२१ व्या शतकाच्याबाबतीत असे म्हटले जात आहे कि विज्ञान कल्पनेपेक्षाही जास्त प्रगती करणार आहे आणि संपूर्ण जगच आता एक छोटेसे खेडे वाटावे अशा रीतीने जुळले जाणार आहे किंबहुना ती प्रक्रिया काही प्रमाणात सुरु झाली आहे असे म्हणण्यासही प्रत्यवाव नसावा. आंतरजालीय जादूने ही किमया तर केली आहेच, पण येथून पुढेही अविश्वसनीय अशा प्रगतीची दारे मानवासमोर उघडली जाणार आहे यात कोणत्याही सुशिक्षित मनाला संदेह न वाटण्यासारखी सध्या स्थिती आहे.
अशा पार्श्वभूमीवर या निमित्ताने आपण असे का विचार करू नये कि आपल्या रुढी, परंपरा, विधी, धर्मात घट्ट रुजून बसलेल्या काही संतापजनक चालीरीती आता नव्या दृष्टीने तपासून मगच आचरणात आणल्या पाहिजेत? मी असे म्हणणार नाही कि "जुने सर्वच जाळूनी किंवा पुरुनी टाका".... पण निदान आपल्या वैज्ञानिक विचाराशी सुसंगत नसणा-या काही बाबींना पूर्णविराम देणे गरजेचे आहे असे मत मांडले तर त्याला कुणी 'धर्म बुडव्या' म्हणेल काय?
घरात मृत झालेल्या व्यक्तीची काही इच्छा अतृप्त राहिली आहे किंवा असेल या समजुतीतून निर्माण झालेली (नव्हे तर पक्की रुतून बसलेली) प्रथा म्हणजे "पिंडविधी " आणि त्यातील "कावळ्याची" अहम भूमिका ! या अनुषंगाने आलेले दोन अनुभव व यातील मला (वैयक्तिकरित्या) जाणीवलेले फोलपण आपणासमोर मांडीत आहे.
डिसेंबर मध्ये एक व फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात एक अशा दोन मृत्यू घटना माझ्या परिचयाच्या संदर्भात घडल्या. पहिला मृत्यू खुद्द माझ्या नात्यातील एका साधारणत: ४०-४२ वर्षाच्या पुरुष व्यक्तीचा ज्याची अति मद्यप्राशनामुळे दोन्ही फुफुसे बिलकुल निकामी झाली होती व त्याचे मरण अटळ होते. तर दुसरे फेब्रुवारी महिन्यातील.... माझ्या मित्राचे आजोबा, ज्यांचे वय ८० च्या पुढील व ज्यांनी आपले आयुष्य अत्यंत सुखी समाधानाने व्यतीत केले आहे असे होते. पहिली व्यक्ती - माझा नातलग - हा "मराठा" समाजातील, तर मित्राचे वडील कोकणस्थ ब्राह्मण ! पहिल्याने आयुष्याचा अगदी कचरा करून टाकला होता. "प्रापंचिक जबाबदारी" नावाची भाजी कुठल्या बाजारात मिळते याचा याला उभ्या आयुष्यात पत्ता लागला नाही, किंवा त्यानेही बेफिकीरपणे त्याचा विचारही केला नाही. आमच्या "मराठा" समाजात एक पलायनवादी (सु?) विचार आहे - तो असा - "जाऊ दे रे, अजून लहान आहे, जरा इकडे तिकडे होणारच की, एकदाचे लग्न करून टाका, मग बघा गडी कसा वळणावर येतोय ते !" आता हा लेकाचा कधी "सरळ" रस्त्याने चाललाच नाही, तर मग लग्नानंतर "वळणावर" कसा येईल यावर भाष्य करायला कुणी पुढे येत नाही. मराठा जातीत तर "मुलगी" म्हणजे कळसूत्री बाहुलीच असते (काही सुशिक्षित घराण्यात अपवाद असतीलही, परंतु ती उदाहरणे म्हणजे "अपवाद" ही संकल्पना सिद्ध करायापुरतीच). थोरली मंडळी ठरवतील त्या नगाबरोबर मांडवात उभे राहायचे, माळ घालायची, त्याच्या नावाने कुंकू लावायचे, आणि दुस-या दिवसापासून त्या एकत्र कुटुंबातील एक "आवाज न करणारे भांडे" होऊन पेचून जायचे. आता लग्न झाल्यावर हा नातेवाईक "सुधारेल" म्हणून कुणी गणपती पाण्यात टाकून बसत नाही, किंबहुना असा सल्ला देणारेही आता दुस-या गल्लीत तंबाखू चुना मळायला निघून गेलेली असतात. निसर्गनियमानुसार (तो थोडाच थांबतो?) या बर्ची बहाद्दराला एक नाही तीन मुले (त्यातही दोन मुली) झाल्या व आपले पुरुषत्व सिद्ध झाले म्हणून गडी हरखून टूम झाला. आधीच मर्कट तशात मद्य प्याला म्हणजे काय होईल हे सांगायला यल्लमा देवी व शंकरोबा यायची गरज नसते. शरीराचा नाश झाला (किंवा करून घेतला...) आणि एके दिवशी दिवटी विझून गेली.
दुसरे ते मित्राचे आजोबा. खास कोकणस्थी रूप, करारी चेहरा, चार चौघात फिरायचे त्यावेळीही त्यांचा आवाज आम्हा मित्रांना जाणवायचा, विशेषत: त्यांचे घारे व विलक्षण तेजस्वी डोळे. विनोद (माझा मित्र) व मी प्राथमिक शाळेपासून एकत्र असल्याने त्यांच्या घरी माझी अगदी स्वयंपाक घरापर्यंत ये-जा असायची. इंग्लिश भाषेवर उत्तम प्रभुत्व तर होतेच पण शास्त्रीय संगीतावर त्यांच्याकडून आठवणी ऐकणे हा एक आनंद होता, विशेषत: कुमार गंधर्व आणि पं. मल्लिकार्जुन मन्सूर ही तर त्यांची श्रद्धास्थाने. दोन मुले, दोन मुली. विनोदचे वडील सरकारी वर्ग-१ अधिकारी, तर चुलते नावाजलेले कारखानदार. एक मुलगी कॅनडा येथे लग्नानंतर कायमच्या वास्तव्यास, तर दुसरी बँक अधिकारी आणि पणजी येथे आपल्या संसारात रममाण ! सर्वांची मिळून ६ नातवंडे, तीही उच्चविद्याविभूषित होऊन आपआपल्या क्षेत्रात नावलौकिक मिळविण्यास आतुर ! थोडक्यात काय तर, विनोदच्या आजोबांचे आयुष्य एक अत्यंत यशस्वी म्हणून ओळखले जात असे. जितका घरी मान, तितकाच गावातही. मला तर माहित आहे कि एकदाही कुणी चुकूनदेखील या माणसाविषयी वाईट बोलले नाही.
चला ~~ आता एकाच गावातील या दोन भिन्न व्यक्ती परलोकवासी झाल्या व मरणोत्तर परिस्थिनुसार धर्माविधीही चालले. मी दोन्ही ठिकाणी प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून हजर असल्याने या विधीतील फोलपणा फार म्हणजे फार तीव्रतेने जाणीवला.
कोल्हापुरात "मुक्तिधाम" या ठिकाणी हिंदू धर्मीयांची दहनाची सोय आहे. त्यानुसार या दोन्ही देहांवर विधीनुसार अग्नी संस्कार करण्यात आले व येथे या बाबतीतील पहिला अध्याय संपला. आता रक्षा विसर्जन व पिंड दान....येथून जातीचे चटके बसू लागतात. मराठा समाज ज्या ठिकाणी चिता, त्याच ठिकाणी पिंडदानाचे सोपस्कार करतो, तर ब्राह्मण चिता जरी एका ठिकाणी असली तरी, रक्षा विसार्जानंतर त्या जागेची केवळ पूजा करतात व पिंडदान विधी पंचगंगा नदीजवळील एका विशिष्ठ जागेत साग्रसंगीत रित्या पार पाडतात. असे का? तर याला काही उत्तर नाही, पण जाणकारांच्या मते (हे मी जाणीवपूर्वक माहित करून घेतले....) "मराठा" समाज पिंड दिवशी जे अन्न आणतो ते पूर्णत: "मांसाहारी" असते. म्हणजे त्यात शाकाहारी पदार्थ नसतात असे नाही, असतातदेखील, पण मांसाहाराचे प्रमाण हे जवळ जवळ ८० टक्के असते. माझ्या घरातून देखील आईने मला "त्या" महान आत्म्यासाठी जो शिधा दिला होता त्यात प्रामुख्याने मटण आणि अंडी यांचा दाबून समावेश होता. ब्राह्मण समाजातील आधुनिक पिढी शाकाहार व मांसाहार दोन्ही मान्य करीत असली तरी पिंडदान विधीच्या वेळी "मांस" निषिद्धच मानले गेले आहे आणि धर्म रीतीनुसार त्यात काही वावगे मानायचे कारण नाही. मुदधा असा कि दोन धर्मीय वेगवेगळ्या ठिकाणी हा विधी पार पाडतात.
आता हे "कावळा" महाशय येण्याचे प्रयोजन काय व ते का येतात व त्यांच्या येण्याचा तसेच त्या आत्म्याचा काय संबध? हा विचार बुद्धिप्रामाण्यावादी विचारांच्या कसोटीवर अर्थपूर्ण ठरतो की नाही हा विचार त्या परिस्थितीत येणे शक्य नसते. तरीही (त्यानंतर...) मी जे काही संबधित वाचन केले ती मध्ये या विधीला (तसेच "कावळ्याला") का महत्व दिले याचा उगम लागला, तो थोडक्यात असा कि अतिप्राचीन काळी हिंदू लोक प्रवास करीत असताना पाण्याचे ठिकाण शोधून काढण्यासाठी "कावळ्याचा" उपयोग करीत असत. कावळा हा दिशा-दिग्दर्शक या भूमिकेत काम करतो असा समज इतका पक्का झाला की, मृत्युनंतर र्देखील हे जे कोणी "आत्मा" महाशय आहेत त्यांना स्वर्गाचा रस्ता दाखविण्यासाठी "कावळा" मदत करतो, त्यासाठी चांगले अन्न देऊन त्याचे पोट भरणे हे क्रमप्राप्त असते. पण तत्पूर्वी जर का त्या "आत्म्याची" भूतलावरील एखादी इच्छा अपुरी राहिली असल्यास तो आत्मा कावळ्याला आपल्या नावे ठेवलेले अन्न स्पर्शू देत नाही. असे झाले तर मृतात्म्याचे कुटुंबीय प्रार्थना करतात व मृत व्यक्तीची जी काही शेवटची इच्छा अपुरी राहिली असेल ती लागलीच पूर्ण करण्याची शपथ देतात. या प्रक्रियेनंतर कावळा पिंडास शिवला तर ठीक, नाहीतर वाट पाहून पाहून (किंवा कंटाळून..) दर्भाचा कावळा करून पिंडास स्पर्शले जाते व विधी आटोपला असे मानण्याचा प्रघात आहे.
माझ्या नातालागाविषयी तर त्याच्या कित्येक इच्छा अपु-या राहणे क्रमप्राप्त होते. पाठीमागे तीस-पस्तीस वर्षाची गरीब गायीसारखी दिसणारी त्याची विधवा पत्नी, शाळेत शिकणा-या दोन मुली, एक मुलगा ज्याचे भविष्य आता पूर्णत: अंध:कारमय, गावात स्वत:चे घर नाही, बँक आकडा शून्य, दागदागिन्याचे तर नाव देखील काढायला नको....एकूणच भयावह परिस्थिती !! अशावेळी तर त्याच्या आत्म्याने कावळ्याला अन्नाच्या त्या ढीगास चोंच लावण्यापासून अटकाव करायला हवा होता. पण नाही, मटण, मासे, अंड्यांचा तो भला मोठा ढीग, (शिवाय... दारू तर अपरिहार्यच...कारण विचारू नये !!) यांची पिंड दान नावाखाली इतकी रेलचेल होती की कावळ्यांच्या कौरव सेनागत लोळ, लोक नमस्कार करून दूर होताच, विजेच्या वेगाने तुटून पडला. दहा मिनिटांच्या आतच त्या पिंडाचा/अन्नाचा सुफडासाफ झाला. लोक ही आनंदात.... कारण "व्वा व्वा... बिचा-याची कोणतीही इच्छा बाकी राहिली नव्हती. गेला सुखात !" साला, सुखातच जाईल ना, इतके चमचमीत खायला (व प्यायालादेखील) मिळाल्यानंतर !!
आता या ब्राह्मण आजोबांचा किस्सा. वर उल्लेख केल्याप्रमाणे जिवंतपणी इतके सुखासमाधानात आयुष्य व्यतीत केलेल्या त्या देवमाणसाची कोणतीही इच्छा बाकी राहिली असल्याचे प्रमाण नव्हते. मुलेबाळे तर सोडाच पण नातू नात देखील अत्यंत सुखी आणि जीवनात यशस्वीरीत्या कालक्रमना करीत असताना त्यांची कसलीही इच्छा राहणे संभवत नव्हते. पण अशा परिस्थितीतदेखील विनोदचे समस्त कुटुंब सकाळी १० ते दुपारचा १ वाजे पर्यंत "मिस्टर क्रो" यांची वाट पाहत घाटावर ताटकळत बसून होते. कावळे तर पलीकडील "मराठा" विभाग मध्ये गर्दी करून राहिले होते, त्यांना तर तेथे स्पेशल नॉन व्हेज डिशेस मिळत होत्या तर ते इथे "बुळबुळीत भेंडी दही भात" खायला कशाला येतील? मी त्या परिस्थितीतदेखील विनोदाला यातील फोलपणा समजावून सांगत होता, पण तो बिचारा पडला त्या कुटुंबातील अनेकापैकी एक, तर त्याला असा काही वेगळा सूर असणे शक्य नव्हते. एक नंतर (तिकडे मराठ्यांचा "दंगा" संपल्यानंतर...) कसाबसा एक कावळा मेहेरबानी केल्याच्या आविर्भावात आला, पण त्या महाराजांचे पोट मटण खा खाऊन तुडुंब भरले असल्याने साहजिकच त्याला "दही भातात" काही खास इंटरेस्ट असेल असे वाटत नव्हते आणि झालेही तसे ! इकडे तिकडे दोन चार चकरा त्याने मारल्या पण पिंडास चोंच नावाचा अवयव लावला नाही. भटजींनी "चला सर्वांनी पुढे या आणि म्हणा 'आजोबा, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतो'" आता त्या स्थितीतही मला विस्मय वाटला की, तेथे असलेल्या विनोदच्या सर्व कुटुंबियांना माहित होते कि आजोबांची कोणतीही इच्छा राहणे शक्य नव्हते. पण आता इलाज नव्हता व अशा परिस्थितीत भटजी बुवा जे कांही सांगतील ते विना तक्रार पुरे करणे एवढेच त्यांच्याजवळ शिल्लक होते, व त्या प्रमाणे त्यांनी नमस्कार चमत्कार करून केलेही. पण इल्ला !! दीड होत आला तरी कावळा काही त्या पिंडास शिवला नाही, फक्त पुढे मागे करीत राहिला व थोड्या वेळाने निघून गेला, त्याचे पिंडाजवळ जाणे हेच "तो पिंडाला शिवला" असे मानून झटकन भटजींनी बाकीचे विधी आटोपले व सर्व (म्हटले तर समाधानाने, म्हटले तर खिन्नपणे...) घरी परतले.
आता या दोन घटनातील विरोधाभास लक्षात घेतला तर, अशा प्रकारच्या विधीत काही तथ्य आहे का हा सवाल माझ्यासमोर त्या त्या वेळी उभा ठाकला होता व माझ्या परीने माझ्या अनेक शिक्षकांना तसेच शहरातील काही नामवंत समाजसुधार विचारांच्या व्यक्तींना भेटून त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला होता. अशावेळी काहीतरी धर्माचे कारण सांगून बोळवण करण्यात येते, तशी माझी झालीही. पण आता येथील सदस्यत्व घेतल्यानंतर असे जाणवले की हे ठिकाण अशा विचारांचा मागोवा घेण्यासाठी अत्यंत योग्य आहे. तेंव्हा हा अनुभव वाचल्यानंतर आपलेही या बाबतीतील बहुमोल असे विचार वाचण्यास मला खचीतच आनंद होईल.
प्रतिक्रिया
हे विधी, या
रानटी माणसाला सुसंस्कृत ..... !!
कै च्या कैच!
+१
थोडा वेळ द्या...
काही अंशी सहमत
काही न करणे.....!
गैरसमज नाही
माझाही अनुभव
सर्वपित्री अमावास्येला....!
सहमत
अरेच्चा!
कावळ्याने
कावळ्याने खाल्ले असतील....
इंद्रजीत
".....अजुन ते पचलेले नाहीत"...
माझा अनुभव..
सास-यांच्या मृत्यूची तिथी.....
किस्से
प्रतिसाद
...असे
"......हिताला
काही
धर्म स्थापनेमागचा हेतू (माझ्यामते तरी)
चांगला (गमतीदार! ) विषय ...
असा विचार केला तर...?
अंधश्रद्धा आणि विज्ञानवाले ....
चांगले अनुभवकथन
एक प्रश्न
लग्नाचीही
समाजापेक्षा
सहमतच
>>नोंदणी
लग्नाची प्रथा....!!
नाही
कोर्ट मॅरेजचा पर्याय
नोंदणी पद्धतीने विवाह
कावळ्यांच्या बाजूने विचार करू - पक्षी तज्ञांचा खुलासा अपेक्षित
पक्षितीर्थ या ठिकाणी एक पक्षाचे जोडपे ...
स्वानुभव
कावळ्यांव
अवडंबर नकोच .. !
गतानुगतिको लोका:
हिंदू धर्मातील श्राध्द संकल्पना....!
गतानुगतिको ...
गतानुगतिको ...
परंपरा आणि रुढी
मुद्दा !!
पिंडदान
".......