बाप्पा आणि मुटके

गणपा's picture
गणपा in पाककृती
9 Dec 2009 - 10:07 am

राम राम मंडळी....
आजच्या या दुसर्‍या गावठी स्पेशल भागात आपल स्वागत.
आपल्याकडे प्रत्येक सणाच अस एक वैशिष्ठ्य असत. आणि सण म्हटला की तो साजरा करताना विविध पक्वांन्न नसतील तर त्या सणांची मजा ती काय!!!!!
उदाहरण द्यायचच झाल तर नारळी पौर्णिमा आली की नारळाच्या वड्या, नारळी भात हे ठरलेल. गणपतीला उकडीचे मोदक. होळीला पुरणाची पोळी. गुढी पाडवा म्हटल की जिलेबी, श्रिखंड पुरी आठवते तर कोजागीरीला मसाला दुध...आणि सणांची राणी दिवाळी. तिची तर तर्‍हाच न्यारी. किती किती नी काय काय फराळ. लाडु, करंज्या, चकल्या, कडबोळी, शंकरपाळे, चिवडा एक ना दोन..
तसे हे पदार्थ आपण या सणां व्यतिरीक्त ही करतो म्हणा.. पण त्याची फ्रिक्वेंसी (मराठीत काय बर म्हणतात याला :/ ) फार कमी.

आमच्या गावी गणपतीला खुप धमाल असते. त्यात बाप्पा म्हणजे सगळ्या देवात लाडका. दिवाळी पेक्षा गावी गणपती उत्सव दणक्यात असतो. हल्ली बरेचजण नवसाचे गणपती ३-५ वर्ष घरीपण बसवतात. पण पुर्वी गावच्या शाळेत आणि मारुतीच्या देवळात सार्वजनीक गणपती बसायचा. हा सार्वजनीक गणपती पण नवसाचा असतो. जे कोणी नवस बोललेले असतात त्यांनी त्या वर्षीचा गणपती बसवायचा अशी प्रथा. यामुळे सगळ्यांनाच गणपती बसवायचा मान मिळायचा. मग आदल्या दिवशी ढोल ताश्याच्या गजरात बाप्पाच आगमन व्हायच घरी. तोवर गावातली तरुण-लहान मंडळी मखर आणि सजावटीच्या कामात गुंतलेली असायची. रात्रभर जागुन मस्त देखावे बनवले जायचे. प्रत्येकाला वाटायची की आपला पण हातभार लागावा बाप्पाच्या कार्यात.

सकाळी सकाळी उठुन कामाची लगबग सुर व्हायची. भटजी यायचे नवस-कर्त्याच्या घरी फुलM वाहुन मग गणरायाची स्वारी शाळेच्या / देवळाच्या मंडपात यायची. तिथे विधिवत पुजा होउन गणपती 'बसायचे'. तोवर घरच्या बायकांची नैवेद्याच ताट तयार कराताना बरीच धांदल चालु आसायची. त्यात लहान पोरी नविन कपडे घालुन नुसत्याच इथुन तिथुन फिरत लुडबुड करत असायच्या. इकडे मंडपात वडिलधारी मंडळी जमलेली आसायची. आरतीची तयारी चालु आसायची, कुणी ढोलकीचा ताबा घ्यायच, काहीजण टाळ घ्यायचे. ज्यांच्या हाती काही लागायच नाही ते नुसतेच टाळ्या वाजवुन साथ द्यायचे. ढोलकीच्या, टाळांच्या नी टाळ्यांच्या गजरात आरती चालु व्हायची. गणपती बसल्या नंतरची पहिली आरती अर्धा पाउण तास तरी चालायची. पण एक वेगळाच जोष असायचा. घालीन लोटांगण चालु झाल की समजायच आता आरती संपत आली. एकदम टाळ ढोलकीचा आवाज बंद व्हायचा आणि धीर गंभीर आवाजात मंत्र पुष्पांजली चालु व्हायची. खुप प्रसन्न वाटायच.......आरती संपता संपता घरुन नैवद्याच ताट आलेल असायचं. बाप्पाला नैवेद्य दाखवुन झाला की बाल गोपाल मंडळी त्यावर तुटुन पडत.:)

इथे प्रसादाच उल्लेख करायला विसरुन कस चालेल बर? देवाला वाहीलेल्या मोदकांचे - फळांचे तुकडे एकत्र करुन प्रसाद केला जायचा जोडीला साखर फुटाणे, बत्तासे, भाताच्या लाह्या असायच्याच. पण मुगाची पूड करुन जो एक प्रसाद बनवला जायचा त्याला तोड नासायची. मी तर नुसता तो प्रसाद खायला मिळावा म्हणुन दर अर्ध्या एक तासाने बाप्पाच्या पाया पडायला जायचो. वडिलधारे कौतुकाने (कित्ती देव भक्त बाळ आहे) पाहायचे.

संध्याकाळी परत आरती, नैवेद्य असायचा. बाप्पाला फक्त नावाला नैवेद्य, खरा तो आमच्याच पोटात जायचा. रात्री जागरण आसायच. पुर्वी बाप्पा फक्त दिड दिवसच असायचा. (हल्ली पाच आणि सात दिवसांनी गौरीबरोबर जाणारे पण असतात.) गावातली बाप्ये मंडळी देवळात जमा व्हायची , गावच महिला मंडळ यायच आणि मग टाळ मृदंगाच्य साथीन भजनांचा सुरेख कार्यक्रम व्हायचा. या भजनी मंडळाला ज्यांच्या घरी बाप्पा असायचे त्यांच्या कडुन मानाच आमंत्रण असायच. जागरण करताना मग रात्रभर शाळेच्या हॉल मध्ये आणि देवळात बुद्धी बळाचे पट मांडले जायचे. कॅरमचे पत्त्यांचे (तिन पत्ती ) डाव रंगायचे. सकाळी सूर्यनारायण उगवायच्या आत मग दुसरी फळी (रात्री आराम करुन आलेली) हजर व्हायची आणि जागरण घडलेली मंडळी घरी जाउन ताजी तवानी होउन यायची.

दुपार पासुन मग बाप्पाच्या निघण्याची तयारी चालु व्हायची. आख्खा गाव मिरवणुकीत सामील व्हायचा. जे म्हातारे-कोतारे असायचे आणि ज्यांना चालता येत नसेल त्यांच्या भेटी साठी बाप्पा स्वतः मिरवत मिरवत संपुर्ण गावातुन फेरी मारायचे. सुरवात एका गणपतीच्या मिरवणुकीने व्हायची पण रस्त्याने जाता जाता त्या त्या घरालले गणपती सामील व्हायचे. तास दोन तास मिरवत शेवटी मिरवणुक समुद्रापाशी यायची. त्या सिंधु-सागराच्या लाटांनाही लाजवेल आसा उत्साह लोकांत सळसळत आसायचा. माझ्या जिवात मात्र कालवा कालव सुरु व्हायची. वाटायच इथुन पुढे सोडुच नये बाप्पाला.

सगळे बाप्पा एका रांगेत बसवले जायचे आणि मग शेवटची आरती चालु व्हायची. पहिल्या आरतीला टिपेत लागणारा माझा आवाज आता मात्र घोगरा व्हायचा नी मी हळुच कोणाच्या नकळत डोळे टिपायचो. आरती संपली की बाप्पाच्या नावाचा गजर व्हायचा. पुढच्या वर्षी लवकर येण्याच आमंत्रण दिल जायच. मग एक एक जण बाप्पाला डोक्यावर घेउन लाटांच्या दिशेने निघायचे. हळु हळु पुढे जाणारा पाठमोरा बाप्पा दिसायचा. मनात काहुर माजलेल असायच. वाटायच असच जाव नी गच्च मिठी मारावी. गळ्या इतक्या पाण्यात गेल्यावर परत बाप्पा आमच्या दिशेने तोंड करायचा.
एक... दोन....तीन......................

जड पावलाने घरी वळायचो. मनातल कधी कुणाबरोबर बोललो नाही पण ती रात्र नकोशी वाटायची. पण एक निश्चिंती आसायची की येणारे बाप्पा परत येणारे....

काल टिव्ही वर एका मालिकेत तेच मंत्रपुष्पांजलीचे धीर-गंभीर स्वर कानावर पडले आणि नकळत परत लहान झालो. मऊ मऊ वाळुत पाय रोवुन बाबांच बोट घट्ट पकडुन बाप्पाला निरोप देताना स्वतःलाच पाहिल. हळव्या मनाने काळ-पटला मागे धाव घेतली नी पण परत येताना सोबत ही खास भेट आपल्यासाठी घेउन आल.

गणपतीच्या दिवसांत बाप्पांसाठी जस मोदकाच ताट आसायच ना तस त्याच्या भक्तांसाठी मुटक्यांच ताट हे ठरलेल असायच.
मग हे मुटके सकाळी न्याहारीला ताज्या कैरीच्या आंबट लोणच्या सोबत येवोत, दुपारच्या जेवणात इतर पक्वांन्नांसोबत येवोत किंवा मग संध्याकाळी गवतीचहा आणि आल मारुन केलेल्या वाफाळत्या चहा सोबत येवोत.... दर वेळी त्यांची लज्जत न्यारीच.

साहित्यः
२ मध्यम कांदे (उभा-आडवा चिरुन)
१ चमचा जीर.
१-१/२ चमचा धणे पुड.
१-१/२ चमचा लाल तिखट.
१-१/२ चमचा जीरे पुड.
१ चमचा हळद.
१-१/२ चमचा आल लसुण पेस्ट (जरा भरड).
२ हिरव्या मिरच्या.
मीठ चवी नुसार.
फोडणी साठी २ चमचे तेलं.

१ बाऊल तांदळाच जाड पीठ. (यात १४-१५ मुटके सहज होतात. अर्थात हाताच्या आकारावर पण अवलंबुन आहे ते.)
(मोदकाची पीठी ते इडलीचा रवा याच्या मधल. रेडिमेड नाही मिळाल तर तांदुळ पटकन मिक्सर मध्ये वाटुन घेतले तरी चालतील.)
१ वाटी खवलेला नारळ.
१ वाटी बिरडं.

कृती

एका जाड बुडाच्या भांड्यात तेल तापवुन त्यात जीर्‍याची फोडणी करुन, मिरच्या परतुन घ्याव्या.

कांदा टाकुन आल लसणाची पेस्ट टाकावी. मग मीठ, लाल तिखट, हळद, धेणे-जिरे पुड टाकुन १ मिनीटं परतुन घ्याव.

लगेच बिरडं, आणि नारळ टाकुन १-२ मिनीटं परताव.

१ ते १-१/४ बाउल पाणी टाकुन चांगली ऊकळी आणावी.

गॅस बंद करुन. तांदळाच पीठ टाकुन उकड करावी. उकड एका थाळीत काढुन घ्यावी.

एक पीठाचा एक गोळा घेउन लंबाकृती आकार द्यावा. आणि मग हलकेच मुठ वळवुन आकार द्यावा. साधारण शंखाचा आकार येतो.

एका कुकर मध्ये डबा ठेवुन त्यावर चाळणी ठेवावी आणि त्यात हे मुटके रचावे.
शक्यतो एकावर एक ठेवु नये. कुकर मधल्या पाण्याचा स्पर्ष चाळणीला होणार नाही याची काळजी घ्या.
(माझ्या कडे चाळणीला स्टँड होत त्यामुळे डबा ठेवायची गरज भासली नाही. अशी चाळणी मिळाली तर उत्तमच.)

कुकरची शिट्टी काढुन हे मुटके मोदक/इडली सारखे वाफवुन घ्यावे.

वाढताना वरुन राईची फोडणी दिली तरी चालेल. नारळ आणि कोथिंबीर वरुन भुरभुरावी. चहा लोणच वा पानात कसही केव्हाही मनसोक्त खाव.

आईची टिपः जर उरलेच दुसर्‍या दिवशी (शक्यता कमीच पण तरी) तर इडली सारख शॅलो फ्राय करुन पण छान लागतात.

बाप्पाचे फोटो जालावरुन साभार

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

9 Dec 2009 - 10:12 am | विजुभाऊ

गणपा.......तु साल्या कोकणात खाद्यपर्यटन असा एखादा प्रकल्प सुरु कर. लै लै लै भन्नाट चालेल.

अमृतांजन's picture

9 Dec 2009 - 10:24 am | अमृतांजन

तुमचे पाककलेचे लेख वाचून मलाही पदार्थ बनवायला आवडायला लागले.
पण एक गोष्ट राहून राहून विचारावीशी वाटते- माखलेल्या हाताने फोटो काढल्यावर तो कॅमेरा कशाने पुसायचा?

sneharani's picture

9 Dec 2009 - 10:31 am | sneharani

सूंदर पाककृती...!

अनामिक's picture

9 Dec 2009 - 10:35 am | अनामिक

ज ह ब ह र्‍या..!!
वेज पाकृ आवडली रे गणपा... बिरडं नसेल तर काय रिप्लेसमेंट वापरावी?

-अनामिक

पर्नल नेने मराठे's picture

9 Dec 2009 - 10:47 am | पर्नल नेने मराठे

गणप्याच्या कश्टान्चे कौतुक वाटतेय ;;)
चुचु

दिपक's picture

9 Dec 2009 - 10:53 am | दिपक

गणेशोस्तवाच वर्णन लै भारी रे गण्या.
पाककृतीबद्दल काय बोलु?

टारझन's picture

9 Dec 2009 - 11:05 am | टारझन

डोळे पाणावले ..!
गणपा तुझ्या पाकृ मला नेहमीच इमोशणल करतात :(

-सहि नाही

शाहरुख's picture

9 Dec 2009 - 11:13 am | शाहरुख

ये हाथ मुझे दे दे गणपा..

>>फ्रिक्वेंसी (मराठीत काय बर म्हणतात याला )
वारंवारिता

सायली पानसे's picture

9 Dec 2009 - 11:13 am | सायली पानसे

फोटो पहुन लगेच करावसा वाटतय पण बिरड्या हव्या तर एक दोन दिवस थांबुन करावे लागेल :-( इथे मिळत नाहित ना मुंबई पुण्यासारख्या हव्य तेव्हा तयार सोललेल्या बिरड्या..मस्त रेसिपी आहे केलि कि सांगेनह कशि झाली ते.

गणा हल्ली तुझी पा.कृ. लाळेर गळ्यात बांधुनच वाचतो.

गणपती विसर्जन आगदी डोळ्या समोर ऊभ केलस.छानच.

सहज's picture

9 Dec 2009 - 11:49 am | सहज

अरे काय भौ.

तुझी ही स्वयंपाकाची आवड नाही तर वेड आहे.

केवढे ते कश्ट! बेश्ट!!

माधुरी दिक्षित's picture

9 Dec 2009 - 12:00 pm | माधुरी दिक्षित

किती निगुतीने करतोस रे तु पदार्थ .
मस्त आहे रेसिपी

प्रभो's picture

9 Dec 2009 - 12:42 pm | प्रभो

गणप्याने साल्याने पाकृ टाकत टाकत साला लेख लिहायला पण हातखंडा जमवलाय...

असो पाकृ आणी लेखही अप्रतिम!!!! डोळे पाणावले ........

'गार'झन

भाग्यश्री कुलकर्णी's picture

9 Dec 2009 - 12:32 pm | भाग्यश्री कुलकर्णी

बाप्पाचे वर्णन आणी मुटके दोन्ही अप्रतिम आहे .तुम्ही उत्तम बल्लवाचार्य तर आहातच पण लेखकही आहात उत्तम.

मी-सौरभ's picture

10 Dec 2009 - 12:08 am | मी-सौरभ

अवांतरः स्माईलीज मधे तोंडाला पाणी सुटलेलं कसं दाखवायचं :?

~X(

सापडलं.........

=P~ =P~ =P~ =P~

सौरभ

परिकथेतील राजकुमार's picture

9 Dec 2009 - 1:29 pm | परिकथेतील राजकुमार

साक्षात __/\__

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

झकासराव's picture

9 Dec 2009 - 1:42 pm | झकासराव

गणपा अ‍ॅज युज्वल बेस्ट् :)

बर एक शंका आहे.
ये बिरडं म्हणजेच पावटे म्हणजेच वाल का?
ते खाउन नंतर हवामान हर्डे नाहि ना घ्याव लागत? :)

गणपा's picture

9 Dec 2009 - 2:07 pm | गणपा

>>ये बिरडं म्हणजेच पावटे म्हणजेच वाल का?
होय. सोललेल्या वालांना बिरडं म्हणतात.
>>ते खाउन नंतर हवामान हर्डे नाहि ना घ्याव लागत?
हा हा हा ते ज्याच्या त्याच्या कोठ्यावर अवलंबुन आहे ;)

-माझी खादाडी.

अवलिया's picture

9 Dec 2009 - 2:44 pm | अवलिया

गणपाच्या स्वयंपाकघरावर महिला मुक्ति संघटनेचा मोर्चा जाणार आहे.
हा त्याच्या बायकोकडुन काम करुन घेतो आणि स्वतःचे म्हणुन मिपावर टाकतो.

--अवलिया

मेघवेडा's picture

9 Dec 2009 - 2:54 pm | मेघवेडा

जबरदस्त रे!! सकाळीपुढे मिपा उघडलं. बघतो तर आमच्या गणपाशेट ची पाकृ! म्हटलं आज सकाळी सकाळी विकेट जाणार आपली!! पण मुटके म्हटल्यावर अगदी आतुरतेने उघडली पाकृ! आणि ठार झालो! नेहमीप्रमाणे आजही काढली विकेट गणपाने! गणपाच्या पाकृ म्हणजे दर्जा .. वरचा क्लास अगदी!

फोटोही सुंदर. कृतीतला प्रत्येक टप्पा फोटोसहित समजावण्याची तुझी इष्टायील देखील आवडते बाबा आपल्याला! मजा आली यार! लेखही तितकाच मस्त!!

वाहतायत तोंडं!! आवरा रे कुणीतरी!!

--

(गणपाच्या 'पाकृ'च्या ठरलेल्या विकेट्स पैकी एक) मेघवेडा.

स्वाती२'s picture

9 Dec 2009 - 5:09 pm | स्वाती२

लेख आणि पाकृ दोन्ही नंबर वन! नुसत्या बिरड्याच्या दर्शनानेच लाळ गळली. मुटके मात्र पहिल्यांदाच पाहिले.

रेवती's picture

9 Dec 2009 - 6:01 pm | रेवती

किती त्रास देशील रे बाबा?;)
एक तर तुझ्या ह्या पाकृ बंद कर नाहीतर सगळ्या नवर्‍यांचा क्लास घे!
आणि हो....ते मुटके आधी इकडे पाठवून दे बरं!
असा पदार्थ मी पहिल्यांदाच पाहिला.

रेवती

चतुरंग's picture

9 Dec 2009 - 6:51 pm | चतुरंग

तू इतका समर्थ ललित लेखकही आहेस हे माहीतच नव्हतं! किती सुरेख लिहिलं आहेस, आठवणींच्या लडी उलगडत नेल्यास.
आणि तुझी पाकृ म्हणजे तर काय वर्णावं? एखादा गवई जसा रागदारी पेश करतो ना तसं तुझं पाकृचं सादरीकरण म्हणजे तबीयतदार पेशकश असते! जियो!!

(तृप्त)चतुरंग

मीनल's picture

9 Dec 2009 - 7:15 pm | मीनल

हा माणूस काय अलटिमेट आहे!
कुठल्याही सुगरणीला मागे टाकेल.

तुम्ही कुठे राहता?
तिथे कलिनरी काँपिटेशन्स होतात का?
तुम्ही जरूर भाग घ्या.
अनोख्या रेसिपींमुळे बक्षिस तुम्हालाच मिळेल यात तिळमात्र शंका नाही.

मीनल.

श्रावण मोडक's picture

9 Dec 2009 - 7:20 pm | श्रावण मोडक

गोड मुटके ठाऊक होते. हे नवीनच. आणि एकूण त्याच्या वर्णनावरून लक्षात येतंय की, एका बैठकीला किमान दहा-एक खाऊन संपतील निवांत.

चित्रा's picture

9 Dec 2009 - 7:39 pm | चित्रा

कौतुक वाटते.

आता एक सांगा - तुम्ही हे कसे शिकलात, आईच्या करण्याकडे पाहून , तिने शिकवून का स्वतःचे स्वतः?

मी स्वतः नुसते पाहून शिकले, पण त्यामुळे करण्यात (मोदक वगैरे नाजूक पदार्थ) जरा कमी पडते असे वाटते.

गावाच्या आठवणींनी आणी अंगणात आजीने भरवलेले मुटके आठवून डोळे भरून आलेत.. :(

गणपा's picture

9 Dec 2009 - 8:10 pm | गणपा

सर्व रसिकांचे मनःपुर्वक आभार.
_/\_

-माझी खादाडी.

भानस's picture

9 Dec 2009 - 9:24 pm | भानस

आहेस रे तू. लिखाणही सुंदर अन पाकॄ तर खल्लास.... :) आता आपल्याकडचे वातवरण तर नाही आणू शकत इथे पण निदान मुटके करून पाहते.

मदनबाण's picture

9 Dec 2009 - 9:31 pm | मदनबाण

लेख आणि पाकृ दोन्ही मस्तच...
गण्या च्यामारी कधीतरी योग जुळो आणि तुझ्या कडची एखाध्यातरी पाकृची चव चाखायला मिळो (फक्त शाकाहारी हं ) !!! फोटो पाहुन पाहुन वाईट अवस्था झाली आहे,आणि हा पदार्थ तर पहिल्यांदाच पाहिला !!!

अवांतर :--- अरे बंधु ,तो नळकांड्याचा कसलासा फोटु खफ वरती टाकला हाय तो हाय तरी कसला ?

(१ नंबरी खादाड)
मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia

भडकमकर मास्तर's picture

10 Dec 2009 - 1:10 am | भडकमकर मास्तर

अरे काय हा स्पीड की काय पाककृती करायचा आणि लिहायचा आणि शिवाय फोटोबिटो म्हणजे बेस्टच आहे

धनंजय's picture

10 Dec 2009 - 9:23 am | धनंजय

फारच छान.

आशिष सुर्वे's picture

10 Dec 2009 - 10:12 am | आशिष सुर्वे

गणपा लेका.. तू तिथं काय करतोयस रे..

लेका ये की इथे.. ते संजीव कपूर नी हरी नायक नी आनखी कोनी सर्वे झक मारत्यात बग तुज्याम्होरं
काय लिवतोयस लेका..!!

नमनाला अगदी नीटनेटकं अन् मोजकं तेल कसं घालावं, ते तुला एकदम पक्कं माहीत हाय बग!

-
कोकणी फणस

श्रीयुत संतोष जोशी's picture

11 Dec 2009 - 12:11 pm | श्रीयुत संतोष जोशी

ज ब र द स्त
अ प्र ति म
सुं द र
झ क्का स
लै भारी
एक नं
फुल टू ट का ट क
अ व र्ण नी य
........
.........
..........
............

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.