तव नयनांचे दल हलले ग
आजपासून मला आवडलेल्या काही कवितांची ओळख करून देत आहे. तेव्हा या कविता किमान पन्नास वर्षांपूर्वीच्या असणार हे तर आलेच. पण चांगली कविता नेहमीच ताजी तवानी असते ( हे माझे मत !) सुरवात श्री. बा.भ.बोरकरांच्या एका भावकवितेपासून करू.
तव नयनाचें दल हललें ग
कवीवर्य बा.भ. बोरकर हे बालकवींप्रमाणेच निसर्गात रंगणारे. त्यामुळे त्यांची एक कविता द्यावयाची म्हटले तर त्यांच्या अनेक निनांतसुंदर निसर्गकविता समोर येतील. पण आज मी आज एक भावकविता देत आहे. हीच का ? तर तुमच्या आवडत्या कवीच्या अनेक कविता तुम्हाला प्रिय असल्या तरी दोन चार तुमच्या स्वत:च्या असतात. त्या नेहमी वाचण्याकरिता नसताच मुळी. एखाद्या खास "मूड"मध्येच त्यांची आठवण येते. आणि "आज अचानक गाठ पडे" प्रमाणे परवा एका टीव्हीवरील कार्यक्रमात ही सुरेल आवाजात ऐकावयास मिळाली.
तव नयनाचें दल हललें ग !
पानावरच्या दवबिंदूपरि
त्रिभुवन हें डळमळलें ग !
तारे गळले, वारे ढळले
दिग्गज पंचाननसे वळले
गिरि ढासळले, सुर कोसळले
ऋषि, मुनि, योगी चळले ग !
ऋतुचक्राचे आंस उडाले
आकाशांतुनि शब्द निघाले,
"आवर आवर अपुले भाले
मीन जळीं तळमळले ग !"
हृदयीं माझ्या चकमक झडली
नजर तुझी धरणीला जडली
दो हृदयांची किमया घडली
पुनरपि जग सावरले ग !
संपूर्ण कविता अगदी लहानश्या कालावधीवर बेतलेली आहे. तीने याच्याकडे पाहिले, नेत्रकटाक्ष टाकला असे नेहमीच्या काव्यात सांगितले जाते, व त्याच्या हे लक्षात येते न येते तोच तीची नजर खाली, जमिनीकडे वळली. या अल्प काळात जे उत्पात घडून आले त्याचे कवी वर्णन करत आहे.
पहिल्या दोन ऒळीतले सौंदर्य ध्यानात घेण्यासाठी जरा सकाळी लवकर उठून बागेत चक्कर मारली पाहिजे. हिवाळ्यातली...एखादी पावसाळ्यातील पहाटही चालेल, पानावर साचलेले दवबिंदू बघा, गवताचे पातेही दिमाखाने हे वैभव मिरवत असते. कोवळे ऊनही काही मिनिटापुरते त्या थेंबाला हिरकणीचे सौंदर्य बहाल करते. वार्याच्या एखाद्या झुळुकीने पान हलते, थेंब इकडे तिकडे हलतो, खाली पडणार, पडणार असे वाटेतो परत जागेवर येतो . प्रियकराच्या दृष्टीने मात्र त्रिभुवनच डळमळलेले असते.
दिग्गज पंचाननसे वळले.... येथली गंमत कळावयास थॊडी पुराणांची ओळख पाहिजे. पंचानन हे शंकराचे नाव. हे योगीराज एकदा बसले असतांना एक लावण्यलतिका त्यांना नमस्कार करण्याकरिता प्रदक्षिणा घालते. ती बाजूला वळल्यावर यांना त्या दिशेला एक मुख फुटले. ही चार नवीन तोंडे मिळाली म्हणून शंकर पंचानन. पुराणातला दुसरा पंचानन म्हणजे मारुती. तोही शंकराचा अंशावतार म्हणूनच पंचानन. विंदांच्या "साठीची गजलेत"ला मारुती यामुळेच मागे वळून पहात नाही ना ? आता दिग्गजच असे वळले तर गिरि ढासळणारच !
नेत्रकटाक्षाला भाल्यांची उपमा ही काही नवी नव्हे. हृदय विद्ध करावयाला हे नेहमीचेच आयुध आहे. पण या भाल्याच्या पात्यावरील चकचकणार्या , लखलखीत तेजाला "तळमळणार्या मीनांशी" जोडून देणे खास गोयकराची किमया. येथे मीनाक्षीतले मीन नाहीत. तीच्या नेत्रातील चमक व तळमळत असल्यामुळे सुर्कन फेर्या मारणार्या माश्यांच्या खवल्यावरील चमकेतील साम्य कवीला जाणवत आहे. आणि हो, दोघांची तळमळही , मीनाची व कवीची !
चकमक झडली, ठिणगी पडली व हृदयाला आग लागली ... नाही नाही, प्रेयसी अशी उर्दू गझलेतील साकी सारखी निष्ठूर नाही. तीने नजर खाली वळवली व किमया झाली तरी पुनरपि जग सावरलेच. ( तीला आपल्या सामर्थ्याची पुरेपुर जाणीव असल्याने तर तीने वेळेवर नजर फिरवली नसावी ना ?)
शरद
याद्या
8332
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
सुरेख
असेच म्हणतो...!
In reply to सुरेख by विद्याधर३१
वा वा सुरेख!!!
आहा
बोरकर संयुक्त महाराष्ट्र
बाकीबाबांच्या सगळ्याच कविता
कविता तर मास्टरपीस आहेच!
सुंदर
पुनरपि
In reply to सुंदर by प्रदीप
सुंदर रसग्रहण.
सुंदर रसग्रहण.
वा
पानावरच्या
शरद दादा आमच्या इथे 'शरदिनी '
एका मस्त कवितेची ओळख.. या
वरची पोस्टमधे काहीतरी गडबड आहे.
In reply to एका मस्त कवितेची ओळख.. या by निखिल देशपांडे
सुरेख!
पुनर्वाचनात आनंद
छान
"तव नयनाचें दल हललें ग!"
खूप सुंदर..चिरतरुण कविता
खूप छान रसग्रहण केले आहे शरद