तुमचे असे होते का माहिती नाही, पण माझ्या बाबतीत कधीतरी असे होते की काहीतरी महत्त्वाचे आठवायचे असते, पण काही केल्या त्याक्षणी तरी आठवत नाही. मागून कधीतरी गरज नसताना आठवूनही जाते, पण त्याक्षणी जी माहिती हवी असते ती काही मिळत नाही. अशाच प्रसंगांमधून गेलेल्या दोन सॉफ्टवेअर संशोधकांनी समोर ठेवलेल्या पर्यायाबद्दल ऐकण्याचा प्रसंग आताच मागील काही दिवसांमध्ये आला. यांची नावे आहेत - गॉर्डन बेल आणि जिम गेमेल. हे दोघे मायक्रोसॉफ्टमध्ये कामाला आहेत. त्यांच्या संशोधनाची दिशा ही आपल्या (म्हणजे मानवी आयुष्याबाबतीत) अनेक मूलभूत असे प्रश्न उपस्थित करेल अशी वाटली.
खरे तर आजकाल अनेक शहरी माणसांची आयुष्ये (किंवा आयुष्याचे मोठे भाग) हे एका अर्थाने इंटरनेटावर असतात. त्याखेरीज कामाव्यतिरिक्त आपल्यापैकी बरेच जण ब्लॉग लिहीतात. त्यातून आपले अनुभव, आपली माहिती, फोटो, कविता आणि गाणी, हे सर्व इतरांपर्यंत पोचवण्याचा हा एक प्रयत्न असतो. त्या अर्थाने याला एक सोशल - सामाजिक मिती (डायमेन्शन) आहे. जे आपल्या अगदी नजिक उपलब्ध नसते, म्हणजे समविचारी वाचकवर्ग, आणि कधी मित्र-मैत्रिणीसुद्धा या आपण अशा माध्यमांमधून मिळवीत असतो. त्याअर्थाने आपल्या शारीर अस्तित्त्वाचाच हा एक जरा सांधलेला, वाढवलेला भाग असतो. जरी ह्या गाठी-भेटी प्रत्यक्ष दिसत नसल्या, तरी त्यातून आपल्याला आवश्यक अशी सहानुभूतीची किंवा स्विकारण्याची, समाजाचाच एक भाग असण्याची भावना जागरूक होत असते.
पण गॉर्डन बेल आणि जिम गेमेल ह्यांचा हा प्रयोग त्या अर्थाने सामाजिक नाही, वैयक्तिक आहे. आयुष्यातील लहानात लहान घटनांच्या नोंदी ठेवण्याचा हा प्रयोग आहे. गॉर्डन आणि जिम याला "लाईफ ब्लॉगिंग" म्हणतात. नेहमीच्या ब्लॉगिंग मधील आणि यातील फरक असा की हे लाईफ-ब्लॉगिंग हे स्वतःच्या आठवणींसाठी ठेवलेले आहे; वाचक, मित्र, सुहृद यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी नाही. या आठवणींत तुमचे व्हिडिओ, लेखन, उद्या तुमच्या मेंदूने आठवणींच्या बाबतीत दगा दिला, तर त्या आठवणींच्या नोंदी - असे सर्व तुम्हाला हव्या त्या क्षणी "रीकॉल" करण्याची, उतरवून घेण्याची, ही सोय आहे. जिम गेमेल याचे उदाहरण देताना म्हणतात - काहीसे धक्कादायक वाक्य आहे - की जसे मी आयुष्यात फ्लश टॉयलेटची अपेक्षा करतो, तसेच आयुष्यातील आठवणींचे आहे, त्याही माझ्यापुढे हवे तेव्हा उपलब्ध असल्या पाहिजेत.
गॉर्डन यांनी आपल्या आयुष्यातील अशा सर्व लहानमोठ्या घटनांच्या नोंदी "माय लाईफ बिट्स" म्हणून ठेवल्या आहेत. आणि जेव्हा ते अशा त्या ठेवू लागले तेव्हा जमलेल्या सगळ्या विद्याचे (डेटाचे) वर्गीकरण करणे हे त्यांना कठीण होऊ लागले. यासाठी त्यांनी जिम गेमेल यांची मदत घेतली. गॉर्डन म्हणतात की "ह्या नोंदींचा एक फायदा असा की ती तुमच्या आयुष्यातील नको तो पसारा दूर करते - त्याला गॉर्डन डिजीटल फेंगशुई म्हणतात! - क्लीन लिव्हिंग. तुम्ही "पोर्टेबल" /"चलत" बनाल, तुमच्या आठवणी, तुमच्या सर्व नोंदी एका प्रकारे तुमच्या सतत सांगाती राहतील. इतकेच नाही, मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे तुमचा भूतकाळ तुम्हाला हवा तेव्हा समोर हजर असू शकतो - आठवणींच्या रूपात, वेगवेगळ्या पद्धतीच्या इलेक्ट्रॉनिक विद्याच्या (डेट्याच्या) रूपात.
ही (इंग्रजी) मुलाखत एनपीआर रेडिओवरील "ऑन पॉइंट" कार्यक्रमाचे संचालक टॉम अॅशब्रूक यांनी घेतली आहे. ऐकण्यासारखी आहे.
http://www.onpointradio.org/stand-alone-player?fileUrl=http%3A%2F%2Fwww…
हे ऐकताना प्रश्न दोन प्रकारचे पडले -
१. ही अशी इ-मेमरी असणे आपल्यापैकी किती जणांना खरेच आवडेल? आवडल्यास का, आणि नावडल्यास का नाही?
२. या सर्व विद्याची (डेट्याची) नोंद कोण करणार? तो पूर्णपणे सुरक्षित असेल का? उद्या तुमच्या इ-मेमरीत ढवळाढवळ करणे कोणाला शक्य होईल का?
३. ह्या सर्व प्रकारात जर अनेक देशातील अनेकजण अशा आयुष्यभराच्या इलेक्ट्रॉनिक नोंदी ठेवत गेले, तर नक्की अशा सर्व संगणकीय "पसार्या"ला इ-जागा तरी किती लागेल?
हे प्रश्न जरी सध्या काहीसे शंका असल्याप्रमाणे वाटले, तरी फेसबुक, ट्विटर यांचे जसे सार्वत्रिकीकरण चटकन झाले, तसेच याही कल्पनेचे होऊ शकते असे वाटले. म्हणून म्हटले विचारून पाहू, तुमचे मत काय आहे?
वाचने
12353
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
आजच
सिलेक्टीव्ह मेमरी
"गॉर्डन
धक्कादायक
कोणत्याही
खूप नवीन
आभारी आहे
या नोंदी
In reply to आभारी आहे by चित्रा
नावीन्य
In reply to या नोंदी by श्रावण मोडक
आपले सर्वच
In reply to नावीन्य by चित्रा
१९८४
In reply to नावीन्य by चित्रा
थोडा वेगळा
In reply to नावीन्य by चित्रा
नविनच
पण
In reply to नविनच by स्वाती२
डोकं
आपलं आयुष्य नैसर्गिकरीत्या जगण्याचं
मेंदूची निष्क्रियता...
+१ अगदी खरं
In reply to मेंदूची निष्क्रियता... by प्रभाकर पेठकर
धन्यवाद
>>>>त्यासाठी
In reply to धन्यवाद by चित्रा
हे म्हणजे काल निर्ण यचे मागचे पान वाट्ते मला.