✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

'गावगुंफण' : सक्षम स्त्रिया = सर्वांगीण प्रगती

च
चिंतातुर जंतू यांनी
Wed, 10/20/2010 - 17:41  ·  लेख
लेख
सक्षम स्त्रिया बायकांना सक्षम करणार्‍या योजनांतून समाजाचा विकास कसा होतो हे 'गावगुंफण' हा माहितीपट पुन्हा एकदा अधोरेखित करतो. पुण्यातले रंगकर्मी अतुल पेठे यांनी हा माहितीपट बनवला आहे. 'हॅलो मेडिकल फाउंडेशन' या संस्थेनं मराठवाड्यातल्या खेड्यांमध्ये उभ्या केलेल्या सामाजिक क्रांतीची यातून ओळख होते. गर्भधारणा आणि प्रसूती हा स्त्रियांच्या आयुष्यातला कसोटीचा काळ असतो. पुरुषप्रधान व्यवस्थेत आधीच दुर्लक्षित, कुपोषित राहिलेल्या बायका आणि त्यात खेड्यांमध्ये असलेला प्राथमिक आरोग्य सेवांचा अभाव या गोष्टी तर स्त्रियांचा कर्दनकाळच ठरतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी काय करता येईल याचा एक उत्कृष्ट धडा 'गावगुंफण'मध्ये मिळतो. खेड्यात आरोग्यसेवा उभारण्यासाठी शहरी डॉक्टर आणि नर्सेस वगैरेंवर अवलंबून राहण्याऐवजी गावातल्या बाईच्या मदतीला जर तिच्याच गावातली बाई येऊ शकली तर ते सर्वात परिणामकारक होईल हे लक्षात घेऊन औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालयातल्या काही आदर्शवादी तरुणांनी ऐंशीच्या दशकात उस्मानाबाद जिल्ह्यातल्या काही खेड्यांत काम सुरू केलं. म्हटलं तर त्यांची कल्पना अतिशय साधी होती. आधुनिक वैद्यकामुळे अनेक आजार सहज आणि फारसा खर्च न करता टाळता येतात किंवा बरे करता येतात. पण खाण्यापिण्याकडे केलेलं दुर्लक्ष आणि साध्या-सोप्या उपायांची माहिती नसणं हीच खेड्यातली खरी अडचण असते. त्यात भोंदू वैद्य आणि रुग्णाकडून पैसे उकळायला टपलेले डॉक्टर हे खेड्यातल्या अज्ञानाचा गैरफायदा घेतात. त्यापेक्षा खेड्यातल्याच काही महिलांना प्राथमिक आरोग्य सेवेचे धडे द्यायचे आणि त्यांना आपल्याच गावात कार्यरत ठेवायचं अशी ती कल्पना होती. अशा कामाला काय प्रकारच्या अडचणी येऊ शकतात याची आपण कल्पना करू शकतो. मुळात मुलींनी शिकूच नये; शिकल्या तरी एकदा लग्न लागलं की सासरी राहून जन्मभर नवरा, मुलं आणि सासरच्या मंडळींची सेवा करत जन्म काढावा अशा विचारांच्या जगात बायकांना अशा लष्करच्या भाकर्‍या भाजायला बाहेर काढायचं हीच एक कठीण गोष्ट होती. संस्थेनं गावांतल्या बायकांना मूलभूत वैद्यकीय तपासण्या करण्याचं आणि प्राथमिक उपचार करण्याचं प्रशिक्षण दिलं. दाईचं प्रशिक्षण घ्यायला गावातल्या मागास, परित्यक्ता, दलित किंवा मुस्लिम स्त्रियांना प्राधान्य दिलं. अशा गरजू बायकाही कदाचित या कामासाठी जास्त सहजतेनं तयार झाल्या असतील. खेड्यापाड्यांत असणार्‍या जातीपातींच्या टोकदार वास्तवाचा विचार करता अशा कामासाठी एखाद्या बाईला जातपात न विचारात घेता कुणी आपल्या घरात घेतील ही गोष्टही कठीण वाटते. पण हे शक्य झालं, कारण गावातल्या बायकांना आपली आबाळ होते आहे हे कळत होतं आणि या बायका आपला तारणहार आहेत हेही कळत होतं. अशा पध्दतीनं या कामामुळे अनायासे जातिनिर्मूलनालाही हातभार लागला. एकदा स्त्री सक्षम झाली की ती आपलं घरदार आणि परिसर सुधारते हा इतरत्र दिसून येणारा प्रकार इथेही दिसला. हळूहळू ग्रामसभेमध्ये स्त्रियांचा सहभाग वाढला. गावात शौचालयं बांधणं, पिण्याच्या पाण्याची सोय करणं, स्त्रीभ्रूणहत्यांविरोधात आंदोलन, दारूबंदी अमलात आणणं अशा गोष्टींसाठी सरकरकडून विविध योजनांद्वारे जी मदत मिळते त्याची माहिती बायकांना होऊ लागली; कंबर कसून त्यांनी अशा योजनांना गावाचा पाठिंबा मिळवला. वयात येणार्‍या मुलींना स्वतःच्या शरीराविषयी माहिती देणं असे उपक्रमही चालू झाले; लग्न आणि शरीरसंबंधांविषयी त्यांना वाटणारी भीती घालवून त्यांना अधिक सक्षम केलं गेलं. गावातल्या जन्म-मृत्यूंची नोंदणी ते कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडणार्‍या स्त्रियांना मदत अशी अनेक इतर कामंही या महिलांकडून होऊ लागली. किरकोळ औषधोपचार निव्वळ एका बसच्या तिकिटाएवढ्या खर्चात होऊ लागले पण गंभीर आजाराकरता खर्च करावाच लागे. मग त्यासाठी मदत म्हणून गावात महिला बचत गट सुरू केले गेले. त्यांद्वारे बायकांच्या हातात पैसा खेळायला लागला. सावकाराची कर्जं फेडणं, घरगुती व्यवसायासाठी भांडवल असाही त्या पैशाचा उपयोग होऊ लागला. घरच्या घरी शेवया-पापड बनवणं, दळण-कांडण करून देणं अशा व्यवसायांचं प्रशिक्षण आणि साधनसामुग्री महिलांना दिली जाऊ लागली. त्यातून महिलांना उत्पन्नासाठी नवीन मार्ग उपलब्ध झाले. हळूहळू गाव सुधारत गेलं. अगदी साध्यासुध्या दिसणार्‍या अशा स्त्रियांना आत्मविश्वासानं स्वतःच्या कामाविषयी, गावाच्या प्रगतीविषयी बोलताना पहाणं हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. त्याची प्रचिती इथंही येते. (माहितीपटातल्या माहितीपूर्ण पण काहीशा रुक्ष भागाऐवजी अशा आणखी स्त्रियांना बोलतं करून त्यांच्याकडूनच ती माहिती मिळाली असती तर माहितीपट अधिक परिणामकारक झाला असता असं मात्र वाटत रहातं.) आज संस्थेचं काम सत्तर गावांत आहे. तसंच शहरांतल्या गरीब वस्त्यांमध्येही आरोग्याच्या समस्या खेड्यांसारख्याच आहेत हे लक्षात घेऊन संस्थेनं आता सोलापुरातही काम सुरू केलं आहे. सोलापुरातल्या सत्तर झोपडपट्ट्यांमध्ये आज संस्था कार्यरत आहे. संस्थेविषयी अधिक माहिती या दुव्यावर मिळेल.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5262 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

वैद्यकीय महाविद्यालयातल्या

गांधीवादी
Wed, 10/20/2010 - 17:51 नवीन
वैद्यकीय महाविद्यालयातल्या आदर्शवादी तरुणांचे, प्रत्यक्ष एक चांगले काम हाती घेतल्याबद्दल. श्री. रंगकर्मी अतुल पेठे यांनी हा माहितीपट बनविला त्याबद्दल, आणि आपण हि माहिती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन. आमच्या वस्तीत सुद्धा काही स्त्रिया पुढाकार हेऊन बचत गटाच्या योजना चालवितात.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा

सुनील
Wed, 10/20/2010 - 17:55 नवीन
हॅलो मेडिकल फाउंडेशन ह्या संस्थेला अनेक शुभेच्छा! काही वर्षांपूर्वी चीनमध्ये "अनवाणी डॉक्टर" ही मोहीम राबवली गेली असल्याचे वाचले होते, त्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

चांगली माहीती

सहज
Wed, 10/20/2010 - 19:58 नवीन
आपण हा माहीतीपट कुठे पाहीलात? आंतरजालावर हा लघुपट उपलब्ध आहे का?
  • Log in or register to post comments

माहितीपटाची उपलब्धता

चिंतातुर जंतू
गुरुवार, 10/21/2010 - 11:18 नवीन
आपण हा माहीतीपट कुठे पाहीलात? आंतरजालावर हा लघुपट उपलब्ध आहे का?
मी हा माहितीपट पुणेरी पध्दतीनं फुकटात पाहिला पण याच्या डी.व्ही.डी. आता उपलब्ध आहेत. अतुल पेठे यांचा संपर्क इथे मिळेल. त्यांच्याकडून अधिक माहिती मिळू शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

अतिशय चांगल्या कार्याची

मितान
Wed, 10/20/2010 - 20:30 नवीन
अतिशय चांगल्या कार्याची माहिती करून दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद ! औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्यातही अशा प्रकारचे काम चालते. स्वतंत्रपणे कोणताही गाजावाजा न करता चाललेली ही कामं बघताना खरंच खूप प्रेरणा मिळते.
  • Log in or register to post comments

असेच फुलतात गुलाब हे ताजे

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 10/20/2010 - 20:45 नवीन
अतिशय सकारात्मक बातमी, माहिती, धाग्याबद्दल मनापासून आभार. 'तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे' या प्रश्नाचं उत्तर ही सर्व मंडळी आपल्या कृतीतून देत आहेत.
  • Log in or register to post comments

+१

मुक्तसुनीत
Wed, 10/20/2010 - 20:48 नवीन
अदितीने सुंदर शब्दांत मांडले आहे. उत्तम माहिती. हा अनुबोधपट लवकरच पाहायला मिळेल अशी आशा आहे. अतुल पेठे यांच्यासारखे लोक कसलाही गाजावाजा न करता वर्षानुवर्षे उत्तम काम करत आहेत. त्यांच्या कामाला माझ्या अनेक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

+१

शहराजाद
Wed, 10/20/2010 - 22:39 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

ता. क.

शहराजाद
Wed, 10/20/2010 - 22:41 नवीन
फोटोदेखील आवडला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शहराजाद

आरती प्रभू

चिंतातुर जंतू
गुरुवार, 10/21/2010 - 12:11 नवीन
'तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे' या प्रश्नाचं उत्तर ही सर्व मंडळी आपल्या कृतीतून देत आहेत.
आरती प्रभूंची ओळ अतिशय प्रिय आहे. ती इथे वापरलेली पाहून आनंद झाला. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

छान

नितिन थत्ते
Wed, 10/20/2010 - 22:24 नवीन
उत्तम ओळख. संस्थेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन. माझ्या (चौथी पास असलेल्या) आजीने त्या काळी (ब्रिटिश काळात) Trained दाई हा कोर्स केला होता. आणि गावातील बाळंतपणांमध्ये सुईण म्हणून ती जात असे. तिला अर्थातच फार काही उपचार करण्याची सोय नव्हती पण बाळंतपणात घ्यायची स्वच्छतेची काळजी वगैरे सुधारणा प्रत्यक्षात आल्या असतील. कदाचित केस कॉम्प्लिकेटेड होत आहे हे लवकर लक्षात येत असेल तर बाळंतिणीचा जीव वाचण्याची शक्यता वाढत असेल. नंतरच्या काळातसुद्धा खेड्यातल्या जनतेच्या सोयीसाठी डॉक्टरकीचा दहावीनंतर ३ वर्षांचा कोर्स सुरू करण्याची कल्पना ८० सालाच्या मागेपुढे निघाली होती. त्यावेळी माझ्या आठवणीप्रमाणे प्रतिभा पाटील महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्री होत्या. पण ती बारगळली (बहुधा सुरूच झाली नाही) हल्ली अशा प्रकारच्या योजना सरकारी पातळीवर राबवल्याच जात नाहीत. :(
  • Log in or register to post comments

आशा

चिंतातुर जंतू
गुरुवार, 10/21/2010 - 12:08 नवीन
हल्ली अशा प्रकारच्या योजना सरकारी पातळीवर राबवल्याच जात नाहीत. :-(
सध्या सरकारतर्फे आशा (Accredited Social Health Activist) ही योजना राबवली जाते. तिची रचना 'हॅलो'च्या कामासारखीच आहे. अधिक माहिती इथे मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

एक समस्या

मिसळभोक्ता
Wed, 10/20/2010 - 22:30 नवीन
स्त्रियांच्या सक्षमीकरणाला माझा नेहमीच पाठिंबा रहात आलेला आहे. परंतु, असे लक्षात येते, की सक्षम होण्याची पहिली पायरी म्हणजे गावागावांत दारुबंदी हा पहिला उपक्रम चालवण्यात येतो. त्यामुळे मी हा पाठिंबा काढून घेतलेला आहे. (इतर कामे आधी करा, मग वेळ मिळालाच, तर दारुबंदी वगैरे करा. सुरुवात तिथून नको. )
  • Log in or register to post comments

उत्तम ओळख

क्रेमर
Wed, 10/20/2010 - 22:47 नवीन
संस्थेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

चिंतातुरजंतु खुप छान माहीती

जागु
गुरुवार, 10/21/2010 - 11:53 नवीन
चिंतातुरजंतु खुप छान माहीती दिलीत. अजुन येउद्यात अशा प्रकारची माहीती.
  • Log in or register to post comments

छान लेख

ए.चंद्रशेखर
गुरुवार, 10/21/2010 - 12:15 नवीन
श्री. पेठे यांच्या कार्याची माहीती सांगणारा लेख छान वाटला. फारच चांगले कार्य आहे हे.
  • Log in or register to post comments

छोटीशी दुरुस्ती

चिंतातुर जंतू
गुरुवार, 10/21/2010 - 14:46 नवीन
श्री. पेठे यांच्या कार्याची माहीती सांगणारा लेख छान वाटला. फारच चांगले कार्य आहे हे.
धन्यवाद. एक किंचितशी दुरुस्ती करतो. अतुल पेठे यांनी 'गावगुंफण' हा माहितीपट बनवलेला आहे. त्यात (आणि या लेखात) ज्या सामाजिक कार्याची ओळख करून दिलेली आहे ते कार्य हॅलो मेडिकल फाउंडेशन ही संस्था करत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ए.चंद्रशेखर

+१

मुक्तसुनीत
Fri, 10/22/2010 - 01:35 नवीन
.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा