मराठी आणि भाषांतर - ३
भाषांतरकार आणि समीक्षिका म्हणून काम करताना
दुवा: http://www.harmonyindia.org/hportal/VirtualPageView.jsp?page_id=4641
(एकच गुणधर्म दाखवणार्या, पण वेगवेगळ्या संदर्भात वापरल्या जाणार्या ’जेंडर’ आणि ’सेक्स’ शब्दांना मराठीत दोन निरनिराळे प्रतिशब्द नाहीत. मात्र इंग्रजीत (बर्याचदा) नसलेली लिंगबदलाची सोय मराठीतल्या (बर्याचश्या) नामांसाठी उपलब्ध आहे. उदा. समीक्षक - समीक्षिका, लेखक - लेखिका, नर्तक - नर्तकी, अभिनेता - अभिनेत्री (मग ’अभियंता - अभियंत्री’पण की काय?! :)) इ.
ही सोय वापरणं काही जणांना अपमानास्पद वाटतं. ’मी ’अॅक्ट्रेस’ नाही, अॅक्टर आहे’ असं शबाना आझमीचं या संदर्भातलं प्रतिपादन तुम्हांला माहीत असेलच. असा उद्मेखून लिंगनिर्देश करणं तिला अमान्य असल्यानं, आणि कामाच्या बाबतीत या गोष्टीचा संदर्भ टाळणंच योग्य समजत असल्यानं ती असं आग्रहाने मांडते. पण या बाबतीत तुमची भूमिका काय आहे, हे जाणून घ्यायला आवडेल. असा फरक करावा की करूच नये, सरसकट करावा की कधी कधीच करावा, भाषेत त्यासाठी शब्द नसतील, तर ते घडवणं योग्य की आचरटपणाचं, त्यानं नक्की काय साधेल इत्यादी)
वयाच्या एक्काहत्तराव्या वर्षी भाषांतरकार-समीक्षिका म्हणून काम करताना वासंती शंकरनारायणन यांच्या आयुष्याला नवा अर्थ आला. त्यांनी १९६९ साली ’बॅंक ऑफ अमेरिका’मध्ये जेव्हा सचिव म्हणून कामाला सुरुवात केली, तेव्हा त्यांच्या मनाशी काहीएक योजना होती. ’ऑपरेशन्स’ विभागात काम करत असताना त्यांनी ’सर्टिफाईड असोसिएट ऑफ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बॅंकर्स’(सीएआयआयबी)च्या परीक्षा दिल्या. लिपिक (की कारकून? शिवाय मला लिपिका असं म्हणणं अंमळ विनोदीच वाटतंय.) म्हणून त्या नोकरीवर रुजू झाल्या होत्या. पण १९८६ मध्ये निवृत्त होईपर्यंत त्यांनी उपव्यवस्थापक या पदापर्यंत मजल मारली. "अकाउण्टन्सीच्या (???) कामात मला फारशी गती कधी नव्हतीच. मात्र हातात घेतलेल्या कामाला संपूर्णपणे न्याय द्यायचा, हे मात्र पक्कं होतं," त्या सांगतात. त्यानुसार त्यांच्या दुसर्या डावालाही त्यांनी शंभर टक्के न्याय दिला आहे. निवृत्तीनंतर आपल्या साहित्यिक आवडीनिवडींचा उपयोग करून घेत त्यांनी मल्याळमधून इंग्रजीत भाषांतरं करायला आणि कलासमीक्षा करायला सुरुवात केली. चेन्नईत राहणार्या वासंतीबाईंना (मूळ लेखात बाईंचं वय आणि राहतं ठिकाण एकाच वाक्यात आलं आहे. पण त्याचं मुळाबरहुकूम भाषांतर मराठीत केलं, तर ते सरळ सरळ भाषांतरित आहे हे कळेल आणि विशोभित दिसेलसं वाटलं, म्हणून ते तपशील असे विखरून लिहिले. शिवाय ’शंकरनारायणनबाई’पेक्षा ’वासंतीबाई’ हे मराठीत बरं वाटेल, असं वाटल्यामुळे हा नावातला बदल. हे बदल केले तर अर्थामध्ये काही बदल होतो का?) साहित्य आणि ललित कला या दोन्ही विषयांमध्ये पहिल्यापासून रस होता. पण त्याबद्दल लिहायचं म्हटल्यावर, त्यांचा खोलात जाऊन रितसर (की रीतसर?) अभ्यास करायचं त्यांनी ठरवलं. बॅंकेतून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी ’केरळातल्या जीवनावर पडलेला नृत्यनाट्याचा प्रभाव’ या विषयावर ’एम.लिट्’साठी प्रबंध लिहिला. तसंच ’मल्याळम चित्रपटातून दिसलेला समाज आणि राजकारण’ या विषयावर त्यांनी पोस्ट डॉक्टरेट (???) केली. नाटकावरही त्यांचं मनापासून प्रेम आहे. इतकं की, नाटकांची समीक्षा करण्यापूर्वी त्या नाटकाच्या तालमींना उपस्थित राहतात. कलाकारांशी चर्चा करतात आणि मगच समीक्षा लिहितात. (’आणि....’ हा मी जोडलेला वाक्यांश. त्याशिवाय एकसंधपणा येणार नाही असं वाटलं.) त्यांच्या लेखांतून, समीक्षणांतून त्यांना दरमहा जेमतेम ४००० रुपये मिळतात. पण त्याबद्दल त्यांची अजिबात कुरकुर नाही.
त्यांनी भाषांतरं करायलाही निवृत्तीनंतरच सुरुवात केली. ’मातृभूमी’नामक नियतकालिकात आलेली ’अग्निसाक्षी’ नावाची एक क्रमश: कथा त्यांनी वाचली. यथावकाश त्या कथेच्या लेखिका ललितांबिका अंतर्जनम यांनी त्यांना त्या कथेचं भाषांतर करण्याची परवानगीही दिली. हे भाषांतर (भाषांतरच ना? की मूळ कथा? माझा काही गोंधळ होतोय?) १९८० साली केरळ साहित्य अकादमीनं प्रसिद्ध केलं. नंतर आलं मतम्पु कुंजुकुट्टन यांचं पुस्तक ’ब्रश्तु’. हेही क्रमश:च प्रसिद्ध झालं होतं. ’आउटकास्ट’ या नावानं मॅकमिलननं ते प्रकाशित केलं. मग ’विरागो, लंडन’ यांचं ’इनर कंट्री’, स्त्रियांसाठीचं ’काली’नं प्रकाशित केलेलं ’इनर स्पेसेस’. एकामागोमाग एक भाषांतर प्रसिद्ध होत गेली. वासंतीबाईंच्या मते - तसं शब्दागणिक भाषांतर नाहीच करता येत. मूळ लेखकाइतकीच भाषांतरकाराची सर्जनशीलताही महत्त्वाची ठरते ती त्यामुळेच.
आता वासंतीबाई रोज सुमारे दोन ते चार तास काम करतात. त्यांना मिळणारं मानधनही प्रकाशक आणि रॉयल्टीनुसार (???) बदलत असतं. "पुस्तक विकल्यानंतर ५ ते १० टक्के रॉयल्टी भाषांतरकाराला मिळते. दर पुस्तकामागे मला दहा ते बारा हजार मिळू शकतील." (इथे अवतरणातली वाक्यं वासंतीबाईंची आहेत, हे अध्याहृत असल्यामुळे मी तसं थेट लिहायचं टाळलं आहे.) पण वीस वर्षांपूर्वी वासंतीबाईंचे यजमान गेले. त्यानंतर भाषांतराच्या कामानंच बाईंचं आयुष्य अर्थपूर्ण केलं आहे. हा आनंद हेच खरं मानधन असं त्यांना वाटतं. "माझ्या साहित्यप्रेमामुळेच मी माझं आयुष्य मनासारखं जगू शकते आहे," त्या म्हणतात.
त्यांच्या मुलांचीही त्यांना मदत होत असते. मुलगी आशा अमेरिकेत राहत असली, तरी त्यांच्याशी कायम संपर्क राखून असते. तर मुलगा आनंद चेन्नईमध्ये स्वत:चं उपाहारगृह चालवतो. तो त्यांच्याच गृहसंकुलात दुसर्या इमारतीत राहतो. ’हे सारं कशासाठी?’ असा प्रश्न वासंतीबाईंना विचारलातच, तर त्या खलिल जिब्रानचे शब्द उसने घेतात. म्हणतात - जवळपणानंही जरा अंतर राखूनच असावं.
अर्थात दर शुक्रवारी आपल्या नातवाबरोबर - अमर्त्यबरोबर - त्यांची ’डिनर डेट’ असते, तेव्हा हे अंतर मिटवून ठेवलेलं असतं, हे सांगणे न लगे! (ही माझी पुरवणी. लेखाच्या सुराला शोभून दिसतेय, की विजोड दिसतेय?)
- पद्मिनी नटराजन
हार्मनी मासिकासाठी, मार्च २००७
Book traversal links for मराठी आणि भाषांतर - ३
वर्गीकरण
प्रतिक्रिया
तुमचे
भाषांतर उत्तम
+१
कठीण काम...
-शेवटचा