भालचंद्र नेमाडे यांची महाकादंबरी 'हिंदू' - स्तुत्य पण फसलेला प्रयत्न
नुकतीच प्रकाशित झालेली आणि विविध कारणांमुळे चर्चित झालेली नेमाड्यांची 'हिंदू' कादंबरी वाचून काढली. कादंबरीचं ढोबळ मानानं कथासूत्र, प्रमुख पात्रं-प्रसंग वगैरेंबद्दल पूर्वी इतर ठिकाणी बरंच काही येऊन गेलेलं आहे. त्यामुळे त्याची पुनरुक्ती करण्याऐवजी आधी ते धागे वाचावेत अशी विनंती करून मला कादंबरीविषयी काय वाटलं याची मांडणी खाली करत आहे. इतर ठिकाणच्या दोन प्रातिनिधिक धाग्यांचे दुवे:
हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ - प्रमोद सहस्रबुद्धे
हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ : चार शब्द - सौरभदा
पुष्कळ वर्षांपूर्वी कोसंबींची इतिहासविषयक मांडणी वाचत असताना त्यात पाश्चिमात्य विचारसरणी आणि भारतीय उपखंडाचा इतिहास यांविषयीची त्यांची मतं वाचताना काहीतरी लख्ख चमकून गेलं होतं. भारतीय ऐतिहासिक दस्तावेजांच्या अभावामुळे भारताला (सांगण्यासारखा) इतिहासच नाही अशी टीका काही पाश्चिमात्य इतिहासकारांकडून होत असे. पाश्चिमात्यांच्या श्रेष्ठत्वाचं आणि पर्यायानं वसाहतवादाचं समर्थन करण्यासाठी अशा टीकेचा उपयोग केला जात असे. त्याला प्रत्युत्तर देताना कोसंबींनी राजेरजवाडे-जमीनदार अशांच्या, म्हणजेच पर्यायानं सत्ताधार्यांच्या नोंदी-दस्त यांभोवती घुटमळणार्या पाश्चिमात्य इतिहासकारांच्या मर्यादा दाखवून देत लोकरीती, लोकदैवतं, लोककथा अशा साध्यासाध्या, सहज उपलब्ध असणार्या साधनांद्वारे सर्वसामान्यांचा, म्हणजेच भारताच्या जनसंस्कृतीचा हजारो वर्षांचा इतिहास आजही कसा जिवंत आहे आणि साक्षेपी संशोधकाला त्यातून भारतीय संस्कृतीविषयी किती मौलिक ज्ञान मिळू शकतं याचा उहापोह केला होता.
रोमिला थापर, रा. चिं. ढेरे अशा अनेकांनी नंतर या पध्दती वापरून भारतीय उपखंडाविषयी संशोधन केलं. परंतु अशा गोष्टींचा वापर करून भारतीय उपखंडाविषयी काहीतरी व्यापक सांगणारं कथनात्मक साहित्यही निर्मिलं जाऊ शकेल का? अगदीच शक्य आहे असं वाटतं. असा प्रयत्न कधी झाला होता का? मला तरी माहीत नाही. पाश्चिमात्य साहित्यात असे प्रयत्न आढळतात. गाब्रिएल गार्सिआ मार्केझचं 'हंड्रेड यर्स ऑफ सॉलिट्यूड' हे एक ठळक उदाहरण पटकन आठवतं. 'हिंदू'मध्ये नेमाड्यांचा प्रयत्न असा काहीसा असावा.
एका गावाची पार्श्वभूमी घेऊन, त्यात राहणारा अठरापगड समाज, त्यांचे परस्परसंबंध आणि बाहेरच्या जगाशी असलेले संबंध यांची वीण कादंबरीत चित्रित केलेली आहे. त्यात पिढ्यांच्या संक्रमणामुळे, बाह्य जगातल्या सत्तासंघर्षांमुळे झालेले बदल चित्रित केलेले आहेत. त्याद्वारे सबंध भारतीय उपखंडाचा, तिथल्या संस्कृतीचा प्रातिनिधिक आढावा घेण्याचा प्रयत्न असं काहीसं कादंबरीचं स्वरूप दिसतं.
भारतीय तत्त्वविचार भारतीयांच्या रोजच्या जगण्याचा अविर्भाज्य भाग म्हणून त्यात येतात. भारतीय समाजाची सहिष्णुता, व्यामिश्रता, समंजसपणा, सर्वांना सांभाळून घेण्याची वृत्ती अशा चांगल्या घटकांबरोबरच रुढीप्रियता, छोटेमोठे जातिनिहाय हेवेदावे, हेकेखोरपणा अशाही अनेक गोष्टी येतात. विविध वंश, वर्णाच्या लोकांच्या हजारो वर्षांच्या परस्परसंबंधांतून बनलेली ही सांस्कृतिक वीण एका गावाच्या इतिहासामधून उलगडून दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. शेती आणि शेतकर्याभोवती गाव फिरत असे म्हणून हे सर्व एका कुणबी निवेदकाच्या माध्यमातून येणं हेही ठीकच. थोडक्यात, कादंबरीचा पट खूपच व्यापक आणि म्हणून महाकादंबरी असं बिरुद शोभावं असा आहे.
कादंबरीविषयी अनेक ठिकाणी पुष्कळ चर्चा झाली; अजूनही होत आहे. तीविषयी काही जणांनी नोंदवलेले आक्षेपही लक्षात घेण्यासारखे आहेत.
कादंबरी प्रतिगामी आहे असा एक आक्षेप आहे. त्यात जुन्या व्यवस्थेचं उदात्तीकरण आहे आणि आधुनिक विचारांना डावललेलं आहे असा तो आक्षेप आहे. कादंबरीत लोटणारा काळ हा काही पिढ्यांचा आहे. त्यात जुन्या व्यवस्थेतला जिव्हाळा, नात्यांमधली माया अशांचं चित्रण आढळतं हे खरंच आहे. पण त्या बरोबर त्याला छेद देणारे काही घटकही आढळतात. उदा: जुन्या व्यवस्थेत बायकांचे आणि गावकुसाबाहेरच्यांचे होणारे हाल, शोषण, वगैरे. कादंबरीचा नायक-निवेदक हा या सर्व व्यवस्थेला कंटाळून, वडिलांच्या मर्जीबाहेर जाऊन, आपला वंशपरंपरागत कुणब्याचा व्यवसाय टाकून देऊन शहरात जातो, उच्चशिक्षण घेतो आणि पुरातत्वशास्त्रात पीएचडी करू इच्छितो. म्हणजे काही प्रमाणात जुन्या व्यवस्थेविषयी टीकाही यात आहे. पण यात शहरं, आधुनिक जीवनमान, तंत्र वगैरेंचं कसलंही समर्थन नाही (असली तर चेष्टाच आहे). नायकाला असं आपलं मूळ नाकारून जगण्याची काही वेगळी दिशा सापडली आहे असं म्हणता येत नाही. पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतरही, अनेक ठिकाणी फिरल्यानंतरही, चित्रविचित्र माणसांशी परिचय झाल्यावरही तो अजून चाचपडतो आहे. त्यामुळे शहरीकरण, शिक्षण आणि एकंदरीत व्यक्तिकेंद्री आधुनिक विचार जुन्या व्यवस्थेला पर्याय म्हणून अजिबातच येत नाहीत. म्हणून कादंबरी पुरोगामी आहे असं निश्चितच म्हणता येणार नाही. तिच्यातून उमटणारं विचारविश्व हे तिच्या नायकाप्रमाणेच दोन दरडींदरम्यान गोंधळलेलं आहे असं वाटतं.
कादंबरीची रचना विस्कळीत आहे असाही एक आक्षेप आहे. सुरुवातीच्या भागात कादंबरी स्थळ-काळात फिरत राहते. नायक मोहेंजोदारोमध्ये उत्खनन मोहिमेत सामील आहे तिथलं वर्तमान वास्तव, नायकाच्या गावाकडच्या आठवणी आणि त्यानं पूर्वापार ऐकलेल्या गावातल्या मागच्या पिढ्यांच्या कथा यांमध्ये कथा फिरत राहते. अशी वीण पाश्चिमात्य कादंबरीत नवीन नाही. त्यामुळे हे फिरत राहणं मूलतः आक्षेपार्ह वाटलं नाही. नंतरचा भाग मात्र सरळ आहे. हळूहळू नायकाच्या बालपणाची, कुमारपणाची कहाणी सांगत-सांगत कादंबरी वास्तवात (साधारण १९६०चं दशक आणि विशीतला पदव्युत्तर शिक्षण घेतलेला नायक इथवर) येते.
विस्कळीतपणाविषयी मला मूलतः काही अडचण नाही. तरीही माझा आक्षेप हा 'कादंबरीच्या रचनेमागे काही विचार दिसत नाही' असा आहे. म्हणजे सुरुवातीचं स्थळ-काळातलं हलत राहणं आणि नंतरचं सरळ पुढे जात राहणं या दोन्हींमागे काहीही कारण दिसत नाही. कादंबरी याऐवजी सरळ पुढे जात राहून शेवटी कधीतरी मोहेंजोदारोला आणि परत गावात पोहोचली असती तरी काही फरक पडला असता असं वाटत नाही.
भाषेविषयीही असाच काहीसा विस्कळीतपणाचा आक्षेप आहे. म्हणजे 'कोसला'प्रमाणे यातही व्याकरण, विरामचिन्हं वगैरेंची तोडमोड आहे. संवाद लिहिताना कुठेही अवतरण चिन्हं वगैरे वापरलेली नाहीत. शिवाय मध्येच काही मजकूर इटालिक्स मध्ये येतो, काही ठळक येतो, मध्येच भित्तीचित्रावर लिहिलेला मजकूर एका ओळीवर चौकटीत दिसावा तसा काळ्या पार्श्वभूमीवर पांढर्या अक्षरात येतो. या सर्वाचा कादंबरीची आशयघनता वाढवायला काही हातभार लागत नाही. त्यामुळे काहीही साधत नाही. त्याची कादंबरीच्या आशयाला काहीही गरज नाही.
'कोसला'मध्ये ही तोडमोड कादंबरीचा अविभाज्य भाग वाटते - कारण याचा संवेदनशील नायक फार मोठ्या मानसिक ताणाला सामोरा गेलेला आहे, त्याचं मानसिक संतुलन ढळलेलं आहे आणि तो आपली गोष्ट सांगतो आहे. इथला नायक तसा नाही. तो आयुष्यात एक महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या सीमारेषेवर आहे, पण पदव्युत्तर शिक्षण घेऊन आता पीएचडीची तयारी करणारा, शिक्षकांकडून, सहकार्यांकडून कौतुक वगैरे झेलत आपलं काम करणारा असा आहे. कादंबरीचा पटही एका व्यक्तीच्या कथेहून खूप मोठा आहे. मग पुन्हा अशी भाषा वापरणं हा निव्वळ टाळीखाऊ प्रकार वाटतो (कारण 'कोसला'तल्या त्या भाषेचे पुष्कळ चाहते आहेत.) त्यानं उलट कादंबरीचं वजन कमी होतं. पाश्चिमात्य देशांतले नवकादंबरीकार असं करतात म्हणून आपणही करू (आणि तरीही देशीवादी म्हणून मिरवू) अशी काहीशी पोरकट वृत्ती यात जाणवते.
असो. जर मुळात कादंबरीत काही ताकद असती ('कोसला'त ती होती) तर हे सर्व आक्षेप बाद करता आले असते. मला कादंबरीचा मुख्य दोष दिसला तो असा की कादंबरी कधी पुरेशी सघन होतच नाही. सुरुवातीच्या भागात एकीकडे पाकिस्तानात भेटलेली माणसं आणि निवेदकाच्या गावातली माणसं या दोहोंमधला खास 'आपला' असा जिव्हाळा, ओलावा दिसतो. 'इथून-तिथून या भूमीतला माणूस सारखाच' असं काहीसं लेखकाला म्हणायचं असावं असं वाटतं. तिथं ते आटोपशीर आणि कादंबरीच्या आवाक्याशी संबंधित वाटतं. नंतर गावातल्या भागात भारतीय माणसाच्या विविध तर्हा दिसतात. भटक्या जमाती, मुसलमान, गावकुसाबाहेरचे, वेश्या ते वारकरी, महानुभावी, देशमुख, पुरोहित असे गावगाड्यातले अनेक प्रकारचे लोक त्यात येतात. या सर्वांना समाजात वेगवेगळं स्थान असतं. तरीही गावगाड्यात त्या सर्वांची एक मोळी बांधलेली असते. म्हणून कादंबरीत त्यांचं चित्रण येणं साहजिक वाटतं. निवेदकाला (म्हणजे पर्यायानं लेखकाला) त्या सर्वांविषयी (त्यांच्या गुणदोषांसहित) वाटत असलेलं प्रेमच त्यातून दिसतं. पण इतरत्र मात्र तसं जाणवत नाही.
पिढ्यांचं संक्रमण दाखवण्यासाठी दलित चळवळ, शहरी पाणी चाखलेल्या सुशिक्षित, सबल स्त्रिया असे अनेक घटक पुढे येतात. पण यातल्या कुठच्याच गोष्टीशी लेखक भिडतो असं वाटत नाही. कारण गावातल्या लोकांविषयी लेखकाला जे प्रेम वाटतं तसं इथं अजिबातच वाटत नाही. त्यामुळे तो सर्व भाग प्रक्षिप्त वाटतो. लेखकाच्या मूळ हेतूला तर त्यानं छेद जातोच; कारण आता ते सर्वसमावेशक, व्यापक भारतखंडाचं चित्र रहात नाही तर 'हेही यायला हवं, तेही यायला हवं; पण याविषयी मला तिटकाराच आहे, तर मग घ्या हात धुवून' असं काहीसं होतं. हे फार हिणकस वाटतं.
नंतर तर हे सर्व फारच लांबतं. ज्यांचा कादंबरीशी, तिच्या आशयाशी अजिबात संबंध नाही अशी पात्रं, प्रसंग यांचं अपचन होईपर्यंत वर्णन येतं. नेमाडपंथी पाचकळ ग्राम्य विनोद, स्त्रीमुक्तीवाल्यांची चेष्टा, प्रत्यक्ष नेमाड्यांच्या आयुष्यात आलेल्या व्यक्तींची खर्याखुर्या नावांनिशी चेष्टा, शहरी माणूस कसा वाईट म्हणून त्याची चेष्टा असे सर्व पोरकट प्रकार मग त्यात येतात. ते कादंबरीचा पाया ढासळवतातच, पण 'आता तरी मोठे व्हा, लेखकराव!' असं नेमाड्यांना ओरडून सांगावं अशी पाळी आणतात. कादंबरी म्हणजे आत्मचरित्र नव्हे. त्यात इतका मोठा आवाका असलेली कादंबरी तर शेरेबाजीनं इतकी बरबटलेली आणि एकारलेली असणं हे खचितच नेमाड्यांना अभिमानास्पद नाही.
'कोसला' प्रकाशित झाली तेव्हा नेमाडे २५ वर्षांचे होते. 'कोसला'मध्ये पुष्कळ 'कट्टा'छाप पोरकटपणा आणि पाचकळपणा आहे. पण 'कोसला'चा आशय 'हिंदू'च्या मानानं मर्यादित होता. तो आशय आणि नेमाड्यांचं तेव्हाचं वय या दोहोंना हा सर्व पाचकळपणा शोभून दिसला. किंबहुना मराठी कादंबरीत त्यानं मोलाची भरच घातली. आज ते अभिजात वाङ्मय म्हणूनच वाचलं जातं. मराठी सारस्वत यासाठी नेमाड्यांना मोठं मानतं आणि ते समर्थनीयच आहे.
पण त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. आज नेमाडे सत्तरीचे आहेत. त्यांना 'हिंदू'मध्ये हजारो वर्षं जुन्या भारतीय संस्कृतीच्या बहुपेडी, बहुरंगी विणीचा इतिहास मांडायचा होता. कोट्यवधी माणसांचं आयुष्य हजारो वर्षं व्यापून वर दशांगुळं उरणारी ही वीण तिच्या समृध्दीसकट आणि तिच्यातल्या ठिगळांसकट दाखवायची म्हणजे खायचं काम नव्हतंच. सधनतेची, देशोदेशींच्या मातीची आणि आधुनिक विचारांची कितीही पुटं त्यावर चढली तरी आत लखलखणारं, अस्सल, खास भारतीय असं काहीतरी शिल्लक ठेवणारी; ज्याच्यासाठी पुन्हापुन्हा आपल्या माणसांकडे, आपल्या तत्त्वविचारांकडे आणि आपल्या मातीकडे ओढ घ्यावीशी वाटेल अशी भारतीय संस्कृती नेमाड्यांना दाखवायची होती. त्यांतलं नक्की काय अस्सल आहे याबद्दलचे नेमाड्यांचे विचार आपल्याला पटोत न पटोत, मराठी आणि भारतीय साहित्यात असं काहीतरी करण्याची ही इच्छा कौतुकास्पद होती आणि आहेही. नेमाड्यांना थोडे कष्ट घेता हे जमू शकलं असतंही कदाचित, पण ते जमलेलं नाही हेच खरं. त्यामुळे एक लाखमोलाची संधी या लेखकरावानं सहज आवाक्यात ठेवता यावेत अशा आपल्या अवगुणांपायी दवडली ही अतीव खेदाची गोष्ट आहे.
प्रतिक्रिया
आनंद
नेमाडेप्रेमींची मते वाचण्यास
छान पुस्तक परिक्षण
मला एक कळत नाही, हे नेमाडे
वाचले नाहि
मला माझी हिंदूची प्रत
टह निराळे !
मलाही हवे आहे
कोंबडी/मसाला
दिली!
मला दे!
उत्तम लेख.. हिंदु बद्दल माझे
मस्त! पुढील चर्चा वाचायला
मी कोण आहे ?
_/\_
विषय आवडीचा...
हा हा हा....मी गंमत करत होतो
डिझाईन्स
ती नजाकत
इंद्रराज आल्या पासुन
शेखर
बरं...घेतले !
प्रतिसाद
चित्रण....!!
सुरेख परीक्षण. मी पुस्तक
भ्रमनिरास
प्रतिसाद - २
आशा
प्रतिसाद - ३
इतपत चर्चा केल्यानंतर मला