Skip to main content

मानवनिर्मित वातावारणबदल (climate change)

निकित यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनप्रकार
सोयीस्कर असत्ये लोकसत्तेमध्ये काही महिन्यांपूर्वी मुग्धा कर्णिक यांचा “गैरसोयीची असत्ये” हा लेख प्रकाशित झाला. त्यामध्ये त्यांनी जागतिक तापमानवाढ आणि वातावरण बदल हे नैसर्गिकच असून त्याला कार्बन डाय ऑक्साईड व इतर हरितगृह वायू जबाबदार नाहीत अशा प्रकारचा दावा केला आहे. त्याकरिता त्यांनी काही शास्त्रज्ञांचे दाखलेसुद्धा दिले आहेत. तथापि, त्यांच्या लेखातील अनेक मुद्दे हे सोयीस्कररित्या अपुऱ्या व अवैज्ञानिक माहितीवर आधारित आणि हास्यास्पद आहेत. कर्णिक यांचा मूळ लेख इथे वाचता येईल. लोकसत्तेमधेच त्याला उत्तर म्हणून माझाही लेख प्रसिद्ध झाला; काही गोष्टी गाळून तो इथे देत आहे. कर्णिक म्हणतात की, वातावरणातील हरितगृह वायूंमध्ये पाण्याच्या वाफेचे प्रमाण सर्वाधिक आहे आणि कार्बन डाय ऑक्साईड चे प्रमाण अत्यल्प आहे; म्हणून, पाण्याची वाफ वा इतर वायूच तापमानवाढीत अधिक भूमिका बजावतात. परंतु, तापमानवाढीच्या “भंपक” अशा मॉडेल्समध्ये यांचा विचारच केलेला नसतो! त्या असाही दावा करतात की, कार्बन डाय ऑक्साइडमुळे जर तापमानवृद्धी होत असेल तर ती वरच्या ट्रोपोस्फिअरमध्ये तीव्रतेने जाणवायला हवी; परंतु तीन दशकांमध्ये त्यात बदल झालेला नाही. हे सर्व दावे पूर्णतः (किंवा सोयीस्कर) चुकीच्या माहितीवर आधारीत आहेत. तापमानवृद्धीच्या सर्व मॉडेल्समध्ये पाण्याच्या वाफेसकट सर्व वायूंचा विचार केलेला असतो. खरं म्हणजे, वातावरणाच्या सर्वात जुन्या (१८९६ पासून!) मॉडेल पासून पाण्याच्या वाफेचा आणि त्यानंतरच्या मॉडेल्स मध्ये इतर वायूंचा प्रभाव देखील लक्षात घेतला आहे. खरं म्हणजे, पाण्याच्या वाफेमुळेच कार्बन डाय ऑक्साईडच्या परिणामांची तीव्रता दुपटीने वाढते असे खुद्द आयपीसीसीच्याच अहवालात नमूद केले आहे. त्याचप्रमाणे, वातावरणाच्या वरच्या पट्ट्यातील (अपर ट्रोपोस्फीअरमधील) वाफेच्या प्रमाणाची (म्हणजेच हवेच्या सापेक्ष आर्द्रतेची) सरासरी गेल्या अनेक वर्षात कमी अधिक प्रमाणात समान राहिली आहे पण मानवनिर्मित उत्सर्जनामुळे कार्बन डाय ऑक्साईड व इतर वायूंची पातळी सतत वाढते आहे. कार्बन डाय ऑक्साईड चे वातावरणातील प्रमाण केवळ ०.०४% आहे हे जरी खरे असले, तरी कमी प्रमाणामुळे त्याचा वातावरण बदलाशी कमी संबंध आहे असे म्हणणे पूर्णपणे अशास्त्रीय आहे. उदा. एखाद्या निरोगी शरीरामधील क्लोरेस्टरॉलचे प्रमाण एकूण रक्ताच्या ०.२०% पेक्षाही कमी असते. ते वाढून ०.२५% जरी झाले तरी हृदयविकाराची शक्यता बळावते. तसेच कार्बन डाय ऑक्साईड चे देखील आहे. पाण्याची वाफ ज्या वेव्लेन्थ चे इन्फ्रारेड रेडीएशन शोषू शकत नाही ते देखील हा वायू शोषू शकतो आणि म्हणूनच तो हरितगृह परिणामासाठी महत्वाचा आहे. २००८ साली येल विद्यापीठाचे रॉबर्ट अॅलन आणि स्टीवन शेरवूड यांनी एक संशोधन प्रसिद्ध केलं. त्यामध्ये त्यांनी वरच्या ट्रोपोस्फिअर मधील वाऱ्याच्या दिशा आणि वेग यांच्यावरून तेथील तापमानवाढीचा अंदाज बांधला तर ती जवळजवळ पृथ्वीच्या पृष्ठभागाएवढीच आढळून आली. याच्यामुळे हरितगृह वायूंमुळे (मुख्यतः कार्बन डाय ऑक्साईड) होणाऱ्या वातावरणबदलाच्या सिद्धांताला पुष्टी मिळाली आहे. एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे की, तापमान वाढीचा संबंध कार्बन डाय ऑक्साइडच्या (वा इतर हरितगृह वायूंच्या) उत्सार्जनाशी नसून त्यांच्या वातावरणातील साठ्याशी असतो. पृथ्वीहून होणाऱ्या एकूण कार्बन उत्सर्जनापैकी जवळजवळ ९५% उत्सर्जन हे नैसर्गिक असते आणि केवळ ५% मानवनिर्मित असते. परंतु, कार्बनचा वातावरणात नैसर्गिकरित्या जाणारा प्रत्येक कण हा प्रामुख्याने वनस्पतीद्वारे आणि समुद्राद्वारे शोषूनही घेतला जात असतो. म्हणूनच वातावरणामधल्या नैसर्गिक कार्बन डाय ऑक्साईड चे प्रमाण समतोल राहते. यालाच कार्बन सायकल असे म्हणतात. औद्योगिक क्रांतीपर्यंत गेली दहा हजार वर्ष पृथ्वीचा कार्बन समतोल बऱ्याच प्रमाणात शाबूत होता. त्यामुळे, ‘ज्या काळात मिथेन, कार्बन डाय ऑक्साइड इत्यादी हरितगृह वायू वातावरणात अधिक जात होते, त्या कालखंडांतील जागतिक तापमान कमी होते’ या कर्णिकांच्या दाव्यात काहीच तथ्य नाही. जेव्हा हे वायू वातावरणात अधिक प्रमाणात जात होते त्यावेळी ते तितक्याच प्रमाणात शोषूनही घेतले जात होते. परंतु औद्योगिक क्रांतीनंतर मात्र मानवनिर्मित उत्सार्जानाद्वारे हा समतोल बिघडत आहे. त्यामुळे पृथ्वीच्या शोषून घेण्याच्या क्षमतेपेक्षा अधिक कार्बन डाय ऑक्साईड व इतर वायू वातावरणामध्ये साठून राहतात आणि हरीतगृह परिणामास व पर्यायाने तापमानवाढीस कारणीभूत ठरतात. प्रामुख्याने विकसित देशांच्या उत्सर्जनामुळे गेल्या १७० वर्षात वातावरणात साठलेला कार्बन डाय ऑक्साईड ३५% ने वाढला आहे. कार्बन डाय ऑक्साईड हा वनस्पतींच्या वाढीकरीता उपकारक वायू आहे. असे जरी असले तरी, वनस्पतींची वाढ ही केवळ कार्बन डाय ऑक्साईड च्या प्रमाणावर अवलंबून नसते तर ती तापमान, मातीचे आणि सभोवतालच्या पर्यावरणाचे गुणधर्म, मातीमधील पाण्याचे प्रमाण (पर्जन्य अथवा सिंचन) या घटकांवर देखील अवलंबून असते. तापमानवृद्धी आणि पर्जन्यमानातील लहरीपणा (जो आपण कमी-अधिक प्रमाणात आजही अनुभवू लागलो आहोत) या घटकांचा विचार केला तर वातावरणबदलामुळे शेतीचे उत्पादन घटणारच आहे. कर्णिक पुढे म्हणतात की आयपीसीसी मधील शास्त्रज्ञांनी सनस्पॉट आणि सौरचक्रामुळे होणाऱ्या वातावरणबदलांकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले आहे. त्या असेही म्हणतात की, १९४० ते १९८० च्या दरम्यान हरित वायू उत्सर्जन वाढून देखील पृथ्वीचे तापमान कमीच राहिले होते. परंतु १९८० नंतर काय झाले हे सांगणे मात्र त्यांनी सोयीस्करपणे टाळले आहे. गेल्या ३०-३५ वर्षात (साधारण १९७५ पासून) सनस्पॉटस् मध्ये विशेष काहीही बदल झालेला नाही पण पृथ्वीचे तापमान मात्र सतत वाढते आहे. किंबहुना गेल्या दहा वर्षांमध्ये तापमानाचे अनेक उच्चांक नोंदविले गेलेले आहेत. गेल्या १२० वर्षांतील सौरचक्रांचा अभ्यास केल्यास असे लक्षात येईल की अकरा वर्षांच्या पूर्ण सौराचक्राच्या कालावधीत सूर्याच्या रेडिएशन मध्ये ०.१% पेक्षा जास्त फरक पडलेला नाही. म्हणजेच तापमानबदल जर सूर्यामुळे होत असतील, तर तापमानवाढ ही ०.१ सें पेक्षा जास्त असणार नाही. परंतु, गेल्या ३० वर्षांत पृथ्वीचे सरासरी तापमान ०.५ सें ने वाढले आहे! तीच गत कर्णिक यांच्या ओझोन संदर्भातील दाव्याबाद्दल. त्या म्हणतात की ओझोन थर कमी होणे हे नैसर्गिकच आहे! ते जर खरच नैसर्गिक असते तर १९५६ पासून वातावरणावर लक्ष ठेवणाऱ्या एकाही शास्त्रज्ञाला आणि उपग्रहाला हे भोक १९७६ पर्यंत सापडले कसे नाही ? १९८७ साली सर्व विकसित देशांनी मॉंट्रीअल प्रोटोकॉल मान्य केला आणि ओझोन थराला घातक ठरणाऱ्या क्लोरोफ्लूरोकार्बनचा वापर १९९६ पर्यंत पूर्णपणे थांबविला; त्यामुळे ओझोन थराचा ऱ्हास कमी झाला व त्याला पडलेले भोक बुजायला मदत झाली. पृथ्वीच्या इतिहासामध्ये आतापर्यंत तापमानवाढ आणि वातावरणबदल यापूर्वीही घडून गेले आहे. उदा. सुमारे एक हजार वर्षांपूर्वी युरोपमधील तापमान वाढले होते तर २००-३०० वर्षांपूर्वी ते कमी झाले होते. अशी प्रत्येक घटना कशामुळे घडली याचे स्पष्टीकरणही शास्त्रज्ञांनी दिलेले आहे. परंतु, त्या कुठल्याच स्पष्टीकरणाने सध्याच्या तापमानवाढीची उकल होऊ शकलेली नाही – ती होते फक्त हरितगृह परिणामाच्या सिद्धांतामुळे. पर्यावरणवाद्यांना ‘मागे घेऊन जाणारे’ अशी उपमा देणाऱ्या कर्णिक यांना पर्यावरणवाद्यांच्या लेखनाचे नीट आकलन झालेले दिसत नाही. IPCC पासून सर्व अहवालांमध्ये शाश्वत उपायांमुळे जगाचे एकूण आर्थिक उत्पन्न वाढणारच कसे आहे अशा तंत्रज्ञानाचा पाढाच वाचण्यात आलेला आहे. पर्यावरणाचा पूर्णपणे ऱ्हास करणाऱ्या आणि नैसर्गिक संसाधनांना ओरबाडणाऱ्या सध्याच्या विकासाच्या प्रतिमानाबद्दल (development model) एकही शब्द न लिहिता, इतर ग्रहांवर जाऊन मानवी वस्ती करण्याची कर्णिक यांची दर्पोक्ती हास्यास्पद आहे ! अर्थात, प्रयत्नपूर्वक आपला विकास शाश्वत कसा होईल हे न बघता, मानवनिर्मित तापमानवाढीचं शास्त्रच कसं भंपक आहे असे म्हटले की त्यासंबधी काही करण्याची जबाबदारीदेखील संपते आणि म्हणूनच ते सोयीस्कर देखील असते. शास्त्राच्या प्रगतीच्या आड असे अडथळे अनेकदा आले आहेत – पण त्या सर्वांवर मात करून मानवाने सत्याचा शोध घेतला आहे. वातावरणबदल व तापमानवाढीच्या सत्याबद्दल आणि त्यावरील उपाययोजनांबद्दल देखील असेच होणार यात काहीच शंका नाही. -- निकीत अभ्यंकर
नितिन थत्ते

विकीपिडियावर इथे म्हटल्या प्रमाणे हरितगृह परिणामातला सहभाग पाण्याच्या वाफेचा ३६-७०% आणि कार्बनडायऑक्साईडचा ९-२६% असतो. आणखी म्हणजे त्यात ओझोनदेखील कारणीभूत (३-७%) असतो असे म्हटले आहे. त्यामुळे ओझोनथराचा र्‍हास थांबवणे हे हरितगृह परिणामाला आमंत्रण तर नाही? आपण वर म्हटल्याप्रमाणे ९५% कार्बनडाय ऑक्साईडचे उत्सर्जन नैसर्गिक असते. नैसर्गिक याचा अर्थ बहुधा सेंद्रीय अभिक्रिया आणि प्राण्यांचे श्वासोच्छवास असे असावे. मानवाची लोकसंख्या १९६० पासून २००० पर्यंत दुप्पट झाली आहे (१४० वर्षात लोकसंख्या ५ पट झाली आहे- वर लेखात लिहिल्याप्रमाणे कार्बनडायॉक्साईड ३५% वाढला आहे). परिणामस्वरूप कार्बनडायॉक्साईडचे उत्सर्जनही दुप्पट झाले आहे. अर्थात त्याचे कॉण्ट्रिब्युशन किती हे मला माहिती नाही. जुन्या काळाच्या मानाने इंधनाच्या वापरात सुधारणाही झाल्या आहेत. पूर्वी चार माणसांच्या कुटुंबाच्या वापरासाठी किती लाकूडफाटा जाळला जात होता आणि कार्बन डायॉक्साईड उत्सर्जित होत होता त्या मानाने आजच्या सुधारित इंधनांत कमी कार्बनडायॉक्साईड उत्सर्जित होत असावा. ग्रीन हाऊस परिणाम खरोखरीचा आहे यात शंका नाही. पण म्हणून सगळे बंद करून बसावे किंवा नवीन काहीच हाती घेऊ नये असे होत नाही. पण अनेकदा तसा टोन अ‍ॅक्टिव्हिस्ट लोकांत आढळतो. याचे एक समांतर उदाहरण मला येथे द्यावेसे वाटते. हल्लीच्या वर्तमानपत्रीय आरोग्यसदरांमध्ये 'मैदा खाणे वाईट' असा सल्ला एकसारखा आढळतो. या सल्ल्याचा अर्थ तुम्ही सारखासारखा मैदा खाल्ला तर ते वाईट असा असतो. पण हे वाचून माझ्या ओळखीतल्या अनेक जागरूक आया आपल्या मुलांना केक, बिस्किटे, पाव वगैरे कधीच खाऊ देत नाहीत. आणि बाजारात मैद्याच्या नसलेल्या पदार्थांचा शोध घेत फिरतात. तसेच काहीसे या ग्रीनहाऊसचे होत आहे असे मला वाटते.
01/11/2010 - 10:52 Permalink
निकित

@ स्पा आणि नितीन: प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. @ नितीन: आपल्या शक्यतांबद्दल: >>> ओझोनथराचा र्‍हास थांबवणे हे हरितगृह परिणामाला आमंत्रण तर नाही? नाही. हरितगृह परिणाम असणे हे एका मर्यादेपर्यंत चांगलेच असते. किंबहुना त्यामुळेच पृथ्वीवर जीवसृष्टी बहरू शकली. त्यामुळे मर्यादित प्रमाणात ओझोन व इतर हरितगृह वायू असणे (कार्बन डाय ऑक्साईड सकट) हे चांगलेच. जेंव्हा हे वायू प्रमाणाबाहेर वाढतात, त्यावेळी हरितगृह परिणाम देखील वाढतो आणि वातावरणामध्ये तापमानवृद्धी होते. ओझोनच्याच्या ऱ्हासामुळे यु. व्ही. रेडीएशन वाढूते. >>> वाढत्या लोकसंख्येमुळे कार्बनडायॉक्साईडचे उत्सर्जनही दुप्पट झाले आहे. नाही. हेच तर कार्बन सायकल असते. जेव्हढा कार्बोन डाय ऑक्साईड नैसर्गिकरीत्या बाहेर पडतो तेवढाच तो हवेतून आपल्या शरीरातही जातो. त्याचप्रमाणे समुद्र आणि जंगले ही अवाढव्य कार्बन अबसोर्बर आहेत. त्यामुळे नैसर्गिक कार्बन सायकल हे नेहमीच कमी अधिक प्रमाणात संतुलित असते. >>> जुन्या काळाच्या मानाने इंधनाच्या वापरात सुधारणाही झाल्या आहेत. हो. पण इंधनाचा एकूण वापर (वीज, वाहतूक इ.) हां प्रचंड वाढलेला आहे - "प्रगती" आणि लोकसंख्येमुळे. >>> पण म्हणून सगळे बंद करून बसावे किंवा नवीन काहीच हाती घेऊ नये असे होत नाही. पण अनेकदा तसा टोन अ‍ॅक्टिव्हिस्ट लोकांत आढळतो. १००% अनुमोदन. पण सध्या आपले जे विकासाचे मॉडेल आहे त्यामध्ये "रॅडीकल रीडीझाईन" ची गरज आहे.
01/11/2010 - 11:50 Permalink
नितिन थत्ते

In reply to by निकित

>>सध्या आपले जे विकासाचे मॉडेल आहे त्यामध्ये "रॅडीकल रीडीझाईन" ची गरज आहे. सहमत आहे. अशा मॉडेलचा शोध घेत राहणे आवश्यक आहे. सध्याच्या मॉडेलमध्ये समाजाच्या गरजा भागवण्याची जितकी ताकद आहे तितकी किमान ताकद असलेलेच दुसरे मॉडेल स्वीकारार्ह होऊ शकेल. शेतीचे पुरेसे उत्पादन होऊ लागल्यावरच हिंसा टाळा आणि शाकाहारी व्हा हा संदेश देता येतो. यापूर्वी ट्राय आउट करून झालेल्या इतर मॉडेलमध्ये ही शक्यता दिसलेली नाही. सध्याच्याच मॉडेलमध्ये नासाडी टाळणे वगैरे सुधारणा करता येतील. पण नासाडी कमी करणे टप्प्याटप्प्याने होतच असते. (येथे सांस्कृतीक नासाडी उदा भांडी घासायला नकोत म्हणून किंवा स्वच्छतेच्या/आरोग्याच्या कल्पनांमुळे फेकून देण्यासारखी भांडी वापरणे वगैरे अभिप्रेत नाही ती कमी करायलाच हवी).
01/11/2010 - 12:07 Permalink
निकित

In reply to by नितिन थत्ते

"रॅडीकल रीडीझाईन" ला वेळ लागेलच - आणि काही प्रमाणात ती एक राजकीय प्रक्रिया असेल. परंतु सध्याच्याच विकासाच्या मॉडेल मध्ये काही रॅडीकल उपाय आहेत. उदा. चारचाकी गाडी. सर्वसाधारण गाडीमध्ये ~९५% उर्जा ही गाडीचे वजन ढकलायला वापरली जाते तर फक्त ५% उर्जा प्रवाशांना घेऊन जाते. इंजिनची कार्यक्षमता ४०% पकडू (ऑप्टीमिस्टिक). म्हणजे इंधनात जेवढी उर्जा असते त्याच्या केवळ २% उर्जा प्रवाशांना पुढे घेऊन जाते आणि ९८% उर्जा वाया जाते !! - मुख्य कारण - गाडीच्या तंत्रज्ञानामध्ये मध्ये गेल्या १०० वर्षात विशेष गुणात्मक फरकच पडलेला नाही ! तंत्रज्ञान तयार झालं तेव्हा पर्यावरणाचा ऱ्हास वगैरे विषय खिजगणतीतही नव्हते आणि इंधनाच्या किमती अत्यंतच कमी होत्या. तीच गत वीजनिर्मितीबद्दल - आता आत्ता कुठे १०० वर्ष जुनं तंत्रज्ञान बदलू लागलंय! तंत्रद्न्यान बदलत नाही कारण खाजगी कंपन्या ते विकू शकतात. त्यामुळे - ग्राहकांनी त्यांची पसंती बदलली पाहिजे किंवा सरकारने योग्य धोरण आखून आर्थिक गणितं बदलली पाहिजेत. वीजनिर्मिती क्षेत्रामध्ये जगातील जवळ जवळ सर्व (भारत सुद्धा) सरकारांनी धोरणे बदलली आहेत आणि त्याचे परिणाम दिसू लागलेत.
01/11/2010 - 12:42 Permalink
ए.चंद्रशेखर

लेख अतिशय अभ्यासपूर्ण व उत्तम आहे यात शंकाच नाही. परंतु लेखक फार कमी काल खंडाच्या अभ्यासावरून एका मोठ्या कालखंडाबद्दल अनुमाने काढण्याचा प्रयत्न करतो आहे असे मला वाटते. उदाहरण द्यायचे झाले तर एखाद्या करंट बॅन्क अकाउंटच्या पासबुकाचे देता ये ईल. अशा पासबुकामधील एक किंवा दोन दिवसांच्या नोंदींचा अभ्यास करून त्या अकाऊंटच्या पंचवार्षिक आर्थिक उलाढालीबद्दल निदाने काढणे जसे चुकीचे ठरू शकते तसेच प्रस्तुत लेखकाचे झाले आहे असे वाटते. सध्या हरित गृह वायू व प्रदुषण यामुळे जागतिक तपमानात गेल्या दशकात वृद्धी झाली आहे असा सर्वसाधारण समज आहे व तो बहुदा योग्य असावा असे म्हणता ये ईल. परंतु याचा भूतलावरच्या तपमानावर किंवा पर्यावरणावर कायमाचा परिणाम हो ईल हे मला मान्य हो ऊ शकत नाही. जगाच्या इतिहासात अशा अनेक उलथापालथी झालेल्या आहेत. साडेसहा कोटी वर्षांपूर्वी मेक्सिकोच्या किनार्‍यावर चिक्शुल्युब येथे एक उल्कापात हो ऊन हजार वर्षांचा हिवाळा आला व सर्व डायनॉसॉरस नष्ट झाले. परंतु काही हजार वर्षांनंतर तपमान परत पूर्ववत झालेच ना. त्याच प्रमाणे ७४००० वर्षांपूर्वी टोबा ज्वालामुखीचा स्फोट हो ऊन १०० वर्षांचा हिवाळा आला व मानव जात जवळ जवळ नामशेष झाली. पण तपमान पूर्ववत झालेच ना. पृथ्वीतलावर अतिशय प्रभावी Servo Mechanisms कार्यरत आहेत हे अनेक वेळा सिद्ध झालेले आहे. गेल्या हजारो कोटी वर्षांपासून पृथ्वीचे तपमान स्थिरच राहिलेले आहे. मानवाने नसते उपद्व्याप करून ते वाढवले तर अशी कोणती तरी यंत्रणा (उदाहरणार्थ मोठ्या ज्वालामुखीचा स्फोट होऊन आलेला १०० किंवा २०० वर्षाचा हिवाळा) कार्यरत हो ऊन तपमान परत खाली आणेलच असे पृथ्वीच्या इतिहासावरून सांगता येते. माणसाने पर्यावरण व हरित गृह वायू उत्सर्जन यांचा तोल सांभाळणे यासाठीच आवश्यक आहे. ते केले नाही तर पृथ्वीवरची कोणती तरी Servomechanism कार्यान्वित हो ऊन सर्व गोष्टी पूर्वीसारख्या करण्यास सुरवात करेल. भले या गोष्टीला शतके किंवा दोन शतके लागतील आणि मनुष्ञ प्राणी त्यात नष्टही होईल.
01/11/2010 - 12:30 Permalink
निकित

In reply to by ए.चंद्रशेखर

लेख वाचल्याबद्दल व प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! वातावरणातील बदलामुळे ज्वालामुखी फुटतील असे मला तरी वाटत नाही. तुम्ही म्हणता तसे इतिहासामध्ये correlational evidence असेलही - पण कार्यकारणभावाने त्याचे स्पष्टीकरण देता येत नाही (थोडक्यात, correlation असेल, पण causation नाही). वातावरणामध्ये झालेले बदल निसर्ग भरून काढतो शकतोच - पण एका मर्यादेपर्यंत. आपलेच उदाहरण द्यायचे झाल्यास - ज्या एका उल्कापातामुळे डायनासोर नष्ट झाले - तोच उल्कापात जर सतत काही शे वर्षं झाला असता - तर त्यानंतर कदाचित जीवसृष्टी उरलीच नसती ! सध्याच्या ग्लोबल वॉर्मिंग चे तसेच आहे. जर मानवनिर्मित हरितगृह उत्सर्जन उद्यापासून पूर्णपणे थांबवले - तर निसर्ग वाढलेला कार्बन डाय ओक्साईड वा इतर वायू शोषून घेईलच - आणि सर्व सायकल्स पुन्हा समतोल होतील. पण आपण आपले उत्सर्जन कमी करण्याची शक्यता नाही - आणि तोच तर खरा प्रश्न आहे. >>> परंतु लेखक फार कमी काल खंडाच्या अभ्यासावरून एका मोठ्या कालखंडाबद्दल अनुमाने काढण्याचा प्रयत्न करतो आहे असे मला वाटते. नाही. पहिली गोष्ट म्हणजे मानवाने निसर्गामध्ये केलेला विध्वंसक हस्तक्षेप हीच मुळी गेल्या साधारण दोनशे वर्षातील घटना आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, ज्या वेगाने तापमान वाढत आहे (गेल्या १३० वर्षात ०.७ सें वाढ ! ) तो वेग भयानक आहे. उदा. साधारण १००० वर्षांपूर्वी जेव्हा युरोप मध्ये स्वल्प-हिमयुग (little ice age) अवतरले, तेव्हा युरोपमधील तापमान हे ०.६-०.८ सें ने कमी झाले होते. त्याच्याही मागे गेले तर गेल्या तीन दशलक्ष वर्षात पृथ्वीचे तापमान साधारण १-१.५ सें ने वाढलेले आहे.
01/11/2010 - 13:30 Permalink
ए.चंद्रशेखर

मला वाटते माझा मुद्दा लेखकांना नीटसा समजला नसावा. मला असे म्हणायचे आहे की चिक्शुल्युब किंवा टोबा या सारख्या भयावह दुर्घटना (Catastrophes ) घडून गेल्यानंतरही पृथ्वीतलावरील Servo mechanisms नी पर्यावरण व तपमान पूर्व स्थितीला जसेआणले तसेच या यंत्रणा, मानवाचे सध्याचे उद्योग प्रमाणाबाहेर गेले तर तपमान व पर्यावरण पूर्वस्थितीला आणतील. परंतु यामधे मानव जातच नष्ट होण्याची शक्यता असल्याने हे उद्योग मानवाने प्रमाणाबाहेर व पर्यावरण व तपमान यांचा समतोल राखला जाईल असेच करण्याची आवश्यकता आहे. नाहीतर स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारून घेण्यासारखे होणार आहे.
01/11/2010 - 14:00 Permalink
विकास

In reply to by ए.चंद्रशेखर

सर्व प्रथम लेख चांगलाच आहे. येथे केवळ वरील प्रतिसादासंदर्भात: संदर्भ पटकन आठवत नाही पण पृथ्वी अजूनही जिवंत ग्रह आहे, सृजनशील आहे. अर्थात ती तिची काळजी घेण्यासाठी समर्थ आहे. ज्युरॅसिक पार्कमधल्या गणितज्ञाच्या तोंडात एक वाक्य दिले होते: की जीवन स्वतःच्या वृद्धीसाठी मार्ग शोधत असते. किंवा वास्तवातील उदाहरण म्हणजे हिरोशिमा-नागासाकीचा पूर्ण कोळसा झाल्यावरही, सर्व संपले असे समजून प्रथम भेटीस गेलेल्यांना जेंव्हा कुठेतरी निसर्गातील जीवन दिसून हायसे वाटले. आता आपण असे म्हणणार का हिरोशीमा-नागासाकी नाहीका परत बसले मग अणूयुद्धाची काळजी कशाला करायची? त्यातूनही मार्ग निघेल आणि मानव/सृष्टी तग धरून अजूनही वृद्धींगत होईल. पण आत्ताच्यांचे काय? म्हणूनच अणूयुद्धाला त्यात दादा असलेली राष्ट्रे पण घाबरत असतात. प्रश्न अजून १०००० वर्षांनी पृथ्वीवर मानवजात असेल का हा नाही पण आपल्या आणि नजीकच्या भविष्यात कसे होईल याचा आहे. उद्या आपण यात (शद्बशः असे नाही, पण) होरपळू लागलो तर हा आशावाद उपयोगाचा ठरेल का? मी माझ्या व्यवसायामुळे यातील किमान अमेरिकेतील अ‍ॅक्टीव्हिस्ट्स बघितलेले आहेत तसेच उद्योग पण बघितले आहेत. चळवळीतील लोकांमधे कधी कधी टोकाचा पर्यावरणवादी अव्यावहारीक दृष्टीकोन दिसला तरी बरेचसे जण सरसकट सगळे बंद करा वगैरे म्हणत नाहीत. त्यांचा तसा रोखही नसतो. मात्र आजच्या घडीस बरेचसे करता येण्यासारखे प्रत्येकाच्या हातात आहे आणि ते करावे असे म्हणणे असते. उद्योगांच्या बाबतीत कधी कधी विरुद्ध अव्यावहारीकपणा असतो. मात्र त्यांना जर का त्यातील व्यवहार समजावून सांगितला तर बदलतात, हा माझा अनुभव आहे. आज येथले अनेक मोठे उद्योग त्या अर्थाने बदलत आहेत. अनेक नवीन उद्योग यासंदर्भात (green economy) तयार होत आहेत. शनीवारीच या संदर्भात काहींना जवळून पाहीले. काहींना मी सल्लागार म्हणून मदतही करत आहे... जमले तर त्यांच्याविषयी नंतर लिहीन.. पण एकंदरीत हा मोठा विषय आहे त्याला अनेक बाजू आहेत. वरकरणी नुसते हे सर्व विकासाच्या विरोधात आहे असे म्हणणे हे आपल्या, म्हणजे भारतीयांच्याच विकासाच्या विरोधात ठरेल, इतकेच तुर्तास म्हणतो.
01/11/2010 - 19:12 Permalink
निकित

In reply to by ए.चंद्रशेखर

@ चंद्रशेखर: >>> या यंत्रणा, मानवाचे सध्याचे उद्योग प्रमाणाबाहेर गेले तर तपमान व पर्यावरण पूर्वस्थितीला आणतील पूर्वस्थितीला कसे आणतील ते नाही कळाले. पृथ्वीच्या एका सिस्टीमचा फीडबॅक मेकॅनीझम दुसऱ्या सिस्टीम मध्ये कार्य करत नाही. उदा. मी आधी म्हटल्याप्रमाणे वातावरण बदलामुळे ज्वालामुखी फुटणार नाहीत - या दोन वेगवेगळ्या सिस्टीमस् आहेत. त्यामुळे वातावरणबदलाचा फीडबॅक हा वातावरणातून किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागावरूनच असावा लागेल - आणि तो असा अचानक उद्भवणारा आणि प्रलयकारी असेल अशा म्हणण्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. आपल्याला जर माहित असेल तर मला वाचायला निश्चितच आवडेल. जरूर शेअर करा. वातावरणाच्या नैसर्गिक फीडबॅक मेकॅनीझम ला मर्यादा आहेत - ज्या मानवाने कधीच ओलांडल्या आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेगाने तापमान बदलत आहे त्या वेगामुळे अशा कपोलकल्पित सर्वो मेकनिझम ची वाट पाहण्याकरता आपल्याकडे वेळ शिल्लक नाही.
01/11/2010 - 22:55 Permalink
ए.चंद्रशेखर

In reply to by निकित

मी उपस्थित केलेल्या मुद्यांबद्दल थोड्या विस्तृत विवेचनाची आवश्यकता आहे असे वाटते. १. पृथ्वीतलावरील स्वनियंत्रण प्रणाली. पृथ्वीतलावर निरनिराळ्या स्तरावरील स्वनियंत्रण प्रणाली अस्तित्वात आहेत. या पैकी अगदी प्राथमिक स्वरूपातल्या प्रणाली आपल्याला अभ्यासता येतात. उदाहरणार्थ एखाद्या स्थानाचे तपमान वाढल्यास वळवाचा पाऊस पडून तपमानाचा समतोल राखला जाणे. काहींचे अस्तित्व आपल्याला समजू शकते परंतु या प्रणालींची कार्यपद्धती आपल्याला अजून तरी नीट समजू शकलेली नाही. उदाहरणार्थ एल निनो किंवा ला निना या घटनांमधे समुद्र जलाच्या तपमानात होणारी वृद्धी किंवा घट. या नियंत्रण प्रणालींच्या अतिरिक्त अतिशय उच्च स्तरावरील एक प्रणाली पृथ्वीतलावर कार्यरत असते. ही प्रणाली जेंव्हा काही भयानक दुर्घटना किंवा फार मोठ्या स्वरूपाचे बदल पृथ्वीवर होतात त्याच वेळी कार्यरत होते असे म्हणता येते कारण ही प्रणाली कार्यरत झाल्याची अनेक उदाहरणे पृथ्वीच्या इतिहासात दिसून येतात. (उदा. हिम युग, चिक्शुल्युब, टोबा) या प्रणालीचे अस्तित्व किंवा कार्यपद्धती याबद्दल काहीही सांगणे मानवाला केवळ अशक्य असल्याने तत्ववेत्यांनी परमेश्वराची संकल्पना निर्माण केली. मात्र ही कार्य प्रणाली जर कार्यरत झाली तर यात पृथ्वीवरील सजिवांचे किंवा मानवाचे काय होईल हे सांगणे मानवाला अशक्य आहे. एक काल्पनिक भविष्य बदलाचा विचार करता ये ईल. समजा पृथ्वीवरचे तपमान प्रमाणाबाहेर वाढून दोन्ही धृवावरचा बर्फ पूर्ण वितळला तर समुद्र पातळी वाढून समुद्र काठचे सर्व मानव निर्मित उद्योग पाण्याखाली जाऊन तपमान वृद्धी कमी हो ऊ शकते. २. गेल्या २०० वर्षातल्या बदलांच्यावरून स्थिर स्वरूपाच्या बदलांची भाकिते करण्यामागचे धोके. १९८० च्या दशकात पृथीच्या वातावरणातून ओझोन वायू एका मोठ्या छिद्रातून अवकाशामधे निसटून जात असल्याचे संशोधकांना आढळून आले. यावरून हा काहीतरी भयानक प्रकार आहे व याचा मानवाच्या अस्तित्वाशी संबंध आहे अशी आरडाओरड झाली. परंतु नंतर ओझोन वायु मानवासाठी विषारी आहे व या वायुमुळे तपमानवृद्धी होण्यास मदत होते आहे त्यामुळे तो वातावरणात काही प्रमाणात निसटला तरी काही बिघडत नाही हे लक्षात आले. या एकाच उदाहरणावरून मानवाचे ज्ञान किती अपुरे आहे हे समजू शकते. दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा जरी ही अत्यंत आश्चर्याची गोष्ट असली तरी पृथ्वीच्या पर्यावरणातील किंवा वातावरणातील सर्व Parameters हे असे नियंत्रित केले जातात की ते जणू मानवाच्या अस्तित्वासाठीच तसे नियंत्रित केलेले आहेत. या परिस्थितीत काही दशके किंवा शतकांच्या निरिक्षणावरून झालेले बदल स्थिर स्वरूपाचेच आहेत असे म्हणणे कितपत योग्य आहे याचा विचार करणे आवश्यक आहे. या बाबतीतले माझे काही विचार माझ्या या ब्लॉगपोस्टवर आहेत. ज्यांना रुची असेल ते वाचू शकतात. ३ पर्यावरण किंवा तपमान वृद्धी नियंत्रित करण्याची गरज. वरील विवेचन वाचून मग मानवाला या गोष्टी नियंत्रित करण्याची गरज तरी काय आहे असे वाटणे आवश्यक आहे. परंतु हे लक्षात घेतले पाहिजे की जर हे बदल अतिरिक्त प्रमाणात वाढले तर पृथ्वीवरील Catastrophe साठीच असलेली व त्या साठी राखून ठेवलेली नैसर्गिक स्व नियंत्रण योजना जर यदा कदा कार्यान्वित झाली तर त्यात मानवजातीचे नुकसान किंवा ती नष्टच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यावरण किंवा तपमान वृद्धीवर नियंत्रण हे पृथ्वीवरील समतोल राखण्यासाठी आवश्यक नसून मानवाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आहे. पृथ्वी स्वतःची काळजी घेण्यास पूर्ण समर्थ आहे.
02/11/2010 - 12:27 Permalink
३_१४ विक्षिप्त अदिती

In reply to by ए.चंद्रशेखर

कारण ही प्रणाली कार्यरत झाल्याची अनेक उदाहरणे पृथ्वीच्या इतिहासात दिसून येतात. (उदा. हिम युग, चिक्शुल्युब, टोबा)
अशनीपात समतोल राखण्याच्या प्रणालीतलाच कसा काय मोजता येईल? बाकी चर्चा माहितीपूर्ण.
02/11/2010 - 12:35 Permalink
ए.चंद्रशेखर

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अशनीपात हे पृथ्वीचा समतोल नष्ट करण्यामागचे कारण होते. या संकटातून पृथ्वीच्या स्वनियंत्रण प्रणालीने काही लाख किंवा कोटी वर्षांनंतर पृथ्वीवरील समतोल परत आणण्यात यश मिळवले. चिक्शुलुब हे Catastrophe चे म्हणून उदाहरण मी दिले आहे. समतोल राखण्याच्या प्रणालीचे नाही.
02/11/2010 - 12:42 Permalink
नितिन थत्ते

In reply to by ए.चंद्रशेखर

इथे काहीतरी भयंकर घोळ होत आहे. करेक्टिव्ह मेकॅनिझम आहे हा मोठाच आरोप आहे. उदा तापमान वाढले म्हणून ते कमी करण्यासाठी वळवाचा पाऊस पडतो हे काहीतरीच आहे. कोणता तरी 'देव' पृथ्वीला नेहमी वाचवतो असे म्हणायचे आहे का? तसे असेल तर आपला पास बॉ.
02/11/2010 - 12:41 Permalink
ए.चंद्रशेखर

In reply to by नितिन थत्ते

वळवाचा पाऊस हे अत्यंत प्राथमिक स्वरूपाचे व बालबोध उदाहरण मी माझा मुद्दा पटावा म्हणून दिले आहे. ते करेक्टिव्ह मेकॅनिझम नाही हे मला मान्य आहे. मुद्दा एवढाच आहे की पृथ्वीच्याया करेक्टिव्ह मेकानिझम निरनिराळ्या स्तरावर Multilateral forms मधे कार्यान्वित आहेत. ज्या प्रमाणातला Disturbance असतो त्या प्रमाणातील करेक्टिव्ह मेकॅनिझम कार्यान्वित होत असते. मानवाला आकलन न हो ऊ शकल्याने तत्ववेत्यांनी परमेश्वराची संकल्पना मांडली असा मी उल्लेख केला आहे. आपण शास्त्रीय विषयावर चर्चा करत असल्याने यात परमेश्वराचा संबंध येऊ शकत नाही.
02/11/2010 - 12:53 Permalink

१. अशा पूर्णतः ईश्वरवादी स्वनियंत्रण प्रक्रियेचे अस्तित्व मी तरी मानत नाही. आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे, याला इतिहासामध्ये correlational evidence असेलही, पण ते causation होऊ शकत नाही - आणि म्हणूनच शास्त्राच्या आणि तर्काच्या निकषांवर पुरून उरत नाही. आपला ब्लॉग मी अजून वाचलेला नाही पण जरूर वाचेन. २. आपली ओझोन थराबाबतची माहिती साफ चुकीची आहे. ओझोन हा वायू अवकाशामध्ये निसटून वगैरे जात नव्हता - तर क्लोरोफ्ळूरोकार्बन व इतर वायूंमुळे त्याच्या थराचे विघटन होत होते - जे मोन्त्रीअल करारानंतर बऱ्याच प्रमाणात कमी झाले. सूर्यप्रकाशातील यु. व्ही. रेडीएशन शोषण्याचे अत्यंत महत्वाचे कार्य हा वायू करतो. त्यामुळे हा वायू अप्पर-ट्रोपोस्फीअर मध्ये असताना मानवासाठी विषारी वगैरे नसून अत्यंत उपकारक आहे. हरितगृह परिणामास त्याचा हातभार असतो - पण मी आधी म्हटल्याप्रमाणे, हरितगृह परिणाम एका मर्यादेपर्यंत पृथ्वीवरील विपुल अशा जीवसृष्टीसाठी आवश्यकच आहे. अवकाशातील थंडीपासून पृथ्वीला वाचवणऱ्या उबदार दुलईचे तो काम करतो. दुसरी गोष्ट म्हणजे - वातावरणशास्त्र केवळ २०० वर्षांच्या आधारावर निष्कर्षाप्रत पोचत नाही ! पृथ्वीच्या जन्मापासूनच्या वातावरणाचा अभ्यास त्यात केलेला असतो. किंबहुना, त्यासाठी ऐतिहासिक-वातावरणशास्त्र (paleo-climatology) नावाची वेगळी शाखाच आहे.
02/11/2010 - 12:52 Permalink

१. अशा पूर्णतः ईश्वरवादी स्वनियंत्रण प्रक्रियेचे अस्तित्व मी तरी मानत नाही. एवढेच म्हणावेसे वाटते की ज्या गोष्टींचे आपल्याला आकलन हो ऊ शकत नाही त्या गोष्टींना ईश्वरवादी म्हणणे हे योग्य नाही. माझ्या कोणत्याही प्रतिसादात मी परमेश्वराच्या कृपेने गोष्टी होतात असे म्हटलेले नाही. आपण हा ईश्वर कोठून मधे आणलात. Sub Atomic Particles आपल्याला बघता येत नाहीत. फक्त त्यांचा दुसर्‍या वस्तूवर झालेला आघात आपल्याला बघता येतो. त्याच प्रमाणे पृथ्वीवरील स्व नियंत्रण प्रक्रियेचे आपल्याला आकलन होत नाही पण फक्त परिणाम दिसतो म्हणून अशा प्रणालींचे अस्तित्व नाकारणे मला तरी योग्य वाटत नाही. आपण रिचर्ड फेनमन या शास्त्रज्ञाचे साहित्य वाचले आहे काय? त्यात अशा आकलन न होणार्‍या गोष्टींबद्दल फार सुरेख विवेचन आहे. आपण ते वाचावे अशी आपणास विनंती.
02/11/2010 - 14:49 Permalink
निकित

In reply to by ए.चंद्रशेखर

तुमच्या लेखनामध्ये मला एक सूत्र जाणवले ते म्हणजे - "माणसाच्या आकलनशक्तीच्या पलीकडील घटनांमुळे स्वनियंत्रण सांभाळले जाते" - म्हणजे पृथ्वीवरील संतुलन बिघडले की कुठलीतरी अज्ञात प्रणाली कार्यान्वित होते आणि एक कार्य घडते. हे कार्य मात्र भौतिकीच्या नियमांना बांधील असते. यातील "कारण" भाव मला नक्कीच ईश्वरवादी वाटला. अवांतर १: जर कार्य देखील आकलनशक्तीच्या पलीकडील असेल - तर त्याला मी ईश्वरी म्हणेन अवांतर २: "आकलनशक्ती पलीकडे काहीतरी कारण आहे" अशा नियमाचे ज्ञान मुळात आकलन शक्तीला कसे होऊ शकते ? आणि ज्या कसोटीवर आपण कार्य तोलतो त्याच कसोटीवर त्या कार्याचे कारणही उतरले पाहिजे. अवांतर ३: माणसाची आकलनशक्ती कालसापेक्ष असते. १०० वर्षांपूर्वी अनेक गोष्टी आपल्या "आकलनशक्तीच्या पलीकडील" होत्या. आजच्या पलीकडील गोष्टी कदाचित अजून १०० वर्षांनी अगदीच अलीकडे आलेल्या असतील !
02/11/2010 - 15:22 Permalink
ए.चंद्रशेखर

In reply to by निकित

आता मला काय म्हणायचे आहे ते तुम्हाला समजू लागले आहे असे वाटते. अनिश्चितता सिद्धांतामधे हेच सूत्र आहे. कोणत्याही नैसर्गिक प्रक्रियेमुळे झालेले परिणाम, भौतिकीच्या आपल्याला ज्ञात सिद्धांताप्रमाणे नसतीलही किंवा असतीलही. परंतु अशा परिणामांचे निरिक्षण करणे शक्य असले तर प्रक्रियेचे अस्तित्व मान्य करणे आवश्यक आहे असे मला वाटते. त्या प्रक्रियेला दैवी म्हणणे हे अडाणीपणाचे लक्षण ठरेल. रिचर्ड फेनमनने पुंज सिद्धांताचे विवेचन करताना हीच गोष्ट विशद केली आहे. ती आपण जरूर वाचावी.
02/11/2010 - 15:37 Permalink
निकित

In reply to by ए.चंद्रशेखर

@विकास १००% अनुमोदन. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! आर्थिक गणितं बदलल्याशिवाय गोष्टी पटकन बदलणार नाहीत. उर्जा - पर्यावरण - आणि विकास यांचा फार जवळचा संबंध आहे - आणि भारतासारख्या देशात तर तो नीट अभ्यासायलाच हवा. पण ही समीकरणं राजकीय देखील आहेत आणि म्हणूनच ती बदलणे ही एक सामाजिक प्रक्रिया असावी असेल.
01/11/2010 - 23:11 Permalink
मदनबाण

कोण म्हणतं save Trees तर... कोण म्हणतं... Save Eath पण मी म्हणतो... Save Our Future & Save Mankind... झाडं नसतील...प्राणी / पक्षी नसतील...नसेल जर पाणी, तर तुम्ही कसे रहालं ? तुम्हाला जर मनुष्य प्रजातीस विलुप्त होण्यापासुन वाचवायचं असेल आणि आपल्या भविष्यातील पिढीला सुंदर आयुष्य द्यायचं असेल...तर तुम्हाला बदलावचं लागेल.
01/11/2010 - 19:54 Permalink
क्रेमर

भूतापवाढीसंदर्भात वाद-प्रतिवाद होतच राहतील. टाइप टु एरर होण्याची शक्यता नगण्य असली तरीही धन आहे. यासंदर्भात सर्व प्रकारचा विदा (डेटा) तपासणे अवघड आहे. परंतु तापमान वाढ होत असण्याची शक्यता मोठी असावी. जरी भूतापवाढ होत नसेल तरी त्यामुळे राबवल्या गेलेल्या उपायांचा फायदा स्वच्छ हवेच्या भक्षणामुळे मानवजातीस होईल, अशी अपेक्षा रास्त ठरावी. मात्र जोपर्यंत स्वच्छ हवेपासून होणारे फायदे व त्यासाठी द्यावी लागणारी किंमत यामध्ये तफावत आहे, तोपर्यंत त्याबाबत फारशी हालचाल होईल असे वाटत नाही. प्रस्तुत लेखात विकासाबद्दल अभिनव पद्धतीने विचार केला जावा असे मत मांडले आहे. दशकभरापूर्वीच्या कार्बन उत्सर्जनातील वाढ पाहता विकसीत देशांचा त्यात सर्वाधिक सहभाग होता, हे लक्षात येते. भविष्यातही दरडोई कार्बन उत्सर्जन अमेरिकेसारख्या विकसीत देशांतच विकसनशील देशांपेक्षा जास्त असेल. या पार्श्वभुमीवर जोमाने विकास होत असलेल्या विकसीनशील देशांना भूतापवाढ विरोधी धोरणे म्हणजे विकासावरील अधिभार आहे असे वाटणे स्वाभाविक आहे. विकासाबाबत या देशांनी कसा विचार केल्यास हा अधिभार कमीत कमी राहील यावर निकित यांची मते वाचायला आवडतील.
01/11/2010 - 23:09 Permalink
निकित

In reply to by क्रेमर

प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! >>> मात्र जोपर्यंत स्वच्छ हवेपासून होणारे फायदे व त्यासाठी द्यावी लागणारी किंमत यामध्ये तफावत आहे, तोपर्यंत त्याबाबत फारशी हालचाल होईल असे वाटत नाही १००% अनुमोदन. परंतु "स्वच्छ हवेचे" अथवा "कमी उत्सर्जनाचे" फायदे मोजायचे कसे ? आणि जरी मोजता आले, तरी ते वस्तूंच्या किमतीमध्ये अंतर्भूत कसे करायचे - हा अर्थशास्त्रामधील फार जुना वाद आहे. ह्यालाच externality म्हणतात. त्याच्या दुरुस्ती करीता सरकारने हस्तक्षेप करणे गरजेचे असते - जी विविध धोरणे आखून, सबसिडी देवून वा कर लावून सरकार करू शकते. इथे आपला दुसरा मुद्दा येतो - सबसिडी किंवा वाढीव किंमत कोणाकडून वसूल करायची ? तुम्ही म्हणता ते १००% मान्य आहे. सध्याच्या प्रयत्नांची प्राथमिक जबाबदारी ही विकसित देशांनीच उचलली पाहिजे. परंतु विकसनशील देशांकडे विकास प्रक्रियेतील चुका सुधारण्यास भरपूर अवसर आहे. उदा. २०३० सालामध्ये भारतात जेवढ्या पायाभूत सुविधा लागतील त्याच्या ७०% अजून बांधून व्हायच्या आहेत. यात सुधारणेला भरपूर वाव आहे. उदा. जर आपण उर्जा वापरातील तांत्रिक कार्यक्षमता सुधारली तर कोणताही जादा खर्च न येता आपण आपले उत्सर्जन कमी करू शकतो जसे की - सी एफ एल दिवे, ५-स्टार उपकरणे, बिल्डिंग चे कार्यक्षम डिझाईन ई. त्याचप्रमाणे भारतामधील प्रचंड अग्रो-कचर्यापासून उर्जानिर्मिती, लघु-जलविद्युत, बायोगॅस, उष्णता-आणि-वीज यांची एकत्र निर्मिती इ. उपाय देखील फायद्याचे आहेत (त्यांवरील खर्च हां सध्याच्या वीजनिर्मिती खर्चापेक्षा कमी आहे). या तंत्रवैज्ञानिक उत्तरांबरोबरच, "विकास" कशाला म्हणायचे आणि विकासाचे कुठले प्रतिमान (मॉडेल) अन्गीकारायचे हे देखील तपासावे लागेल. उदा. विकासाच्या पाश्चिमात्य संकल्पनेमध्ये केंद्रीकरणाला प्रचंड महत्व आहे. जसे की - एक केंद्रीभूत industrial center - ज्याभोवती वस्ती आणि इतर उद्योग वाढतात. पण उर्जेच्या दृष्टीकोनामधून ते अकार्यक्षमतेला प्रोत्साहन देणारे आहे. त्याचप्रमाणे बाजारवादी व्यवस्थेच्या आपण बघत असलेल्या भणंग रूपामध्ये एकुणातच अधिक गोष्टी "वापरण्याला" (consumption) आलेले महत्व - यालाही मर्यादा घालाव्या लागतील.
02/11/2010 - 12:15 Permalink
नितिन थत्ते

In reply to by निकित

>>परंतु विकसनशील देशांकडे विकास प्रक्रियेतील चुका सुधारण्यास भरपूर अवसर आहे. उदा. २०३० सालामध्ये भारतात जेवढ्या पायाभूत सुविधा लागतील त्याच्या ७०% अजून बांधून व्हायच्या आहेत. यात सुधारणेला भरपूर वाव आहे. उदा. जर आपण उर्जा वापरातील तांत्रिक कार्यक्षमता सुधारली तर कोणताही जादा खर्च न येता आपण आपले उत्सर्जन कमी करू शकतो हे मान्य आहे. म्हणून तंत्रज्ञानाच्या (साध्या दिव्याऐवजी सीएफएल वापरायचा असेल तर त्यातल्या) किंमतीतली तफावत विकसित देशांनी सबसिडाईज करायला हवी. प्रयास संस्था साध्या सीलिंग फॅनच्या तंत्रज्ञानात काय सुधारणा करता येईल त्याची पाहणी करीत आहे. त्या तंत्रज्ञान सुधारणेसाठी लागनारा पैसा सरकारने कंपन्यांना द्यावा असे सुचवत आहे. तो पैसा (भारत) सरकारने देण्याऐवजी विकसित देशांनी ग्रॅण्ट म्हणून (लोन नव्हे) भारताला द्यावी. तशी तयारी विकसित देश दाखवत असल्याची माहिती नाही. त्या ऐवजी ते त्यांच्या देशातल्या नव्या तंत्रज्ञानाने बनलेल्या वस्तू महागड्या किंमतीना घेऊन त्याच वापराव्या असे विकसनशील देशांना सुचवीत आहे.
02/11/2010 - 12:37 Permalink
निकित

In reply to by नितिन थत्ते

@ नितीन: वादच नाही ! वाढीव किंमत ही विकसित देशांनीच द्यायला हवी. आणि अशी ग्रांट ही केवळ उत्सर्जन कमी करण्यासाठी नाही तर सध्याच्या वातावरणबदलाचे जे परिणाम आपल्याला भोगावे लागतील ते निस्तरण्यासाठी देखील असावी. मी प्रयास सन्स्थेमध्ये पूर्वी काम करत असे - आणि अजूनही त्यांच्याबरोबर काही प्रोजेक्ट्स वर काम करत आहे. तुम्हाला प्रयास कसे ठाऊक ?
02/11/2010 - 12:59 Permalink
क्रेमर

In reply to by निकित

ह्यालाच externality म्हणतात. त्याच्या दुरुस्ती करीता सरकारने हस्तक्षेप करणे गरजेचे असते - जी विविध धोरणे आखून, सबसिडी देवून वा कर लावून सरकार करू शकते.
बाह्यता (externalities) आहेत व त्यासाठी विनिमयव्यवस्था (exchange mechanism) खाजगी वस्तुंप्रमाणे (private goods) निर्माण होऊ शकत नाही या मताशी सहमत आहे. परंतु सरकारने करधोरणातूनच बाह्यतांचे नियमन करावे किंवा त्याची किंमत ठरवावी असे वाटत नाही. 'कॅप अँड ट्रेड' सारख्या योजना वापरून बाजारातील तत्त्वांचा वापर करून किंमतीचा शोध घेणे (price discovery) शक्य आहे. सरकारचा हस्तक्षेप यासाठी आवश्यक आहे याबाबतही सहमत. अशा धोरणांसाठी लागणारी राजकिय इच्छाशक्ति - जनमताचा रेटा - मात्र कमी प्रमाणात आढळतो.
विकसनशील देशांकडे विकास प्रक्रियेतील चुका सुधारण्यास भरपूर अवसर आहे.
चूका सुधारण्यास वाव आहे पण यासाठी मोजावा लागणारा अधिभार धन आहे की ऋण हे ठरवणे गरजेचे आहे. उदा. कमी खर्चात वीजनिर्मिती केली जाऊ शकते यासाठी काहीएक पुरावा हवा आहे. (लहान प्रकल्प अनेक आहेत पण त्यांची स्केलेबिलिटी किती प्रमाणात आहे?) पवनऊर्जानिर्मितीसाठी तशी पाहता मार्जिनल कॉस्ट शून्यच आहे पण ती वीज वाहून नेण्यासाठी लागणारे ट्रान्समिशन हे खर्चिक काम आहे.
"विकास" कशाला म्हणायचे आणि विकासाचे कुठले प्रतिमान (मॉडेल) अन्गीकारायचे हे देखील तपासावे लागेल.
हे समजले नाही. पाश्चात्य देशातीला प्रगतीला विकास म्हणता येईल काय? केंद्रीकरण ऊर्जेचा अपव्यय करते व विकेंद्रीकरणाने तसे होणार नाही हे एम्पिरिकली तपासले गेले आहे काय?
त्याचप्रमाणे बाजारवादी व्यवस्थेच्या आपण बघत असलेल्या भणंग रूपामध्ये एकुणातच अधिक गोष्टी "वापरण्याला" (consumption) आलेले महत्व - यालाही मर्यादा घालाव्या लागतील.
लोक बाजारव्यवस्थेत भोगवादी होत आहेत असे आपणास म्हणायचे आहे काय? उत्पन्न कमी झाल्यास आपोआपच गरजांवर - भक्षणावर - नियंत्रण येते, हे बाजारव्यवस्थेत घडतेच, त्यासाठी वेगळे काही केले जावे असे वाटत नाही. उत्पन्नाचे वितरण सुधारण्याची गरज आहे, हे मान्य आहे पण त्यासाठी बाजारव्यवस्थेबाहेरच जायला हवे याबाबत साशंक आहे.
02/11/2010 - 19:12 Permalink
निकित

In reply to by क्रेमर

बाह्यातेबाबत (शब्द आवडला - धन्यवाद !) आपले म्हणणे मान्य.
चूका सुधारण्यास वाव आहे पण यासाठी मोजावा लागणारा अधिभार धन आहे की ऋण हे ठरवणे गरजेचे आहे.
अनेक उपायांचा अधिभार ऋण आहे. उदा. कार्यक्षमतेमधील सुधारणा. आणि याबाबत अमेरिका (मुख्यतः कॅलीफोर्निया) आणि युरोपीय देशांमध्ये भरपूर पुरावे आहेत. कॅलीफोर्नियामधील कंपन्या दरवर्षी वीजेची ५०% वाढीव मागणी ही कार्यक्षमता सुधारून पूर्ण करतात. लघु-उर्जा प्रकल्पांच्या स्केलेबिलीटी संदर्भात तुमची शंका रास्त आहे. म्हणूनच अशा प्रकल्पांचा पोर्टफोलियो अथवा बास्केट बनवणे गरजेचे आहे.यामुळे लोकली उपलब्ध संसाधने वापरता येतील. दुसरी गोष्ट म्हणजे - उर्जेच्या निर्मितीपेक्षा - उर्जा जे कार्य करते (service) त्याकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. उदा. combined heat and power (CHP) किंवा tri-generation सिस्टीम मध्ये एकूण कार्यक्षमता ७५-८०% पर्यंत वाढू शकते.
पाश्चात्य देशातीला प्रगतीला विकास म्हणता येईल काय?
हो आणि नाही. आर्थिक प्रगती झाली (उत्पन्न वाढलं, वितरण काही प्रमाणात सुधारलं) आणि त्या अनुषंगाने विकासाच्या विविध टप्प्यांची पूर्तता झाली (शिक्षण, आरोग्य, इतर सुविधा इ.). परंतु मुख्यप्रवाहातील अर्थशास्त्री आणि इतर धुरीण मात्र आर्थिक उत्पन्नवाढीलाच विकास मानू लागले. आणि तिथे खरी गोची आहे. विकसनशील देशांनी देखील आपली प्रमुख विकास धोरणे उत्पन्नवाढीपुरतीच मर्यादित ठेवली (ट्रीकल डाउन वर विश्वास ठेवून!). पण याला विरोधाभास म्हणून केरळ किंवा श्रीलंका यांचे उदाहरण बोलके आहे. मर्यादित उत्पन्न असूनही त्यांचा विकासाचा निर्देशांक खूपच चांगला आहे. बाजारवादी व्यवस्थेबाबत: माझा आक्षेप हा बाजारवादी व्यवस्थेला नाही तर त्याच्या भणंग अशा रूपाला आहे. भारतासारख्या सर्वार्थाने विखुरलेल्या देशात (बाजारवादी व्यवस्था + वाढलेल्या खाजगी आकांक्षा + विस्कटलेले वितरण + समाजाचे नैतिक अधःपतन + राजकीय दृष्टीचा अभाव) ही बेरीज म्हणजे अफूची गोळी ठरू शकते - जे आपण कमी-अधिक प्रमाणात आजही अनुभवत आहोत.
03/11/2010 - 09:52 Permalink
क्रेमर

In reply to by निकित

वीजनिर्मीती क्षेत्रात कार्यक्षमता वाढवता येणे शक्य आहे, हे बरोबरच आहे. विशेषत: भारतासारख्या देशात जेथे वितरणात मोठ्या प्रमाणात वीज वाया जाते. स्थानिक संसाधने वापरून निर्माण केलेली वीज ही वीज न पोहोचलेल्या ग्रामीण भागास वरदान ठरू शकेल. परंतु स्केलेबिलिटीविषयी मी साशंक आहे. अर्थात भविष्यात या क्षेत्रातही प्रगती होऊन परिस्थिती सुधारू शकेल.
...परंतु मुख्यप्रवाहातील अर्थशास्त्री आणि इतर धुरीण मात्र आर्थिक उत्पन्नवाढीलाच विकास मानू लागले. आणि तिथे खरी गोची आहे.
मानव विकास निर्देशांक (Human Development Index) हे विकासाचे एकक म्हणून मूख्य प्रवाहातील अर्थतज्ज्ञही वापरतात. अमर्त्य सेन तसेच आजच्या काळातील एस्थर डफ्लो यांच्यासारखे विकास अर्थतज्ज्ञ (Development Economists) साक्षरता, स्त्रियांची सक्षमता वगैरे मुद्द्यांवर काम करतच आहेत. पण वृत्तपत्रातून सातत्याने लेखन करणारे व स्वत:ला अर्थतज्ज्ञ म्हणवून घेणारे अनेक टॉकिंग हेड्स 'ट्रिकल डाउन' वगैरेसारख्या संज्ञांचा वापर करून आपल्याकडे विकासाबाबत चुकीचे चित्र उभे करतात. या पार्श्वभुमीवर केरळ व श्रीलंका यांचे उदाहरण समर्पक आहे.
बाजारवादी व्यवस्था + वाढलेल्या खाजगी आकांक्षा + विस्कटलेले वितरण + समाजाचे नैतिक अधःपतन + राजकीय दृष्टीचा अभाव
वाढलेल्या खाजगी आकांक्षा व समाजाचे नैतिक अधःपतन याबाबत असहमत आहे. बाजारवादी व्यवस्था + अशक्त संस्था (weak institutions) असे काहीसे गणित मला पटते.
03/11/2010 - 19:37 Permalink
३_१४ विक्षिप्त अदिती

In reply to by क्रेमर

क्रेमरभय्या, प्रतिसाद नीटसा समजला नाहीये. आता पुन्हा एकदा जाहिर विनंती, तुमच्या विषयावर सविस्तर लेख का लिहीत नाही तुम्ही?
03/11/2010 - 21:21 Permalink
सहज

पण अजुन पुरेशी माहीती अथवा नवा विचार, शोध काहीच नसल्याने क्लायमेट चेंजबद्दल अजुन संभ्रमाची अवस्था आहे. मधे बीबीसीप्रस्तुत एका मालीकेत दाखवले होते की नासाच्या प्रयोगातील काही त्रुटी, पृथ्वीवर तापमान मोजणार्‍या काही प्रयोगातील काही चुकांमुळे तसेच सौर्यवादळे इ घटकांमुळे तापमानवृद्धीचे काही भयावह आकडे आले होते. आधीक तपासाअंती ते तसे काही नाही हे कळले. थोडक्यात अजुन पुरेशी माहीती, विदा नाही. अर्थात याचा अर्थ मानवनिर्मीत प्रदुषणावर उपाययोजना न करणे असा नक्कीच नाही पण कदाचित वाटते तेवढी ही समस्या गंभीर नसेलही.
02/11/2010 - 12:55 Permalink
३_१४ विक्षिप्त अदिती

In reply to by सहज

... पण कदाचित वाटते तेवढी ही समस्या गंभीर नसेलही.
सकाळी नऊ किंवा संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास कोणत्याही शहरातल्या चौकात दहा-पंधरा मिनीटं उभं राहिल्यावर समस्येतला काही भाग तरी नक्कीच समजेल.
02/11/2010 - 13:23 Permalink
नितिन थत्ते

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ती लोकल समस्या आहे. (ती सोडवायला हवी यात संशय नाही). (मागे एका चर्चेत शहरातल्या चौकातली समस्या पार्टिक्युलेट मॅटर मुळे अधिक असते असे कळले होते). पण त्याने ओव्हरऑल पृथीचे तापमान वाढले आहे असा निष्कर्ष आढता येणार नाही.
02/11/2010 - 13:30 Permalink
३_१४ विक्षिप्त अदिती

In reply to by नितिन थत्ते

वातावरण बदल लोकली नक्कीच होत आहे, गाड्यांची इंजिनं आणखी एफिशियंट बनवली जावीत, शहरी माणसांचं रहाणीमान सुधारण्यासाठी याची गरज आहे असे काही मुद्दे मूळ लेखात आले आहेत त्याला अनुसरून प्रतिसाद होता. बाकी आपली असहमती नाही.
02/11/2010 - 14:13 Permalink

संभ्रम नाही म्हणता मग हे चुकीचे आहे का? असो संभ्रम एकंदर म्हणत आहे. प्रदुषण नाकारले नाही आहे की प्रदुषणाचे दुष्परिणाम नाकारले नाही आहेत. जगबुडीची भाकीते अजुन नक्की नाही म्हणत आहे. शिवाय ह्या प्रदुषणाला मी विकसनशील, विकसीत देश असे परिमाण लावत नाही. जितका दोष निकीत यांचा आहे तितकाच दोष सहज यांचा आहे तितकाच मनमोहनसिंग तितकाच ओबामा असे मानतो. आणि फार तर काय होईल? डायनोसॉर नष्ट झाले मग सस्तनप्राण्यांचा खरा उदय झाला. उद्या मनुष्य संपला अजुन कोणतरी येईल. हाय काय नाय काय? मनुष्याची कसोटी आहे खरी. जर हुशार असेल तर टिकेल. जर हुशार नसेल तर टिकला पाहीजे असा आग्रह कशाला?
02/11/2010 - 14:11 Permalink
चिंतातुर जंतू

In reply to by सहज

विशिष्ट विवादित उद्योगांशी लागेबांधे असणार्‍या काही मूठभर शास्त्रज्ञांनी हेतुपुरस्सर संभ्रम निर्माण केलेला आहे असं प्रतिपादन मर्चंट्स ऑफ डाऊट या पुस्तकात केलेलं आहे.
02/11/2010 - 15:00 Permalink
चिंतातुर जंतू

'गैरसोयीची असत्ये' हा लेख 'लोकसत्ता'त प्रकाशित झाला होता तेव्हा वाचला होता आणि वाचून धक्काच बसला होता. आपला त्यावरचा प्रतिसादही तेव्हा वाचला होता. इथे पुन्हा दिल्याबद्दल धन्यवाद. 'रॉयल सोसायटी'नं या दुव्यावर दिलेल्या माहितीचा सर्वसामान्यांना फायदा व्हावा.
02/11/2010 - 13:52 Permalink
श्रावण मोडक

चांगली चर्चा. फाटा न फुटता झालेली. नीलकांत, संपादक, मिपावर असं एक दालन करता येईल का पहा, जिथं हा लेख, पूर्वीचा धनंजयचा कोणार्कचा लेख नंतर देवाविषयीचा एक लेख (ज्यात मेघना, डान्राव यांची भर आठवते) असे काही लेख, ज्यावर विषयाला धरून उत्तम चर्चा झालेली आहे, ते या दालनात ठेवावेत. अधूनमधून तिथे जाऊन त्यांचा आस्वाद घेता यावा.
03/11/2010 - 21:56 Permalink