Skip to main content

तेथे वेधलिसे बाळी

तेथे वेधलिसे बाळी

Published on शुक्रवार, 01/10/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
आज आपण ज्ञानेश्वर महाराजांची एक कविता बघणार आहोत.विसाव्या शतकांत मनोविज्ञान संशोधिकांनी केलेल्या प्रयोगाचा वापर सातशे वर्षांपूर्वीच्या कवितेत आढळतो.प्रथम कविता बघू. निळिये मंडळी निळवर्ण सावळी तेथे वेधलिसे बाळी ध्यानरुपा ! वेधू वेधला निळा पाहे घननिळा विरहिणी केवळा रंगरसने ! निळवर्ण अंभ, निळवर्ण स्वयंभ वेधे वेधू न लभे वैकुंठीचा ! ज्ञानदेव निळी हृदयी सावळी प्रेमरसे कल्लोळी बुडी देत ! बाळी- गोपी, अंभ- आकाश, स्वयंभ- विष्णु/कृष्ण, कल्लोळ - लाटा संशोधकांनी केलेला प्रयोग असा : एका कुत्र्याला खाणे द्यावयाच्या आधीं शिट्टी वाजवावयाची आणि लगेच खाणे द्यायचे. काही दिवसातच कुत्र्याच्या मनांत शिट्टी आणि खाणे यांची इतकी एकरुपता झाली कीं शिट्टी ऐकली कीं तो लगेचच शेपटी हलवू लागे, लाळ घोटावयास सुरवात करी; खाणे समोर नसेना कां ! ( Pavlovian Behavior) गोकुळातल्या गोपीचे बघाना काय झाले आहे.बाहेर, उघड्यावर, कृष्णाचे ध्यान धरून बसली होती बिचारी,बहूदा "कौन गली गयो शाम" म्हणत आणि अचानक तिचे लक्ष वर, आकाशाकडे गेले.आणि अहो आश्चर्यं, तिला तेथे घननिळ दिसला कीं !! निळा रंग आणि कृष्ण यांचे इतके एकीकरण मनांत ठसले आहे कीं आतां कोठेही,केंव्हाही निळा रंग दिसला कीं तिच्या समोर कृष्णच उभा रहातो. माऊलींनी शब्द वापरला आहे "वेधला".अर्जुनाला जसा फ़क्त पक्षाचा डॊळाच दिसत होता, दुसरे काही नाही,अगदी तसेच ! रंग ही रसना झाली.नव्हे, आता सर्व संवेदनाच केवळ "निळवर्ण’ झाल्या आहेत. पण हे तुम्हा-आम्हाकरिता नाही बर का. आपण निळ्या आकाशात बुडलेला निळ्या रंगाचा "वैकुंठीचा स्वयंभ" वेगळा नाही करू शकणार. माऊली म्हणतात त्यासाठी हृदयात सावळी साठवून प्रेमरसाच्या लाटांमध्ये बुडी घेता आली पाहिजे ! संतांचे निळ्य़ा रंगाचा असा उपयोग केलेले २०-२५ अभंग सहज सापडतात. पण संतच कशाला पाहिजेत ? विसाव्या शतकातील कविवर्य बा.भ.बोरकरांनाही या कल्पनेने भारावले. त्यांची या रंगमोहिनीने रंगलेली कविता... ती पुढे केव्हातरी पाहू. शरद
लेखनप्रकार

याद्या 1777
प्रतिक्रिया 3

बस्स. तुमच्या या लेखनानेच
बा.भ.बोरकरांनाही या कल्पनेने भारावले. त्यांची या रंगमोहिनीने रंगलेली कविता... ती पुढे केव्हातरी पाहू.
यातील पुढे या शब्दाचा अर्थ शोधतोय... :)

मला कै. गंगाधर महाम्बरेंच्या " निळा सावळा नाथ, तशीही निळी सावळी रात" ह्या कवितेची आठवण झाली.