उदंड जाहली कविता (२)
उदंड जाहली कविता (२)
आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे १,००,००० श्लोकांचे महाभारत हे सर्वात मोठे काव्य होय. पण दासोपंतांची लिहलेले गीतार्णव हे १,२५,००० ओव्यांचे काव्य त्याही पेक्षा २५ % मोठे असल्याने गीतार्णवला हा मान दिला पाहिजे.
श्री. मंगेश पाडगांवकर यांचे २५ पेक्षा जास्त कवितासंग्रह असल्यामुळे अर्वाचिन बहुप्रसव कवींमध्ये त्यांना अग्रणी म्हणावयास हरकत नाही. कोणास दुरुस्ती करावयाची असेल तर अवष्य कळवावे.
श्री. भावे यांच्या काळी (स.न.१८९०-१९२०) केशवसुत, टीळक, बी, बालकवी इत्यादींची मजल ४-५ संग्रहांच्यावर नसल्याने (एकांक २५००-३०००) मी प्राचीन कवींच्या शोधाला एकांक (किंवा ओवी)२०,००० पासून सुरवात केली. पण लवकरच हे चूक आहे असे दिसू लागले. २०,००० ते ४०,००० पर्यंतच्या काही कवींची यादी खालीलप्रमाणे :
विष्णुदास नामा, रंगनाथ मोगरे, मृत्यंजयस्वामी (पूर्वधर्मीचा मुसलमान), रंगनाथ निगडीकर, सोहिरोबानाथ, हरिदास, हरिबुवा भोंडले, कृष्ण याज्ञवल्की, मधुकर, मन्मथस्वामी, मेरुस्वामी, गंगाधर, नारयण केसरी, सिद्धकवी, पद्मनाभ राजूरकर, गिरिधरस्वामी, आत्माराम, जयराम,नारायणबोवा जानवडकर, हंसराजस्वामी, .... बरीच मोठी यादी आहे. मी मुद्दाम आपणा सर्वांना माहित असलेले ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, रामदास, मोरोपंत, वामन या यादीत दिलेले नाहित. ही यादी जवळजवल अज्ञात कवींचीच आहे. यात महानुभावी,शैव, जंगम, पूर्वध्र्मीच मुसलमान आदी निरनिराळ्या पंथांचे तसेच महाराष्ट्राबाहेरील तांमीळनाडूतले कवीही आहेत.
आता ४०,००० एकांकापेक्षा जास्त लिहणारे काही कवी बघू.
बहिरा जातवेद ... . ७५,०००
कृष्ण दयार्णव .... ५०,०००
श्रीधर ............ ६०,०००
गोपाळ .... ७५,०००
राम पंडित .... ५०,०००
दाजी कवी ..... ६०,०००
दत्तवरद विठ्ठल .. ७५,०००
शुभानंद ,,,,,, १,००,०००
शिवकल्याण .. १,००,०००
माधवस्वामी ... १,३०,०००
या सर्वांचे मेरुमणी दासोपंत. गीतार्णव हा एकच ग्रंथ १,२५,००० पेक्षा मोठा आहे. दुसरा पदार्णव हा संग्रह तसाच १,३०,००० च्या आसपास. इतर "किरकोळ" लेखन ५०,००० धरले तरी एकुण संख्या ३,००,००० च्यावर जाते.
येथे दोन गोष्टी लक्षात घ्या. प्रथम हे आकडे अंदाजे आहेत. ५०,००० म्हणजे ५-१० हजार इकडे तिकडे. कोणीही प्रत्येक लेखकाचे सर्व ग्रंथ घेऊन बेरीज करत बसलेले नाही. दुसरी गोष्ट हे आकडे म्हणजे संशोधकांना ज्ञात असलेल्या, त्यांना मिळालेल्या पोथ्यांवरून घेतलेले. सर्व कवींचे सर्व लिखाण मिळालेले नाही, तशी शक्यताही नाही. उदाहरणार्थ दासोपंतांचे लिखाण त्यांच्या वंशजांमध्ये वाटले गेले.वरील आकडे त्यातील काही वंशजांकडील मिळालेल्या पोथ्यांवरून. नक्की आकडा "विठ्ठलच" जाणे. (दासोपंतांना तरी तो माहित असेल की नाही कोणास ठाउक !) काळाच्या उदरात,हवा-कृमीकिटकांमुळे, किती गडप झाले, त्याचा अंदाज करणे अशक्यच. मला सापडलेले काही कवी वरील यादीत दिले आहेत, खरा आकडा याच्या कितीतरी पटीतच असणार.
आता प्राचीन कवींनी एवढे प्रचंड लेखन कसे व का केले असावे ? उत्तर सोपे आहे. सर्व कवींचा उद्देश धर्माची ओळख येथील सर्वसामान्य लोकांना, जे संस्कृत जाणत नव्हते, त्यांना मराठीतून करून देणे हा होता. त्यामुळे सर्व काव्य हे गीता, भागवत, रामायण व भारत या भोवतीच घुटमळत होते. सगळे कवी संस्कृतचे जाणकार होते व त्यांना स्वत:करिता ह्या लिखाणाचा काहीच उपयोग नव्हता. सगळी काबाडी अज्ञ, आर्त बहुजनांसाठी. ख्रिस्चन मिशनरी जगभर भटकले, ह्यांनी स्वत:ला लिखाणात गाडून घेतले. आतली ओढ एकच. गुणवत्ता अर्थातच फार उच्च नाही पण सगळीच अगदी टाकावू असेही नाही. आजही आल्हादकारक वाटावे असे काव्य यातही तुम्हाला आढळून येईल.
शरद
प्रतिक्रिया
इंटरेस्टींग माहिती
धन्यवाद
सहमत आहे
शरदकाका
माहितीपूर्ण लेख, आवडला.
+१
वा माहितीपूर्ण