थिंक महाराष्ट्र डॉट कॉम ह्या मराठी संकेतस्थळाच्या उदघाटनाचा (लॉचिंग) कार्यक्रम ५ मार्च २०१०, शुक्रवार, रोजी सायंकाळी दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रांत साजरा झाला. श्री. दिनकर गांगल यांनी या संकेतस्थळाची थोडक्यात पण चांगली ओळख करून दिली. श्री.गांगल आणि ग्रंथाली यांच्याबद्दल मनात जे आदराचे स्थान आहे त्याला साजेसे असेच हे संकेतस्थळ असावे असे त्यावरून दिसले.
ह्या कार्यक्रमाचा एक महत्वाचा भाग म्हणून मराठी ब्लॉग्ज व संकेतस्थळांशी संबंधित मान्यवरांचे एक चर्चासत्र झाले. 'ब्लॉग्ज, वेब माध्यम आणि मराठी' हा त्याचा विषय होता. त्यात वेगळ्या प्रकारे उद्बोधक अशी माहिती मिळाली. "इंग्रजी, चिनी, जर्मन वगैरे भाषांमध्ये कोटीच्या कोटी ब्लॉग्ज आहेत, त्यामानाने मराठीतली दीड दोन हजार ही संख्या अगदी नगण्य आहे. जे आहेत ते देखील अनियमित आहेत, त्यात ओरिजिनल कंटेंट नसतोच, असल्याच तर कविता असतात, मिसळपाववरून उद्या हकालपट्टी झाली तर जालावर कुठे तरी आपले लिखाण असावे म्हणून लोक ब्लॉग या नांवाचे गोडाऊन उघडून ठेवतात" वगैरे मनोरंजक माहिती व्यासपीठावरून दिली गेली. "परदेशातले (आणि अमिताभ बच्चनसारखे भारतीय) सेलिब्रिटीज ब्लॉग्ज लिहितात आणि लक्षावधी लोक ते वाचतात. त्यामुळे ते एक महत्वाचे सामाजिक संपर्कमाध्यम बनले आहे. मराठीभाषिक नेतेमंडळी किंवा सुप्रसिध्द नट, गायक, खेळाडू वगैरे प्रसिध्द लोक ब्लॉग लिहीत नाहीत कारण त्यांना त्यासाठी मोकळा वेळच उपलब्ध नसतो, पण लेखन हाच ज्यांचा व्यवसाय आहे असे कितीसे साहित्यिक ब्लॉग लिहितात? उद्याचा नागरिक म्हणजे आजचा युवावर्ग तर मराठी ब्लॉगबद्दल पूर्णपणे उदासीन आहे" वगैरे सांगितले गेले. "कांही ठिकाणी चांगले साहित्यही लिहिले जात आहे, विशेषेकरून पाककृतीसंबंधी छान माहिती दिली जात आहे" असा एकच हलकासा विसंवादी सूर ऐकायला मिळाला.
पुढची पायरी म्हणजे " संगणक आणि त्याचा कीबोर्ड हेच उद्या लुप्त होणार असून सगळे कम्यूनिकेशन सेलफोनवरून दृकश्राव्य माध्यमातून होणार आहे, अक्षर ही संकल्पनाच बाद होऊन गेल्यानंतर लिपीला अर्थ उरणार नाही आणि उद्याचे ब्लॉग्जसुध्दा व्हीडिओवर असणार आहेत." असे भवितव्य एका महान द्रष्ट्याने दाखवले. थोडक्यात सांगायचे तर मराठी ब्लॉग्जना फारसा भूतकाळ नाहीच, त्याचा वर्तमानकाळ विशेष स्पृहणीय नाही आणि भविष्यकाळ अंधःकारमय आहे असा नैराश्य उत्पन्न करणारा मतितार्थ या चर्चेत दिसून आला.
चर्चेत सांगितले गेले त्याप्रमाणे मराठी ब्लॉग्ज, अनुदिन्या किंवा जालनिशा वगैरे अजून बाल्यावस्थेत आहेत. कदाचित त्याही पलीकडे शैशवावस्थेत असतील. पण तान्हे बाळसुध्दा हातापायाच्या हालचाली करून आणि किंचाळून मोठ्या लोकांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न करत असते आणि अनेक वेळा आसपास असलेली मोठी मंडळी त्याच्याकडे लक्ष देतात, त्याला अंजारून गोंजारून मायेचा स्पर्श देतात. त्यामुळे ते बाळ तर सुखावतेच, पण मोठ्या माणसालासुध्दा एक प्रकारचा आनंद मिळतो. मराठी ब्लॉगविश्वातली आम्ही अजाण बालकेसुध्दा अशी थोडीशी हालचाल करत आहोत. आजूबाजूची मोठी माणसे आमच्याकडे लक्ष देतील अशी वेडी आशा अजूनही बाळगून आहोत.
मराठी ब्लॉग या प्रकाराबद्दल मिपाकरांची काय मते आहेत आणि त्याच्या भविष्याबद्दल काय वाटते?
(हा चर्चाविषय कोणत्या लेखनविषयात बसेल ते न समजल्यामुळे 'मौजमजा' या नावाखाली टाकला आहे. प्रत्यक्षात हा गंभीर मामला आहे. 'इतर' असा एक पर्याय ठेवला तर त्यात टाकता आला असता. याबद्दलही मार्गदर्शन व्हावे)
वाचने
4366
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
श्री.गांगल
हा हा हा!
दूर्दैवाने खरे आहे.
स्वांत सुखाय
दुर्लक्ष
In reply to स्वांत सुखाय by प्रकाश घाटपांडे
मौजमजा
कितीतरी
In reply to मौजमजा by देवदत्त
चर्चेचे स्वरूप
In reply to मौजमजा by देवदत्त
लेखन
विकेंद्रीकरण
मराठी वाचकसंख्या
वृत्तांत