युरो ४ वा भारत ४ मानक पूर्ण करू शकत नसल्याने मारूती ८०० हे मॉडेल भारतातील प्रमूख शहरांतून बंद
करण्यात आले आहे. लवकरच तिची निर्मितीही थांबवण्यात येईल असे मला वाटते.
१९८४ पासून अतिशय लोकप्रिय असलेल्या ह्या गाडीचा प्रवास आता थांबत आहे. भारतातील चार-चाकी वाहनविश्वात
क्रांतीचा अग्रदूत असलेली ही कार एकेकाळी अनेक लोकांची ड्रीम्-कार होती. त्याअगोदर सर्वसामान्यांना उपलब्ध असलेल्या गाड्या म्हणजे
प्रिमियर पद्मिनी, अॅम्बॅसिडर, कॉन्टेसा व जीप. (काही काळ स्टॅन्डर्ड) त्यातली अॅम्बॅसिडर व कॉन्टेसा आरामदायी असल्या तरी मायलेजचा
विचार करता फक्त सरकारलाच परवडत असत किंवा ऊस बागायतदार वा साखरसम्राटांनाच (एकूण एकच!). जीपही शिकारी, पोलीस, गुंड व
गावाकडचे शेतकरी ह्या मंडळींच्या आवडीची. म्हणजे उरली फक्त पद्मिनी!
पद्मिनी पांढरपेश्यांची लाडकी असली तरी तिच्यात कैक त्रूटी होत्याच. एकतर मोठ्ठा आवाज, स्टिअरिंगला डावीकडे असलेले गियर्स्..अन त्यातही
जरासुद्धा नाजूकपणा नाही. रिव्हर्स टाकतांना तर ताकद लावूनच गियर पाडायला लागायचा. डॅशबोर्डही अनाकर्षक, एसीची सुविधा नाही. अगदी कुणी कौतूकाने
बसविलाच तर गाडी अॅव्हरेजमध्ये मार खायची, पिक-अपवर परिणाम व्हायचा. त्यातल्यात्यात एक पंखा चालून जायचा. शेप एरोडायनॅमिक
नसल्याने म्हणा किंवा इंजिनची कमी शक्ती म्हणा, पद्मिनी ताशी ऐंशीच्या वर काही मजल मारू शकायची नाही. घाटात खूप वेळा उजवे पाऊल
वाकडे करून चवड्याने ब्रेक तर टाचेने अॅक्सिलेटर पंप करत गाडी चढवायला लागत असे. हॅन्डब्रेक हा नावालाच होता. अर्थात असल्या सगळ्या गुण
वैशिष्ठ्यांमुळे जो पद्मिनी सफाईदारपणे चालवेल तो कुठलीही गाडी चालवेल असे म्हटले जायचे ते उगीच नव्हे!
एक फायदा मात्र होता पद्मिनीत. तो म्हणजे तिची पुढची सीट सलग आडवी होती, दोन वेगळ्या नव्हत्या. ह्याचा फायदा प्रेमिकांना अन नवविवाहित
जोडप्यांना अवश्य व्हायचा. डाव्या कुशीत प्रियेला कवटाळून उजव्या हाताने सफाईदारपणे व्हील फिरवत महाबळेश्वरला जाण्यात काही औरच मजा असायची.
पण प्रिमियर कंपनीने स्पर्धा नसल्याने वा आळस म्हणूनही असेल कदाचित पण वर्षानूवर्षे तेच मॉडेल भारतीयांच्या माथी मारले. त्यामुळे १९८४ मध्ये मारूती ८०० चे
लोकांनी अतिशय हर्षाने स्वागत केले ह्यात काही आश्चर्य नाही.
आकर्षक रंग, रूप, छोटेखानी आकार, नाजूक स्टिअरिंग, मुलायम बिनाआवाजी गियर, उत्तम एसी, मस्त पिक-अप, फायबरचा झकास
डॅशबोर्ड अशी किती तरी फिचर्स ८०० मध्ये होती जी पूर्वीच्या कुठल्याच भारतीय गाडीत नव्हती. पार्किंगला जागाही फारशी लागायची नाही, छोट्या जागेत
पटकन वळायची ती गुणी ८००! मला आठवते आहे, एकदम सुरूवातीला म्हणजे ८४-८५ मध्ये लाल रंगाच्या ८००ची खूप फॅशन होती आणि त्या गाड्यांचे
नंबर गोळा करण्याची कसलीशी स्पर्धाही होती ज्यात लहान-मोठ्यांनी उत्साहाने भाग घेतला होता.
गरिबांसाठी म्हणून बनवलेली ही कार सुरूवातीला कितीतरी वर्षे श्रीमंतांचीच लाडकी होती. प्रिमियरप्रेमी कितीही नाक मुरडून ' अहो किती हलकी
आहे, पत्रा तर म्हणे फायबरचाच आहे, हायवे वर बाजूने ट्रक गेला तर कलंडते म्हणे' असे शेरे मारत असले तरी लोक ती गाडी घेतच होते.
अर्थात पद्मिनी चालविण्याची सवय असलेल्या लोकांच्या हातात एकदम मारूती ८०० आल्यावर सुरूवातीला अपघात होणे साहाजिकच होते व तसे ते झालेही. त्यामुळे काही
काळ ८०० ला अॅक्सिडेन्ट कार असाही काळा डाग लागला होता. पण जशी लोकांना सवय होत गेली तशी अपघातही कमी होऊ लागले.
१९८४ ते जवळ जवळ २००२ साली अल्टो येइस्तोवर मारूती ८०० ने राज्य केलं असं म्हटलं तर अतिशयोक्ती नाही. किती तरी वर्षे मारूतीला (मला वाटते
ह्युन्डाई सॅन्ट्रो येईपर्यंत) पर्यायच नव्हता. काही काळ तर पाच गियर वाल्या ८०० ने अल्टोलाही चितपट केले होते, म्हणूनच बहुतेक कंपनीने पाच गियरचे
व्हर्जन तातडीने बंद केले. पण त्या गाडीला बराच जास्ती अॅव्हरेज होता हे नाकबूल करता येत नाही.
मीही ही गाडी कॉलेजमध्ये असतांना चार्-पाच वर्षे वापरली होती व त्या गाडीच्या माझ्या मनात त्या दिवसांत असू शकतात त्या सर्वप्रकारच्या आठवणी
दरवळत आहेत. सगळ्याच आज व्यक्त करू शकत नसलो तरी मित्रांबरोबर केलेल्या रायगड, महाबळेश्वर, दिवे-आगर इ पिकनिक्स.. फ्रेशर पार्टीच्या गंमती,
पुरूषोत्तम नाट्यस्पर्धा, चोरून बियर पिण्याचे हक्काचे ठिकाण अश्या कैक गोष्टी आज आठवतात. ह्या आठवणी तश्या फार जुन्या नसल्या तरी आता ती गाडीही माझ्याकडे नाही आणि ते मित्र, ते दिवसही परत येणार नाहीत. एट हंड्रेडही आता कालवश होत आहे. गुडबाय एट हंड्रेड.. तू आंम्हाला खूप काही दिलेस ते विसरणे अवघड आहे!
वाचने
5254
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
८००!
मारुती ८००, येस!
छानच आहे
चोरून बियर
उत्तम जमुन
व्वा दाढे
तुला
In reply to व्वा दाढे by टारझन
सगळ्या
In reply to तुला by रेवती
मोठ्या
In reply to सगळ्या by टारझन
मुकेश
In reply to सगळ्या by टारझन
भलतीच
In reply to मुकेश by देवदत्त
८००सारखाच
माहिती
In reply to ८००सारखाच by संदीप चित्रे
माझ्या माहितीनुसार,
In reply to माहिती by तिमा
लेख
हेच म्हणतो
In reply to लेख by प्राजु
>>सरकारलाच
गाडीचं
दाढे साहेब
सगळ्यांना
सर्व वाचकांना धन्यवाद
just add ZEN to your life!
कालपरवाच