Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मितान on Wed, 08/04/2010 - 12:19
एक होतं जंगल. त्या जंगलात एक हत्ती रहायचा. दिवसभर त्या जंगलात खेळत रहायचा. भूक लागली की झाडावरची फळं खायचा आणि तळं, तलाव, झरा असे जिथे सापडेल तिथले पाणी प्यायचा. हत्तीची जंगलात सगळ्यांशी मैत्री होती. तो सर्वाना मदत करायचा. त्यामुळे सर्वांचा आवडता होता. एके दिवशी तो असाच जंगलात फिरत होता. फिरता फिरता तो जंगलाच्या दुसर्‍या टोकाला गेला. त्याला खूप खूप तहान लागली होती. म्हणून तो पाणी शोधू लागला. उन्हाळ्यामुळे बहुतेक सर्व ठिकाणचे पाणी आटले होते. काही ठिकाणी नुसताच चिखल राहिला होता तर काही तळ्यांचे डबक्यात रुपांतर झाले होते. खूप शोधल्यानंतर हत्तीला अखेर एक जागा सापडली. तिथे खड्ड्यात पाणी दिसले. हत्तीने त्यात आपली सोंड बुडविली. आणि फुर्रर्रर्र करून पाणी पिऊ लागला. एक मिनिटात सगळे पाणीच संपले ! सगळे पाणी हत्तीने पिऊन टाकले होते ! " अरेच्चा ! पाणी संपले सुद्धा ! " हत्ती मनात म्हणाला. तेवढयात त्याला सोंडेच्या टोकावर काहीतरी वळवळ जाणवली....बघतो तर काय....एक छोटीशी मासोळी पाण्यातून बाहेर पडल्यामुळे तडफडत होती. अगदी सोंडेच्या टोकावर ! हत्तीने पाहिले. मासोळीला म्हणाला " हाय, कशी आहेस ? " मासोळीला हत्तीचा खूप राग आला होता. तिचे सगळे पाणी त्याने संपवले होते नं.. " काय रे हत्तीदादा, एवढा मोठा झालास तू तरी तुला काही कळत नाही ! माझे पाणी संपवलेस. आता मी कुठे राहू ? पाण्याबाहेर तर मी जगूच शकत नाही. तुझ्यामुळे मी आता मरून जाणार ! दुष्ट आहेस तू ! " असे मासोळी खूप रागारागाने बोलली. हत्तीला खूप वाईट वाटले.आपली चूक त्याला समजली. पण त्याने मुद्दाम पाणी संपवले नव्हते. तो म्हणाला," अगं मासोळी, चुकून संपलं गं पाणी! मी तुला दुसरे पाणी शोधून देतो. चल आपण शोधूया.. " मासोळी म्हणाली," तू खरंच मला मदत करशील ? " " हो गं हो. नक्की करेन" हत्ती म्हणाला. मग ते दोघे पाणी शोधत शोधत फिरू लागले. पाणी काही सापडेना. मासोळीची तडफड खूपच वाढू लागली. हत्तीला खूप वाईट वाटले. आपल्यामुळे मासोळीला त्रास होतो आहे हे बघून त्याला रडू आले. दोन्ही डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. टप टप पाणी जमिनीवर पडले. तो म्हणाला, " आता काय करायचं? " पाणी बघून मासोळीने टुण्णकन त्यात उडी मारली. आणि ती म्हणाली, "हत्तीदादा, हे पाणी मला थोडावेळ पुरेल. तू दुसरे पाणी शोधून ये तोवर मी इथेच थांबते. " हत्तीला गंमतच वाटली. तो पाणी शोधायला एकटाच निघून गेला. तिथेच जवळ एका चिखलाच्या डबक्यात एक मगर होती. ती हे सगळे दुरून बघत होती. मासोळीला एकटी सोडून हत्ती निघून गेल्याचे तिने पाहिले. मासोळी बघून तिच्या तोंडाला पाणी सुटले. आज आयतीच मेजवानी मिळणार म्हणून ती खूष झाली. दबक्या पावलांनी मासोळीच्या मागे गेली नि एका घासात तिने मासोळीला गट्टम् केले ! हत्ती परत आला तर तिथे मासोळीच नाही. "आता काय करायचं?" पण तिथल्या झाडावरच्या एका धीवर पक्षाने हत्तीच्या कानात सगळे सांगितले. हत्तीला मगरीचा एवढा राग आला.. त्याने तिला उचलले नि झाडावर उलटे टांगले ! मगरीला खूप भीती वाटली. ती हत्तीला तिला झाडावरून खाली उतरवण्यासाठी विनवू लागली. हत्ती म्हणाला, " आधी ती गिळून टाकलेली मासोळी बाहेर टाक मग मी तुला खाली उतरवतो." मगरीपुढे काही पर्यायच नव्हता. तिने मासोळी खाली टाकली. मासोळी हत्तीला म्हणाली, " तुला बघून आत्ता कुठं माझ्या जिवात जीव आला ! आता सोड बरं मला पाण्यात ! " हत्तीचे तोंड एवढुसे झाले. त्याला अजून पाणी कुठे सापडले होते ! तो म्हणाला" मी पटकन येतो. तू इथेच माझी वाट बघ." आणि तो पाणी शोधायला निघाला. इकडे झाडावरच्या धीवर पक्षाने एक झडप मारली नि मासोळीला चोचीत उचलले. पिल्लांना खाऊ मिळाला या आनंदात तो घरट्याकडे निघाला. समोर हत्ती उभा ! त्याने आपल्या सोंडेत धीवराचे घरटेच पकडले होते. त्यात धीवराची पिल्लं घाबरून ओरडत होती. धीवराला आपली चूक समजली. त्याने मासोळीला अलगद खाली ठेवले. हत्तीनेही मग घरटे जागेवर ठेवले. त्याने मासोळीला उचलले आणि सापडलेल्या छोट्याश्या तळ्याकडे निघाला. मासोळीला ते तळे पाहून खूप आनंद झाला. तिच्या आधीच्या घरापेक्षा इथे थोडे जास्त पाणी होते. हत्तीने तिला पाण्यात सोडताच सुळसुळ पोहत ती आनंदात गिरक्या घेऊ लागली. ते बघून हत्तीला खूप खूप आनंद झाला. अखेर त्याने मासोळीला वाचवले होते ! उन्हात फिरून फिरून हत्ती खूप थकला होता. आणि त्याला खूप तहान लागली होती. त्याने समोरच्याच पाण्यात आपली सोंड बुडविली. आणि तो ढसाढसा पाणी पिऊ लागला. दोन मिनिटात तळयातले पाणीच संपले !!!! त्या तळ्यात तर खूप खूप मासोळ्या राहात होत्या. सगळ्याच्या सगळ्या हत्तीकडे रागारागाने पाहू लागल्या. हत्तीने मात्र डोक्याला हात लावला ! आता काय करायचं??? ( विरंगुळा म्हणून या डच बालकथेचा अनुवाद केला आहे. बघा तुम्हालाही आवडते का कथा... ! )
  • Log in or register to post comments
  • 8353 views
  • डच बालकथा - २ - एक होती अळी
  • डच बालकथा ३ - कोंबडी आणि पिल्लू
  • डच बालकथा ४ - नीनाची सकाळ
  • डच बालकथेचा स्वैर अनुवाद ६ : खजिना
  • डच बालकथेचा स्वैर अनुवाद ७ : एल्माची भरारी
  • डच बालकथेचा स्वैर अनुवाद ८ : प्लुक !

Book traversal links for डच बालकथा - हत्ती आणि मासोळी

  • डच बालकथा - २ - एक होती अळी ›

प्रतिक्रिया

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 08/04/2010 - 12:30

Permalink

मस्त

अनुवाद मस्त जमला आहे. पण एक शंका आहे: धीवर पक्षी म्हणजे नक्की कोणता पक्षी?
  • Log in or register to post comments

Submitted by मितान on Wed, 08/04/2010 - 12:34

Permalink

धीवर म्हणजे किंगफिशर .

धीवर म्हणजे किंगफिशर .
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 08/04/2010 - 13:05

In reply to धीवर म्हणजे किंगफिशर . by मितान

Permalink

ओह! मी खंड्या हे नाव ऐकलं

ओह! मी खंड्या हे नाव ऐकलं होतं. तुझ्या गोष्टीमुळे आणखी एक नाव समजलं.
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on Wed, 08/04/2010 - 16:53

In reply to ओह! मी खंड्या हे नाव ऐकलं by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

झाडावर धीवराची हाले चोच

झाडावर धीवराची हाले चोच लाल..अश्या ओळी असलेली एक कविता बालभारतीत होती. तिथेच खंड्या उर्फ धीवर उर्फ किंगफिशरची पहिल्यांदा ओळख झाली .
  • Log in or register to post comments

Submitted by जिप्सी on Wed, 08/04/2010 - 12:57

Permalink

वा वा !!!!

खरच मस्त आहे गोष्ट !!!! बर्याच दिवसांनी बालकथा वाचली. मजकूर संपादित.
  • Log in or register to post comments

Submitted by rajesh84 on Wed, 08/04/2010 - 13:07

Permalink

छान प्रयत्न.....

छान जमल बुआ....
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Wed, 08/04/2010 - 13:18

Permalink

छान आहे कथा..

आवडली. आणि आपल्याकडच्या कथेशी साधर्म्य नसल्याने एक नवीच छान कथा समजली. माझी भाची, तिला गोष्टी ऐकायला खूप आवडायचे. ती छोट्या शिशुवर्गात असताना तिला अलीबाबाची भलीमोठी गोष्ट पाठ झाली होती आणि मी घरी नसताना आलेल्या माझ्या मैत्रिणीला ऐकवली होती. पण मला सांग म्हटले की पठ्ठी मला आठवत नाही, तूच सांग म्हणून हट्ट धरायची. सुरूवात केली रे केली, "ही गोष्ट माहित आहे, दुसरी सांग" म्हणून हट्ट धरायची. तेव्हा नवनवीन कथा कुठून आणायच्या हीच मोठी अडचण होती. तेव्हा अशा वेगवेगळ्या भाषांतल्या कथा मिळायला हव्या होत्या. :) अवांतरः लोकांनी समंजसपणे इतर धाग्यावरचे स्कोर्स निदान या सुंदर धाग्यावर सेटल करू नयेत.
  • Log in or register to post comments

Submitted by मितान on गुरुवार, 08/05/2010 - 11:34

In reply to छान आहे कथा.. by मस्त कलंदर

Permalink

म क , मला पण या गोष्टी

म क , मला पण या गोष्टी रुचिपालट म्हणून आवडल्या. मुख्य म्हणजे प्रत्येक गोष्टीतून काही बोध किंवा तात्पर्य काढण्याची भानगड यात नाही ;)
  • Log in or register to post comments

Submitted by दीपक साकुरे on Wed, 08/04/2010 - 13:22

Permalink

मस्तच..

छान अनुवाद ... मला त्या मासोळीचे नवल वाटते की एव्हडा वेळ पाण्याबाहेर राहुनही ती जिवंत राहिली..:) अजुन वाचायला आवडेल..
  • Log in or register to post comments

Submitted by जिप्सी on Wed, 08/04/2010 - 13:24

Permalink

नाही नाही

स्कोर्स सेटल करणे हा उद्देश अजिबातच नव्हता. समंजसपणे माफ करावे हि विनंती !
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Wed, 08/04/2010 - 15:01

In reply to नाही नाही by जिप्सी

Permalink

धन्यवाद.

धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Wed, 08/04/2010 - 13:25

Permalink

आवडली. संकलन करीत आहे.

आवडली. संकलन करीत आहे. :)
  • Log in or register to post comments

Submitted by स्वछंदी-पाखरु on Wed, 08/04/2010 - 13:51

Permalink

डच बालकथा - हत्ती आणि मासोळी = कापूसकोंड्याची गोष्ट..?

डच बालकथा - हत्ती आणि मासोळी = कापूसकोंड्याची गोष्ट.. असच कहि वाटत आहे असो पण अनुवादासाठी +१ उत्तम कथा....
  • Log in or register to post comments

Submitted by मितान on गुरुवार, 08/05/2010 - 11:35

In reply to डच बालकथा - हत्ती आणि मासोळी = कापूसकोंड्याची गोष्ट..? by स्वछंदी-पाखरु

Permalink

ही मस्त आयडियाची कल्पना

ही मस्त आयडियाची कल्पना सुचवलीत ! आता कापुसकोंड्याची गोष्ट डच मध्ये अनुवादित करून इकडच्या मित्रांना ऐकवते ;)
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल देशपांडे on Wed, 08/04/2010 - 14:05

Permalink

सही कथा आहे.. अनुवाद छानच आहे

सही कथा आहे.. अनुवाद छानच आहे हा.. अशा इतर काही कथा पण येउद्या
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Wed, 08/04/2010 - 15:05

Permalink

मस्त,

माया, छानच ग, अशा अनुवादित बालकथा येऊ देत अजून. स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Wed, 08/04/2010 - 16:47

Permalink

छान छान

त्या तळ्यात तर खूप खूप मासोळ्या राहात होत्या. सगळ्याच्या सगळ्या हत्तीकडे रागारागाने पाहू लागल्या. हत्तीने मात्र डोक्याला हात लावला !
छान छान! उद्बोधक!! डचांकडे हत्तीच्या गोष्टी केल्या जातात याचे नवल वाटले. मला वाटायचे की ज्या प्रदेशात जे प्राणी असतात त्यांच्याच लोककथा वगैरे तयार होतात. असो. :) माझा गैरसमज असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Wed, 08/04/2010 - 21:25

Permalink

मस्त बालकथा

आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by मितान on गुरुवार, 08/05/2010 - 11:39

Permalink

सर्वांचे उत्साहवर्धक

सर्वांचे उत्साहवर्धक प्रतिसादांबद्दल आभार. :) @प्रियाली, अगं ही लोककथा नाही. अगदी १० वर्षांपूर्वी लिहिलेली बालकथा आहे. मुलांना आकर्षण असते ते सगळे प्राणी आपल्या गोष्टीत पण येतातच की...
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on गुरुवार, 08/05/2010 - 12:20

Permalink

:-)

हे एक बोर्डबुक असेल व प्रत्येक पानावर एक चित्र कसे असेल नजरेसमोर उभे राहीले! छान अजुन येउ दे!
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 08/05/2010 - 12:24

Permalink

बालकथेच केलेल भाषांतर फारच

बालकथेच केलेल भाषांतर फारच सुरेख झाल आहे... :)
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 08/05/2010 - 13:19

Permalink

मस्त साधी सोपी डोक्याला शॉट न

मस्त साधी सोपी डोक्याला शॉट न लावणारी कथा. आवडली एकदम.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com