मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

`अन्नोन'दशा

आपला अभिजित · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
सकाळी बाइकवरून कुठेतरी निघालो होतो आणि राजाराम पुलाजवळील सिग्नलच्या अलीकडेच मोबाईल वाजला. "सायलेंट' करायला विसरलो होतो आणि व्हायब्रेटर सुरू असल्यानं माझं हृदय खिळखिळं होण्याआधी फोन उचलणं आवश्‍यक होतं. कुठला तरी "अननोन' नंबर होता. ""सर तुम्ही अभिजित पेंढारकरच बोलताय ना?'' ""हो, बोला.'' ""सर, मी जळगावहून बोलतेय, तुमचा "प्रीमियर'मधला लेख वाचला.'' व्हायब्रेटरवर असलेल्या मोबाईलमुळे दडपलेली माझी छाती आता फुगली होती. सत्काराच्या वेळी हार घालण्यासाठी मान वाकवून ठेवतात, तशी मी लेखनाबद्दलची प्रशंसा ऐकण्यासाठी माझे कान मी मोबाईलच्या अधिकाधिक जवळ आणले. कानात प्राण, प्रेम चोप्रा, अमरीश पुरी, शक्ती कपूर...सगळे आणले! ""सर, तुम्हाला जरा विचित्र वाटेल, पण एक विचारू का?'' आता तर मी तिच्या शब्दांच्या अमृतचांदण्यात चिंब व्हायला आतुर झालो होतो. माझ्या लेखनाची वारेमाप स्तुती होणार, "तुम्हाला कसं काय सुचतं हे सगळं,' असा कौतुकवर्षाव होणार, अशी खात्री होती. त्याच धुंदीत मी असताना तिनं पुढचं वाक्‍य टाकलं - "सर, सलमान खानचा नंबर आहे का तुमच्याकडे?'' धुंदी खाडकन उतरली होती. कानाखाली एक सणसणीत चपराक बसली होती. ""सलमान खानचा नंबर? तुम्हाला कशाला हवाय? तुम्ही फॅन आहात का त्याच्या?'' मी आवाजात शक्‍य तितकं मार्दव आणून विचारलं. ""हो सर...खूप! मला प्लीज द्या ना त्याचा नंबर. कुठून मिळणार नाही का?'' ""अहो ताई, माझ्याकडे नाही त्याचा नंबर. मी पुण्यात असतो. तुम्हाला मुंबईतून मिळवावा लागेल नंबर.'' "सलमान खानच्या कारकिर्दीवर लेख लिहिण्यासाठी त्याला "मॉडेल' म्हणून समोर बसवून त्याची लांबी-रुंदी मोजायची नसते! तसा मी बराक ओबामांनाही लेखातून चार खडे बोल सुनावू शकतो. याचा अर्थ ते अफगाणिस्तान, इस्राईलविषयीची धोरणं आखण्यासाठी ते दर वेळी फोन करून माझा सल्ला घेतात असं नाही!' असंच मला तिला सुनावायचं होतं, पण मनाला आवर घातला. शेवटी युवती-दाक्षिण्य म्हणून काही असतंच ना! बिचारीचा भ्रमनिरास झाला होता. लेख वाचल्या वाचल्या "युरेका' म्हणून तिनं मला फोन केला असावा. तिच्या लाडक्‍या सलमानचा नाही, निदान त्याच्यावर लेख लिहिणाऱ्याचा नंबर "प्रीमियर'मध्ये छापला होता. सलमान त्याच्याकडे नक्कीच रोज विटी-दांडू खेळायला येत असणार, असा तिचा ठाम समज होता. केवढ्या अपेक्षेनं तिनं मला फोन केला होता! पण तिच्या सगळ्या स्वप्नांचा आणि उत्साहाचा मी चक्काचूर केला. "अननोन' नंबरची दहशत असते ती अशी. एखाद्या वेळी काही वेगळी संधी असेल म्हणून "अननोन' नंबरचा फोन उचलायला जावं, तर कुण्यातरी प्रतिभावंत वाचकाचा फोन असतो. कुठला तरी लेख कुठल्या तरी पुरवणीसाठी त्यांनी म्हणे टपालानं, कुण्या माणसाच्या हस्ते किंवा पेटीत टाकून पाठविलेला असतो. आपला एवढा एकमेवाद्वितीय अनुभव का छापला नाही, अशी त्यांची विचारणा असते. कधी कधी तर आपण सकाळी सकाळी प्रेमानं "अननोन' नंबरचा फोन घ्यावा तर असे संवाद होतात... ""हॅलो...'' (आवाजात शक्‍य तितका गोडवा आणून) - मी. ""हलव...कोन बोल्तंय?'' ""आपण कोन बोल्ताय?'' ""हा...कोन? विलास का?'' ""आपण कोण बोलताय? आपण फोन केलाय ना? मग आपणच आधी सांगितलं पाहिजे ना, कोण बोल्ताय ते?'' ""हा...मी अण्णा बोल्तोय. विलास आहे का?'' ... कधी कधी तर "रॉंग नंबर' आहे, असं सांगूनही लोकांना पटत नाही. "काय चेष्टा करताय का राव,' म्हणून ते पुन्हा तिथेच फोन करतात. वर त्यांच्या कुणा विलास, संजय, दादू, म्हादू, गणपतला फोन देण्याचा धमकीवजा आदेशही देतात. आता त्यांच्या आग्रहासाठी आणि आपण त्यांचा फोन उचलल्याचं प्रायश्‍चित्त म्हणून त्यांचा विलास, संजय, दादू, म्हादू किंवा गणपत कुठून पैदा करायचा, असा प्रश्‍न मला पडतो. प्राचीन काळी लॅंडलाइनवर फोन करण्याची पद्धत होती, तेव्हा तर माझ्या नंबरवर कायम दुसऱ्याच कुणाच्या नावासाठी फोन यायचा. बहुधा "बीएसएनएल'नं कुणाचा तरी बंद केलेला नंबर मला दिला होता. त्या भल्या माणसाचे जुने स्नेही मला फोन करून पिडायचे. दहा-बारा वेळा सांगून झालं, तरी त्यांची संपर्कयात्रा काही थांबेना. शेवटी कंटाळून त्यांनी त्यांच्या स्नेह्याचा मोबाईल नंबर मिळविला की काय, कुणास ठाऊक! पण माझे फोन बंद झाले. हल्ली नाइट ड्युटीच्या वेळी तरी मी दुपारी मोबाईल सायलेंटवरच टाकून घोरत पडतो. कुठल्या नोन-अननोन नंबर्सना नंगानाच घालायचाय, तो घालू द्या! चार वाजता उठेपर्यंत मी त्याकडे ढुंकून बघत नाही. एखाद वेळी उतावीळ झालेल्या कुणाकुणाचे ढीगभर मिस्ड कॉल्स मिळतात. मी मेलो बिलो की काय, अशी शंका त्याला येते. मग मी झोपलो होतो, असं त्याला शांतपणे सांगतो. त्याचा चेहरा मग (मोबाईलवरूनही) पाहण्यासारखा होतो. र्ल मॅनर्स ही तर भल्याभल्यांना न झेपणारी गोष्ट आहे. माझा मोबाईल अनेकदा "सायलेंट' असतो. म्हणजे मीटिंगसाठी जाण्यापूर्वी काही मिनिटं आधी आणि नंतर, दुपारी झोपलो असताना, रात्री झोपण्यापूर्वी आणि अगदी फोनच्या रिंगची कटकट नको असेल तेव्हाही! मीटिंग ऐन रंगात आलेली असताना अनेक जणांचे मोबाईलवरचे "कोंबडे' आरवतात. काहीतरी गंभीर विषय चाललेला असताना त्यांची "मुन्नी बदनाम' होते किंवा तबला, ढोलताशे वाजू लागतात. मग फोन बंद करण्यासाठी किंवा उत्तर देण्यासाठी त्यांची तारांबळ उडते. बरं, मीटिंगमध्ये असताना चुकून फोन आला, तर लोक कट करून गप्प बसत नाहीत. "हॅलो, मीटिंगमध्ये आहे.' हे सांगून बहुधा त्यांना फुशारकी मिरवायची असते. बरं, हळू आवाजात खुसपुसल्यामुळं पलीकडच्याला काही ऐकू येत नाही. तेवढी त्याची पोहोचही नसते. तो पुन्हा काहितरी विचारतो. हा पुन्हा - "हॅलो, मीटिंगमध्ये आहे. नंतर करतो,' असं सांगतो. आल्यावर कट न करण्याएवढा आणि फोन "कट' केल्याचा अर्थ न कळण्याएवढा कोण उपटसुंभ पलीकडे असतो, कुणास ठाऊक! यांना तरी "आन्सर' करावाच लागेल, असा कुठल्या राष्ट्राध्यक्षांचा दर वेळी फोन येत असतो, हेही कळत नाही. थेटरात असताना तर यांना आणखी स्फुरण चढतं. थेटरातल्या गर्दीतही फोन घेऊ नये, सायलेंट ठेवावा, वगैरे गोष्टी यांच्या गावीही नसतात. तिथला संवाद साधारणतः असा ः ""हां...बोल.'' ...जणू काही हा लोडाला टेकून घरात निवांत पडलाय! "पिच्चर बघतोय...पिच्चर' यावर पलीकडच्यानं "बरं, ठीक आहे, नंतर करतो,' असं म्हणणं अपेक्षित असतं. प्रत्यक्षात पलीकडचा विचारतो, "कुठला पिच्चर?' मग हा त्याला "पिच्चर'चं नाव सांगतो. बरं, ते सहज समजण्यासारखं असेल, तर ठीक. नाहीतर त्याला त्यातल्या कलाकारांचीही नावं घेऊन समजावून द्यावं लागतं. (किती त्रास!) पलीकडच्याचं समाधान होत नाही, तोपर्यंत शेजारच्या प्रेक्षकांची सुटका कठीणच. बरं, फोन "कट' करण्याचा, न उचलण्याचा अर्थही अनेकांना कळत नाही, हे खरंच आहे. एकदा फोन उचलला नाही, तर लोक तो उचलेपर्यंत पुनःपुन्हा करत राहतात. मला तर अनेक जण एसएमएस-शत्रूच वाटतात. मध्यंतरी माझ्या फोनवरचे सगळे नंबर उडाले. त्यामुळे सणासुदीला ढिगाने येणारे एसएमएस कुणाचे आहेत, हेही कळत नाही. काही "अननोन' लोक एखादा जोक-बिक पाठवतात, त्यांचेही नाव कळत नाही. "हू इज इट,' असा रिप्लाय पाठवला, तर या बाबांना झेपतच नाही! पुन्हा काहीच उत्तर नाही. मला रिप्लाय करण्याचीही जाम खुमखुमी असते. त्या माणसाला पुन्हा एसएमएस करण्यासाठी उचकवण्याचा प्रयत्न त्यातून असतो. अनेक ठोंब्यांना तेही कळत नाही. विरामचिन्हांचा आणि त्यांचाही 36चा आकडा असावा, असं वाटतं. कारण दूरदर्शनवरच्या बातम्या सांगितल्यासारखे सपक, सरळसोट एसएमएस करून ते मोकळे होतात. असो. विषय जरासा लांबलाच नाही? आपल्या प्रतिक्रिया एसएमएस करून नक्की कळवा हं! "अननोन' नंबर असला, तरी मी नक्की रिप्लाय देईन. (*कंडिशन्स अप्लाय) ... * दसरा, दिवाळीला एक किंवा दोन रुपये एसएमएस नसलेल्या दिवशी!

वाचने 3981 वाचनखूण प्रतिक्रिया 28

शुचि Mon, 10/18/2010 - 01:05
खूप हसले. मस्त लेख. नोन अननोन नंबरसचा नंगानाच हा हा हा. मीटींग चालू असताना यांची मुन्नी बदनाम होते हे तर खूप भारी :)

स्पंदना Mon, 10/18/2010 - 07:18
मिटींग मधले अन थेटर मधले दोन्ही अन्भव आवडले???? न्म्हणजे मला वाचतात्ना मज्जा आली पण तुम्हाला त्रास होतो हे कळले. अवांतरः ऐसा सलमान मे क्या है जो लडकियोंको लुभाता है? उसका थप्पड मारने का स्टाईल?( ऐश्वर्याने खाल्ल्या होत्या म्हणुन.)

मृत्युन्जय Mon, 10/18/2010 - 10:30
ही असली `अन्नोन'दशा मीही फार अनुभवली आहे. आमच्या जुन्या घरात रोज किमान ५-७ फोन यायचे रघुनाथ माशेलकरांसाठी. त्यावेळेस कॉलर आय डी वगैरे प्रकार नव्हता. त्यामुळे वैताग यायचा अगदी. आणि असला असता तरी फरक पडला नसता. वेगवेगळे लोक फोन करायचे. बहुधा माशेलकरांचा जुना नंबर आमच्याकडे हस्तांतरीत झाला होता. त्या लोकांना कितीही सांगितले की राँग नंबर आहे तरी त्यांचा विश्वास बसायचा नाही. त्यांना वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आमंत्रण देण्यासाठी फोन करणारे लोक असायचे बहुतेक सगळे. माशेलकरांचा नंबर नाही म्हणुन सांगितले की "फक्त २ मिनिटांचे काम आहे. आम्ही जास्त वेळ घेणार नाही. पण त्यांना फोन द्याच" अशी गळ घालायचे. शेवटी मी पदरचे पैसे खर्च करुन (पुणेकर माणसाने २-३ कॉलचे पैसे खर्च करुन) एन सी एल चा आणि नंतर माशेलकरांचा नंबर शोधुन काढला. आणि राँग नंबर वाल्यांना तो नंबर द्यायला सुरुवात केली की जेणेकरुन त्या लोकांनी माझा पिच्छा सोडावा. पण नंतर काही लोक आम्ही माशेलकरांचे पी ए असल्याच्या थाटात परत फोन करायला लागले. एन सी एल मध्ये माशेलकर साहेब ऑफिसमध्ये नाही आहेत म्हणुन सांगत आहेत तर आमचा एक निरोप तेवढा साहेबांपर्यंत पोचवा म्हणुन. माशेलकरांचा नंबर हँडी म्हणुन फोनच्या वरच लिहुन ठेवला होता ठळक अक्षरात. नंतर घरी येणारे लोक कुतुहलाने विचारायचे "तुमची आणि माशेलकरांची कशी ओळख?" मीटिंग मध्ये असताना कॉल करणारे लोक तर फार तापदायक. मी पण नेहेमीच मोबाइल सायलेंट मोड वर ठेवुन मीटिंगमध्ये जातो. पण कॉल करणारे लोक एकापाठोपाठ कॉल करतच सुटतात. एकदा मला मीटिंग मध्ये असताना तब्बल १४ कॉल आले. एकापाठोपाठ एक. एकाच माणसाचे. मोबाइल वायब्रेट होत राहतो आणि नाही म्हणले तरी तो वाजतो आहे याचे आपल्याला भान असते. शेवटी मी मीटिंगमधुन उठलो. (मी असा उठल्यामुळे बॉसने अतिशय जळजळीत नजरेने माझ्याकडे पाहिले ही गोष्ट वेगळीच). बाहेर येउन महाभागाला फोन केला तर त्याने शांतपणे मी ओफिसचा टेलिफोन ऑपरेटर किंवा साहेबाचा पी ए असल्याच्या थाटात विचारले की *** साहेब आज ऑफिसमध्ये आहेत का? $#%@&$%@$^%@. मीही तेवढ्याच शांतपणे मग ते ऑफिसमध्ये असुनसुद्धा सिंगापोरला गेल्याचे सांगितले. :)

सुहास.. Mon, 10/18/2010 - 15:11
हा हा हा ..अभिदा ..एकदम मस्त .. आमचे एक संभाषण : नंबर नेहमीप्रमाणे अननोन, स्थळ पुणे, वेळ -दु.३.३० मी : हॅलो तो: हां, अमित, **** बोलतोय. किती वाजेपर्यंत येतोस ? मी : ? तो : सात वाजेपर्यंत पोहोच. मी: ओके फोन कट ::: नंबर नेहमीप्रमाणे अननोन, स्थळ पुणे, वेळ -सांय.७.३० मी : हॅलो तो: हां, अमित, **** बोलतोय. किती वाजेपर्यंत येतोस ? मी : अजुन अर्धा तास लागेल तो :ओके फोन कट ::: नंबर नेहमीप्रमाणे अननोन, स्थळ पुणे, वेळ -सांय.८.०० वाजता. मी : हॅलो तो: हां, अमित, **** बोलतोय. किती वाजेपर्यंत येतोस ? मी : अजुन दहा मिनीटे लागेल तो :ओके फोन कट :::: मी : हॅलो तो: अहो साहेब , सांगायच नाही का तुम्ही अमित नाही ते ? मी : आता सांगतो की मी अमित नाही, तो : @$@%^ फोन कट ..

हा हा हा ... मस्तच रे! अशाच एका दिनेश का दिपकला माझ्या मोबाईलवर बरेच लोकं शोधत असतात. अशा शोधकांचे नंबरही मी 'रांग नंबर' नावाखाली सेव्ह केले आहेत. हे लोकं फोन करायला लागले की स्वतःचा "अमूल्य" वेळ आणि त्यांच्या पैशांची मी बचत करते!

धमाल मुलगा Tue, 10/19/2010 - 22:00
>>व्हायब्रेटर सुरू असल्यानं माझं हृदय खिळखिळं होण्याआधी फोन उचलणं आवश्‍यक होतं. आपल्या मोबाईलला किती हॉर्सपावरची मोटार आहे हो? ;) बाकी हे डोक्याची मंडई करणारं छळाष्टक जवळपास प्रत्येकाच्या अनुभवविश्वाला ग्रासुन टाकणारं आहे! (अगंबाबो..काय वाक्यंय!) आमची सहानुभुती आपल्याप्रति कायम आहे अभिजीतराय. 'रांग नंबर'चा आमच्या जुन्या हापिसात बेक्कार किस्सा केला होता. (नेहमीप्रमाणेच) काम काही नव्हतं, मग छान गप्पांचा फड जमवून बसलो होतो, तर हापिसच्या एका नंबरावर सारखा फोन यायला लागला. बिचारी ती रिसेप्शनिस्ट वैतागली आणि आम्हाला मदत मागायला आली. आता आम्ही सगळेच तिच्यायला टगे! कुणाचीतरी खेचायला मिळतेय म्हणल्यावर सगळे सरसावले... फोन आला, आणि महेशनं बाजी मारली..फटकन स्पिकरफोन चालू केला आणि महेशः 'हलाव...' कॉलरः मम्मदभै हय क्या? महेशः आँ? कॉ : अरे...मम्मदभै है क्या? मय झ्याकीर बोल र्‍हा हूं! महेशः हां झ्याकीरमियां..... झाकीरः मम्मदभै किदर हय? महेश : तुमकू नै मालूम? झाकीर : क्या? महेशः वो पिछले हप्ते गुज्यर गये झाकीर: या अल्ला! क्या बोल्ते? महेशः आउर क्या झाकीरः बुरा हुवा.. बुरा हुवा! फीर..सलीम है क्या? महेशः वो बैदा लाने गया हय झाकीर: क्याऽऽ...... इकडं आम्ही सगळे पाताळविजयममधल्या राक्षसांसारखे खदाखदा हसतोय आणि ते झाकीरमियां तिकडून वैतागुन श्या घालायला लागलं... -- नेहमी वैताग आणणारा प्रकार म्हणजे आपल्याला कोणीतरी फोन करतं आणि वर विचारतं 'कोन्बोल्तंय?' अग्ग्ग्गं....अशी कवटी सरकते ना... एक दिवस असाच कंटाळून बसलो होतो आणि मोबाईल वाजला... 'अन्नोन'दशाच! तो: ह्यालो...कोन्बोल्तंय? मी: अहो, फोन तुम्ही केलाय ना? एकतर तुम्हाला कोणाशी बोलायचं ते सांगा नाहीतर आपलं नाव सांगा ना. तो: पन तुमी कोन्बोल्ताय? मी: अहो, त्याच्याशी तुम्हाला काही घेणंदेणं आहे का? तुम्हाला ज्याच्याशी बोलायचंय त्याचं नाव विचारा ना. असेल तर मी होय तोच बोलतोय म्हणेन, नसेल तर नाही म्हणून सांगेन. तो (जरा उचकुन) : आरं पन तुला काय पैशे पडतील का सांगितलं तर? मी (हांऽ..घ्या आता रौंडात) : बंर्रं....मी अटल बिहारी वाजपेयी बोलतोय. तो: आं? यका नावची दोन माण्सं असतात का? मी: का नसतात? शिवाजीराव भोसले नाहीत का? तो: आरं पन तु का यवढा भाव खातो? सांग की कोन बोल्तोय मी: सांगितलं ना, अटल बिहारी वाजपेयी बोलतोय म्हणून. आता काय शिवाजीमहाराज बोलतोय म्हणून सांगू का? तो: ए...नीट बोल ना.. मी: आता ह्यात काय वैट बोल्लो भाऊ? तो: आरं पन तुला काय प्रॉब्लेम है नाव सांगायला? मी: आता सांगितलं ना. तरी तेच काय म्हणताय? तो: खरं नाव सांग की रे ए... मी: बरं....मी महात्मा गांधी बोलतोय. बास? आता खुश? तो (लैच्च वैतागून): तुझ्या मायला... मी: तुझ्या मायला नाय का काय रं? तो: ओऽऽ...चुकलं माझं....ठेवा आता फोन. मी: मी का ठेऊ? मला इनकमिंग फ्री है. तो: ओ चुकलं ना! इथं भेटलात वर नका भेटू. मी: आयला, स्वर्गात मोबाईल चालु झाले काय? तो (स्वगत किंवा सोबत असलेल्याला ) : आय घा*ली आन फोन लावला. बेन लै कडू है! आपला पुढचा आख्खा दिवस बेश्ट गेला भौ!

भडकमकर मास्तर Tue, 10/19/2010 - 23:53
आप्ल्याला कोणताही राँग नम्बर आला की "सॉरी, ते दिल्लीला गेले आहेत, भेटू शकणार नाहीत.." असे मी करतो.. "माझा एवढा वेळ जातो तर मला काही करमणूक नको का?" असे माझे स्पष्टीकरण ...

रेवती Wed, 10/20/2010 - 01:28
१.एकदा फोन आल्यावर नेहमी प्रमाणे हॅलो म्हटल्यावर पलिकडून विचारलं,"हा राँग नंबर आहे काय?" पुण्यात कोणा 'सरदेशमुखांचा फोन आहे का?' हे विचारणारे फोन वर्षभर यायचे. २.एकदा आजींनी फोन केला. त्यांच्यावर चिडलेलं बरं दिसणार नाही म्हणून 'राँग नंबर' असं सांगितल्यावर त्यांना समजले नाही मग त्यांनीच मला सुचवलं कि 'मुली तूच मला सरदेशमुखांचा फोन नं. शोधून दे कि!'

नीधप Wed, 10/20/2010 - 12:25
हा हा हा!! मस्त!! नवर्‍याला एकसे एक समस येत असतात 'सर तुमच्याकडे काम करायचंय' पासून 'माझ्याकडे चित्रपटसृष्टी हादरून सोडेल अशी स्क्रिप्ट आहे' पर्यंत त्या ची आठवण झाली.