लेखनप्रकार
(सदर लेख माझ्या मातोश्रींनी लिहिला असून २४ मे २०१०च्या सकाळ मुक्तपीठात
प्रकाशित झाला आहे. मिपाच्या नियमांत बसत नसल्यास काढून टाकायला हरकत नाही.)
सुमारे पन्नास वर्षांपूर्वी घडलेली हकिगत मी सांगत आहे. त्यावेळी मी दहा वर्षांची असेन. अगदी बारीकशी, कुणाच्या
अध्यात ना मध्यात. आई- वडील, आजोबा, दोन काका-काकू, चुलत भावंडे असे भरलेले घर. मोठ्या भावडांमध्ये
खूप दंगामस्ती, भांडणे चालयची. कधी कधी त्यांना आजोबांच्या छड्या खाव्या लागत. माझ्या जन्मानंतर वडिलांचा व्यवसाय
अधिक भरभराटीला लागला त्यामुळे मी त्यांची फार लाडकी मुलगी होते आणि असे सर्व असताना मला माझ्या वडिलांनी
अगदी अचानक एक सणसणीत थोबाडीत दिली. माझी काही चूक नसताना! हे अघटित घडले तरी कसे? त्याचीच गमतीदार
हकिगत सांगणार आहे. त्यासाठी माझ्या वडिलांबद्दल थोडी माहिती सांगावी लागेल.
माझ्या वडिलांना आम्ही 'आप्पा' म्हणत असू. ते दहा वर्षांचे असताना त्यांना मलेरिया झाला. जवळजवळ महिनाभर ताप
येत होता. सतत औषधे घेतल्याने ताप बरा झाला; पण त्या औषधांचा त्यांच्या कनावर विपरीत परिणाम झाला. दोन्ही
कान बधिर झाले. अजिबात ऐकू येईना. शाळा- शिक्षण तिथेच थांबले. सुदैवाने त्या आधी जे शिक्षण झाले होते त्यामुळे लिहिता-
वाचता येत होते एव्हढेच. पण उत्तम बुद्धिमत्ता आणि भरपूर कष्ट करण्याची तयारी यामुळे त्यांना जे यश मिळाले ते
आश्चर्य करण्यासारखे होते.
एव्हढे मोठे व्यंग असल्याने या मुलाचे पुढे कसे होणार, अशी काळजी त्यांच्या वडिलांना वाटत होती. त्यांनी आपल्या
पायावर उभे राहणे तर गरजेचे होते. पोटापाण्यासाठी कोणता उद्योग करायचा हा प्रश्न होता. मग माझ्या आजोबांनी त्यांना
दोन म्हशी घेऊन दिल्या आणि दुधाचा व्यवसाय करण्यास सांगितले. अप्पांनी हे आव्हान स्वीकारले. अविरत प्रामाणिक कष्ट,
पडेल ते काम करण्याची तयारी यामुळे त्यांचा व्यवसाय इतका विस्तारला की त्यांच्या गोठ्यात २५-३० म्हशी होत्या. 'मुळेकर
डेअरी' नावारुपाला येत होती. आमचे राहण्याचे घर खालापूरला होते. तेथून काही अंतरावर महड (देवस्थान) येथे
म्हशींचा गोठा होता.त्याला आम्ही वाडा म्हणायचो. मध्यरात्री बारा वाजता उठून सायकलने वाड्यावर जायचे. तेथे कामाला
गडी माणसे होती, पण त्यांच्या बरोबरीने माझे वडील पण काम करीत. पहाटे पाचपर्यंत म्हशींचे दूध काढून बरण्या भरून ते
गडी घेऊन जायचे. घरोघर रतीब घालण्याचे काम करीत. तसेच दुपारी म्हशींचे दूध काढून ते चार वाजेपर्यंत ग्राहकांना
मिळत असे. अश्या प्रकारे खोपोली- सायमाळ येथील लोकांना दोन वेळा ताजे दूध पुरविले जायचे. असा हा डेअरीचा कारभार
चालविताना अप्पांना दिवसाचे चोविस तास कमी पडायचे.
घरची सर्व जबाबदारी माझी आई समर्थपणे सांभाळत होती. अप्पांचा बराच वेळ वाड्यावर जात होता. गाई-म्हशींना वेळेवर
खाणे देणे, पाणी पाजणे इ कामे नोकरांकडून करून घेणे मोठे जिकिरेचे होते. जसे त्यांचे त्यांच्या उद्योगावर प्रेम होते, तसेच
गडी माणसांवरही होते; पण नोकरांनी कामामध्ये काही चुकारपणा केला, लबाडी केली तर अप्पांचा पारा एव्हढा चढायचा, की
त्या नोकराच्या श्रीमुखात द्यायला ते मागे-पुढे बघायचे नाहीत.
गाई-म्हशींनी भरलेला वाडा म्हणजे त्यांचे सर्वस्व होते. त्यांच्या ध्यानी-मनी-स्वप्नी वाडाच असायचा. ह्याचे प्रत्यंतर मला
एके दिवशी आले. त्याचे असे झाले- त्या रात्री मी आई-वडिलांच्यामध्ये झोपले होते. साधारण बारा वाजता माझ्या गालावर
सणसणीत चपराक बसली! कुणाची? साक्षात माझ्या लाडक्या पिताजींची! मी मोठ्ठ्याने रडत, गाल चोळत जागी झाले. लगेच
आई जागी झाली. मी रडत रडत आईला सांगितले, 'मला अप्पांनी थोबाडीत मारली.' अप्पांना माझे रडणे ऐकू जाण्याचा
प्रश्नच नव्हता. आईने त्यांना उठविले. ते खडबडून जागे झाले. ते म्हणाले, " मी स्वप्नात वाड्यावर होतो." तिथे नोकराने, जेठू
नावाच्या गड्याने काहीतरी कामचुकारपणा केला होता. त्यामुळे संतापून त्यांनी जेठूला जोरदार थोबाडीत दिली. ती बसली
माझ्या गालावर! सकाळपर्यंत माझा गाल पुरीसारखा फुगला होता. घरातील सर्व मंडळी माझ्याकडे पाहून माझी चेष्टा करीत होती,
हसत होती.
एरवी जे वडील मी तब्येतीने नाजूक म्हणून मला फुलासारखे जपत होते, त्यांच्याकडून हा असा मार खाण्याचा प्रसंग आला. पण
ह्या घटनेने त्यांना फारच वाईट वाटले. कितीतरी दिवस त्यांना अपराधीपणाची बोचणी लागली होती. त्यामुळे ते माझे अधिकच
लाड करू लागले. मी तर मनातल्या मनात केव्हाच माफ केले होते त्यांना.
या प्रसंगानंतर एक गोष्ट मात्र झाली, अप्पांनी गड्यांच्या श्रीमुखात मारणे सोडून दिले!
- सौ. सुचेता प्रफुल्ल दाढे
मिसळपाव
छान आठवण
In reply to छान आठवण by प्रदीप
सहमत
In reply to सहमत by सन्जोप राव
+१
मस्तच
In reply to मस्तच by पांथस्थ
हा हा हा!
भारीच आहे
झोपेत
हा हा हा
In reply to हा हा हा by परिकथेतील राजकुमार
हेच
मजेशीर..
गमतीदार
In reply to गमतीदार by स्वाती२
+१
असाच
हा!हा!हा! प्
झोपेतील कृत्ये
In reply to झोपेतील कृत्ये by प्रदीप
सायबाचा पोर्या अकली
किस्सा