पुणे ते नासिकः गडकोटांच्या साक्षीने, रेल्वेच्या मार्गाने
पुणे ते नासिक व्हाया पनवेल हा रेल्वे मार्गाचा प्रवास इतरांसाठी सर्वसाधारणपणे लांबचा (बसमार्गापेक्षा १ तास जास्त) व कंटाळवाणा असला तरी आम्हा सह्याद्रीप्रेमींसाठी खूपच आनंददायक कारण ह्या सबंध प्रवासात सह्यधारेवरील २ घाट व अनेक किल्ले व सुळके यांचे उत्कट व उत्कृष्ट दर्शन होते.
रेल्वेने पुणे सोडताच दापोडी नंतर डावीकडे सिंहगडाचे त्याच्या चिरपरीचित मनोर्यासह दर्शन होते ते थेट देहूरोड पर्यंत. आता उजवीकडे तुकोबारायांच्या वास्तव्याने पावन झालेला भंडारा डोंगर दिसू लागतो व लगेचच डावीकडे घोराडेश्वराची लेणी लक्ष्य वेधून घेतात. थोड्याच वेळात गाडी कामशेत ओलांडते व आता डावीकडे विसापूर किल्ल्याची लांबलचक तटबंदी दिसते विसापूरावरून आपली फिरलेली नजर जाउन स्थिरावते ती थेट लोहगडावरच. लोहगडाला असलेले नेढे, मुख्य किल्ला, विंचू काटा व त्याच्या पायथ्यातील सदाहरीत वन तिथे केलेल्या अनेक सफरींची आठवण करून देते. आपल्याउजवीकडेने कार्ल्याची लेणी साथीने असतातच. आता रेल्वेगाडी घाटमाथ्यावर आलेली असते. खंडाळा सोडताच डावीकडे नागफणीचा भव्य कातळसुळका दर्शन देतो व उजवीकडे राजमाचीचे आवळेजावळे जोडकिल्ले श्रीवर्धन व मनरंजन दिसतात पण ते अगदी थोड्या काळासाठी. अर्थात राजमाची किल्ला त्याच्या जायच्या संपूर्ण मार्गासह बराच वेळ आपली साथ करतो ते मात्र नासिक वरून येतांना कारण हा घाटातील जायचा व यायचा मार्ग हा वेगळा झालाय तो मधील एका डोंगररांगेमुळे.
आता अनेक बोगद्यांमधून गाडी जात असते व बाहेर येताच दर्याखोर्या दिसू लागताच घाटात मधूनच काही लेणी पण दिसतात.(जाणकारांनी यावर अधिक प्रकाश टाकावा) .गाडी कर्जत ला उतरत असतानाच सोनगिरीचा गोलाकार कातळ लक्ष वेधून घेतो व डावीकडे दूरवर कर्नाळा किल्ला सुळक्यासह मिरवतांना दिसतो. उजवीकडे ढाकचा बहिरी त्याच्या कळकराय सुळक्यासह अतिशय भव्य दिसतो. निरखून पाहिल्यास बहिरीच्या पोटातील त्याची गडदही (गुहा) दिसते.
गाडी आता पनवेलच्या दिशेने निघालेली असते. चौक वरून जातांना डावीकडे माणिकगड त्याची भव्य कातळटोपी घालून बसलेला असतो. आता उजवीकडे इर्शाळचा सुळका प्रबळगडाचे भव्य पठार व त्याला चिकटलेला कलावंतीण सुळका व त्यापाठीमागे माथेरान लक्ष्यवेधी ठरते. पनवेल ओलांडताच आता उजवीकडे चंदेरी, म्हसमाळ व नवरा नवरीची रांग दिसते. हे जातात न जाताच तोच पुढे मलंगगड त्यावरील देवणीच्या उत्तुंग सुळक्यासह सामोरा येतो.
गाडी आता कल्याणपर्यंत आलेली असते. कल्याण खाडीकिनारी असलेला व शहरीकरणामुळे हरवला गेलेला दुर्गाडीचा किल्ला दिसतो. येथेच महारा़जांनी त्यांच्या पहिल्या आरमाराची पायाउभारणी केलेली आहे. कल्याण सोडतांच काही वेळातच डावीकडे माहूली किल्ल्याची एक बाजू नजरेसमोर येते. वजीराचा एकूटवाणा सुळका अतिशय सुंदर दिसतो. वाशिंद वरून गाडी पुढे जाताच आसनगावच्या इथे माहूली त्याच्या अंगावरील अनेक सुळक्यांसह व त्याच्या भंडारदुर्ग व पळसगड ह्या उपकिल्ल्यासह संपूर्ण सामोरा येतो. माहुलीचे ब्रह्मा, विष्णू, शंकर, नवरा, नवरी, करवली, भटोबा आदी उत्तुंग सुळके सहजी ओळखू येतात. बराचा काळ माहुली आपली रेल्वेमार्गाने साथ करतो. गाडी आता कसारा घाटात चढू लागते. आता डावीकडे हरिहर किल्ला त्याच्या विशिष्ट आकारामुळे सहजच ओळखू येतो. त्याच्या शेजारीच ब्रह्मा डोंगर दिसतो.
कसारा घाटातून त्यातील बोगद्यांतून इगतपुरीला वर येताच इतका वेळ उजवीकडे साथ करत असलेली सह्याद्रीतील सर्वोच्च रांग आता ठळकपणे सामोरी येते. कुलंग, मधील मदनगड व त्या शेजारील भव्य अलंगगड हे तिघेहि पावणेपाच हजार फूट उंचीवरील गड आपल्या उत्तुंग कातळभिंतीमुळे लक्ष वेधून घेतात. त्यावरून नजर पुढे सरकताच कळसूबाईच्या सर्वोच्च शिखराचे दर्शन होउन आपली मान आदराने झुकते पण ती थोडाच काळ कारण नजर त्या उत्तुंग पर्वतरांगेचा वेध घेण्यास आसुसलेली असते.
आता रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूस गिरिशिखरांचे दर्शन होत राहते. डावीकडे कावनई किल्ला दिसू लागतो व त्यापुढेच ब्रह्मगिरी, अंजनेरी, घारगड त्याच्या जवळील डांग्या सुळक्यासह दृग्गोचर होतात. हे सर्व दिसत असतानाच लहाविट स्टेशनचा उजवीकडे कळसुबाई रांगेच्या पूर्व पट्ट्यांतील किल्ले ठळकपणे नजरेसमोर येतात. बितनगड, लांबच लांब पट्टा उर्फ विश्रामगड किल्ला, त्यापुढे औंढा किल्ला त्याच्या काळ्याकभिन्न सुळ्क्यासह दिसतो व त्यापुढे आडगड, डुबेरगड दिसतात.
देवळाली स्टेशनच्या उजवीकडे बहुल्याची कातळटोपी लक्ष वेधून घेते व गाडी नासिकरोड स्थानकात शिरत असतानाच भरपूर किल्ले बघून पोट भरलेले असतांनाच स्वीट डिश म्हणून डावीकडे पांडवलेण्याचा त्रिकोणी डोंगर सह्याद्रीच्या ह्या अनोख्या मेजवानीची सांगता करतो.
--------------------------------------
(याचसाठी पुन्हा पुन्हा प्रवास केलेला) वल्ली
प्रतिक्रिया
या दुर्ग
पनवेल -कर्जत
त्या बोगद्यात
बरोबर
मस्त!!
तो प्रवास सुंदर होता!
वेगवान
रेल्वेने
अर्थातच
कुलंग,
रतनगड दिसत नाही
बरोबर,
अहो पेब
चंदेरीचा उल्लेख केला आहे.
झकास
मस्त.
पेब....
हा किल्ले मोरधन..फोटो आम्हीच क्लिक केलाय.
शरभ लई भारी
धन्स शरभ. सुंदर
वल्ली काय म्हणतो ?
या ट्रॅकवर बर्याचदा प्रवास