे, रोजच्या बातम्या हे संवादरुपाने शिकवतात. ( मी अजुन १ ली ग्रेड च अनुभवली आहे). मला तरी ते खुप फायदेशीर वाटले. "मी क्लास मधे टॉक केलं, म्हणुन टिचर ने मला पनिश केलं" -असे 'मराठी" ऐकायचे नसेल , तर तुमच्या सारख्या अनेकांची गरज आहे-हे नक्की.

In reply to by पद्मश्री चित्रे

वेलदोडा Wed, 05/28/2008 - 23:07
हल्लि जवळ जवळ सर्व मराठी शाळांत 'conversational english' हा शाळेतर्फे पण बाहेरिल संस्थेकडुन चालवला जाणारा उपक्रम आहे. एक प्रश्नः जवळ जवळ सर्व मराठी शाळा ? जवळ जवळ म्हणजे किती? ९९% , ९०%, ८०%, ७०%...... आणि पुणे , मुंबई, ठाणे वगैरे ठिकाणच्या मराठी शाळा सोडल्या तर इतर शहरातील , लहान गावातील शाळेचे काय? शिवाय महानगरपालिकेच्या शाळेतही हा उपक्रम चालवला जातो काय?

In reply to by वेलदोडा

पद्मश्री चित्रे गुरुवार, 05/29/2008 - 12:11
>>जवळ जवळ सर्व मराठी शाळा ? जवळ जवळ म्हणजे किती? ९९% , ९०%, ८०%, ७०%...... मी शिक्षणतज्ज्ञ नाही, त्यामुळे ही टक्केवारी नाही देवु शकत. काही शाळांत म्हणते हव तर. इतर प्रश्णांच्या बाबत पण हेच. असा उपक्रम आहे, हा उद्देश हे लिहीण्यामगे होता. भितीने मुलांना मराठी शाळेत न घालणार्‍यांसाठी एक माहिती म्हणुन.बाकी, ज्या लोकांना हा विचार च पटत नाही, त्यांना टक्केवारी काही असली तरि काय फरक पडतो?

ऋषिकेश Sun, 05/25/2008 - 13:05
मी अजून अविवाहीत आहे (व मला मुलेही नाहित :) ) त्यामुळे या चर्चेत भाग घेता येणार नाहि. पण विचार केल्यास माझी नोकरी अशी आहे की मी सलग १० वर्षे भारतातच (त्यातही महाराष्ट्रातच) राहिन याची खात्री नाही. जर दिर्घकाळासाठी जर मला परदेशात वास्तव्य करावे लागले तर मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उद्भवेल या प्रमुख कारणासाठी मी बहुतेक माझ्या मुलांना इंग्रजी माध्यमातूनच शिकवेन. परंतु आवड विचाराल तर मी जसा शिकलो तसा सेमी इंग्रजीतून (विज्ञान-गणित इग्रजी व इतर विषय मराठीतून) मुलांना शिकवायला आवडेल -('मिसळ'लेला) ऋषिकेश

अजिंक्य गुरुवार, 05/29/2008 - 13:27
मला वाटतं, सेमी इंग्रजी हा पर्याय बहुधा कोणी विचारात घेतलेला दिसत नाहीये..... जरी पुढील शिक्षण इंग्रजीमधून घ्यायचे असले, तरीही, भाषा म्हणून तरी मराठी शिकणे आवश्यक आहे. आणि ती फक्त गुण मिळवण्यासाठी किंवा एक विषय म्हणून नव्हे, तर मातृभाषा या नात्याने शिकणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे, इतिहास, भूगोल असे विषय देखील मराठीमधून शिकण्यास काहीही हरकत नसावी. तेच जास्त सोयीचे आहे. पण गणित, विज्ञानासारखे विषय - जे पुढे इंग्रजी मधूनच शिकायचे असतात - आधीही त्याच माध्यमातून शिकल्यास पुढील शिक्षण घेताना फायदा होतो.

In reply to by अजिंक्य

पद्मश्री चित्रे गुरुवार, 05/29/2008 - 14:24
मला सेमी-इंग्रजी च म्हणायचे आहे. ५ वी पासुन सेमी-इंग्रजी हा उत्तम पर्याय आहे -असे मला वाटते. अर्थात, यात मुळ माध्यम मराठी च असते.

वेलदोडा Fri, 05/30/2008 - 02:09
मी क्लास मधे टॉक केलं, म्हणुन टिचर ने मला पनिश केलं" -असे 'मराठी" ऐकायचे नसेल तर... मग मी टिव्ही वर सिरीयल पाहत आहे. तुमचा मोबाईल नंबर देता का प्लीज? आज कॉलेज ला काळे मॅडम चे लेक्चर बन्क केले. सिनेमा फारच बोअर होता कार चे टायर पंन्क्चर झाल्याने बस ने आलो. ........ ...... ...... हे कोणते 'मराठी' बॉ ?

मन Fri, 05/30/2008 - 02:22
मी आणि माझी (भावी) बायको अविवाहित आहोत!! अजुन पुत्री-हिरकणी आम्हाला प्राप्त झालेली नाही. त्यामुळे प्रतिक्रिया द्यायला तितकासा समर्थ नाही. तरीही, आमची भावी पिढी मराठी माध्यमातच जाइल असे दिसते. आपलाच, मनोबा