Skip to main content

जोधा अकबर

लेखक कोलबेर यांनी मंगळवार, 18/03/2008 01:13 या दिवशी प्रकाशित केले.
आशुतोष गोवारिकरचा हा भव्य दिव्य वादग्रस्त चित्रपट एकदाचा पाहायला मिळाला. भारतात हा चित्रपट बंद पाडण्यासाठी लोक रस्त्यावर का उतरले आहेत ह्याची पुसटशी कल्पना आली. इतिहास वगैरे मारो गोली पण आजकाल मल्टिप्लेक्सच्या दिवसात चित्रपट बघायचा म्हणजे जेव्हा दोन तीनशे रुपयाला फोडणी लागते तेव्हा त्या बदल्यात पदरात असले काही पडणार असेल तर लोकं रस्त्यावर येणारच. असो.. तर हा भव्य दिव्य चित्रपट सुरू होतो अमिताभ बच्चन ह्यांच्या खर्जातल्या आवाजाने. मुघल भारतात कसे आले इथपासून ते छोटा अकबर पानिपतावर कसा पोहोचला इथपर्यंत त्यांचा आवाज आपली सोबत करतो. पानिपतात मुघल सैन्याने हिंदू राजाला छोट्या अकबरा समोर पेश केले असता अकबर त्याला मारत नाही. 'हा देश महात्मा गांधींचा आहे, इथं मी हिंसा करणार नाही! ह्या राजाला जिवंत सोडून द्या' असं म्हणणार्‍या त्या बाल अकबराचे आपल्या कोण कौतुक वाटते (आता गांधींचा जन्म अकबरानंतर शेकडो वर्षांनी झाला असली ऐतिहासिक कुजकट शंका कुणाला येत असेल तर तो दोष तुमचा आहे! हा चित्रपट ८०%च इतिहासावर असून २०% गोवारिकरांचे स्वप्न रंजन आहे हे तुम्हाला माहीत नाही का?) नंतर थोड्या लढाया स्पेशल इफेक्ट वगैरे झाले की कथा वळते राजपूत राज घराण्यांकडे. इथे आमेर नावाच्या संस्थानात एक वेडसर राजा असतो. त्याची मुलगी म्हणजे जोधा (ऐश्वर्या राय-बच्चन) जी फावल्या वेळात आपल्या भावाशी ढाल तलवार वगैरे (एकदम रजपूत ष्टाईल) खेळत असते. तर हा राजा लवकरच आपला वारीस जाहीर करणार असतो आणि जोधाला आपला ढाल तलवारवाला भाऊ नॉमिनेशन जिंकणार अशी खात्री असते. शेवटी दसर्‍याच्या दिवशी हा राजा (अर्थातच वेडसर असल्याने) दुसर्‍याच कुणाची तरी निवड वारस म्हणून करतो आणि आपल्या जोधाचा विवाह देखिल तिच्या बालपणीच ठरलेल्या राजकुमाराशी जाहीर करून टाकतो. इकडे सत्ता आपल्याला मिळत नाही म्हणून हा चिडलेला भाऊ राजाच्या विरोधात कट शिजवू लागतो. हे पाहून राजाची मात्र चांगलीच टरकते आणि तो सरळ जाऊन मुघलांशी हातमिळवणी करायचे ठरवतो आणि कहानीमे ट्वीस्ट इथे येतो. मुघलांना मी माझे राज्य अर्पण करेन पण त्यांच्या बादशहाने माझ्या मुलीला देखिल त्याच्या जनानखान्यात भरती केले पाहिजे अशी 'अट' (जोधाला न विचारताच) परस्पर घालून टाकतो. आयतेच राज्यही मिळतेय आणि राजाची मुलगी देखिल हा राजाचा वेडसरपणा पाहून खरंतर अकबराच्या तोंडाला पाणी सुटते पण ते लपवून आपण ह्या प्रस्तावावर चक्क विचार करत आहोत असे दाखवण्यात ह्रितीक रोशनने अभिनयात कमाल केली आहे. शेवटी थोडेसे आढेवेढे घेतल्यावर अकबर ऑफर एकदाचा कबूल करतो. परंतु आता जोधा मात्र ह्या प्रकाराने वैतागलेली असते.. ती म्हणते माझ्या मना विरुद्ध लग्न ठरवताय? काही हरकत नाही! पण माझ्या सुद्धा दोन अटी आहेत. आता हा राजा, लग्न ठरवताना मुलीला कसलेही मत विचारत नाही पण ह्या अटींचे प्रकरण मात्र एकदम मान्य करतो... का? अहो शेवटी वेडसरंच ना तो! तर ह्या अटी ती फक्त अकबरालाच सांगणार म्हणे बाकी कूण्णालाही नाही असा क्लॉज देखिल असतो..झाले सगळे पुन्हा एकदम टेन्शन मध्ये.. एकदम सीरियस म्युझिक. शेवटी अकबर एकांतात तिला भेटायला जातो.ह्या टेन्स वातावरणात, 'हमे कुछ नही चाहिये बारतियोंका स्वागत पान परागसे होना चाहिये' अशी अट तर जोधा घालणार नाही ना? असा एक अविचार मनात डोकावून जातो. पण नाही जोधाच्या दोन शुल्लक अटी अकबर कबूल करतो आणि धूमधडाक्यात लगीन लावून तिला घेऊन जातो. इथं एक 'ख्वाजा मेरे ख्वाजा' नावाचे गाणे येते त्याच्या शेवटी ह्रीतीकने केलेला नाच अगदी बघण्यासारखा आहे. त्यावेळेस त्याच्या चेहर्‍यावर असणारे मतिमंद भाव खरंच दाद देण्यासारखे आहेत (दुवा बघुन खात्री करा!). पांढरे वेष घातलेल्या जपानी रेस्टॉरंटातल्या आचार्‍यां सारख्या दिसणार्‍या कलाकारांनी केलेली कवायत देखिल पहाण्या सारखी आहे. (तुमच्या संगणकाचा आवाज बंद करुन एकदा ही कवायत बघाच!) इथून पुढे मात्र गोवारीकरांनी दिग्दर्शन एकता कपूरच्या कुशल नेतृत्वाकडे सोपावाले आहे. प्रेम करणारा पती कजाग नसणारी सासू असे सगळे असूनही एकता कपूरने तिचे टॅलंट दाखवले आहे अकबराच्या दाईचे पात्र रंगवण्यात. अकबराचा सांभाळ आईपेक्षा म्हणे ह्या दाईनेच केलेला असतो. आणि सासू मवाळ असली तरी ही उपसासू मात्र महा कजाग असते. त्यांतून एक समज गैर समजांची मानवी नाते संबंध दाखवणारी घरेलू घर घर की कहानी सुरू होते जी पडद्यावरच बघावी..कारण मी तो पर्यंत झोपून गेलो होतो आणि मधून मधून 'किती घोरतोयस?' असं बायकोच्या आवाजात कुणीतरी म्हणत असल्याच पुसटसं आठवतंय! शेवटी काहीतरी ढढँ ढढँ वाजते आणि चित्रपट एकदाचा संपतो इतकेच आठवते आहे!!

वाचने 35819
प्रतिक्रिया 81

प्रतिक्रिया

आता च्यामारी नाही .. . . . . . . . . . . . . . . . . . . . तर तद माताय म्हना समजल का? विवेक वि.

आणि हा विनोदी चित्रपट फार आवडला बुवा मला.. किती उच्च प्रतिचे विनोद होते यात सुरुवातीपासून... :"भारतावर प्रेम करणार्‍या मुघल सल्तनतीचा उदय झाला "म्हणे.यात होते कोण कोण तर "हुमायून, बाबर.. आणि या परंपरेत दाखल झाला अकबर". वाहवा! हो ना! आणि याच परंपरेत पुढे जहांगीर, शाहजहान, औरंगझेब असे राजे निर्माण झाले असे सुधा म्हणतील हे लोक. मग काही दिवसानी औरंगझेबावर पण सिनेमा लागेल आणि त्यात त्याचा उल्लेख "प्रेमळ, मनमिळावू, सहृदय" असा झाला तर आश्चर्य वाटायला नको. पुण्याचे पेशवे

कोलबेरराव जबरा परिक्षण लिहले आहे. मलाही पिक्चर जास्त आवडला नव्हता, झोपलो नाही इतकेच .... "'हा देश महात्मा गांधींचा आहे, इथं मी हिंसा करणार नाही! ह्या राजाला जिवंत सोडून द्या'" हे वाक्य खरोखर आहे का नाही ते लक्षात नाही पण अकबराने असे सोडून दिलेले अजिबात आवडले नाही.... च्यायला पिक्चर बघण्यामागे आमच्या काही अपेक्षा असतात आणि त्या जर तुम्ही पूर्ण करणार नसाल तर आम्हाला 'दगडफेक' करण्याचा पूर्ण अधिकार आहे असे आम्ही मानतो... शेवटी अकबर एकांतात तिला भेटायला जातो.ह्या टेन्स वातावरणात, 'हमे कुछ नही चाहिये बारतियोंका स्वागत पान परागसे होना चाहिये' अशी अट तर जोधा घालणार नाही ना?..." हा हा हा. आणि समजा घातली असती तर अकबराने म्हणायला हवे " बारातीयों का स्वागत हम रेडियो मिर्ची लगाकर करेंगे " अजून एक खटाकलेला प्रसंग म्हणजे अकबराचे "खलिफा-ए-तुर्कस्तानच्या" आवेशात बाजारात काय जातो, तिथे सवाल्-जबाब काय करतो, लोक पण त्याला अत्यंत "महत्वपूर्ण व आतल्या गोटातली" माहिती देतात ... सगळेच हस्यास्पद ... मला शंका आली की आता अकबराला बाजारात "मार तर नाही खवा लागणार". आता तुम्ही अकबराला येवढे "दिलवाले जिल्लेईलाही" दाखवले आहे तर त्याच्या दरबारातील "नवरत्ने " दाखवता नाहित आली ... बाकी तुमच्या उपमा जपानी आचारी , मतिमंद, पान पराग ह्याला तोड नाही ... छोटा डॉन-ए- बंगरूळूस्तान [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

ह ह पु वा झाली... ........... अतिशयोक्त वर्णन आवडले....( अर्थात तुम्ही जितकी वाट लावून ठेवली आहे, तितकी फिल्म वाईट नाही... आमच्या मते काही प्रसंग झकास जमले आहेत उदा. तलवार बाजी करणार्‍या हृतिक ला जोधाने लपून पाहणे, युद्धे,हत्ती ला काबूत आणणे वगैरे)... ते असो) सर्व लोक तुमचे गान्धीजी डायलॉग फार सीरियसली घेत आहेत...का कोण जाणे?? अहो, तुम्ही फार लवकर झोपलात..... पुढे फार विनोदी विनोदी प्रसन्ग तुम्ही मिस केलेत..... उदा. १.ते २६ जानेवारील दिल्लीला असते तसे गाणे किंवा गॅदरिन्ग ला असते ना प्राथमिक शाळेच्या , तसे , ( अझीमो-शाह-शहन्शाह).....त्यात तर नन्तर नन्तर डोक्यात पिसे खोवलेले ईशान्येचे आदिवासी डांस करताना पाहून खूपच करमणूक झाली...आणि टिपिकल कोरिओग्राफी, गोलात नाचतायत , एकदा पुढे, मग मागे, एकदा क्लॉक्वाईज मग बाहेरचा गोल अँटिक्लॉकवाईज)वगैरे.... २. अकबर आपल्या बायकोसमोर आपण निरक्षर असल्याचे कबूल करतो तो प्रसंग महा विनोदी आहे....( सत्य असले तरी लेखकाने आपल रिसर्च दाखवायची ती वेळ नव्हती) ३.हृतिक ने काम बरेच बरे केले आहे, पण एकूणच सारखे प्रश्न पडत राहतात सिनेम पाहताना.... जेव्हा तो म्हणतो , " हम हिन्दुस्तान को गलत हाथोमें नाही जाने देंगे"..अरे जलालुद्दिन, तू स्वतःच गलत नाहीस का रे लब्बाडा, कुठून बाहेरून येतोस , आणि हिन्दुस्थानावर राज्य करतोस?? ______________________ ते ख्वाजा मेरे ख्वाजा गाण्यातले हावभाव आणि नृत्य मलाही भयन्कर विनोदी वाटले होते...परन्तु "तुर्कनामा " ( ले. मीना प्रभु) या पुस्तकात या धार्मिक गाणे गात गोल गोल फिरणार्‍या तुर्की मंडळींचे फोटो आहेत, ती तशीच पद्धत असते म्हणे गात नाचण्याची.... थोडक्यात गोवारीकरांचा रिसर्च तुम्हाला -आम्हाला झेपला नाही इतकेच.... ______________________________ माझ्या बायकोच्या मते अकबर सिनेमात लहानपणापासून कोणाच्या तरी इच्छेने चालणारा दाखवला आहे, आधी बहराम खान, मग ती दाई, मग जोधा ( ती म्हणते म्हणून जनतेच्या कल्याणाची कामे करतो तो..... आणि तीर्थयात्रेचा टॅक्स कमी करणे इतकेच काय ते महान काम दाखवले आहे....)....शेवटी शेवटी सिनेमा सम्पता सम्पत नाही....आवरा हो आवरा, असे म्हणायची वेळ येते प्रेक्षकावर, मला जाम कंटाळा आला..._______________एवढ्या पैशांत किमान पन्नास चांगले मराठी सिनेमे निघाले असते....

गाण्यात तो सगळ्यात पुढे बसलेला नाकातून सगळे विश्व दिसणारा अत्यंत सुस्वरूप कलाकार कोण आहे?

मला तर सिनेमा एवढा खराब नाही वाटला. एकदा तरी पाहू शकतो. हो, एवढे आहे की इतर आवडलेल्या सिनेमांप्रमाणे नंतर टीव्ही वर त्याची जाहिरात पाहताना चित्रपट पाहिल्याची खास आठवण येत नाही ( हा माझा चित्रपट आवडणे/ न आवडणे ह्याचा निकष काढण्याच्या पद्धतीतील एक आहे. माझ्या फिल्लमबाजीवर नंतर लिहिनच :) ) मी सिनेमा पहायला गेलो तो हृतिक रोशन करीता, आणि त्यावेळी नववधूबरोबर तोच एक चित्रपट पहावासा वाटला ;) सर्वांचे काम आहेच चांगले, गाणी एवढी खास नाही वाटली. आताही माहित नाही त्यात किती व कोणती गाणी आहेत

जबरा!!!!.. परिक्षण वाचून ह ह लो पो :))))))) त्यातही जपानी आचारी, पान पराग आणि गांधी तर क्लास !!! जियो! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

मी हा चित्रपट पाहीला नाही. पाहण्याचे काही कारणही नाही. पण, तुमच्या 'आग्रहा'मुळे हे अत्यंत कंटाळवाणे गाणे उगिच बघितले. हे गाणेतर विनोदीही नाही. नुसतेच रटाळ साडेसहा मिनिटे........................................................................................................... अशी. कंटाळलेली, ऐश

जोधा अकबर चांगला सिनेमा आहे. अकबराचा थोडा उदो उदो आहे which is bad. पण in general या परिक्षणा इतका वाईट नक्किच नाहि.