Skip to main content

काळ्या घोड्याचा उरूस!

लेखक नीधप यांनी सोमवार, 15/02/2010 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
फेब्रुवारी २०४५ 'दर वर्षी थंडीच्या मोसमात मुंबईनगरीमधे फोर्ट परिसरात काळ्या घोड्याचा उरूस भरतो. तर्‍हेतर्‍हेचे खाद्यपदार्थ, भिरभिरी, मुखवटे, इतर खेळणी, टिशर्ट, कपडे, दागिने, मातीच्या उपयोगी वस्तू याची भरपूर रेलचेल असते. लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्व भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. विशेषतः शनिवार रविवारच्या दिवशी तर मुंगीला शिरायला जागा उरत नाही एवढी गर्दी होते. काळा घोडा ही देवता तांत्रिक प्रकारची आहे. चित्रविचित्र प्रकारची, विविध वस्तूंपासून बनलेली शिल्पे वाह्यल्याने ही देवता प्रसन्न होते. त्यामुळे अनेक चित्र व शिल्पकारांना पाचारण करून विचित्र विचित्र वस्तू बनवून काळा घोड्याभोवती मांडल्या जातात. याच परिसरात छत्रपति शिवाजी वस्तूसंग्रहालय, जहांगीर कला प्रदर्शनी, नवकलेची राष्ट्रीय प्रदर्शनी आणि अश्याच अनेक वास्तू असल्याने या उरूसाला काळा घोडा कला महोत्सव असे म्हणण्याची काही वर्षांपूर्वी पद्धत पडली होती. पण लोटणार्‍या गर्दीने काळा घोडा देवतेला न्याय दिला आणि दाखवून दिले की हा कला महोत्सव नसून उरूस आहे.' वयाच्या सत्तरीला आलेली मी सकाळी सकाळी पेप्रात वाचत होते. वाचून परत एकदा जुनी चिडचिड वर आली. हल्ली सगळ्या जुन्या चिडचिडी बाहेर यायला लागल्यात. आमच्यावेळी असं नव्हतं ची टेप नाही वाजवायची म्हणली तरी वाजवली जातेय... असो हे असं होतं हल्ली चिडचिडल्यावर सुद्धा जास्त वेळ त्याच ट्रॅकवर रहाता येत नाही. तर काळ्या घोड्याच्या उरूसाची बातमी वाचली पेप्रात आणि संताप संताप झाला. कला महोत्सवाचं जत्रेत झालेलं रूपांतर बघितलं होतं. कुठल्याही महोत्सवाला देव देवता देवस्की याच्याशी नाहीतर बॉलिवूड, टॉलिवूडशी जोडायचं ही पद्धतच पडून गेली होती. त्या अनुषंगाने खादाडीचे स्टॉल्स आणि विकायच्या फुटकळ वस्तू... नुसतं हस्तकौशल्य असलेल्या. कला मिसिंग इन अ‍ॅक्शन. एक काळ असा होता की काला घोडा फेस्टिवलमधे सगळ्या 'आव्हा गार्द (Avent Garde)' म्हणता येईल अश्या कलाप्रकारांचं प्रदर्शन असायचं. चित्रकला, शिल्पकला, इन्स्टॉलेशन्स, संगीत, नृत्य, नाटक सगळं सगळं चाकोरीबाहेरचं. नवीन असं काहीतरी. बघणार्‍याला टोचून जाईल, विचारात पाडेल, अस्वस्थ करेल, अनुभव देईल, डोक्याला चालना देईल, किक देईल असं काहीतरी... सगळं फ्रेश वातावरण. सिरीयल्समधल्या गोड, गुलगुलीत, कंटाळवाण्या कौटुंबिक बजबजपुरीला हास्यास्पद बनवेल असं 'आजचं', ताजं काहीतरी तिथे मिळायचं. वातावरण कलाप्रकार, कलाप्रवाह यांनी भारीत असायचं. अश्याच अपेक्षा घेऊन २०१० च्या फेब्रुवारीमधे मी आणि निलिमा गेलो होतो काळा घोडा आर्ट फेस्टिव्हलला. नेमका होता शनिवार. प्रचंड गर्दी होती. कला महोत्सवाला अशी दाद मिळतेय बघून आधी छानच वाटलं. पण थोडं त्या गर्दीच्या पोटात घुसलो तेव्हा भ्रमनिरास झाला. फुटपाथवर 'हॅलो मॅडम, इंडियन इंस्टृमेंट!' म्हणत डमरू-ढोलक्-ढोलकी यांचा संगम असलेलं एक बडववाद्य घेऊन गोर्‍या चमडीच्या मागे लागणारे विक्रेते होते. भिरभिरं, खेळणी, फुगे, डेव्हिलची लाल शिंगे असलेले हेयरबॅण्ड विकणारे अनेक जण होते. खाद्यपदार्थ, सिरॅमिकच्या वस्तू ज्यात बरेचसे विविध आकाराचे फ्लॉवरपॉटस होते, खोटे दागिने, कापडचोपड, टि शर्टस, उलटी येईल इतपत गोड असलेली लॅण्डस्केपस, व्यवस्थित सबमिसिव्ह दिसणार्‍या भारतीय नारीचे वेगवेगळ्या रंगात रंगवलेले चेहरे आणि त्याला लावलेल्या महागड्या फ्रेम्स, झाडे-रोपे-पक्ष्यांची पत्र्याची घरटी-प्लास्टिकच्या कुंड्या, हुबेहुब चित्र काढून देणारे असेच बरेचसे स्टॉल्स होते. 'ये देखो ये काला घोडा फेस्टिव्हलसे लिया!' असं सांगून स्वतःचा कलात्मक दृष्टीकोन सिद्ध करता येईल इतपत आर्टसी दिसेल पण एकुणात गुळचट दिसणार्‍या गृहसजावटीच्या वस्तू चिक्कार होत्या. या सगळ्या स्टॉल्सवर ही झुंबड उडालेली होती. सगळं हस्तकौशल्य उतू चाललं होतं. हुबेहुब आणि आकर्षक ह्याच्यापलिकडे बर्‍याचश्या वस्तूंची उडी नव्हती. तिथल्या गर्दीमधे 'लूक लूक हा हॉर्सी कसा छान बनवलाय ना ड्राइड ग्रासमधून!' असं काहीतरी अगम्य बोलत मिरवणारे विकेंड अ‍ॅक्टिव्हिटी म्हणून मुलांना घेऊन आलेले आईबाप होते. 'काला घोडा फेस्टिव्हल घुमने जायेंगे, खायेंगे, पियेंगे, ऐश करेंगे' म्हणत आलेले कॉलेजियन्सचे ग्रुप होते. 'देखो हमे क्या मिला' म्हणत आपल्या डोक्यावर लाल शिंगांचा हेयरबॅण्ड वागवत चित्कारत फिरणार्‍या मुली होत्या. 'काला घोडा देखनेको जायेंगे फीर वहीपे खाना खाके घर जायेंगे' असं ठरवून आलेले लोक होते. थोडक्यात सगळे जत्रेला आल्यासारखे. सगळे हस्तकौशल्यालाच कला समजणारे. गेलेल्या सिडीज, जुनी सायकल, पाण्याच्या संपलेल्या बाटल्या अश्या सगळ्या कचर्‍यातून एक इन्स्टॉलेशन केलेलं होतं. पण ते बघायचं तर अगदीच त्याच्या पुढ्यात जावं लागत होतं जिथून त्या इन्स्टॉलेशनचा काही इफेक्ट जाणवत नव्हता. दुरून बघायचं तर पोर्टेबल कमानीचा एक मोठ्ठा पोलादी खांब पुढ्यातच ठेवलेला होता आणि गर्दी तर लोकलच्या तोंडात मारेल अशी होती. दुरून काही दिसण्याचा प्रश्नच नव्हता. आणि बिन्डोक लोक त्या इन्स्टॉलेशनला हात बित लावून बघत होते. लहान पोरं टांगलेल्या बाटल्यांना झोका देऊन बघत होती. हात लावू नये च्या सुचनेवर हात टेकवून त्यावर रेलून कोणी गप्पा मारायचा प्रयत्न करत होता. ते एक इन्स्टॉलेशन आहे.. बघण्याची वस्तू आहे. हात लावण्याची नाही. मी मनातल्या मनात त्या लोकांवर फिसकटले आणि मागे वळले. एक मोठी घंटा टांगल्याचं पेपरमधे आलं होतं ती लांबवरून दिसत होती. तिथपर्यंत पोचणं आणि नंतर तिथून बाहेर येणं हे मुश्किल वाटत होतं. काही थोडे लोक गर्दीला वैतागलेले, अरे हा कला महोत्सव आहे ना अश्या प्रश्नात पडलेले, गुळचट चित्रं आणि फ्लॉवरपॉटस बघून कंटाळलेले, आमच्यासारखे तिथून लवकरात लवकर बाहेर पडायच्या बेतात होते. बाहेर पडलेही. हॅण्डलूम एक्स्पो, सिल्क एक्स्पो, हॅण्डिक्राफ्ट एक्स्पो, भीमथडी जत्रा, पूर्वी सारसबागेच्या ग्राउंडवर भरायचं ते डिस्नेलँड या पेक्षा इथे फार वेगळं काय होतं हा प्रश्न सतत घोळत राह्यला डोक्यात. हस्तकौशल्यालाच कला मानून भागवावं लागणार का आता असे प्रश्नही उमटले. एक महोत्सव केवळ दृश्य आणि प्रयोगकलांचा, कलाकार आणि कलारसिक यांच्यापुरताच किंवा त्यांच्या आवडीनिवडीला, अपेक्षांना प्राधान्य देणारा असा असूच शकत नाही का? खूप चिडचिड होत राह्यली. त्याला होत आली आता ३०-३५ वर्ष. काळा घोडा देवतेने कलेचा शिरच्छेद करून झाला. महोत्सवाचा उरूस झाला. अंगवळणी पडून घ्यायचा प्रयत्न काही कमी केला नाही पण जमलं नाही. म्हणून मग चिडचिड लिहूनच काढली. -नी
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4051
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

नीरजा, तुझी चिडचिड समजली. काही लोकांना पैसे देऊन काय वाट्टेल ते घेता, शिकता, करता येतं; यामधे कला आणि रस्त्यावर चिरडलेल्यांची कलेवरं, सगळंच सारखं! अदिती

वा! छान!! काळा घोडा इथे होणार्‍या कलात्सोवाला सुद्धा आता बांद्राच्या माउंट मेरीच्या जत्रे चं स्वरूप येत चाललयं तर :S (बांद्राच्या माउंट मेरीच्या जत्रेत टी शर्ट, टॉप्स किती स्वस्त, छान मिळालेत ही चर्चा जास्त ऐकण्यात येते :) )

छान लेखानी दिवसाची सुरुवात झाली. आपल्या बारीक नीरीक्षण कौशल्यास सलाम तसेच ती नीरीक्षणे कागदावर उमटवणे ही तितकीच कठीण गोष्ट. काही ठीकाणी छद्म वापरले आहे उदा - >> उलटी येईल इतपत गोड असलेली लॅण्डस्केपस, व्यवस्थित सबमिसिव्ह दिसणार्‍या भारतीय नारी>> मजा आली वाचून, कलेचा उरुस झाल्याने वाइट का वाटलं तो महत्वाचा मुद्दा मी "मिस" केला आहे. परत वाचते आणि विचार करते. :) ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

वेळ पुढे करून आताच्या स्थितीकडे पाहिलेल आवडल. यात अर्थातच तो भविष्य काळ वर्तमान काळ झाला आहे आणि आताचा वर्तमान काळ भूत काळ. फोटो टाकला असता तर अधिक छान झाल असत असं वाटत. मी कधीही काळा घोडा येथिल आर्ट फेस्टिव्हल पाहिलेला नाही. पण काय असू शकेल याचा अंदाज आला. तरीही जायला आवडेल. (कला प्रेमी )मीनल.

काही लोकांना पैसे देऊन काय वाट्टेल ते घेता, शिकता, करता येतं; असं वाटत असतं. समंजस, हो. माउंट मेरीची जत्राच.. फक्त विविध आकाराच्या मेणबत्त्या आणि जीझसची चित्रे नाहीत इतकंच. - नी http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

बाळे नीरजा, अशी चिडचीड करून काय होणारे? ब्लडप्रेशर मात्र वाढेल उगाचच!! या वयात आता तब्येतीला जपायला हवं तुला!! बाकी तुझ्या या चिडचीडीमुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या.... एक काळ होता की जेंव्हा त्या सगळ्या परिसरात, म्हणजे विल्सनपासून, जेजे, झेवियर, जयहिंद, खालसा थेट एल्फिन्स्टनपर्यंत अशा अनेक कलाविषयक गोष्टी घडत असत. अगदी कला महोत्सव (तुझ्या मराठीत आर्ट फेष्टीवल!) होत नसले तरी साध्या कला उत्सवांना वाण नव्हती. आणि हो, मोतमावलीच्या जत्रेतली सर्वधर्मीय गर्दी ही प्रामुख्याने मेणबत्त्या लावायला किंवा नवस फेडायलाच असायची.... गेले ते दिवस.... बाकी 'काला घोडा' ला जुन्या काळी हुतात्मा चौक म्हणायचे ना?महाराष्ट्रनिर्मितीसाठी अमर झालेल्या हुतात्म्यांच्या स्मरणासाठी तिथे स्मारक बांधलं होतं म्हणून? आता नव्वदीच्या घरात माझंही स्मरण धूसर झालंय.... खात्री करून घेण्यासाठी म्हणून एका अस्सल मुंबईकराला विचारलं तर तो म्हणाला,"ओ दादाजी, वो जभी महारास्ट्र था तभी बनाया था! जभीसे यहांपर एक्स्टेंडेड यूपी हुवा है तभीसे उसको काला घोडा ही बोलत है!!" भाषा फार बदललीये नाही मुंबईची? असो. बाकी त्या भागात स्वस्तात पुस्तकं मिळायचे स्टॉलही होते बघ खूप. मी फिजिक्स-केमिस्ट्रीची जुनी पुस्तकं तिथून घेऊनच माझं शिक्षण पूर्ण केलं होतं... आता मिळतात का तिथे पुस्तकं? की नुसते सीड्या- बिड्यांचेच स्टॉल झाले आहेत? सारांश काय की, आता काला घोडा फेष्टीवल ला जा, घूम, खा-पी अन् ऐश कर.... पण त्या कलेबिलेच्या लफडयात पडून चिड्चीड करून घेऊ नकोस!! कलेच्या नादी लागून अनेक जण बरबाद झालेत!!! आणि रोज नेमाने शवासन करत जा, चिडचीड कमी होईल... तुझा सिडॉ (१२१, एक्झॉटिक सिनीयर सेंटर, हॉलीवूड ९१६३८) १५ फेब्रुवारी २०४५

In reply to by पिवळा डांबिस

अहो डांबिस काका, एका पेल्यात बर्फाचे दोन तुकडे जेमतेम डुंबतील एवढं सोनेरी द्रव्य टाकून त्याचा आस्वाद घेत घेत टेन्शन घालवणे नाही जमत प्रत्येकाला :) [आणि हो, हा काला घोडा चौक आणि हुतात्मा चौक हे दोन्ही वेगळे आहेत :) हुतात्मा स्मारक हे फ्लोरा फाउंटेन या चौकात आहे. या चौका पासून गेटवे ऑफ ईंडीया कडे गेलात तर जहाँगीर ऑर्ट गॅलरी असलेला पुढील चौक म्हणजे काला घोडा. वाचीव माहीतीनुसार कोणे एके काळी तेथे काळ्या घोड्याचा दगडातला पुतळा होता :) पुढे केव्हातरी तो काढून टाकण्यात आला पण त्यामुळे त्या चौकाला पडलेले काळा घोडा हे नाव मात्र तसेच राहीले. आणि हो त्या भागातील फुटपाथवर जुनी/नवी आणि जवळपास सर्वच विषयांवरची पुस्तके मिळतात. सध्या मात्र विक्रेत्यांचं प्रमाण कमी झालं आहे :( ]

In reply to by समंजस

आणि हो, हा काला घोडा चौक आणि हुतात्मा चौक हे दोन्ही वेगळे आहेत हुश्श बरं झालं कोणीतरी कन्फर्म केलं ते. मला वाटलं आपलाच घोळ झाला की एवढे दिवस जे चौक वेगळे समजत होतो ते एकच होते की काय.. :) >>आणि हो त्या भागातील फुटपाथवर जुनी/नवी आणि जवळपास सर्वच विषयांवरची पुस्तके मिळतात. सध्या मात्र विक्रेत्यांचं प्रमाण कमी झालं आहे मिळायची. आता तुम्ही म्हणता तसं प्रमाण कमी नव्हे तर नगण्य झालंय. कारवाई केली गेली होती ना मधे. - नी http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

In reply to by समंजस

हा काला घोडा चौक आणि हुतात्मा चौक हे दोन्ही वेगळे आहेत ओके! आय स्टॅन्ड करेक्टेड! एका पेल्यात बर्फाचे दोन तुकडे जेमतेम डुंबतील एवढं सोनेरी द्रव्य टाकून त्याचा आस्वाद घेत घेत टेन्शन घालवणे नाही जमत प्रत्येकाला हा उपाय नीरजाने करावा असं मी माझ्या प्रतिसादात कुठेही सुचवलेलं नाही. तुम्हाला तसं सुचवायचं असेल त्यासाठी माझ्या प्रतिसादाची ढाल वापरण्याची गरज नाही!!!

In reply to by पिवळा डांबिस

तुमचं वाक्यं ढाल म्हणून प्रतिसादात वापरणे हा उद्देश नव्हता. तरी सुद्धा तुमचं वाक्यं माझ्या प्रतिसादात वापरल्यामुळे, क्षमा असावी!

नीधपतै, तुमचा राग मला समजला नाही. या कलोत्सवास एलिटीस्ट बनवायचे असल्यास कुणी यावे व कुणी नाही यावर निर्बंध घालावे. पण सर्वांना खुले ठेवायचे असल्यास लोक येणार, मुले-बाळे येणार आणि ते कलेची जाण असणारेच असतील आणि कलेसाठीच आले असतील अशी अपेक्षा ठेवता येणार नाही. पण १% लोकांना कुठल्यातरी शिल्पासमोर उभे राहून काहीतरी प्रेरणा मिळेल. तुम्ही या सर्व व्यापाराला आणि गर्दीलाच 'आव्हा गार्ड' (Avant-garde) म्हणून पाहीले असते तर तुम्हाला इतका मनस्ताप झाला नसता.

In reply to by अक्षय पुर्णपात्रे

कला महोत्सव म्हणून एक्स्पो प्रकारचा बाजार भरवण्याला आव्हा गार्द म्हणणं एवढा मोठ्ठा विनोद मला जमण्यासारखा नाही. एलिटिस्ट पुरताच हा फेस्टिव्हल असावा असे मी कुठेही सूचित केलेले नाही. - नी http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

In reply to by नीधप

कला महोत्सव म्हणून एक्स्पो प्रकारचा बाजार भरवण्याला आव्हा गार्द म्हणणं एवढा मोठ्ठा विनोद मला जमण्यासारखा नाही.
तुम्हाला तो विनोद का वाटावा बुवा? तुम्हाला जमण्यासारखा नसल्यानेच तुम्हाला त्रास झाला असावा.
एलिटिस्ट पुरताच हा फेस्टिव्हल असावा असे मी कुठेही सूचित केलेले नाही.
तुम्ही सूचित केलेले आहे असे प्रतिसादात कुठेही सूचित केलेले नाही. तेव्हा हे स्पष्टिकरण अप्रस्तुत आहे. जेथे लोक दिसतील तिकडे छोटे-मोठे विक्रेते जातील. शास्त्रीय गायक मोठ्या कंपन्यांच्या मोठ्या बॅनरखाली राग आळवलेले चालते तर हेही चालवून घ्यायला हवे.

एक वेगळाच लेख.. सुंदर! तात्या.

पुण्यात आता साहित्यसंमेलनाचा उरुस होईलच. ती एक सामाजिक गरज आहेच. धरल तर चावतय सोडल तर पळतय. असो. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

In reply to by नीधप

लेख आवडला, लेखातला त्रागा पटण्यासारखा आहे. तरी श्री. घाटपांडे यांच्याशी सहमत. या प्रदर्शनाला कधी गेले नाही, पण तुम्ही सांगत आहात त्यावरून असे वाटते आहे की कदाचित आयोजक बदललेले असतील किंवा आर्थिक दृष्टीने स्टॉल्स ठेवणे, जत्रा भरवणे महत्त्वाचे होत चाललेले असावे.

धरले तर चावतंय, सोडले तर पळतंय असे आहे खरे. लेखाला नेमके वैचारिक उत्तर सुचत नाही. आमच्या गावात अशी जंगी कला-जत्रा दोन दिवसांची भरवतात - खाद्यपदार्थाचे गाडे, मोठे फेरिस व्हील, असे सगळेसुद्धा असते. त्यातही मजा येते. पण यात अतिशय नाविन्यपूर्न अशी कलाकृती, तसे कलाकार झाकोळले जातात, हेसुद्धा खरे. शिल्पे, ग्राफिटी, भित्तिचित्रे, इन्स्टॉलेशन-रचना... या अशा प्रकारची कलाच मला उघड्या हवेत चांगली आस्वादता येते. नाही म्हटले तर (जत्रेत नाही, पण अशाच साध्या दिवशी) जे. जे. स्कूलजवळ विकायला ठेवलेल्या चित्रांपैकी काही अगदी आरामात मला आस्वादता आली आहेत - हेसुद्धा खरे. पण ते शक्य होते गजबजाट नसल्यामुळे. सारांश : मला जत्राही आवडतात, पण तुमचा त्रागाही समजतो-पटतो.

In reply to by धनंजय

अपेक्षेप्रमाणेच मुद्दा तुम्हाला नेमका कळलाय धनंजय. बाकी जत्रा मलाही आवडतात. पण प्रत्येकच ठिकाण केवळ जत्रेचेच होऊन जाणे किंवा प्रत्येक जत्रा एकसारखीच असणे किंवा प्रत्येक जत्रेतून समुदायाने एकसारख्याच गोष्टींची अपेक्षा धरणे आणि त्या एकसारख्याच गोष्टींच्या अपेक्षा पुरवल्या जाणे याबद्दल नाखुषी आहे. - नी http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

एखाद्या चांगल्या गोष्टीची "इव्हेंट" झाल्यावर जी वाट लागते तेच झालं काला घोडा फेस्टिव्हलचं.