लिखाळगुरुजी,
अहो, पाया पडणारे लोक तुमच्या ठायी बिठोबाला पाहून पाया पडतात. तो नमस्कार स्वतःला लाऊन घेणे हा अहंकार. तो नमस्कार तुम्ही सुद्धा आनंदाने विठोबाकडे पोहोचता करा
अहो पण त्याकरता मुळात विठोबावर तर विश्वास हवा ना?! :)
काय म्हणता?
बाकी आमचे तुकोबा बिच्चारे भाबडे हो! त्यांना ठायी ठायी विठोबा दिसत असे..! :)
असो..
आपला,
(विठ्ठलप्रेमी) तात्या.
अहो पण त्याकरता मुळात विठोबावर तर विश्वास हवा ना?!
बरोबर. पण जेव्हा समोरचा विठोबाला नमस्कार करतो आहे असे आपण मानतो तेव्हा (स्वतःसाठी विठोबा अस्तित्वात नसला) तरी समोरच्याच्या असलेल्या विठोबाला आपण क्षणभर मान्यता देतोच ना. त्या नसलेल्या पण क्षणभर समोरच्याच्या कल्पनेतल्या असलेल्या देवाकडे तो नमस्कार लाऊन द्यावा :)
(हे तर्कसंगत असावे. बाकी मी तर्काच्या फार भानगडित पडत नाही.)
-- लिखाळ
विठोबासी शरण जावे। निजनिष्ठा नाम घ्यावे - संत तुकाराम (चित्रपटातले)
पण क्षणभर समोरच्याच्या कल्पनेतल्या असलेल्या देवाकडे तो नमस्कार लाऊन द्यावा
असं म्हणता? बरं बरं! :)
हे तर्कसंगत असावे. बाकी मी तर्काच्या फार भानगडित पडत नाही.
हम्म! तर्क, रॅशनल थिंकिंग वगैरे वगैरे! आपण तर या शब्दांनादेखील पार घाबरतो भैय्या! :)
तात्या.
--
माती, पाणी, उजेड, वारा
तूच मिसळीशी सर्व पसारा
आभाळच मग ये आकारा
तुझ्या घटांच्या उतरंडीला
नसे अंत, ना पार..
विठ्ठला, तू वेडा कुंभार!
१-२ शंका उगाच मनात आल्यासारख्या वाटतात -
१. (भगवंत) आहे अशी श्रद्धा असणारा तो आस्तिक अन् (भगवंत) नाही श्रद्धा असणारा तो नास्तिक.
- पण, भगवंत आहे, त्याच्याच ईच्छेने सगळे घडते अशी श्रद्धा असून सुद्धा वेळेवर ते विसरणारा आस्तिक म्हणता येईल काय? तसेच भगवंत नाही अशी श्रद्धा असून सुद्धा वेळेवर ते विसरणारा नास्तिक म्हणता येईल काय? :)
- श्रद्धा दोन्ही बाजूंनी नाही काय? एका बाजूची अंध अन् दुसर्या बाजूची डोळस कशी होईल?
२. धर्म ही संकल्पना कशासाठी अस्तित्वात आली? ती नसती तर काय झाले असते? कर्मकांडं-रूढी-परंपरा कशासाठी अस्तित्वात आल्यात? कर्मकांडं-रूढी-परंपरा म्हणजेच धर्म का? किंवा हे सर्व न पाळणं म्हणजे धर्म का?
- मी स्वतः अजूनही वरील प्रश्नांच्या उत्तरांजवळ नाही पोचू शकलो ब्वॉ. तसे यम -नियमांबद्दल वाचले होते थोडेसे. पण ते वाचून वाटले की इतर धर्मांत देखील या पेक्षा काही वेगळे सांगीतलेले नसावे.
३. पौरुषेय-अपौरुषेय म्हणजे नक्की काय? (फारच बाळबोध प्रश्न असे वाटू नये म्हणजे झाले रे राघवा!!)
- मला वाटते यावर चर्चा करण्यासाठी आधी भगवंत आहे हे मान्य करावे लागेल. मनोभुमिका सारख्या पातळीवर आल्याशिवाय चर्चा करणे अयोग्य.
मला स्वत:ला असे वाटते की आपण कोणत्याही गोष्टीचा कार्यकारणभाव जाणून मग पटले तर तसे वागावे. मी देवळात जातो. कशासाठी? ते एकदा शोधले की मग त्यावर चर्चा करण्याची गरज राहील असे वाटत नाही. तसेच मी पूजा करतो. व्रतं-उपास-तीर्थयात्रा करतो. हे सर्व मी का करतो हे शोधणे योग्य. तसे केले म्हणजे इतरांशी तुलना करण्याचा संभव उरणार नाही. :)
(भगवंताच्या अस्तित्वावर श्रद्धा असलेला) राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )
हा धागा सगळा वाचला. "माझिया जातिचे मज मिळो कोणी" प्रकारचा आनंद मिळाला. श्रावण यांच्याशी सहमत; कोणाच्या श्रद्धाविषयाच्या आड मी येत नाही आणि माझ्या मतांच्या आड कोणाच्या श्रद्धा येऊ देत नाही.
मी साधारण ११ वर्षांची असताना खूप विचार करून (!) देव असणे शक्य नाही असे ठरवले. आता त्यावर वीसेक वर्षे उलटून गेल्यावर कधी कधी असे वाटते की एखादी अशी आंधळी श्रद्धा असती तर बरे झाले असते का? कसे वाटले असते, असे कुतूहल वाटते. पण अश्या विषयात, एकदा एका दिशेने चालू पडल्यावर परतीची वाट नाही. कदाचित, सश्रद्धांचेही असेच होत असावे. जसे मला लोकांना देव आहे हे पटतेच कसे याचे मनोमन आश्चर्य वाटते, तसे त्यांना देव नाही वाटणारे लोक नीट विचार करत कसा नाहीत याचे आश्चर्य वाटत असावे.
न राहवून खालच्या ओळी. मूळ विषयाशी असंबंध.
वर एका प्रतिसादात (बहुधा भोचक यांच्या) उत्क्रांती शब्दाचा वापर त्यांनी प्रगती या अर्थाने केला आहे. पशुवत आचरणातून नागरीकरणाकडे असे काहीसे. उत्क्रांती म्हणजे प्रगती नाही. उत्क्रांती म्हणजे मोठा बदल. तो चांगला की वाईट, प्रगती की अधो, हे त्या शब्दात नाही.
लेख वाचला, त्यावरच्या प्रतिक्रिया, अभिप्रायही वाचले. चर्चेसंबंधात मलाही माझे काही विचार तपासून घ्यावेसे वाटले, म्हणून हा पोस्टप्रपंच.
मला मूळ लेखामध्ये काही वेळा प्रचंड परस्परविरोधी मुद्दे मांडल्यासारखे वाटतात. कदाचित माझ्या समजूतीची गल्लत असेल, मी नाकारीत नाही. लेख 'संस्कार' ह्या मूळ विषयापासून सुरु होत होत, आस्तिकता/ नास्तिकतेची वळणं घेत, धर्म ह्या विषयाला स्पर्ष करुन (इथे जगण्याचे तत्वज्ञान, पद्ध्त ह्या अर्थी हिंदू धर्म म्हणायचे आहे का धार्मिकता ह्या अर्थी? दोन्ही खूप वेगळ्या बाबी आहेत), रुढी आणि त्या अनुषंगाने येणारे आचार, विचार, पद्धती येथवर येऊन पोहोचतो. ह्या पैकी नक्की चर्चा कशावर? की सगळ्यांच बाबींवर? कारण प्रथमदर्शनी पाहता एकमेकांशी निगडीत वाटणार्या ह्या सर्व बाबी भिन्न आहेत, असं मला वाटत.
उदाहरणार्थ: संस्कार आणि त्यावरुन आस्तिक वा नास्तिक असण्याचा मुद्दा.
संस्कारित मन आणि आस्तिक वा नास्तिक वृत्ती ह्या सर्वस्वी भिन्न संकल्पना नाहीत का? एखाद्या व्यक्तीचे संस्कारित असणे आणि आस्तिक वा नास्तिक असणे ह्याचा परस्पराशी काय संबंध? माझ्या मते, संस्कार ही सातत्याने घडत राहणारी एक प्रक्रिया आहे. ती काही दहा- पंधरा मिनिटांत वा दिवसांत करता येणार नाही, किंवा नुसती स्तोत्रे वगैरे पाठ करुनही ती होणार नाही. केवळ उपचार म्हणून देवाची पूजा करणे म्हणजे संस्कार नव्हेत. ह्या अश्या गोष्टींना संस्कार कसे समजता येईल?
उदा: या देवी सर्वभूतेषू मातृरुपेण संस्थित: l हे नुसते पाठ करुन संस्कार निश्चित होणार नाही, पण, ह्या मागचा अर्थ समजावून जर हे स्तोत्र म्हटले तर, संस्कार जरुर होतील. सर्व जगात मातृरुपाने देवी वास करते आहे. म्हटले तर साधे वाक्य आहे, म्हटले तर आईचा मान का राखावा ह्याची शिकवण आहे. कधीकधी बुद्धीप्रामाण्यवादाचेही झापड लागू शकते. देवाचे स्तोत्र आहे म्हणजे ते केवळ उपचार म्हणून म्हणायचे असे का? त्यामागचा कार्यकारणभाव शोधायचा प्रयत्न केला तर कुठे बिघडते? हे स्तोत्र लिहिण्यामागे लिहिणार्याने काय विचार केला असेल, असे कधी वाटत नाही का? आडवे तिडवे वाचन आणि चर्चा करणार्याला हे प्रश्न कधी पडत नाहीत का? किंवा, गीतेमध्ये सांगितले आहे,
त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः l
काम: क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्रयं त्यजेत् ll
एतैर्विमुक्त: कौंतेय तमौद्वारेस्त्रिभिर्नरः l
आचरत्यात्मनः श्रेयस्ततो याति परां गतिम् ll
(गीता १६.२१ आणि २२ - चू भू माफ करा काही असेल तर)
थोडक्यात, काम, क्रोध आणि लोभ ही नरकाची ३ दारे आहेत. हे विकार आत्म्याचा विनाश करतात, तेह्वा यांचा त्याग करावा. हे अर्जुना, ह्या तीन तमोद्वारांतून (तमोगुणांमधून) मनुष्य सुटला म्हणजे तो स्वतःला कल्याणकारी आचरण करतो व परमगतीला प्राप्त होतो.
ह्यातला अध्यात्माचा भाग - परमगती वगैरे, स्वर्ग, नरक- सोडून देऊ हवे तर, पण हा उपदेश, संस्काराचा भाग नाही का? कशातून किती घ्यायचे, कसे घ्यायचे हे एका मर्यादेनंतर आपले आपणच ठरवायला नको का? असो.
माझ्या मते, साध्या सरळ शब्दांत संस्कार म्हणजे एखाद्याची वागायची पद्धत आणि (त्या व्यक्तीची) सत् विचारशक्ती ह्यांमधली सूसूत्रता. जेह्वा सत् विचारशक्तीवर असत् विचारशक्ती मात करते तेह्वा ते कुसंस्कार ठरतात. एकूणच संस्काराची प्रक्रिया सूक्ष्म आणि तरल असणार. जी व्यक्ती स्वतःचे स्वातंत्र्य जपताना, इतरांबद्द्ल आदर जपू शकते, ती संस्कारितच आहे, भले मग तिची वृत्ती आस्तिक असो वा नास्तिक.
तुकोबाराय म्हणतात,
अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ l त्याचे गळा माळ असो नसो ll
आत्माअनुभवी चोखाळिल्या वाटा l त्याचे माथा जटा असो नसो ll
परस्त्रीचे ठायी जो का नपुंसक l त्याचे अंगा राख असो नसो ll
परद्रव्या अंध निंदेसी जो मुका l तोची संत देखा तुका म्हणे ll
हेच ना संस्कार?
अवांतरः हुश्श!! हिंदू धर्म (तत्वज्ञान) आणि रुढींना धर्म मानून धर्म ह्या संकल्पनेला झोडपण्याविषयी नंतर... क्रमशः, क्रमशः :D :P
मला मूळ लेखामध्ये काही वेळा प्रचंड परस्परविरोधी मुद्दे मांडल्यासारखे वाटतात.
हम्म!
देसी डोळे परि निर्मिसी
तयापुढे अंधार
विठ्ठला तू वेडा कुंभार..! :)
तात्या.
मला या विषयावर एक लेख लिहायचा होता, पण राहून जात होते.
१. संस्कार हे मनावर करायचे असतात कारण मन हे चंचल असते. ते काबूत ठेवणे ही समाजाची (टिकण्यासाठी आणि पुढील पिठीवर दॄढ करण्यासाठीची) गरज आहे. याद्वारे आपण आपले स्वातंत्र अंशतः गमावून समाजात आपली जागा मिळवतो. म्हणजेच आपण काही विशिष्ट प्रकारे न वागायचे मान्य करतो आणि इतर गोष्टींकडे लक्ष देतो.
२. समाजात ज्या रूढी असतात त्यामागे काही कारण असते, पण ते कारण आजच्या जगात बरोबर असेलच असे नाही. उदा. सती, बालविवाह, जात संस्था...
३. काही गोष्टी मात्र मनुष्य मूळ प्राणी स्वभावाने करतोच. याचाच अर्थ असा की, आपण अजून पूर्ण सामाजिक(माणसाळलेले) झालो नाही आहोत. जर एखादे कुत्रे जंगलात हरवले तर ते जंगली बनते व माणसाळलेले राहत नाही कारण जगण्यासाठी माणसाळलेले राहण्याची त्याची गरज संपलेली/नष्ट झालेली असते.
४. आपल्या समाजातल्या अशा कितीतरी गोष्टी ह्या जुन्या नियमानुसार आहेत असे मी मानतो. जेवढा समाज जास्त जुना/प्राचीन तेवढ्या त्यात जास्त चूकीच्या समजूती किंवा कालबाह्य समजूती.
५. आता एवढ्या प्रस्तावनेनंतर मूळ मुद्दा असा की,
जर आपण काही चुकीच्या समजूती झुकारल्या तर आपण नास्तिक ठरत नाही. तसेच केवळ दुसर्यासाठी त्या मान्य करण्याने अस्तिक ठरत नाही.
६. जेवढी ही गोष्ट व्यक्तिसापेक्ष आहे तेवढीच ती समाज आणि काळ सापेक्षपण आहे.
७. त्यामुळे धर्म हा व्यक्तिगत बनला पाहिजे आणि समाजाने त्याला हो म्हणले पाहिजे.
८. हिंदू धर्मात(की संस्कॄती?) कितीतरी चाली-रिती आहेत ज्या नसण्यामुळे आपण जास्त प्रगत बनू. फक्त धर्मसुधारणा करून न थांबता सुधारित धर्म् आचरणात आला पाहिजे.
९. का आपण १० लोक मिळून सांगू शकत नाही, की आम्ही असा असा हिंदू धर्मावर आधारित पण सुधारित समुदाय काढला आहे आणि सरकारने त्याला नवा धर्म म्हणून मान्यता द्यावी. यात नवे ग्रंथ, पुस्तक असेल, नवी न्याय समाज रचना असेल. ही मान्यता मिळाल्यावर तो धर्म/जात म्हणून पुढच्या पिढीला मिळेल आणि सामाजिक विषमता दूर होण्यास सुरुवात होइल. जसे जास्त अनुयायी तशी कमी विषमता.
बाकी परत...
>>>समाजात ज्या रूढी असतात त्यामागे काही कारण असते, पण ते कारण आजच्या जगात बरोबर असेलच असे नाही. उदा. सती, बालविवाह, जात संस्था...
१०० % असहमत. असल्या रूढी कोणत्याही काळात/जगात अयोग्यच. त्याची काही कारणे असलीच तर ती एका गटाने दुसर्या गटावर वर्चस्व गाजवणे हीच होती. आणि हे कोणत्याही जगात/काळात स्वीकारार्ह असता कामा नयेत.
(निदान जी उदाहरणे दिली आहेत ती तरी तसल्या प्रकारची आहेत)
बाकी तुमचे म्हणणे बरेचसे मान्य.
नितिन थत्ते (खराटा)
(रंग माझा वेगळा)
>>>१०० % असहमत.
आपल्या असहमतीशी सहमत. विशेष करून जी उदाहरणे दिली आहेत त्यासंदर्भात नक्कीच असहमती आहे.
बाकी आधी लिहायची इच्छा होती पण वराती मागून घोडं नको असे वाटते. :-)
>>>समाजात ज्या रूढी असतात त्यामागे काही कारण असते, पण ते कारण आजच्या जगात बरोबर असेलच असे नाही. उदा. सती, बालविवाह, जात संस्था...
मी आपला विरोध समजू शकतो. पण वरील वाक्यात मी कुठेही असे म्हटले नाहीये की त्या रूढी बरोबर होत्या.
त्या काळी तथाकथित उच्च वर्गाचे महत्व टिकण्यासाठी आणि इतरांचे दमन करण्यासाठी या चाली रिती होत्या असे आपण म्हणतो हेच बरोबर आहे.
पण मूळ प्रश्न असा की, जर हे कारण चूक होते/आहे, तरीपण त्या काळी समाजाने ते प्रकार वापरलेच ना? जिथे कुठे सुरूवात झाली असेल, तिथेच त्याला विरोध करून हाणून का पाडले गेले नाही? याचाच दुसरा अर्थ असा की, समाजाने ते स्वीकारले (यात सर्वजण आले. आपण ४थी, ५वीच्या पुस्तकात वाचत नाही का, अस्पॄशता, सती आणि बालविवाह या त्याकाळी समाजाला लागलेली वाळवी होती. म्हणजेच ती काही फक्त विशिष्ट सामाजिक वर्गात नसून सर्व थरांत होती.) यात त्या समाजाची कितीही दांभिकता असली तरी हाच समाज आपला पूर्वज आहे हे मान्य करावे लागते.
आता चिकित्साच करायची झाली तर असे म्हणता येइल की, सती पध्दत ही त्याकाळी मागे उरणार्या विधवा स्त्रीयांची विल्हेवाट लावण्याची सोय होती. आजच्या काळात हे नक्कीच क्रूर आहे. पण लक्षात घ्या की, माझ्या प्रतिक्रियेत मुद्दा २ व ३ हे याचा विचार करतात. एकेकाळी मनुष्य जमात प्राण्यांकडून शिकत असे. जसे काही सस्तन प्राणी वर्गांत वॄध्द, आजारी व परावलंबी प्राणी हे प्रवासात मागे पडतात आणि इतर श्वापदांकडून मारले जातात तशी काहीशी प्रथा मनुष्याने उचलली. उदाहरण द्यायचे तर,आफ्रिकेतील जमातीत नात्यात लग्न करणे उचित समजतात.
त्यामुळे असे म्हणता येइल की, ज्या घडामोडी आपण आत्ता पाहतो आहोत त्या पुढे चांगल्याकडे घेऊन जावोत.
मोठा गहन आणि उत्तम विषय आहे.
असा विषय चर्चेला घेतल्याबद्दल श्री.डानराव ह्यांचे अभिनंदन.
अश्या गहन विचार करणार्या थोर विचारवंतांच्या मांदियाळीतले बरेचसे आमचे स्नेही आहे ह्याचा आम्हाला मोठा अभिमानच वाटतो. छान! असेच मोठे व्हा...उत्तम नाव कमवा....आम्हाला तुमचा अभिमान आहे. :)
बाकी,आपणा सर्वांना त्या सर्वशक्तीमान अश्या जगनियंत्या परमेश्वराने साक्षात त्यालाच "काय रे, बोल तू आहेस का? दे ऊतर" असे विचार करण्याची बुध्दी देऊ केली, किती तो थोरपणा त्या देवाचा. :)
असो, साक्षात ज्ञानोबा माऊलींनी म्हणलंच आहे, "जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणिजात"
ईश्वरवाद्यांना ईश्वर मिळो,
निरिश्वरवाद्यांना तो नसण्याच्या आपल्या विचारांचं समाधान मिळो,
सगुण उपासकांना त्यांच्या इष्ट देवतेचा कृपाप्रसाद लाभो,
निर्गुण उपासकांना "कोऽऽहम्"चे उत्तर मिळो
......प्राणिजात!!!
बाकी, अश्रध्दांची स्वतःच्या अश्रध्द असण्यावर असलेली इतकी श्रध्दा पाहुन अंमळ मौज वाटली :)
बाकी, माझ्या ह्या महासंपन्न हिंदूधर्माला ऊठसुठ नावं ठेवणार्यांना एक जाहीर आव्हान करतो,
असेल हिंमत, तर जाहीरपणे इतर धर्मांबाबतही असं लिहून दाखवा. आणा त्याही धर्मांतल्या अनिष्ट प्रथा चव्हाट्यावर. आमच्या सहिष्णूतेचा अवाजवी गैरफायदा अजुन किती दिवस घेणार आहात?
ह्यावर कोणी इतक्यांदा घासून गुळगुळीतच नव्हे तर बुळबुळीत झालेलं लंगडं उत्तर देऊ नका..."मी माझ्या धर्माबद्दलच बोलणार" वगैरे...पुष्कळ झालंय आत्तापर्यंत हिंदूधर्मावर तोंडसुख घेऊन. आता येऊद्या इतर धर्माबाबत!!!! आहेत..मुस्लीम धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे, ज्यू आहे पुष्कळ आहेत.
थोर विचारवंतांकडून ह्या सर्व धर्मांतल्या अनिष्ट प्रथांबद्दलही कळु द्या आम्हा मुर्ख गरीब अज्ञानी बहुजनांस !
बोला, पुंडलीक वरदा हऽऽरी विठ्ठल...
ज्ञानेश्वर माऽऊली...ज्ञानराज माऽऊली.....तुकाराम :!!!!!!!!!!!!१
-(भडक्क भगवा) ध.
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
बाकी, अश्रध्दांची स्वतःच्या अश्रध्द असण्यावर असलेली इतकी श्रध्दा पाहुन अंमळ मौज वाटली
मौज नाही वाटली, तर इतके दृढ श्रद्धाळू लोक आहेत हे पाहून छान वाटलं, आणि अशी दृढता माझ्या श्रद्धेमधे केव्हा येईल असा प्रश्नही मनात उत्पन्न झाला. शेवटी श्रद्धा कशावरही असू दे, ईश्वराच्या असण्यावर नाहीतर ईश्वराच्या नसण्यावर, देवावर नाहीतर फक्त स्वतःवर, श्रद्धा असणं महत्वाचं. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आठवलं - 'माणसांमाणसांत जर काही फरक असेल तर तो या श्रद्धेचा. श्रद्धेचं अस्तित्वच माणसाचं लहानमोठेपण ठरवते. तेव्हा श्रद्धा बाळगा.' (हे मूळ विंग्रजी वाक्यांचं तोकडं भाषांतर आहे, तेव्हा चूभूदेघे).
- भटोबा
छान बोल्लात भटोबा...
एकदम काठावरचे भट झालात की. ;)
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
बाकी, माझ्या ह्या महासंपन्न हिंदूधर्माला ऊठसुठ नावं ठेवणार्यांना एक जाहीर आव्हान करतो,
असेल हिंमत, तर जाहीरपणे इतर धर्मांबाबतही असं लिहून दाखवा. आणा त्याही धर्मांतल्या अनिष्ट प्रथा चव्हाट्यावर. आमच्या सहिष्णूतेचा अवाजवी गैरफायदा अजुन किती दिवस घेणार आहात?
आव्हान देताहात हे खरं, पण त्याची गरजच नाही. डॉन यांचा लेख, मेघना, मी किंवा भोचक यांची प्रतिक्रिया आणि नंतर त्यावर त्यांना पुष्टी देणारे प्रतिसाद यावरून ही चर्चा झाली आहे. एक गोष्ट पाहताहात का, या सगळ्यात प्रत्येकाने स्वतःचे विश्लेषण केले आहे. ते व्यक्तीगत विश्लेषण आहे. सश्रद्धांच्या संदर्भात केलेले आत्मविश्लेषण आहे. स्वतःला तपासण्याची ती कृती आहे. येथे हे सारे करताना या मंडळींसाठी सश्रद्धांमध्ये केवळ हिंदूच आहेत असे तुम्ही गृहीत धरता आहात, कारण त्यांनी लिहिताना त्यासंदर्भातील दाखले देत लिहिले आहे. पण तुम्ही हे विसरू नका, की त्यात केलेले भाष्य हे न पटणाऱ्या, तर्काच्या कसोटीला न उतरणाऱ्या गोष्टींवर (ही धारणा त्या-त्या लेखकाची आहे) आहे. आणि ही मंडळी त्या अर्थाने धर्म मानतच नसल्याने, पण त्यांची टीका धर्म (विशिष्ट धर्म नव्हे) ही संदर्भचौकट घेऊन येणाऱ्या गोष्टींवरच असल्याने, ती इतर धर्मांतील अशा गोष्टींना लागू होतेच. आम्ही अधार्मिक ठरतो ना ते सगळ्या धर्मांच्या लेखी. इस्लाम, ख्रिश्चन किंवा अन्य कोणताही. अगदी बौद्धांच्या लेखीही ठरूच.
आम्ही आमच्यावरच टीका केली ती तुम्ही अशी लावून घेऊ नका. आव्हानाच्या भाषेपेक्षा सरळसोट प्रश्न जरूर करा. ही तात्कालीक प्रतिक्रिया तुम्ही व्यक्त केलीतच कशी हे समजेनासे झाले आहे. :)
आता माझ्यापुरते बोलायचे तर...
ख्रिश्चन, इस्लाम, (तुम्ही म्हणता म्हणून) हिंदू (मी म्हणेन वैदिक धर्म), बौद्ध, जैन (इत्यादी, कुठला राहिला असल्यास त्यावरून पकडाल तुम्ही) या सगळ्या धर्मांमध्ये तर्कावर न उतरणाऱ्या, माणसाने आज जिथंपर्यंतची प्रगती साध्य केली आहे त्या प्रगतीतून आलेल्या अनुभवांती ज्ञानाच्या कसोटीवर न उतरणाऱ्या गोष्टी आहेत. त्या त्याज्य आहेत. हे सगळे धर्म त्या - त्या रुढी-परंपरांपुरते भंपक आहेत.
विज्ञानाच्या अनुषंगाने मानवी बुद्धीच्या सध्याच्या क्षमतेतदेखील या विश्वाच्या काही रहस्यांची उत्तरे मिळत नाहीतच. त्यामुळे ती विज्ञानाची मर्यादा आहेच. विज्ञान हेही त्या अर्थाने धर्मासारखेच मर्यादित आहे. दोघांच्या मर्यादांचा आवाका वेगळा. पहिल्याने दुसऱ्याला, दुसऱ्याने पहिल्याला पवित्रेबाज आव्हान देण्यात अर्थ नाही. कारण अशा वेळी त्यांच्या-त्यांच्या बौद्धीक क्षमतांच्या पलीकडे असणारे प्रश्न सामान्य माणसाकडून आले की त्यांची पंचाईत होते. हे ध्यानी घ्या की असे प्रश्न तज्ज्ञांपेक्षा सामान्य माणसालाच अधिक पडतात. त्याच्याकडचा तो एरवी रेअर असलेला कॉमन सेन्स अशा वेळी पूर्ण जागा असतो. अशा प्रश्नांपुढे आपला विचार तर्काच्या कसोटीवर उतरवण्यात हे दोन्ही वादी कमीच पडतात. मग त्यांचे-त्यांचे क्षेत्र पार झूटच आहे असा भ्रम पसरण्यास वेळ लागत नाही.
आणि खरं सांगायचं तर या ज्या मर्यादा आहेत ना, धर्म किंवा विज्ञानाच्या नव्हेतच. त्या आहेत माणसाच्या मर्यादा. कारण धर्म असो वा विज्ञान, हे दोन्ही माणसाच्याच बुद्धीतून, कल्पनेतून जन्माला आले आहेत. त्याच्या बुद्धीच्या मर्यादांची चौकट त्या संकल्पनाला लागलेली आहेच. माणूसच ती आतून ढुशा मारून विस्तारत असतो. ही चर्चा किंवा अशा इतर चर्चा म्हणजेच या ढुशा आहेत. विचारविश्वाचीही उत्क्रांती होत असते. त्या उत्क्रांतीमध्ये या ढुशा देण्याच्या प्रक्रिया होतातच.
विठ्ठल, माणसाचा माणसाला नमस्कार वगैरे उल्लेख वर आले आहेत. एक गोष्ट मांडतो - सच्चा वारकरी जो असतो ना, तो एकादशीच्या दिवशी गाभाऱ्यातील विठ्ठलाचे दर्शन घेत नाही, तो त्या दिवशी खरं तर मंदिरात जातच नाही. मंदिराबाहेर राहून तो कळसाकडे पाहून नमस्कार करतो. त्या दिवशी विठ्ठलच वारकऱ्यांचे दर्शन घेण्यासाठी कळसावर आलेला असतो, असे मानले जाते. पुरेशी बोलकी आहे ही गोष्ट श्रद्धा आणि अश्रद्धा, देव असणे आणि देव नसणे आणि धर्म व अधर्म यासंदर्भात भाष्य करण्यासाठी. त्या वारकऱ्याची ही श्रद्धा आहे, विठ्ठल माझे दर्शन घेतोय, मी त्याचे घेतोय. कारण हा विठ्ठल लोकांच्या मनात आहे. तो त्या मूर्तीत नाही. मूर्ती ही केवळ प्रतिक आहे. त्या प्रतिकापाशी वारकरी लीन होतो हे ठीक. पण त्याचवेळी "कांदा, मुळा भाजी अवघी विठाई माझी," हेदेखील आहेच. चोखा त्या पायरीशी गेला हे विसरता येत नाही. हे सारं व्यामिश्र आहे. त्याची आपल्या नेहमीच्या पद्धतीनं कृष्ण-धवल उत्तरं निघत नसतात. आजच्या बुद्धीची ती मर्यादा आहे.
आईनस्टाईनच ना, म्हणाला होता की, माणसाची बुद्धी ही केव्हाही त्याच्यापुढे असणाऱ्या समस्या सोडवण्याच्या गरजेपेक्षा थोडी मागेच असते. किंवा माणसापुढच्या समस्या या नेहमी त्या घडीच्या त्याच्या बुद्धीक्षमतेच्या थोड्या पुढेच असतात. हे विसरून कसं चालेल?
तारतम्य (म्हणजेच विवेक म्हणूया) ही माणसाची मोठी क्षमता आहे. त्या क्षमतेच्या जोरावरच तो इतर जीवांपेक्षा वेगळा ठरत गेला आहे. तोच हरपला की काय होते त्याचे दाखले या चर्चेत काही प्रतिसादांतून दिसतात.
चला, आता चर्चा बंद करायला हवी.
कारण इतर धर्मांतील अनिष्ट प्रथांबद्दल आपण काही बोलत नाही. (आपल्याला इतर धर्मांबद्दल पुरेशी माहिती आहेच कुठे? आपण आपले आपल्या आसपासच्या समाजात जे पाहतो त्यावरच बोलतो. माझी खात्री आहे की जे उदा. मुस्लिम धर्मावर टीका करू इच्छितात त्यांनाही त्या धर्माची 'बुरखा, चार बायका आणि ट्रिपल तलाक' याखेरीज जास्त काहीही माहिती नसते).
या धाग्यावर माझ्या मते कोणीही 'महासंपन्न' हिंदू धर्मातच अनिष्ट रूढी आहेत असे आडूनही सुचवलेले नाही. पण धर्माची, श्रद्धेची आणि रूढींची चर्चा थांबवण्यासाठी हे चांगले निमित्त आहे.
या धाग्यावरही इतर धर्मातील अनिष्ट प्रथांबद्दल कोणास माहिती असेल आणि लिहायचे असेल तर आडकाठी नाहीच आहे.
इतर धर्मातील अनिष्ट प्रथांबद्दल त्या त्या देशांतील आणि भारतातीलही विचारी (पक्षी: अश्रद्ध) लोक टीका करीतच असतात. अब्राहम कोवूर हे तसेच एक होत. त्यांची पुस्तके वाचली तर त्यांनी जास्तीत जास्त टीका केरळातील आणि श्रीलंकेतील ख्रिश्चन धर्मावर केली आहे. कारण त्यांच्या अनुभव विश्वात त्या विशिष्ट रूढींचा प्रभाव सर्वाधिक होता. आता त्यांना जर तिथले ख्रिश्चन 'तुम्ही महाराष्ट्रातल्या कोकणस्थ ब्राह्मणांच्या किंवा पंजाबातील जाट समाजातल्या रूढींवर टीका करून दाखवा बरे' असे आव्हान देऊ लागले तर ते अन्यायकारक आणि विषयाला चुकीचा फाटा फोडणारे ठरेल.
नितिन थत्ते (खराटा)
(रंग माझा वेगळा)
माझी खात्री आहे की जे उदा. मुस्लिम धर्मावर टीका करू इच्छितात त्यांनाही त्या धर्माची 'बुरखा, चार बायका आणि ट्रिपल तलाक' याखेरीज जास्त काहीही माहिती नसते
नक्की? खात्रीलायक?? अगदी कन्फर्म???
शेठ, या कधी इकडं. एखाद्या संध्याकाळी मस्त ब्लेंडेड स्कॉचसोबत खुप गप्पा करु.... कुरआन, त्यातले आयता, शरियत, मोहम्मद पैगंबर, इथपासून ते जागतीक मुस्लीम, इंडोनेशीयन मुस्लीम, पाकीस्तानी+बांग्लादेशी मुस्लीम आणि भारतीय मुस्लीम असा एक तुलनात्मक अभ्यासाचा मुद्दा चर्चेला घेऊ :)
>>या धाग्यावर माझ्या मते कोणीही 'महासंपन्न' हिंदू धर्मातच अनिष्ट रूढी आहेत असे आडूनही सुचवलेले नाही.
नाकारलेलेही कुठे दिसत नाही बॉ. आणि हो, हिंदू धर्मच ह्या अनिष्ट रुढी-परंपरांना हिंदू धर्मात राहुनच बोल लावले तरी अशा बोल लावणार्यांना जिवंत ठेवतो..नव्हे, अभ्यासू(!) म्हणुनही वागवतो.
>>पण धर्माची, श्रद्धेची आणि रूढींची चर्चा थांबवण्यासाठी हे चांगले निमित्त आहे.
चर्चा थांबवण्याबद्दल कुठे काय म्हणालंय कोण? आम्ही ह्याच धाग्यात इतर धर्मांवर बोला असं म्हणालो आहोत काय?
आम्ही फक्त असं म्हणालो की आजवर बर्याचदा हिंदूधर्मावर टिकात्मक लेखन झालंय, इतर धर्मांबाबतही थोर विचारवंताचे ज्ञानकण आम्हा मूढांच्या पदरात घालावे :)
अब्राहम कोवूर हे तसेच एक होत. त्यांची पुस्तके वाचली तर त्यांनी जास्तीत जास्त टीका केरळातील आणि श्रीलंकेतील ख्रिश्चन धर्मावर केली आहे.
अशी आणखी किती उदाहरणं आहेत? आणि उठसुठ हिंदूधर्माला बोल लावणारे किती आणि कितीदा 'फुल थ्रॉटल' असतात? पहा, विचार करा, आनंदी रहा :)
कारण त्यांच्या अनुभव विश्वात त्या विशिष्ट रूढींचा प्रभाव सर्वाधिक होता.
हो ना! मग इथे काय फक्त आणि फक्त हिंदूच आहेत का? की अनुभव विश्व फक्त हिंदू समाजापुरतं मर्यादित ठेवलंय? तसं असेल तर निधर्मी/सेक्युलरगिरी कुठे गेली? :)
आता त्यांना जर तिथले ख्रिश्चन 'तुम्ही महाराष्ट्रातल्या कोकणस्थ ब्राह्मणांच्या किंवा पंजाबातील जाट समाजातल्या रूढींवर टीका करून दाखवा बरे' असे आव्हान देऊ लागले तर ते अन्यायकारक आणि विषयाला चुकीचा फाटा फोडणारे ठरेल.
बरोबर!
पण आम्ही कधी म्हणालो की केरळातल्या ख्रिश्चनांबद्दल किंवा उत्तरप्रदेशातल्या मुस्लीमांबद्दल बोला? जिथल्या हिंदूंना नजरेसमोर ठेऊन त्या रुढींवर टिका केली तशीत तिथल्याच अहिंदू रुढींवर बोला की. :)
>>इतर धर्मातील अनिष्ट प्रथांबद्दल त्या त्या देशांतील आणि भारतातीलही विचारी (पक्षी: अश्रद्ध) लोक टीका करीतच असतात.
सलमान रश्दी, तस्लीमा नसरीन ही नावं कुठं ऐकल्यासारखी वाटताहेत, नै का बॉ? :) काय झालंय बरं त्यांचं?
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
>>शेठ, या कधी इकडं. एखाद्या संध्याकाळी मस्त ब्लेंडेड स्कॉचसोबत खुप गप्पा करु.... कुरआन, त्यातले आयता, शरियत, मोहम्मद पैगंबर, इथपासून ते जागतीक मुस्लीम, इंडोनेशीयन मुस्लीम, पाकीस्तानी+बांग्लादेशी मुस्लीम आणि भारतीय मुस्लीम असा एक तुलनात्मक अभ्यासाचा मुद्दा चर्चेला घेऊ
तुम्हाला या सार्या गोष्टींची माहिती जर आहे तर तुम्ही लिहा ना त्यातल्या अनिष्ट गोष्टींबद्दल. आम्हाला नाही तेवढी माहिती मुसलमानांबद्दल... म्हणून आम्ही नाही लिहू शकत. तुम्ही लिहा. मी तर कुठल्या धर्माबद्दल लिहिलेच नव्हते. देव या संकल्पनेबद्दल लिहिले होते.
मी समजा हिंदूंच्या एका अनिष्ट रूढीविषयी लिहिले असेल तर लगेच मी दुसर्या धर्मातल्या एका रूढीबाबत लिहिलेच पाहिजे असा हट्ट का? मी एखाद्या रूढीविषयी लिहिले तर ते हिंदू धर्मावरील टीका नसून त्या रूढीवरील टीका असते. ती रूढी कोणत्याही धर्मात असेल तरी मी तिच्यावर टीकाच करेन. बालविवाह कोणत्याही धर्मात आक्षेपार्हच आहे.
>>हिंदू धर्मात राहुनच बोल लावले तरी अशा बोल लावणार्यांना जिवंत ठेवतो..नव्हे, अभ्यासू(!) म्हणुनही वागवतो.
हे तर ख्रिश्चन धर्मातही आहे. पाश्चात्य जगाची प्रगती (इथे प्रगती कशाला म्हणायचे हा फाटा फोडू नये) ही धर्माला आव्हान देण्याच्या प्रक्रियेतूनच सुरू झाली आहे. आणि आता धर्मावर टीका करणार्याला विषाचा प्याला घ्यायची शिक्षा केली जात नाही. मुस्लिम धर्मात हे कदाचित आज कमी प्रमाणात असेल पण पुढे ते होणारच नाही असे नव्हे.
अजून एक गोष्ट. समजा मी एखाद्याच्या रस्त्यावरील प्रत्येक देवळाकडे/चर्चकडे पाहून नमस्कार करण्याच्या सवयीवर टीका केली तर ती त्या विशिष्ट कृतीवर टीका नसून त्या व्यक्तीच्या मानसिक परावलंबित्वावरची टीका असेल.
धर्मावरील आमचा आक्षेप हा अनेक अन्यायकारक गोष्टींना तो समर्थन पुरवतो हे आहे. त्यामध्ये सर्वच धर्म येतात.
(अवांतरः आपण येथे वकिली युक्तिवाद करायला जमलो नाही. त्यामुळे विशिष्ट शब्द पकडून बोल्ड करून आव्हाने द्यायची गरज नाही.)
नितिन थत्ते (खराटा)
(रंग माझा वेगळा)
धर्म आणि रुढी एकमेकांपासून अतिशय भिन्न अशा संकल्पना आहेत.
धर्मामध्ये एक विशिष्ट तत्वज्ञान सांगितलेले असते, जगण्याची, वागण्याची विशिष्ट अशी प्रणाली सांगितलेली असते. आपल्या मूळ रुपात कोणताही धर्म खूप व्यापक आणि सहिष्णू असतो.
मुळात हिंदू धर्म हा "धार्मिकता" ह्या अर्थी धर्म नव्हे. ती एक जीवन प्रणाली आहे. ह्यात प्रत्येक मताला स्थान आहे. आस्तिकता, नास्तिकता, सगुण, निर्गुण, निरीश्वरवाद... यादी वाढतच जाते, म्हणूनच हिंदू वेगवेगळे पंथ मानू शकतात, त्यांची दैवतंही वेगळी असू शकतात. एकच देवाला वा प्रेषिताला मानायला हवं अशी सक्ती इथे नाही. जन्माने वा कर्माने हिंदू असून, हिंदू धर्माविषयी माहिती न करुन घेता, काही अभ्यास न करता, धर्माला नावं ठेवायची मुभाही इथेच आहे, ह्याच धर्मात. आताआतापर्यंत असं कोणी केलं तर केवळ धर्मांधतेने कोणी अश्या टीकाकांराना त्रास पोहोचवल्याचं ऐकीवात नाही. प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याची पूर्ण मुभा हे हिंदू धर्माचं अतिशय अभिमानस्पद वैशिष्ट्य आहे.
राहता राहिल्या रुढी. ह्या व्यक्ती निर्माण करतात आणि सामाजिक जीवनात रुढी जन्म घेतात आणि नष्टही होतात. रुढी निर्माण होण्याची कारणं बर्याचदा समाजावर मूठभर लोकांचा वरचष्मा रहावा म्हणून निर्माण केल्या जातात. त्या नाहीश्या व्हायलाही हव्यात, पण रुढी म्हणजे धर्म, असे गृहीतक धरुन, म्हणून धर्माला का झोडपावे? हे म्हणजे, हाताला घाण लागली तर, घाण साफ करण्याऐवजी हात कापून टाकूया म्हणण्याप्रमाणेच झाले ना?
हे सर्व ब्रम्हांड निर्माण करणारा कोणीतरी आहेच ना. आपोआप जग निर्माण झाले असे तर नाही. आकाशातील ग्रह , तारे, आपली पॄथ्वी , पृथ्वीवरील जीव सृष्टी, माणसाला असलेला मेंदू/विचारशक्ती , पाणी , वायू , आग ...हे सर्व कुठून आले? कोणी निर्माण केले? अशी कुठली तरी शक्ती असणारच.
ही जी काय शक्ती आहे माझ्या मते तीच देव. तिची वेगवेगळी रुपे माणसाने निर्माण केली की खरोखरीच अशी रुपे आहेत ते मला माहित नाहि पण त्या शक्तीवर माझा विश्वास आहे.
ह्या शक्तीला / देवाला कर्मकांडाच्या बंधनात अडकवले माणसाने.
कर्मकांडे करायची कि नाहित, प्रथा पाळायच्या की नाहीत हा वादाचा वेगळा मुद्दा होऊ शकेल पण सॄष्टीनिर्माणकर्त्याचे अस्तित्वच नाकारणे हे मला तरी पटत नाही.
यातले "कोट्स" वगळता बाकी सर्व माझी, एका व्यक्तीची व्यक्तीगत मतं आहे. त्यामुळे प्रतिवादात झोडपायचं असेल तरीही कृपया समस्त निरीश्वरवादी गटाला झोडपू नये.
हे सर्व ब्रम्हांड निर्माण करणारा कोणीतरी आहेच ना. आपोआप जग निर्माण झाले असे तर नाही. आकाशातील ग्रह , तारे, आपली पॄथ्वी , पृथ्वीवरील जीव सृष्टी, माणसाला असलेला मेंदू/विचारशक्ती , पाणी , वायू , आग ...हे सर्व कुठून आले? कोणी निर्माण केले? अशी कुठली तरी शक्ती असणारच....
... कर्मकांडे करायची कि नाहित, प्रथा पाळायच्या की नाहीत हा वादाचा वेगळा मुद्दा होऊ शकेल पण सॄष्टीनिर्माणकर्त्याचे अस्तित्वच नाकारणे हे मला तरी पटत नाही.
ब्रह्मांड जर कोणी निर्माण केले तर त्याला/तिला/तेला कोणी निर्माण केलं? एकदा ब्रह्मांड निर्माण झालं हे मान्य केलंत की आकाशातील ग्रह , तारे, आपली पॄथ्वी , पृथ्वीवरील जीव सृष्टी, माणसाला असलेला मेंदू/विचारशक्ती , पाणी , वायू , आग ...हे सर्व कुठून आले याचं उत्तर देणारी मोठी लेखमाला मी लिहू शकते. (सॉरी, सध्या अजिबात वेळ नाही, जमेल तसं लिहेन, मागणी असेल तरच!)
ब्रह्मांड कसं निर्माण झालं याचंही उत्तर विश्वरचनेचा अभ्यास करण्यार्यांकडे आहे (मला ते समजलं आहे असा माझा दावा नाही). कसं निर्माण झालं याचं उत्तर विज्ञान देतं, पण का निर्माण झालं याचं उत्तर विज्ञानात मिळेलच असं नाही. तिथे मात्र तर्क इ. इ. गोष्टींची गरज पडेल.
सृष्टीनिर्माणकर्त्याचं अस्तित्त्व हा मलातरी चक्राकार खेळ वाटतो. कशावरून हे ब्रह्मांड, ही सृष्टी कोणीतरी निर्माण केली? आणि मग या निर्मिकाला कोणी निर्माण केलं? आणि निर्मिकाच्या निर्मात्याला कोणी निर्माण केलं .... ही साखळी संपणारच नाही.
काही थोडी वेगळी उदाहरणं देते:
१. पूर्वी असं मानत एका कासवाच्या पाठीवर (किंवा ग्रीसमधे असाल तर हर्क्युलिसच्या पाठीवर) पृथ्वी आहे असं मानत. मग ते कासव (/हर्क्युलिस) कुठल्या पृष्ठभागावर विसावलं आहे? या प्रश्नाचं सोपं उत्तर असं आहे, की पृथ्वी अंतराळात आहे, आणि सूर्याशी गुरूत्वाकर्षणाने बांधली आहे.
२. जेव्हा सूर्याभोवती पृथ्वी आणि इतर ग्रह फिरतात हे अमान्य होतं, तेव्हा अतिशय किचकट अशा ग्रहांच्या कक्षा आखून (एपिसायकल्स) , ग्रह पृथ्वीभोवती फिरतात असं मानायचे. ६ ग्रहांसाठी २८ (का जास्त) एपिसायकल्स होती. एक चुकीचं गृहीतक हटवलं, आणि ६ ग्रहांसाठी १ नियम लागू करता आला. पुढे तो नियम सगळ्याच गुरूत्वीय बंधक वस्तूंसाठी लागू होतो असं लक्षात आलं.
निष्कर्षः आपण मारे मोठमोठ्या किचकट संकल्पना, जसं देव, शक्ती, इ. मांडतो. मोठ्या संकल्पना अशासाठी म्हणाते कारण हे देव, शक्ती, निसर्ग हे माझ्यासारख्या सामान्य माणसाला नाही कळत. (जे कळत नाही आणि कुठल्याही प्रकारे दिसतही नाही त्यावर विश्वास तरी कसा ठेवणार?) कदाचित हे सगळं किचकट करण्याची गरजच नसेल, आणि उत्तर असेल हे विश्व कोणीही निर्माण केलं नाही. जी काही भौतिक स्थिती होती, त्यातून हे विश्व असंच निर्माण झालं (असतं). आणि उत्तर सोपंच होतं/असतं, फक्त ते सापडण्यासाठी, दिसण्यासाठी, मान्य करण्यासाठी कोरी पाटी असावी.
माझी देवाविषयीची धारणा: मी निरोगी असताना, दुसरा आजारी पडू नये; किंवा दुसरा ठणठणीत असताना मी आजारी पडू नये असा काही नियम नाही. आजारी माणसाला औषधं, जास्तीची काळजी इ.ची गरज असते. तसंच काही लोकांना नित्यनियमाने किंवा अडीअडचणीत एका मानसिक आधाराची गरज असते, ती गरज "देव" किंवा "ती विवक्षित शक्ती आहे ही धारणा" भागवतात. देवाच्या अशा प्रकारच्या अस्तित्त्वामुळे काही लोकं, खरंतर बरेच लोकं, सुखात रहातात. (अडचणीच्या काळात माझ्यासाठी हीच गरज मित्रमंडळ, नातेवाईक, कलिग्ज भागवतात.) माझ्यालेखी देव आहे, पण तो या आस्तिक लोकांच्या डोक्यात आहे, अगदी I think, so I am, याच चालीवर!
जोपर्यंत देव ही संकल्पना अनेक लोकांचं भलं करत आहे, किमान वाईट तरी करत नाही आहे तोपर्यंत मला देव चालतो. जेव्हा त्याच देवाच्या नावावर भांडणं होतात तेव्हा मला तो आवडत नाही.
किंवा जेव्हा माझ्यावर देव लादला जात नाही तोपर्यंत मला तो चालतो. अनेक आस्तिक मित्र-मैत्रिणीही जिवलग आहेत. पण माझ्यावर देवाचं अस्तित्व स्वीकारण्याची सक्ती मला चालत नाही.
मी पण अदितीशी सहमत. १ वर्षापूर्वीपर्यंत मीही आस्तिक होतो. म्हणजे कधी नीट विचारच केला नव्हता मी आस्तिक का आहे ह्याचा. आणि जेंव्हा मी तो केला तेंव्हा लक्षात आलं की एका आस्तिक कुटंबात वाढणे हेच त्याच्यामागचे एकमेव कारण आहे. देव ही संकल्पना मला मनापासून नाहीच पटत.
आस्तिक लोकांबद्दल आपली काहीच तक्रार नाही. फक्त सारखं आम्हाला re-convert करण्याची धडपड सोडून द्या!
>>जोपर्यंत देव ही संकल्पना अनेक लोकांचं भलं करत आहे, किमान वाईट तरी करत नाही आहे तोपर्यंत मला देव चालतो. जेव्हा त्याच देवाच्या नावावर भांडणं होतात तेव्हा मला तो आवडत नाही.
किंवा जेव्हा माझ्यावर देव लादला जात नाही तोपर्यंत मला तो चालतो.
मला काय वाटते हे नीट लिहायची अक्कल असती तर मी असेच काहीसे लिहिले असते !!
>>जेव्हा त्याच देवाच्या नावावर भांडणं होतात तेव्हा मला तो आवडत नाही.
अदिती, तुझा बहुतांश प्रतिसाद पटला. देव मानणं वा न मानणं हे व्यक्तीसापेक्ष. मान्य. असं धरून चालू, की देव आहे. मग काय त्याने सांगितलय की माझ्या नावावर भांडा? तो भांडणार्यांचा दोष की देवाचा? भांडणं देवाच्या प्रेमाने होत असतील, असंही नसत! अशी भांडणं बहुतांशी धूर्त लोक त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी लावतात, आणि विचार न करता, झापडबाज जनता त्याला बळी पडते. ह्यात देवाचा काय दोष? जनतेच्या अज्ञानाचा, माहिती नसल्याचा फायदा घेऊन आपापसात तेढ पैदा करुन दिली जाते. सगळे मानवी खेळच ना? उदा: रुढींना धर्म समजणे, मानणे.
तसंच हे भांडणं होतात म्हणून देव आवडत नाही, असं म्हणणं झालं की.
आता, असं मानू की देव नाही. पुढे काही उरतच नाही बोलायला मग. :) जो नाहीच तो कसा दोषी? अन् मग तो आवडायचा प्रश्नच येत नाही!
आता, असं मानू की देव नाही. पुढे काही उरतच नाही बोलायला मग. जो नाहीच तो कसा दोषी? अन् मग तो आवडायचा प्रश्नच येत नाही!
माझ्या आधीच्या प्रतिसादात व्याकरण आणि/किंवा भाषेची चूक आहे.
माझ्यासाठी देव ही काही (बर्याचशा?) लोकांच्या डोक्यातली एक संकल्पना आहे. जेव्हा त्या संकल्पनेवर लोकं भांडतात, इतरांवर आपली मतं मानण्याची सक्ती करतात (अगदी इमोशनल ब्लॅकमेलींगसुद्धा) तेव्हा ती संकल्पना मला आवडत नाही. एक नुसती संकल्पना असू शकत नाही, तिच्यासाठी एका मेंदूची गरज असते आणि नुसता मेंदूही असू शकत नाही, त्यासाठी एका (मानवी) शरीराची गरज असते. (हाच तर्क "ती शक्ती म्हणजे देव" याही बाबतीत लावता येईल.) मुद्दा हा, की जेव्हा अशी सक्ती होते तेव्हा ती संकल्पना, पक्षी: तो माणूस, मला आवडत नाही.
देवाला माझ्या लेखी स्वतंत्र अस्तित्व नाही, त्यासाठी एका मेंदूची आणि (मानवी) शरीराची आवश्यकता आहे (किंवा एखादा शब्दकोषतरी)! आणि यशो, तुझा तर्क मान्य, जी गोष्ट अस्तित्वात नाही तिचा रागतरी कसा येणार?
थोडं अवांतर: माझं निरीश्वरवादी असणं हे (माझ्यामते) "सिमेट्रीक" आहे. उदा: मला एक झोळी आवडली म्हणून मी ती घेतली, अगदी रोज वापरते. त्या झोळीवर "हरे कृष्ण हरे राम" असं लिहिलेलं असूनसुद्धा मला त्याचा फरक पडत नाही. मला झोळीशी मतलब आहे, त्यावरच्या लिखाणाशी नाही. ते लिखाण नसतं तरी मला फरक पडत नव्हता, तर ते लिखाण आहे म्हणूनही मला फरक पडू नये.
>>जेव्हा त्या संकल्पनेवर लोकं भांडतात, इतरांवर आपली मतं मानण्याची सक्ती करतात (अगदी इमोशनल ब्लॅकमेलींगसुद्धा) तेव्हा ती संकल्पना मला आवडत नाही. >> :)
संकल्पना न आवडण्यापेक्षा जर त्या लोकांच हेकेखोरपणा आवडत नाही, असं म्हणणं अधिक संयुक्तिक नाही का? :) कारण तीच संकल्पना अजून काही जणांना मान्य असेल, पण ती इतरांनीही मान्य करावी असा त्यांचा आग्रह नसेल. मग दोषी कोण? संकल्पना की ती राबवणारे?
असो. मुळातच चर्चा नक्की कशावर हा माझा सुरुवातीचा प्रश्न तसाच आहे. :)
संकल्पना न आवडण्यापेक्षा जर त्या लोकांच हेकेखोरपणा आवडत नाही, असं म्हणणं अधिक संयुक्तिक नाही का?
एक गृहीतक चुकतं तेव्हा आख्खा डोलारा कोसळतो, जसा एपिसायकल्सचा डोलारा कोसळला! :-)
(किंवा, गणितात जेव्हा एखादी अगदी साधी वाटणारी गोष्ट सिद्ध करतात, उदा. शून्य एकापेक्षा लहान आहे, तेव्हा सुरूवात करताना एक शून्यापेक्षा लहान आहे, किंवा दोन्ही सारखेच आहेत असं मानतात. आणि मग डोलारा कोसळतो ते दाखवतात. असो. माझं वाचन फार काही नाही, त्यामुळे माझ्या मर्यादित माहितीमधून हे एक उदाहरण दिलं.)
असो... देव आणि धर्म या दोन गोष्टींचा संबंध नाही असं माझं आणखी एक मत. तेव्हा डॉनराव, चर्चा नक्की कशावर करायची आहे, देवावर का धर्मावर??
नक्की चर्चा कशावर !
डॉनरावांनी 'जनातले मनातले' मध्ये स्वतःच्या मनातले विचार मांडले आहेत. लेख या स्वरूपात ते विचार असतानासुद्धा चर्चा कशावर? हा प्रश्न अप्रस्तुत वाटतो. विषय निघाला म्हणून सदस्य एकमेकांत चर्चा करत असावेत.
पाहा समोर दिसत असून उमज पडत नाही. देवाच्या बाबतीत असे होत नसेल कशावरून. तर्काच्या घोड्यावर स्वार झाले की रस्त्यातल्या अनेक गोष्टी धुरळ्यात अंधूक होतात असे वाटते. (हे आपले उगीच बरे का :) !)
अदिती,
विवेकानंदांची ज्ञानयोगावरील वाख्याने आहेत. त्यामध्ये ईश्वरविषयी कल्पनांचा प्रवास, आणि बरेच काही चांगल्या पद्धतीने मांडले आहे. वाचले नसल्यास जरूर वाचावे.
--लिखाळ.
जुने ठेवणे मीपणे आकळेना -समर्थ.
खर तर ईतर मान्यव॑राच्या मध्ये ईथे कडमडायच नव्हत ..पण जरा काही निदर्शनास आणुन देत आहोत..
बाबा॑नो आणी बाया॑नो,
काही कारण नसताना, तावातावाने,शब्द-पाल्हाळ लावुन, वाद-विवाद स्पर्धेच "सत्यनारायण" घालुन.
आपण एक-दुसर्यास मिपाच्या माध्यमाने " आस्तिक कि॑वा नास्तिक व्हायला सा॑गत आहात"
आमच्या साठी दोन्ही सारखेच
नास्तिक म्हणतो देव नाही ..सोडुन देतो..
आस्तिक म्हणतो देव आहे .मान्य करतो.सोडुन देतो...
देव आहे की नाही हे कोणी शोधत नाही...का ? का ? सा॑गा ना...लई जिकीरीच काम ना ??
कुठ आता तपश्चर्येला बसणार...
जरा दमान घ्या...
सुहास
प्रतिक्रिया
लिखाळगुरु
अहो पण
पण क्षणभर
छान चर्चा! :)
मस्त
लेख वाचला,
मला मूळ
मला या
>>>समाजात
सहमत...
>>>समाजात
छान चर्चा!
बाकी,
है शाब्बास!
धमालराव...
चला, आता
सोयीस्कर माघार?
>>शेठ, या
>>भारतातीलह
धर्म आणि
हे सर्व
चला चक्राचा खेळ खेळू या!
अर्थातच
मी पण
प्रतिसाद आवडला
बाप रे थोर
>>जेव्हा
आता, असं
>>जेव्हा
संकल्पना न
नक्की
थोडस वेगळ मत...