मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उडदाचं घुटं

शाल्मली · · पाककृती
नमस्कार मंडळी, आज खूप दिवसांनी येत आहे. सोबत आणला आहे रोजच्या जेवणातला साधासाच एक पदार्थ. रोजच्याच आमटीचा कंटाळा आला की करावं असं उडदाचं घुटं किंवा उडदाची आमटी. साहित्यः- उडदाची डाळ १ वाटी हरभर्‍याची डाळ १ मोठा चमचा कोरडं खोबरं किसून साधारण पाव वाटी लसूण ४-५ पाकळ्या, आलं एक पेराएवढं, मीठ, चिंचेचा कोळ १ मोठा चमचा. फोडणीचे साहित्यः- तेल, मोहरी, जिरं, कढिपत्ता, हिरवी /लाल मिरची, कोथिंबीर कृती- उडदाची डाळ व हरभर्‍याची डाळ कुकरात ४ शिट्ट्या करुन शिजवून घ्यावी. एका कढल्यात कोरडं खोबरं आणि जिरं खरपूस भाजून घ्यावे. शिजलेली डाळ डावेनी घोटून एकजीव करुन घ्यावी. आता त्यात अंदाजे पाणी घालून उकळवण्यास ठेवावी. भाजलेलं जिरं आणि खोबरं त्यात चुरुन घालावे. चिंचेचा कोळ,चवीप्रमाणे मीठ घालावे. एका कढल्यात तेलाची फोडणी करावी. त्यात कढिपत्ता, हिरवी /लाल मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण घालावे. लसूण खमंग होईपर्यंत परतावे. आता उकळी आलेल्या मिश्रणात ही फोडणी घालावी. अजून एक उकळी येऊ द्यावी. वाफाळत्या भातावर गरमागरम घुटं घेऊन भात ओरपावा. --शाल्मली.

वाचने 14169 वाचनखूण प्रतिक्रिया 22

प्रभो Mon, 07/19/2010 - 23:08
मस्त दिसतेय आमटी.....पण कधी खाल्ली नाही... आईला करायला सांगायला हवी... :)

स्वाती२ Mon, 07/19/2010 - 23:15
मस्तच! गेल्याच आठवड्यात आईशी बोलताना या आमटीची आठवण निघाली . माझ्या आईला तिच्या आजीच्या हातच्या घुट्याची आठवण येत होती आणि मला माझ्या आजीच्या!

शिल्पा ब Mon, 07/19/2010 - 23:43
छान दिसतेय...करुन बघते या आठवड्यात.. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

रेवती Tue, 07/20/2010 - 01:22
छान पदार्थ! गरमागरम भात आणि ही आमटी ........जोडीला पाऊस! मज्जा! आणि शाल्मलीताई वेलकम ब्याक! :) रेवती

धनंजय Tue, 07/20/2010 - 03:39
यात फोडणीत कोथिंबीरही परतायची आहे का? (फोडणीत लसूण खमंग होईस्तोवर कोथिंबीर चांगलीच कोळपेल.) गोरीगोमटी आमटी छानच दिसते आहे. चिंचही बहुधा हलक्या हातानेच घालायची असेल.

In reply to by धनंजय

शाल्मली Fri, 07/23/2010 - 22:30
नाही.. नाही.. जरा फोडणीचा क्रम चुकला.. आधी लसूण परतून घ्यायची आणि मग कोथिंबीर घालून लगेच गॅस बंद करायचा. म्हणजे कोथिंबीरही हिरवी रहाते. :) लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद! --शाल्मली.

सहज Tue, 07/20/2010 - 07:07
करुन पाहीले पाहीजे. तूर, मुग, मसुर, मिश्र बरेचदा होते आता हे स्पेशल उडीद केले पाहीजे.

माझी आई घुट वेगळ्या पद्धतीने करते. म्हणजे उड्दाचे पीठ वापरून. पण इथे ते मिळ्त नसल्याने मी या सुखापासून वन्चित होते....आता करु शकेन्....शुक्रान्!(अरेबिक मध्ये आभार)

अरुंधती Wed, 07/21/2010 - 22:07
पाकृ मस्तच! माझी काकू करते बहुतेक शनिवारी हे घुटं आवर्जून! :) अरुंधती http://iravatik.blogspot.com/

चित्रा Sat, 07/24/2010 - 00:22
उडदाचे घुटे पिण्यासारखी हवा आहे आज, तेव्हा नक्की करतेच :) छान. मला या आमटीला घुटे म्हणतात हे बरेच वर्षे माहिती नव्हते. सासरी आल्यावर कळले. आमच्याकडे त्याला उडदाची आमटी असेच म्हणत असत. फक्त त्यात हरभर्‍याची डाळ आमच्याकडे घालत नाहीत. ही पाककृती वेगळी दिसते आहे, त्याबाबतीत.

रुपी Wed, 08/16/2017 - 03:11
फेसबूकवरच्या 'आम्ही सारे खवय्ये' या प्रमोद तांबे चालवत असलेल्या पेजवर ही पाकृ फोटोसहीत उचलून टाकली आहे. शब्द थोडेफार बदललेत. मी रिपोर्ट करण्यासाठी अजून माहिती वाचली, पण चोरलेली पाकृ, फोटो माझे स्वतःचे नसल्याने मी ते रिपोर्ट करु शकत नाही. हे पेज रिपोर्ट करण्यासाठी मिपा प्रशासन काही करु शकेल का? मिपाकरांच्या पाकृ चोरण्याची ही त्यांची पहिलीच वेळ नाही.

कंजूस Wed, 08/16/2017 - 06:03
हीच पाककृती स्वत: करून फोटो टाकून देता आली असती फेसबुकावर. अर्धापाऊण तास लागला असता. //अशी पाकृती मिपा संस्थळावर आलेली आहे तरी नवीन लिहावी// हे तांबेला कळवू शकतो.ग्रुप अडमिनला दखल घ्यावीच लागेल.

रेवती Wed, 08/16/2017 - 06:18
रुपी, शाल्मलीने जर फेसबुकातूनच तिकडे निषेध नोंदवला तर बरे होईल असे वाटतेय. स्वातीताई (स्वातीदिनेश), शाल्मलीला कळवता येईल का?