पाहुणेर
पाहुणेर
प्रत्यक्षातले विश्व, कवीच्या कल्पनेतले विश्व तसेच आणखी एक विश्व कवितेत आढळते,भावविश्व. शाळेत आपण शिकलेल्या कविता प्रत्यक्षातल्या विश्वाचे काव्यात्वक वर्णन केलेल्याच असत. जरा नंतरच्या काळात कल्पनेतले विश्वही परिचयाचे होऊं लागते. उदाहराणर्थ "शाळेस रोज जातांना, मज विघ्ने येती नाना" या कवितेपासून "फूलराणी"चे कल्पनेतील विश्वही आपल्या परिचयाचे झालेले असते.भावविश्वाची ओळख जरा मोठेपणी, जाणून उमजून कविता वाचावयाला सुरवात केल्यावरच होऊं लागते.त्यातही ज्यांना "भावगीते" म्हणतात तीच जास्त परिचयाची असतात. गदिमा., शांता शेळके, पाडगांवकर यांची भावगीते सुंदर भावकविताही असूं शकतात; पण तरीही भावगीत व भावकविता यात सूक्ष्म फरक राहतोच. आज श्री. पुरुषोत्तम पाटील यांची एक निनांतसुंदर भावकविता पाहू.
पाहुणेर
येणार्यासाठीं
लगबग पहांट....चुळुक झुळुक सडा
हलकेसे स्वस्तिक, फुलकीशी रांगोळी
अन् थोडा दळदार सूर्य....
थांबलेल्यासाठीं
एकुलता पाट, सुगरण ताट
अन् नखलेल्या कोंवळ्या पानांचा
थोडा बेतशीर केशरविडा....
जाणार्यासाठीं
अर्ध्या-उघड्या दाराआडचा
ओझरता इरकली पदर
अन् कांकणांची थोडी अस्वस्थ किणकिण....
पुरुषोत्तम पाटील (तळ्यांतल्या साउल्या,१९७८)
हे निसर्गचित्र आहे कीं भावचित्र याचा संभ्रम पाडावा असे हे मोहक आणि रेखीव पण धूसर चित्र. पन्नासेक वर्षांपूर्वीचे खेडेगावातले एक लहानसे घर, समोर एक छॊटेसे अंगण आणि पहांटे हळुवारपणे सडा घालणारी... अरे. पण हिचे वर्णन तर कोठेच नाही ! लगबग आहे ती येऊं घातलेल्या पाहुण्याच्या स्वागताची, पाहुणेराची ! त्याच्याकरता सडा चुळुकझुळुक, हलकी फुलकी स्वस्तिक-रांगोळी, सूर्य मात्र दळदार ! गंमत पहा. काढणारी नाजूक, शेलाटी म्हणून स्वस्तिक-रांगोळी हलकीफुलकी ! पण येणारा, तो राजबिंडा, दणकट आहे, त्याचे प्रतीक जो सूर्य, तो मात्र दळदार, भरीव ; फोपशा नाही. किती सहजतेने ही रूपके वळणे बदलतात !
पाहुणा आला, त्याच्या भोजनासाठी घरातला एकुलता एक पाट व समोरील ताटात सुगरणीने केलेला स्वयंपाक. कोवळी पाने नखलून केलेल्या पानांचा केशरविडा , पण तोही बेतशीर .इथेही ती सुगरण नाही, ताट सुगरण बनले आहे.
पाहुणा निघाला, पण त्याला निरोप द्यावयाला अंगणाच्या फाटकापर्यंत जाता येत नाही. अर्ध्या उघड्या दारातूनच बघावयाचे, तेही ओझरतेच. हृदयातील अस्वस्थता दाखवणार.... किणकिणारी कांकणे!
तो "पाहण्याकरिता" आला होता? असावा नाही ? वाटते खरे तसेच. पण कवी तर त्याच्या विषयी वा तिच्या विषयी काहीच सांगत नाही. सगळे तुमच्यावरच सोडलेले. म्हणून तर चित्र धूसर पण मोहक आणि रेखीवही. कोणत्याही सहृदय रसिकाला तिच्या भावविश्वात सहज नेणारे.
ही किमया कशाने साधली? मला वाटते या शब्दचित्रात रंग भरले आहेत विशेषणांनी. आणि ही विशेषणे कोणाही व्यक्तीला लावलेली नाहीत. अचेतनात जीवन भरण्याचे काम ती करतात. पहांटेपासून लगबग तिची पण पहांटच लगबग होते. सड्याचा आवाज, चुळुकझुळुक, नादमयी होतो. रांगोळी हलकी फुलकी होते आणि सूर्य दळदार. सुगरण ती पण ते आपल्याला कळते सुगरण ताटामुळे. कोवळी पाने? असतील,असतील. डोळ्यासमोर येते ती तिचीच कोवळीक. तिची आतुरता दिसते अर्ध्या दारामागच्या "इरकली" पदराने. आज तिने खास इरकली साडीची घडी मोडली,येणार्याकरता. व किंचित थरथरणारे हात,ते जाणवतात किणकिणत्या कांकणांनी! जणुं सगळ्या निर्जीव वस्तु आज तिच्याकरता सजीव झाल्या आहेत.
काव्यात तुलना अप्रस्तुत असतात कारण बर्याच वेळी त्या फसव्याच ठरतात. पण तरीही तुम्हाला भा.रा.तांब्यांची " नववधू" आठवली असेलच.दोहोंची तुलना केलीत तर दोन भावविश्वांच्या मांडणीतला फरक प्रकर्षाने जाणवेल.
शरद
याद्या
2841
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
पाहुणेर
मलाही सन्जोपरावांचच मत पटल
पुष्कळ शब्द आहेत पण लेखकाला
नुसरत फते अली खान यानी
आमचेकडे सर्व प्रकारच्या
In reply to नुसरत फते अली खान यानी by विजुभाऊ
सुंदर कविता.
सुंदर कविता सांगितल्याबद्दल
जीवघेणी कविता, रसग्रहण आणि
कविता आवडली
न सांगता सांगणारी कविता
घरधनी आला ?