मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अपव्यय

नितिन थत्ते · · काथ्याकूट
काही वर्षांपूर्वी भाभा अणुशक्ती केंद्राने खार्‍या पाण्याचे रूपांतर गोड्या पाण्यात करण्याचे रिव्हर्स ऑसमॉसिस तंत्रज्ञान विकसित केले असल्याचे वाचले होते. त्यावेळी देशी तंत्रज्ञांनी यश मिळवल्याचा अभिमान वाटला होता. पुढच्या काळातील पेय जलाच्या टंचाईवर उत्तम उपाय असे जाणवले होते. नंतर त्यांनी हे तंत्रज्ञान अल्प किंमतीत खुले करून दिल्याचेही वाचले होते. या तंत्रात एका सूक्ष्म छिद्रे असलेल्या पडद्यातून (Membrane) खारे पाणी पास केले जाते पाण्यातील क्षार त्या पडद्यातच राहतात आणि गोडे पाणी पलिकडे जाते. नंतर त्या पडद्यात अडकलेले क्षार 'धुवावे' लागतात. त्यासाठी काही पाणी वाया जाते. तरीही भारतात बर्‍याच भागांत गोड्यापाण्याची उपलब्धता कमी आहे अशा भागात हे वरदान आहे. समुद्राजवळच्या प्रदेशांत तर पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष पूर्णपणे संपुष्टात येऊ शकते. सध्या मी रहात असलेल्या गेस्टहाऊसमध्ये या तंत्रज्ञानावर आधारित आर ओ फिल्टर नवीनच बसवलेला आहे. त्यातून अतिशय सुंदर गोडे पाणी मिळते. पण त्याचे ऑपरेशन पाहून संशय आला. त्या फिल्टरला एक ड्रेन पाईप आहे. ज्यातून हे 'मेम्ब्रेन धुणारे' पाणी बाहेर येते. संशयातून मोजणी केली तेव्हा धक्कादायक निरीक्षण आले. जेव्हा मी एक लीटर पाणी पिण्यासाठी त्यातून काढतो तेव्हा चार लीटर पाणी ड्रेन पाईप मधून वाहून जाते. हे बहुधा ठराविक कालावधी नंतर मेंब्रेन धुण्याची कटकट नको म्हणून केले असावे. कुणा मिपाकरांच्याकडे असे फिल्टर असतील तर त्यांतूनही इतके पाणी वाया जाते का? गोड्या पाण्यासाठी चौपट पाणी वाया घालवणे योग्य वाटते का? तुम्हाला काय वाटते? रोगापेक्षा उपाय भयंकर आहे असे वाटते. दुसरे म्हणजे बहुतेक बाटलीबंद पाण्याच्या बाटल्यांवर आतील पाणी याच तंत्रज्ञानाने 'शुद्ध' केले असल्याचे लिहिलेले असते. अशा बातल्या भरण्याच्या ठिकाणी तर केवढे पाणी वाया घालवले जात असेल !!!

वाचन 2795 प्रतिक्रिया 0