मराठी आणि भाषांतर - २
(तुम्हांलाही आपापले पाठ (छ्या:! हे नाही ब्वॉ बरं वाटत!) भाषांतरित करून इथे द्यायचे असले, तर नक्की द्या. तूर्तास हे नवीन भाषांतर (थोडं मोठं!):
औषध कंपन्या संशोधनासाठी पैसा का पुरवतात?
- संध्या श्रीनिवासन
(http://infochangeindia.org/Health/Healthcare-markets-and-you/Why-does-a-drug-company-sponsor-research.html)
---
स्तनांच्या कर्करोगातील धोक्यांवर होणार्या संशोधनासाठी एखादी बहुराष्ट्रीय कंपनी पैसा का पुरवते? परोपकार म्हणून? की त्यातून या विशिष्ट रोगाच्या ('प्रॉब्लेम'चं थेट भाषांतर 'त्रास' असं होऊ शकेल. पण ते इथे शोभून दिसणार नाही असं वाटतंय. शिवाय मी मुळातली वाक्यरचान बदलून दोन लहान वाक्यांचं एकच मोठं वाक्य केलं आहे.) दर रुग्णामागे दरमहा ९०,००० रुपये किंमतीच्या औषधाचा धंदा होतो म्हणून? औषध बाजाराचा तुमच्यावर - ग्राहकावर वा रुग्णावर - होणारा थेट परिणाम या विषयावर नवीन स्तंभात संध्या श्रीनिवासन लिहितात:
भारतीय स्त्रियांमधील कर्करोगाच्या अभ्यासावरील वृत्तान्त २०१०च्या फेब्रुवारीमध्ये वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले. "एचईआर-टू पॉझिटिव्ह" प्रकारच्या स्तनांच्या कर्करोगातील धोक्यांची पाहणी करण्यासाठी, मुंबईतील टाटा मेमोरियल रुग्णालयात आणि पुण्यातील जहांगीर रुग्णालयात स्तनांच्या कर्करोगावरील उपचारात्मक चाचण्यांमध्ये (क्लिनिक या शब्दाला प्रतिशब्द काय? उपचार / दवाखाना यांत त्यातल्या प्रायोगिक धोक्याची / अनिश्चिततेची अर्थछटा नाही) सहभागी होणार्या एक हजार महिलांची तपासणी करण्यात येणार आहे.
या प्रकारच्या कर्करोगामध्ये एचईआर-टू प्रथिनांच्या अतिरिक्त निर्मितीमुळे कर्करोगाची गाठ (ट्यूमर या शब्दाचं असं ओढून ताणून भाषांतर करावं की कसं? मराठीतील प्रतिशब्द वापरण्याचा आग्रह आणि वाचकांची सोय या दुहेरी कात्रीत सापडण्याची हीच ती जागा!) अधिकाधिक वेगाने वाढते. ('फ्युएल्ड बाय' या शब्दाला 'खतपाणी मिळणे/घालणे' हा शब्द आठवला होता. पण तो इथे अर्थातच चपखल वाटायचा नाही). स्तनांच्या कर्करोग झालेल्या पाश्चिमात्त्य रुग्णांपैकी २०% रुग्णांमध्ये एचईआर-टू आढळून येते; तर स्तनांचा कर्करोग झालेल्या भारतीय रुग्णांपैकी ३०% महिलांमध्ये एचईआर-टू असल्याचे दिसते. या फरकामागची कारणे समजून घेण्यासाठी ही तपासणी (स्टडी या शब्दाचं भाषांतर सरळसोट अभ्यास असं करता येईल, हे मला मान्य आहे! पण वर 'तपासणी' हा शब्द वापरला असल्यानं हा द्राविडी प्राणायाम! काही उपाय सुचतोय?) करण्यात येणार आहे.
ग्लॅक्सोस्मिथक्लाईन या बहुराष्ट्रीय कंपनीच्या आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि आशियामध्ये संशोधनासाठी पैसा पुरवणार्या 'ओन्कॉलॉजी इंटरनॅशनक एथनिक रिसर्च इनिशिएटिव्ह'ने (भाषांतर? भाषांतर??? आवश्यक की अनावश्यक? शक्य की अशक्य??) या अभ्यासाचे प्रायोजकत्व स्वीकारले आहे.
'ग्लॅक्सो'च्या (मराठीतलं सुटसुटीत - संक्षिप्त रूप - पक्षी 'शॉर्टफॉर्म'! बरोबर आहे का? की दर वेळी कंपनीचं नाव पूर्ण लिहिलं पाहिजे?) किंवा वरील दोन्ही रुग्णालयांच्या संस्थळांवर या अभ्यासाबद्दल कोणतीही अधिक माहिती उपलब्ध नाही. तसेच, 'आयसीएमआर / डब्ल्यूएचओ' (ICMR/WHO) यांच्या नोंदींमध्ये किंवा 'यूएस क्लिनिकल ट्रायल्स'च्या (क्लिनिकल ट्रायल=संशोधनात्मक चाचणी?) नोंदीमध्येही या अभ्यासाचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. जून २००९पासून भारतात होणार्या कोणत्याही चाचणीमध्ये (क्लिनिकल ट्रायल=संशोधनात्मक चाचणी? मीच आधी केलेल्या वापराला सरावून, कसलाही सबळ आधार नसताना दडपून एखादा शब्दसमूह वापरायला मी सुरुवात करते ती अशी!) रुग्णनोंदणीला सुरुवात होण्याआधी आयसीएमआर (ICMR) नोंदखात्यामध्ये (रजिस्ट्री??!) त्या चाचणीची नोंद करणे बंधनकारक झाले असल्यामुळे; या अभ्यासामध्ये अद्याप रुग्णनोंदणी झालेली नसल्याचे मानावयास जागा आहे. (उगाच लांबलचक वाक्य. पण ते कसं तोडलं असता परिणामकारक होईल?)
ते काहीही असले तरी ('इन एनी केस'='कोणत्याही परिस्थितीत'. पण त्यापेक्षा मला माझंच भाषांतर जास्त चपखल वाटतं आहे) भारतातील एचईआर टू पॉझिटिव्ह असलेल्या स्तनांच्या कर्करोगावरील अभ्यासासाठी पैसा पुरवण्यात 'ग्लॅक्सो'ला इतका रस (हे मी केलेलं रूपांतर, भाषांतर नव्हे) का आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. स्तनांच्या कर्करोगातील एथनिक (????? हेल्प!) घटक खोलात जाऊन जाणून घेणे आणि त्यायोगे जगाच्या या भागातील कर्करोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यात मदत करणे हा (हा की हाच?) यामागचा शुद्ध परोपकारी हेतू आहे काय?
.....
प्रतिक्रिया
वा...
निवड आवडली
माझा प्रयत्न...
"भाषांतर", "अनुवाद" आणि "रुपांतर"
श्रामो:
उपक्रमावरचा दुवा
आशय, स्वर, रोख इत्यादी
ग्लॅक्सोस्मिथक्लाइन
हा आणि
क्लिनिकल ट्रायल = चिकित्सालयीन चाचणी