विंगकमांडरांचा बहुरंगी वहुढंगी वग- नाडीभविष्याचा चमत्कार अर्थात् 'शिळ्या कढीला ऊत' भाग १

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in काथ्याकूट
3 Sep 2009 - 10:26 am
गाभा: 

प्रास्ताविक
सध्या मिपावर नाडीज्योतिषाबाबत व अंनिस बाबत मजकुर येत आहे. १९९५ ते २००३ या काळात हा विषय आमच्या अत्यंत जिव्हाळ्याचा व ऐरणीचा होता. त्याकाळात अनेक पत्रव्यवहार झाले. लेख झाले. प्रतिवाद झाले. अंधश्रद्धा निर्मुलन वार्तापत्र, एप्रिल १९९९ मधील लेख आम्हाला या निमित्ताने आठवला. हा लेख त्यावेळच्या घटनाक्रमांवर आनुषंगिक आहे.मिपावरील चर्चेवर ही प्रतिक्रिया नसुन त्यानिमित्त असलेली प्रतिक्षिप्त क्रिया आहे. याकडे फक्त एक संदर्भ म्हणुन पहावे. ऐतिहासिक दस्तऐवज म्हणा हव तर. आत्ताच्या चर्चेशी त्याचा संबंध लाउ नये. आमचा प्रतिवाद हा विचारांशी आहे . वैचारिक प्रतिवाद करता करता कळत नकळत आपण व्यक्तिगत पातळीवर देखील जातो. हे परस्पर वाद प्रतिवाद यातुन घडते. मानवी स्वभाव आहे तो. माझे जेष्ठ स्नेही फलज्योतिष चिकित्सक माधव रिसबुड यांच्या कडे आमचा अड्डा असायचा. आमचे बरेचसे लेखनही एकत्रित असायचे. असो गेले ते दिवस. या लेखा निमित्त अनेक लोक आमच्याकडुन दुखावले गेले होते. त्यांच्याशी पत्रव्यवहार करता करता आमच्या नाकी नउ आले होते. आता आम्हाला नाडी या विषयाचा कंटाळा आला आहे.
विंग-कमांडरांचा बहुरंगी बहुढंगी वग - नाडीभविष्याचा चमत्कार अर्थात् 'शिळ्या कढीला ऊत`
( ढोलकी: खुद्द प्राचार्य गळतगे )

प्रकाश घाटपांडे

विंग-कमांडर शशिकांत ओक यांनी लिहिलेले "बोध अंधश्रद्धेचा" या नावाचे पुस्तक आमच्या एका सनातनी मित्राने आमच्या हाती दिले व 'आता बोला!' अशा आविर्भावाने तो आमच्याकडे बघू लागला. पुस्तक वरवर चाळून पहाताच मित्राचा हेतू आमच्या ध्यानात आला. पुस्तक वाचतांना आम्हाला असे वाटले की 'बोध अंधश्रद्धेचा' या नावाऐवजी लाभ अंधश्रद्धेचा, किंवा लोभ अंधश्रद्धेचा हे नाव या पुस्तकाला जास्त शोभून दिसले असते!
नि:स्वार्थपणे जनहितार्थ झटणारे ते दैवीगुणाचे, आपल्याबरोबर इतरांचेही हित जपणारे ते मनुष्यगुणाचे, आपल्या स्वार्थाकरिता दुस याचे नुकसान करणारे ते राक्षसगुणाचे, पण निष्कारण दुस यांचे नुकसान करणा यांना काय म्हणावे हे भर्तृहरीला समजेना! 'ते के न जानीमहे |' एवढे म्हणून तो स्वस्थ बसला. त्याच्या वर्गवारीप्रमाणे समाजात भोळसट आणि वेडगळ समजुती फैलावण्यातच ज्यांचा स्वार्थ गुंतलेला असतो त्यांना आपण राक्षस-श्रेणीत घालू शकू पण केवळ सनसनाटीच्या आनंदासाठी घातक किंवा वेडगळ समजुती जे फैलावतात त्यांना कोणत्या श्रेणीत घालायचे ? (देवालाही वेठीला धरणारे हे लोक!) त्यात त्यांचा काही स्वार्थ असतो म्हणावे तर तसेही नसते. तर, अशा या दोन श्रेणीच्या लोकांना अं. नि. स. हा त्यांच्या मार्गातला एक मोठा अडसर आहे असे वाटते म्हणून ते तिच्यावर सतत आग ओकत असतात. प्रस्तुत पुस्तकाच्या लेखकाचा हेतू तोच आहे एवढे सांगितले म्हणजे पुस्तकाच्या स्वरूपाची कल्पना वाचकांना येईल.
पूर्वेतिहास.
१९९४ च्या अखेरीस " नाडीभविष्य- चक्रावून टाकणारा चमत्कार " या नावाचे अंकवजा पुस्तक श्री. ओकांनी लिहून प्रसिद्ध केले आणि नाडीभविष्याचा जोरदार प्रचार सुरू केला.त्याची प्रत नारळीकरांनाही अभिप्रायासाठी पाठविली. डॉ.नारळीकरांनी त्यावर आपली भूमिका अविश्वासाची आहे असे सकारण सांगून १००० - २००० व्यक्तींचे सॅम्पल घेवून वस्तुनिष्ठतेचे निकष सांभाळून तशी चाचणी होवू शकेल असे सांगितले. बोध अंधश्रद्धेचा या पुस्तकात पृष्ठ ८ वर डॉ. जयंत नारळीकरांना लिहीलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, ''आपण आपली पट्टी पहावी अशी माझी तीव्र इच्छा आहे कार्यबाहुल्यामुळे आपणास ते शक्य नसेल तर आपण आपला अंगठाछाप व इतर माहिती पाठवल्यास आपली पट्टी हुडकून फोटो, वही, कॅसेट पाठवू शकेन.`` याच पत्राची प्रत डॉ. दाभोळकरांना पाठवण्यात आली होती. त्यावर डॉ. दाभोळकरांनी श्री. ओक यांना असे कळवले की १० व्यक्तींच्या अंगठ्याचे ठसे व इतर आवश्यक माहिती ओकांच्या कडे पाठविण्यात येईल. त्याच्या आधारे व्यक्तींचे शिक्षण, विवाह, संतती अशा निश्चित व तपासण्याजोग्या बाबींची माहिती नाडीग्रंथाद्वारे मिळवून ओकांनी पाठवावी. या पत्राला श्री. ओकांनी ता. ८-४-९५ च्या पत्राद्वारे असे कळवले की या त-हेचे सहकार्य ओक देउ इच्छित नाहीत. दाभोळकरांनी त्यांची माणसे परीक्षणासाठी समक्ष केंद्रात पाठवावीत. डॉ.दाभोळकरांनी श्री. कुंभोजकरांना लिहिलेल्या दि. १५.२.९५ च्या पत्रात नाडीभविष्याला आव्हान दिले. आव्हानाचे स्वरूप असे होते की ज्या कोणाला अशी खात्री वाटत असेल की व्यक्तीच्या अंगठयाचा ठसा, व काही आवश्यक तपशील एवढया सामुग्रीवर त्या व्यक्तीच्या विशिष्ट बाबींचा बिनचूक तपशील नाडीपट्टीतून मिळतो, त्याने इच्छा असल्यास हे आव्हान स्वीकारावे आणि पाच लाख रुपये जिंकावेत. हे आव्हान कोणा एका विशिष्ट व्यक्तीला दिलेले नव्हते. डॉ. दाभोळकरांना ही खात्री वाटत होती की नाडीपट्टीतून अशा त-हेची माहिती मिळणे अशक्य आहे व हे आव्हान कुणीही स्वीकारून जिंकू शकणार नाही. दाभोळकरांना वाटत असलेली खात्री कशी योग्य होती ते या लेखावरून समजेल. या आव्हानामुळे लोकांचे लक्ष या विषयाकडे आकर्षित झाले, पण ओकांचा व त्यांच्या समर्थकांचा तिळपापड झाला. आपला दावा सिद्ध होउ शकणार नाही याची कल्पना ओकांना होतीच, म्हणून तो दावा नाशाबित करण्याची जबाबदारी ते दाभोळकरांच्यावर ढकलू लागले! 'दाभोळकरांनी स्वत: नाडीभविष्याचा अनुभव घेउन मगच काय ते बोलावे' असा घोशा त्यांनी लावला. त्यात त्यांचा कावा असा होता :- समजा, दाभोळकर स्वत: नाडीकेंद्रात जाउन आले व आपल्याला काहीही अनुभव आला नाही असे म्हणू लागले तर ' दाभोळकर पूर्वग्रह-दूषित असल्यामुळे त्यांनी नाडीवाचकाला खरी उत्तरे दिली नसावीत त्यामुळे त्यांना अनुभव आला नाही' असा आरोप करायला ओक मोकळेच रहातात! या दरम्यान, नाडीपट्टीतील कूटलिपी तामीळ भाषिक लोकांना ओळखता येते की नाही याचा उहापोह सुरू झाला. त्यात अगदी परस्पर-विरोधी अभिप्राय मिळाले.
पुष्कळ पत्रापत्री झाली, आरोप-प्रत्यारोप व तोंडी वादविवाद झाले. होता होता, १९९६ च्या किर्लोस्कर दिवाळी अंकात अं. नि. स. चे एक प्रमुख कार्यकर्ते श्री. ओंकार पाटील यांचा स्वानुभवावर आधारलेला प्रदीर्घ लेख प्रसिद्ध झाला. नाडीज्योतिषाचे बिंग त्यांनी फोडले होते. त्यानंतर दोन वर्षे सामसूम झाली होती. आता पुन्हा या पुस्तकाच्या रूपाने त्या शिळ्या झालेल्या कढीला ऊत आणायचे ओकांनी ठरवलेले दिसते. अं. नि. स.च्या वतीने त्यावर काही लिहिण्याची आवश्यकता आम्हाला दिसत नाही, परंतु नाडीभविष्यासंबंधाने काही माहिती वाचकांना द्यावी व प्रस्तुत पुस्तकात नाडीभविष्यासंबंधाने केलेल्या विपर्यस्त विधानांचा प्रतिवाद करावा या उद्देशाने हा लेख आम्ही लिहीत आहोत. अं.नि.स.ची या विषयासंबंधीची भूमिकाही यामुळे स्पष्ट होण्यास मदत होईल.
ओकांचा अतिरंजित मतलबी प्रचार.
" नाडी-भाकिते हजारो वर्षांपूर्वी त्रिकालज्ञानी महर्षींनी अतींद्रिय ज्ञानाच्या सहारयाने लिहून ठेवली आहेत, प्रत्येक माणसाचे भाकित कूटलिपीत ताड-पट्टीवर कोरून लिहिलेले आहे, इतकेच नव्हे तर त्याचे नाव, त्याच्या वडिलांचे नांव हे सुद्धा कोरून ठेवलेले आहे," असा धडाकेबाज प्रचार ओकांनी सुरू केला. आम्ही असे ठामपणाने सांगतो की ही भाकिते १६ ते १७ शे वर्षाहून जास्त जुनी असणे शक्य नाही, ती कुणी अतींद्रिय ज्ञानाच्या मदतीने लिहिलेली नसून ज्योतिषशास्त्राच्या मदतीने सामान्य ज्योतिषांनी लिहिलेली आहेत, व मुख्य म्हणजे पट्टीवर कूटलिपीत नावे असणे केवळ अशक्य आहे. ओकांचा प्रचार विपर्यस्त व केवळ जाहिरातबाजीसाठी चाललेला आहे. आमच्या प्रतिपादनास आधार पुढीलप्रमाणे आहेत:-
१.) नाडीपट्टीतून निघालेल्या कुंडलीसोबत जन्मदिवशीच्या वाराचा सुद्धा उल्लेख असतो. सोम-मंगळादि सात वार खाल्डियन लोकांच्याकडून आपल्याकडे इसवी सन पूर्व सुमारे पाचव्या शतकात आले. त्यापूर्वी आपल्याकडे फक्त तिथ्यांचा उल्लेख करीत असत. ( आधार:- कै. शं. बा. दिक्षित कृत भारतीय ज्योतिषशास्त्राचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास. ) यावरून असे दिसते की नाडीभविष्ये जास्तीत जास्त अडीच हजार वर्षाहून प्राचीन नाहीत.
२.) नाडी ज्योतिषातली भाकिते १२ कांडांत १२ स्थानांच्या फलानुसार विभागलेली असतात. १२ स्थानांचा संबंध बारा राशींशी आहे. राशींची कल्पना ग्रीक ज्योतिषांनी भारतात इसवी सन पूर्व सुमारे तिस या-चौथ्या शतकात आणली. त्यापूर्वी भारतीय ज्योतिषांना मेष-वृषभादि राशी माहीत नव्हत्या. ( पहा: वरील ग्रंथ. ) यावरून एक गोष्ट निश्चित दिसते की नाडीभाकिते २३०० वर्षाहून जास्त प्राचीन असणे शक्य नाही.
३.) नाडीपट्टीत निघलेली कुंडली पृच्छकाजवळच्या जन्मकुंडलीशी तंतोतंत जुळते असे नाडीसमर्थक मोट्या कौतुकाने सांगतात. पट्टीत निघालेली कुंडली निरयन राशींवर आधारलेली असते हे उघड आहे. राशींची निरयन गणना १६-१७ शे वर्षापूर्वी भारतात प्रचलित नव्हती, ती इ. स. च्या चौथ्या-पाचव्या शतकानंतर केव्हातरी ज्योतिषांच्या प्रचारात आली असावी. ( ग्रीकांनी व पाश्चात्य देशांनी ही पद्धत स्वीकारलेली नाही. ) यावरून हे उघड दिसते की प्रस्तुत नाडीभविष्ये १६-१७ शतकाहून जास्त जुनी असणे शक्य नाही.
अतींद्रिय ज्ञानाबद्दल बोलायचे तर, अतींद्रिय ज्ञानी व त्रिकालदर्शी महर्षी कृत-त्रेता-द्वापार युगात होऊन गेले पण कली युगात तसे महर्षी झाले नाहीत असे श्रीमद्भागवत ग्रंथात म्हटले आहे. कली युग सुरू होऊन सुमारे ५००० वर्षे झाली. यावरून दिसते की प्रस्तुत नाडीभविष्ये सामान्य ज्योतिषांनीच लिहिलेली आहेत. अतींद्रिय ज्ञानाशी त्यांचा काही संबंध नाही.
भाकितांची मूळची संख्या किती ? आजवर जेवढी माणसे जन्मली आणि पुढे जन्मणार आहेत त्या सर्वांची भाकिते लिहिलेल्या पट्ट्या उपलब्ध आहेत, असा आचरट प्रचार प्रथम ओकांनी केला, पण तो फारच ऎबसर्ड दिसतो असे कुणीतरी त्यांच्या ध्यानात आणून दिल्यावर ते म्हणू लागले की तसे नाही, जेवढी माणसे भाकित वाचून घ्यायला येणार आहेत तेवढ्याच माणसांच्या पट्ट्या त्या त्रिकालदर्शी महर्षींनी लिहून ठेवल्या आहेत! हा विनोदी खुलासा सुद्धा किती बिनडोकपणाचा आहे हे पुढे येणा-या चर्चेवरून कळेलच.
नाडीपट्टीवर व्यक्तीचे नाव कोरलेले असते असे सांगणे ही धंदेवाईक लबाडी आहे आणि तिच्यावर विश्वास ठेवणे हा मूर्खपणा आहे. असे म्हणण्याची कारणे अशी आहेत:-
नाडी-ज्योतिष हा फलज्योतिषाचाच एक प्रकार असला तरी प्रचलित फलज्योतिषात आणि नाडीज्योतिषात एक मूलभूत फरक आहे तो असा की फलज्योतिषातली भाकिते जन्माच्या वेळच्या संपूर्ण ग्रहस्थितीचा विचार करून वर्तवायची असतात, पण नाडीज्योतिषातली भाकिते राशीचक्राच्या कितव्या अंशाचा कितवा भाग जन्मवेळी उगवत होता याचा विचार करून पूर्वीच कुणीतरी वर्तवून ठेवलेली आहेत! म्हणजे, नाडी-ज्योतिष हे भृगुसंहितेप्रमाणेच जणू काही एखादे रेडीमेड भाकितांचे स्टोअरच आहे. भोंदूंनी फसवावे आणि दुधखुळ्यांनी फसावे या सहकारी तत्वावर ही रेडीमेड भाकितांची दुकाने जोरात चालत असतात.
नाडी म्हणजे एका पळाचा अवधी. एक पळ म्हणजे २४ सेकंद. एका अहोरात्रात, म्हणजे २४ तासात, ३६०० पळे बसतात. दरेक पळाचे भाकित कुणी वर्तवल्यास एका दिवसाची ३६०० भाकिते तयार हातील. तिकडे आकाशात राशी-चक्राचे जे ३६० अंश असतात त्यांचे प्रत्येकी १० विभाग केल्यास ३६०० विभाग होतात. एकेक विभाग पूर्वेस उगवून वर यायला एक पळ लागते. ( ३६०० पळात म्हणजे २४ तासात राशीचक्राची एक फेरी पुरी होते.) या ३६०० पळांच्या भाकितांची सांगड ३६०० राशी-विभागांशी घातलेली असते. मेष राशीच्या पहिल्या अंशाचा पहिला एकदशांशावा भाग ज्या पळात उगवून वर येतो ते पळ पहिल्या क्रमांकाचे मानून त्याचे भाकित एका पट्टीवर लिहायचे, व याप्रमाणे पुढे अनुक्रमाने ३६०० नाडी-पट्ट्या तयार करून ठेवायच्या. याचा उपयोग कसा केला जातो ते पाहू.
जातकाच्या जन्मवेळी कितव्या राशीचा कितवा क्रमांक उगवत होता ते जन्मकुंडलीवरून समजते. त्या क्रमांकाशी संबंधित नाडीपट्टी काढायची, व तिच्यावर लिहिलेले भाकित तेच त्या जातकाचे भाकित असे समजायचे! नाडी-ज्योतिषाचा संबंध जन्मकुंडलीशी अशा प्रकारे येतो. भूत-भविष्यकथनाची त्याची पद्धत काहीही असो, पण ते कथन फलज्योतिषाप्रमाणे १२ स्थानात किंवा कांडात विभागलेले असते, त्यामुळे या नाडीज्योतिषाला हायब्रिडज्योतिष हे नाव शोभून दिसते. अशी ही नाडी-ज्योतिषाची थोडक्यात थियरी आहे. तिच्यात आवश्यकतेप्रमाणे तिखट-मीठ-मसाला घातला जात असावा. भृगुसंहितेत ज्याप्रमाणे १०-१२ दिवसांच्या अवधीत जन्मलेल्या सर्व जातकांचे भाकित एकच असते, त्याच प्रमाणे नाडी-ज्योतिषात तारीख-महिना-वर्ष कोणतेही असो पण विशिष्ट राशी-अंश उगवत असता जन्मलेल्या सर्व जातकांचे भाकित एकच असते! डोके ठिकाणावर असलेल्या कोणत्या शहाण्या माणसाला हे पटेल ? पण शहाण्याला वेडे करतील अशा किती तरी कल्पना शेकडो वर्षे या शास्त्रात धुमाकूळ घालीत आहेत. दशापद्धत म्हणजे काय प्रकार आहे हे ज्यांना समजले आहे त्यांना आमचे म्हणणे सहज पटेल.
जन्मवेळ नोंदवण्यासाठी एका पळाचे भाग मोजण्याचे कुठलेही व्यावहारिक साधन पूर्वी उपलब्ध नव्हते म्हणून जन्मवेळ अमुक घटिका अमुक पळे एवढीच नोंदवीत असत. आज सुद्धा जन्म-वेळ कुणी अर्ध्या-पाव मिनिटांची नोंदवत नाहीत कारण ते व्यावहारिक दृष्टया शक्य नसते. म्हणूनच जन्मवेळेत अर्ध्या किंवा पाव पळाची सूक्ष्मता ( अक्युरसी ) आणून नाडी-पट्ट्यांची बेसिक संख्या ३६०० च्या दुप्पट किंवा चौपट करणे निरर्थक आहे. ३६०० हीच बेसिक संख्या व्यवहार्य व म्हणून अपरिहार्य आहे. एकेका पट्टीवरचा मजकूर १२ पट्ट्यांवर विभागून लिहून पट्ट्यांची संख्या जरी ४३२०० इतकी वाढवली असली तरी बेसिक पट्ट्यांची संख्या ३६०० हीच असते.
(क्रमशः)

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Sep 2009 - 5:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

घाटपांडे साहेब, चांगले लेखन.

आजवर जेवढी माणसे जन्मली आणि पुढे जन्मणार आहेत त्या सर्वांची भाकिते लिहिलेल्या पट्ट्या उपलब्ध आहेत,

घाटपांडे साहेब, या पट्ट्या दाखवा हो.
त्यावर भाकित कसे केलेले असते आणि ते वाचायचे कसे. काही नमुना आहे का ?

नाडी-भाकिते हजारो वर्षांपूर्वी त्रिकालज्ञानी महर्षींनी अतींद्रिय ज्ञानाच्या सहारयाने लिहून ठेवली आहेत, प्रत्येक माणसाचे भाकित कूटलिपीत ताड-पट्टीवर कोरून लिहिलेले आहे,

हम्म, अतिंद्रियाच्या साह्याने माणसाचे भाकित कुटलिपीत असतील तर काही नैसर्गिक घटनांच्या भाकितेही त्यात असतात असा दावा नाडीपट्टीचे अभ्यासक करतात काय ?

-दिलीप बिरुटे

प्रकाश घाटपांडे's picture

3 Sep 2009 - 6:13 pm | प्रकाश घाटपांडे

ते कूट लिपीत असते. फक्त नाडी वाचकांना वाचता येते
http://www.misalpav.com/node/3664#comment-52213
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Sep 2009 - 6:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ते कूट लिपीत असते. फक्त नाडी वाचकांना वाचता येते
हम्म :(
काय बोलायचे आता ?

कूट लिपीत असेल तर अन्य कूट लिपी समजणार्‍यांना त्याचा सारखा अर्थ बोध होतो का ? उदा. आपण दिलेल्या दुव्यावर 'शशिकांत' हा शब्द उमटलेला दिसला तोच अर्थ किंवा शब्द आणखी कोणा नाडीपट्टी जाणकाराला दाखवल्यास तोच शब्द किंवा अर्थ दिसतो का ?

ताडपत्रावर जे लिहिलेले असते. त्याची भाषा तमिळ असते. (ती कूट कशी असेल ) तेव्हा ती सर्वांना समजायला पाहिजे ना ?

-दिलीप बिरुटे

प्रकाश घाटपांडे's picture

3 Sep 2009 - 6:34 pm | प्रकाश घाटपांडे

सांकेतिक शब्दांत देखील गट असतात. त्यांच्यापैकी कुणाला तो वाचता येइल.तो शब्द पाच हजार वर्षांपुर्वी नाडीपट्टीत लिहिला होता काय?
नाडीपट्टीच वय काय? मजकुराच वय काय? अशी ती गोची आहे
डॉक्टर च गचाळ अक्षरातील प्रिस्क्रिप्शन केमिस्टला वाचता येत
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

श्री ओक यांनी एका पट्टीचे चित्र काही संकेतस्थळांवरती प्रकाशित केले आहे.

त्यात बाणांनी दाखवलेली अक्षरे लावण्या इतपत तमिळ लिपी मला वाचता येते. (पण बाकी पट्टीतले क्वचितच एखादे अक्षर मला लागते.)

बाणाने दाखवलेली अक्षरे अशी आहेत :
१. 'च' (तमिळ लिपीमध्ये च, छ, ज, झ, स, श, ष या सर्व संस्कृत अक्षरांसाठीचे चिह्न)
२. 'चि' (तमिळ लिपीमध्ये चि, छि, जि, झि, सि, शि, षि या सर्व संस्कृत अक्षरांसाठीचे चिह्न)
३. 'का' (तमिळ लिपीमध्ये का, खा, गा, घा या सर्व संस्कृत अक्षरांसाठीचे चिह्न)
४. न्
५. त (तमिळ लिपीमध्ये त, थ, द, ध या सर्व संस्कृत अक्षरांसाठीचे चिह्न)
असे सर्व पर्याय असले तरी बहुतेक तमिळ वाचक "ससिकान्त" किंवा (वाचक ब्राह्मण असल्यास) "शशिकान्त" असाच उच्चार करेल.

परंतु त्या चित्राचे कशाबद्दल प्रमाण (यात नेमका काय चमत्कार) म्हणून काय अर्थ आहे, ते मला कळले नाही.

माझ्याकडील एका पुस्तकात "धनंजय" असा शब्द स्पष्ट छापलेला आहे, तो मी बघितला आहे. पण त्यावरून गीताप्रेस-गोरखपूर-भविष्य केंद्राचा चमत्कार असे कोणी म्हटल्यास मी अत्यंत संभ्रमित होईन.

त्याच प्रमाणे माझ्याकडील एका ग्रंथात (अमरकोष) जवळजवळ सर्व सामान्य संस्कृतोद्भव नावे कुठे ना कुठे सापडतात. या ग्रंथाची छापील प्रत मी वापरतो, पण या ग्रंथाचे हस्तलिखित (माझ्या खापरपणजोबांच्या माळ्यावर सापडलेली बरीच जीर्ण पाने) माझ्यापाशी आहेत. त्यातही खूप नावे सापडतील. माझ्या आजोबांना अमरकोष तोंडपाठ होता, त्यांना फार शोधाशोध न करता नाव असलेले पान लगेच सापडले असते. पण त्यात "नेमका चमत्कार तो काय?" हे कोणालाही पटवून देणे कठिण जाईल. "धनंजयचे पणजोबा हस्तलिखित बाडे भविष्य केंद्रा"स या चमत्कारातून काहीही सामर्थ्य मिळत नाही, असे मला तरी वाटते.

फरक हा की त्या अमरकोषाच्या हस्तलिखितातले सर्वच शब्द सुवाच्य आहेत, आणि श्री. ओक यांनी प्रकाशित केलेल्या चित्रात तो एकच शब्द सुवाच्य आहे.

असो. "चमत्कार" म्हणजे नेमके काय, या शब्दाची व्याख्या वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी असावी. व्याख्या-परिभाषांची निश्चिती झाल्याशिवाय संवाद आणि तर्क निष्फळ असतात. म्हणून त्या चित्राच्या संदर्भात मी आजपर्यंत काहीच बोललेलो नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Sep 2009 - 10:25 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

चेन्नईला इन्स्टीट्यूट ऑफ मॅथ्समधे डॉ. रणजय (रॉणॉजय) अधिकारी हडप्पा संस्कृतीमधल्या चित्रलिपीला भाषेचा दर्जा द्यावा का नाही यावर संशोधन करता येईल. सदर कूट तमिळ किंवा जी काही भाषा आहे असं म्हटलं जात आहे, त्याबद्दल रॉणॉजॉयच्या गटातल्या लोकांशी बोलता येईल.

अर्थात या चमत्कारांवर माझा अजिबात विश्वास नाही हे मला नव्याने सांगायची गरज नसावी.

अदिती

हैयो हैयैयो's picture

5 Sep 2009 - 9:30 am | हैयो हैयैयो

कूटतमिळलिपी

ते कूट लिपीत असते.

मान्य.

फक्त नाडी वाचकांना वाचता येते

अमान्य. तुम्ही डोके लढवलेत तर तुम्हालाही वाचता येणे शक्य आहे. येथे श्री. धनंजय सर ह्यांनी तमिळलिपिच्या प्राथमिक ओळखीवर आधारीत पट्टीतील काही अक्षरांबाबत आपले मत प्रदर्शित केले आहे. आपण स्वतः प्रयत्न करून पाहिला आहेत काय?

हैयो हैयैयो!

प्रकाश घाटपांडे's picture

5 Sep 2009 - 2:49 pm | प्रकाश घाटपांडे

आपण स्वतः प्रयत्न करून पाहिला आहेत काय?

नाही. खुद्द तामिळ लोकांना कुट तामिळ फारसे समजत नाही आम्हाला काय समजणार? डॊकटर चे प्रिस्क्रिप्शन सुद्धा आपल्याला समजत नाही नीट.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

हैयो हैयैयो's picture

6 Sep 2009 - 9:24 pm | हैयो हैयैयो

चिकित्सक?

स्वतःस काहीच येत नाही, तरी शिकण्याची इच्छाही नाही आणि तरीही स्वत:स चिकित्सक म्हणवून घेण्याचा अधिकार आहे असे आपणास वाटते काय?

हैयो हैयैयो!

धनंजय's picture

3 Sep 2009 - 6:38 pm | धनंजय

बराच इतिहास आहे तर.