पुण्या-मुंबईतील (आणि खरं तर भारतातील सर्वच मोठ्या शहरांतील) वाहतूक व्यवस्थेवर पडणार्या ताणाबद्दल बरीच साधक-बाधक चर्चा माध्यमांतून वाचायला, ऐकायला आणि पहायला मिळते. या समस्यांवर BRT, Metro आणि Mono-rail सारखे उपाय सुचवले गेले आहेत, दिल्ली-कलकत्ता सारख्या शहरांमध्ये Metro यशस्वीही ठरली आहे. पुण्या-मुंबईत काय फायदे तोटे होतील याचं घोडा-मैदान लांब नाही.
अशातच चीन मध्ये होऊ घातलेल्या एका वाहन-क्रांतीची ही झलकः मोठ्या शहरांमधील वाहतूक ताणावरील उपाय म्हणून -विशेषतः ट्रॅफिक जॅम मुळे होणार्या अडचणींवर मात म्हणून- एक पर्यावरण-सुलभ उपाय सुचवलाय शेन्झ्हेन हुआझी फ्युचर पार्किंग या कंपनीने: थ्री डी एक्स्प्रेस
वाहनांच्या गर्दीचा निचरा करण्यासाठी रस्त्यांचं अनिर्बंध रुंदीकरण करत राहण्यापेक्षा आहे त्या रस्त्यावरील वाहनांच्या वरून प्रवास करणार्या महाकाय बसेस ही कंपनी तयार करणार आहे. सहा फूटांहून ( २ मीटर्स) कमी उंचीची वाहनं जिच्या खालून सहजपणे जाऊ शकतील अशी ही वरचा मजला बारा फूटांपेक्षा (4 meters) आधिक उंच असलेली प्रत्येक थ्री डी एक्स्प्रेस बस तिच्या वरच्या स्तरावरून १२००-१४०० प्रवासी घेऊन जाईल असं वाचण्यात आलं. रस्त्याच्या कडेला असलेल्या 'रूळां'वरून या त्रिमिती बस ची चाकं चालत राहतील [straddling bus]. खालील वाहने एकमेकांना overtake करतांना ट्रॅफिक जॅम झाला तरी त्यांच्या 'बाहेरून' चालणारी त्रिमिती बस चालतच राहील आणि त्यातील प्रवासी न अडकता इच्छित स्थळी पोहोचू शकतील, अशी कल्पना आहे. दिवसा छपरावरील सौर-पॅनेल्स चा वापर करून सौरशक्ती वर, आणि रात्रीच्या वेळी विद्युत शक्तीवर ही बस चालेल.
ठराविक अंतरावर असलेल्या स्थानकांमधील वरच्या मजल्यावर प्रवासी चढ-उतार करतील. ही त्रिमिती बस स्थानकावर थांबेल तेंव्हा त्या बसच्या खालील वाहनांची वाहतूक सुखेनैव चालू राहील. एका त्रिमिती बस आणि तिच्यासाठी लागणारा ३०-४० किलोमीटर्स लांबीचा लोहमार्ग यांच्या बांधणीसाठी ५०० मिलियन युआन लागतील, आणि हा खर्च मेट्रोच्या खर्चाच्या १०% इतका कमी आहे असं कंपनी म्हणते. ट्रॅफिक जॅम चं प्रमाण या त्रिमिती बस मुळे २० ते ३० टक्क्यांवर खाली येईल असा कंपनीचा दावा अहे. या कल्पनेला सरकारकडून हिरवा कंदील मिळाला असून पहिला prototype मार्ग लवकरच बांधायला सुरूवात होईल.
या प्रकल्पाविषयीचा कंपनीच्या सादरीकरणाचा व्हिडिओ खाली देतो आहे, त्यानुसार ही त्रिमिती बस वळणावरून सहज जातांना दाखवली आहे, ते कितपत शक्य आहे, आणि बसचं एकंदरीत आकारमान पहाता (खाली साधारण ६-७ गाड्या एकावेळी मावू शकतील इतकीच लांबी असलेल्या या बसमध्ये) १४०० प्रवासी कसे बसतील, यांविषयी मी जरा साशंक आहे -
आता असा प्रयोग भारतात करावा का या विषयी यथावकाश चर्चा होईलच, पण मला पडलेला मुलभूत प्रश्न हा की पोटाखालून वेगवेगळी (म्हणजे बदलत राहणारी) ६-८ वाहनं घेऊन जाणार्या या बसला अखेर रस्त्याचे ट्रॅफिक लाईट सारखे नियम पाळावेच लागणार, म्हणजे तिचा वेग "एक ट्रॅफिक लाईट ते दुसरा ट्रॅफिक लाईट" किंवा "एक स्थानक ते पुढचा ट्रॅफिक लाईट" यांतल्या अंतरामुळे नियंत्रित होणार, हे दोन stops जितके जवळ-जवळ (आणि शहरात, इतर cross trafficच्या सोयीसाठी ते जवळ असणं भाग असणार) तितका या त्रिमिती बसचा वेग कमी होणार, मग खरा वेळ कितपत वाचेल?
अवांतरः या त्रिमिती एक्स्प्रेस ची माहिती शोधतांना चीनमधील एका सध्याच्या बसचा हा खालील व्हिडिओ सापडला -
या त्रिमिती बस च्या पोटाखालून जाणार्या गाड्या जर अशा एकमेकांवर आणि भोवतालच्या बसच्या भिंतीच्या आतल्या भागावर आदळल्या तर....केला तुका, अन् झाला माका!
वाचने
3253
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्म्म्म... मुंबईकर रेल्वे
???
In reply to ह्म्म्म... मुंबईकर रेल्वे by मदनबाण
ही मराठी भाषेची चेष्टा आहे.
In reply to ??? by मधुशाला
अगदी अगदी
In reply to ही मराठी भाषेची चेष्टा आहे. by नगरीनिरंजन
चुकीचा शब्द प्रयोग केल्या
In reply to अगदी अगदी by हुप्प्या
क्रांतीकारी कल्पना
मस्त कल्पना...
अभिनव
भारी कल्पना आहे
महाबस
हे पण जरा नजरेखालून घाला ............
चांगली कल्पना
चांगली कल्पना.