"किरण नगरकर....." ३५ वर्षात एकच मराठी पुस्तक... तरीही !
किरण नगरकर.....आज वय ६८.... "सात सक्कं त्रेचाळीस" ही मराठी साहित्याच्या विश्वात मैलाचा दगड ठरलेली कादंबरी आणि Rawan & Eddie (1995), Cuckold (1997), God's Little Soldier (2006) या तीन इंग्रजी कादंबर्या..... बस ! तरीही पहिल्या मराठी कादंबरी पासून ते अलीकडील २००६ मध्ये प्रकाशित झालेल्या इंग्रजी कादंबरीच्या वाटचालीपर्यंतचा किरण नगरकर यांचा प्रवास म्हणजे साहित्यातील एका वेगळ्या धर्तीचा चालता बोलता इतिहास म्हटला पाहिजे.
काल रात्री मी Cuckold ही त्यांची "साहित्य अकादमी" पारितोषिक विजेती कादंबरी वाचून संपविली आणि जरी कादंबरीचा विषय सोळाव्या शतकातील एका घटनेवर आधारित असला तरी तिची स्पंदनं कालातीत आहेत. आपल्या संस्थाळावरील प्रत्येक सदस्याने आवर्जून वाचावी अशी ही अजोड कलाकृती असून कादंबरीवर भाष्य करताना ज्येष्ठ पत्रकार श्री खुशवंत सिंग यांनी लिहिले आहे, "...मराठीतील प्रथम श्रेणीचे लेखक किरण नगरकर यांची इंग्रजीतील 'ककल्ड' ही कादंबरी मी भारतीय लेखकांच्या कादंबर्यात सर्वोत्कृष्ट मानतो...".
केवळ मराठी भाषेतील साहित्य वाचनार्या वाचकांना किरणची ओळख (किरणला 'अहोजाहो' म्हणूच शकत नाही इतका तो किंवा "ते" आपल्यातील वाटतात... ["लता आशा" यांचा उल्लेखही आपण एकेरी केला तरच मनाला बरे वाटते] किंबहुना त्यानी जर हे लिखाण वाचले ~~ मराठी संस्थाळांना भेटी देणे हा त्यांचा विरंगुळा आहे.... तर मी आणि आपण सर्वच... त्यांना एकेरी संबोधितो याचा खचितच आनंद होईल) फक्त "सात सक्कं त्रेचाळीस" मुळे आहे; त्यामुळे इंग्रजी भाषेतील त्यांच्या तीन पुस्तकांनी त्यांना जागतिक पातळीवर नेऊन ठवले आहे ही खचितच आपण सर्व मराठी भाषिकांना अभिमानास्पद बाब आहे.
कोण हे "किरण नगरकर"? असा प्रश्न जर कुणाला पडला असेल, तर त्यांच्यासाठी तसेच त्यांच्यावर प्रेम कारणार्या (आणि असे खूप आहेत...) त्यांच्या वाचकासाठी, Cuckold च्या निमित्ताने किरणवर हा छोटासा लेख प्रपंच.... जो आपण स्वीकारावा ही विनंती.
१९४२ मध्ये मुंबई येथे ब्राह्मो समाजाची (प्रार्थना समाज तत्वाशी निगडीत...) तत्वे मानणा-या कुटुंबात किरणचा जन्म झाला. त्यांचे आजोबा ब्राह्मो समाजाच्या चळवळीशी अत्यंत जवळीक साधून होते, इतकेच नव्हे तर शिकागोच्या धर्म परिषदेसाठी (१८९३ व १९०२३) अमेरिकेला गेले होते. घराची "अत्यंत" म्हणावी अशी गरिबी त्यामुळे "मी अशा कुटुंबात वाढलो कि जिथे दोन वेळेच्या अन्नाची तरतूद कुटुंब प्रमुखाला रोज करावी लागत असे." असे असलेतरी किरणच्या वडिलांना शिक्षणाचे महत्व खूप वाटत असल्याने शिक्षणाची आबाळ झाली नाही. चौथी पर्यंत मराठी माध्यम पण तेथून पुढे चित्पावन ब्राह्मण कुटुंबीयांनी वाळीत टाकलेल्या नगरकर कुटुंबाला इकडून तिकडे तिकडून इकडे फिरावे लागले असल्याने एक ख्रिश्चन संस्थेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत किरणला प्रवेश देण्यात आला आणि तिथून सर्वच शिक्षण इंग्रजी माध्यमातूनच पूर्ण केले. पुण्याचा फर्गसनमधून पदवी तर मुंबईच्या एस. आय. इ. एस. कॉलेजमधून इंग्लिश विषयात पदव्यत्तर. पुणे काय मुंबई काय, किरण मितभाषी आणि दारिद्रयामुळे स्वताला सतत मागेच ठेवत असल्याने या दोन्ही ठिकाणी खास मैत्री अशी कोणाशीच झाली नाही, एकटेपणा होता, मात्र त्यामुळे वाचनावरच जास्त भर. एम. ए. नंतर त्याच कॉलेजमध्ये एक वर्ष तात्पुरत्या स्वरूपाची प्राध्यापकाची नोकरी, त्या क्षेत्रात किरणचे मन रमने शक्यच नव्हते पण तिथे विलास सारंग, करंदीकर, पार्थसारथी अशा नामावंतांशी त्याचा परिचय झाला आणि सारंग यांच्यामुळे नंतर थेट दिलीप चित्रे मित्र बनला. किरणच्या लेखन शैलीवर चित्रे खूष होते.....(तो पर्यंत किरण फक्त स्वैर लेखन करून स्वत:जवळच ठेवी व असेच मित्रासमवेत वाचन....गप्पांच्या स्वरुपात...). दिलीपने "अभिरुची" मध्य लेखन करण्यास किरणला प्रवृत्त केले. अभिरुचीचा साहित्यक्षेत्रात सत्यकथेसारखा दबदबा ! एक कथा किरणने लिहिली आणि ती अभिरुचीमध्ये प्रसिद्ध झालीही... मोबदल्याचा तर प्रश्न नव्हताच पण आपणाला "मराठी" लिहिता येते याचा किरणला आनंद झाला....कारण सर्व शिक्षण इंग्रजीमधून झाले असल्याने मराठीविषयी खात्री नव्हती. त्या कथा अनुभवावरून बरेच दिवस डोक्यात घोळत असलेले विषय किरणने लिहिण्यास सुरुवात केली....साल १९६७....आणि कादंबरीला नाव दिले "सात सक्कं त्रेचाळीस..."
पण आता नोकरीचे वांधे झाले होते.... आणि मुंबईच्या कॉलेजमध्ये तर शिकविणे आता शक्य नसल्याने किरणने पुणे गाठले आणि तिथे "इंडिअन रायटिंग टुडे" इथे दरमहा रुपये २३० इतक्या "मोठया" पगारावर टेबल लिखाणाचे काम सुरु केले. मुंबईत पगार ३५० मिळत होता, पण आता १०० रुपले पगार कमी झाला असल्याने दोन वेळेच्या खाण्याची भ्रांत पडू लागली आणि साहजिकच पुढील तीन चार वर्षे किरणमधील "लेखक" ठार झोपलाच. १९६७ ला लिहिण्यास घेतलेली "सात सक्कं त्रेचाळीस" ला प्रसिद्धीचे तोंड पाहण्यास १९७४ साल उजाडावे लागले. पण कादंबरी प्रसिद्ध झाली.... "मौज" परंपरेत अजिबात गाजावाजा न करता..... आणि किरण आपण "लेखक" झालो ही बाब विसरूनही गेला. मौजे मुळे टीकाकारांनी किमान नोंद तरी घेतली, पण सर्वसामान्य मराठी वाचकबाबा अजूनही "स्वामी", "ययाती", "मृत्युंजय", इ.इ. यांच्या कोशातून बाहेर पडायला तयार नव्हता. हसवीण्यासाठी पु. लं. होतेच, १० ते ५ नोकरी करता करता लोकलमध्ये, बसमध्ये वाचनाची भूक भागविण्यासाठी व. पु. काळे, काकोडकर, दळवी आणि तमाम महिला लेखक वर्ग .... सुळसुळीत पाच रुपयेवाली "हंस". "मोहिनी", "नवल" होतेच. जास्तीतजास्त "दिवाळी" अंक हेच मराठी साहित्य मानणारी मध्यमवर्गीय कुटुंबे होतीच, जोडीला अधून मधून दलित हुंकार चालूच..... अशा परिस्थितीत जो महाराष्ट्र अजून "कोसला"च्या धक्क्यातून बाहेर पडला नव्हता, त्याला "सात सक्कं त्रेचाळीस" चे गणित काय आहे हे उमजून घेणे अंमळ गरजेचे वाटले नाही. तरीही "ठणठणपाळ" ने आपल्या एका "खास" अशा लेखाद्वारे या कादंबरीची त्यांच्या लकबीत स्तुती केली (किंवा चिरफाड केली असे म्हणू या....) पण ब-याच लोकांनी निदान त्यामुळे का होईना ही कादंबरी हाताळली. किरणने तर आता मराठीला रामराम ठोकलाच होता. तरीही त्यांची त्या कादंबरीतील "कुशंक" आणि "रघु" ही दोन पात्रे मनात आजदेखील घर करून राहिली आहेत.
विशेष म्हणजे मी स्वत: किरण नगरकर यांची "Rawan and Eddie" ही १९९५ मध्ये प्रसिद्ध झालेली इंग्रजीमधील कादंबरी प्रथम वाचली आणि हिच्या गुणवैशिष्ट्याबद्दल माझे या विषयातील मार्गदर्शक (माझे मामा) यांच्या समवेत चर्चा करीत असताना त्यांनीच मला "सात सक्कं त्रेचाळीस" अगोदर वाच मग नंतर आपण किरणबद्दल बोलू असे सुचविले.... ही गोष्ट साधारणत: १९९९-२००० ची.... त्यांच्या सूचनेनुसार मराठी भाषेतील तो चमत्कार मी वाचला... नव्हे अक्षरश: खाल्ला.... आणि किरणबद्दल काय बोलू, काय वाचू, कुठून मिळवू असे होऊन गेले.
प्रकाशन व्यवसाय म्हणजे काय, तो कसा चालतो, त्यातील आर्थिक बाजू कशा व कोणी सांभाळायच्या या बाबतचे किरणचे ज्ञान "अगाध" असल्याने "सात सक्कं त्रेचाळीस" ची आवृत्ती कितीची निघाली, दुसरी निघणार की नाही, "रॉयल्टी" चितळे मिठाई आपणाला भागवत देणार की नाही... या बाबीपासून तो अनभिज्ञच राहिला. त्याला मौजेकडून सांगण्यात आले कि १००० ची आवृती होती व ती संपण्यास "मौज" परंपरेनुसार २१ वर्षे लागली. त्यामुळे मराठीमध्ये कसला आला आहे अस्तित्ववाद आणि कुठली आली आहे शब्दमाध्यमातून क्रांती !!! (कवितेची तर ३०० ची आवृत्ती निघते असे म्हणतात..... बाप रे....३०० ? आणि ती संपण्यास परत २० वर्षे !! आता केशवसुत जरी असले तर ३०० चोपड्यातून कोणत्या प्रकारची क्रांती इथे रुजायची आणि फुलायची ???) साहजिकच आपणाला लेखनातून जे काही सांगायचे ते "इंग्लिश" या जागतिक पातळीवरील भाषेतूनच सांगितले पाहिजे असे किरणने मत बनिवले आणि त्या क्षणापासून त्याची लेखणी त्या प्रांतात भ्रमण करीत आहे.
१९७६-७७ च्या आणीबाणीच्या काळात किरणने महाभारतातील काही घडामोडीवर आपल्या शैलीत भाष्य करणारे "Bedtime Story" नामक नाटक लिहिले आणि हिंदू धर्माचा अपमान अशी ओरड त्या काळी इतकी झाली की रा. स्व. संघ, हिंदू महासभा, तसेच शिवसेनेने त्यावर बंदी पुकारली.... काम कारणार्या कलाकारांना धमकी देण्यात आली.... साहजिकच नाटकाच्या तालिमी बंद पडल्या. सेन्सोर बोर्डाने ७८ "कट्स" सुचविले.... ते श्री. मे. पु. रेगे आदींच्या मध्यस्थीने २८ पर्यंत खाली आले, पण नाटकात काम करायला कुणीच तयार नसल्याने ते बासनात गेले, ते कायमचेच. याच दरम्यान किरणची आणि अरुण कोलटकर यांची जाहिरात क्षेत्राच्या निमित्ताने ओळख झाली. दोघेही आचार विचाराने समानधर्मी असल्याने साहजिकच मैत्री झाली आणि ती फुलली देखील. जाहिरात क्षेत्रात किरणचा जम बसत असतानाच त्याला १९९१ मध्ये रॉकेफेलर शिष्यवृत्तीवर शिकागो येथे जाण्याची संधी मिळाली. तिथे पडेल ती कामे करून किरणने स्वत:ला पूर्णवेळ लेखन कार्याला वाहून घेतले. "रावण अॅन्ड एडी" व नंतर "ककल्ड" या निर्मिती तिथल्याच. इंग्रजी भाषेत लिखाण केले ते पैसे मिळतात म्हणू असे नव्हे तर किरणला त्या भाषेची पडलेली भुरळ होय. असे असले तरी किरण नगरकर, अरुण कोलटकर, विलास सारंग यांनी आपल्या मराठी मातीचा गंध सोडून दिलेला नाही.....(विशेषत: कोलटकरांची "जेजुरी" वाचताना ही बाब प्रकर्षाने अनुभवायला मिळते...) तिघांच्याही लेखनाला इथल श्वास, नाद आणि गंध आहे.
किरण नगरकरला इंग्रजी भाषा किती वश झाली आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजेच "ककल्ड" ही महाकादंबरी होय. ~~ "मीरा" आपल्या मनातील "मीरा...." ~~ श्री कृष्णालाच आपला प्रियकर, पती, परमेश्वर मानणारी मेराथची राजकुमारी.... ती मेवाडची महाराणी झाली. महाराष्ट्रातच नव्हे तर अखंड भारतात "मीरा" या व्यक्तिरेखेकडे अत्यंत भाऊकतेने पाहण्याचा प्रघात आहे.....अर्थात त्यात गैर काहीच नाही... त्याला कारण भगवान श्री कृष्ण. आता जी कृष्ण भक्त आहे तिला कोण आणि का दोष देणार? पण किरण नगरकर यांनी या कादंबरीत "त्या" दुर्दैवी "युवराज"च्या नजरेतून या प्रकरणाकडे पाहिले आहे. ... पण म्हणून ही काही खास "ऐतिहासिक" कादंबरी नाही, तर ती आहे कालातीत.... आजही पती, पत्नी आणि प्रियकर यांच्यासंबंधी भोवर्यातील गतिमानता आणि परिणाम जाणवून देण्याचे कार्य "ककल्ड" करते.... नव्हे वाचकाना खिळवून ठेवते.
श्रीमती रेखा सबनीस यांनी "प्रतिस्पर्धी" या शीर्षकाने "ककल्ड" चा अनुवाद केला आहे जो पॉप्युलर प्रकाशन यांनी अतिशय सुंदररीत्या प्रकाशित केला आहे. आपल्या सर्वासाठी किरण नगरकर यांची दोन्ही भाषेतील ही कलाकृती सध्या बाजारात उपलब्ध आहे.
"प्रतिस्पर्धी" च्या मलपृष्ठावर "पायोनियर" चे श्री. मकरंद परांजपे यांची प्रतिक्रिया छापलेली आहे... ते म्हणतात : ".... मी वाचलेल्या कुठल्याही भारतीय लेखकाच्या इंग्रजी कादंबरीपेक्षा "ककल्ड" इतकी वेगळी आहे की तिची विशेष प्रशंसा व उल्लेख करणे मला आवश्यक वाटते. भूतकाळ इतक्या जिवंतपणे उभा करणे एवढेच जरी साध्य मानले; तरीही ही एक महान कादंबरी आहे...."
वाचल्यानंतर निव्वळ कादंबरीच नव्हे तर खुद्द श्री. किरण नगरकर यांच्याबद्दलदेखील तुम्हा सर्वांचे असेच मत होईल.
धन्यवाद.
(एका इंग्रजी संस्थळावर [Another Sub-Continent] संस्थापक संपादक श्री. अर्नब चक्लदार यांनी सन २००५ मध्ये श्री. किरण नगरकर यांची मुंबई मुक्कामी एक प्रदीर्घ मुलाखत घेतली होती, त्यातील काही भागांचा उपायोग या लेखासाठी मी केला आहे, त्या संस्थळाचा मी रीतसर सदस्य असल्याने मला त्या मुलाखतीचा "अभ्यास" उद्देशासाठी वापर करता येतो, त्याबद्दल श्री. अर्नब यांचे मी मन:पूर्वक आभार मानत आहे.......
खरे तर, ती संपूर्ण मुलाखतच कुणीतरी (कधीतरी...) मरठीमध्ये अनुवादित करुन येथील सर्व सदस्यांसाठी दिली पाहिजे, इतकी ती अभ्यासपूर्ण आहे ~~ आपले ज्येष्ठ सदस्य श्री. मुक्त सुनीत हे काम अत्यंत सार्थरित्या करु शकतील असा विश्वास वाटतवर्गीकरण
प्रतिक्रिया
छान ओळख
मी.पा.वरिल एक अत्यंत सुंदर
प्रतिक्रिया
पहिल्यांदाच नाव ऐकतोय.
मला
परिचय
"ककल्ड" ची घाई करू नका.....
चांगला
दुसरी आवृत्ती.....
सुंदर ओळख
कोसला आणि 'सात सक्कं...'
श्री. जंतु,
दोनच ऑप्शन्स...!!
ज्यांना
निरीक्षण
प्रगल्भता ....
कुतुहल
कलन्दर!!....
उत्तम
नगरकरांचे साहित्य ....
अप्रतिम
आउट ऑफ बॉक्स" विचार
७ सक्कं ४३.
प्रतिसाद
"संप्रति कोण हा नवा पुरुषावतार ?"....
किरण
उत्सूकता लागली आहे. ....!
लेखक आणि पुस्तक ओळख . .उत्तम
उत्सुकता निर्माण....!!
चित्पावन
वाळीत>? हे नविनच ऐकतो आहे...
वाचले पाहिजे
लेख आवडला
महत्प्रयासाने हे पुस्तक
द एक्स्ट्राज हे रावण अँड
मीराबाई ही मेराथची राजकुमारी
"सात सक्कं त्रेचाळीस" अजिबात
"सात सक्कं त्रेचाळीस" अजिबात
मी अजून सात सक्कं त्रेचाळीस
ही कादंबरी निपोंची पण भयानक
+१
किरण नगरकरांवरील लेख आठवला
कोसला आवडलेली असल्याने 'सात