Skip to main content

प्रॉम्प्ट

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 02/11/2026 10:30 या दिवशी प्रकाशित केले.

हस्तिदंती मनोऱ्यात बसून सणासुदीसाठी 
AI वर बनविलेल्या तुमच्या 
तुपकट शुभेच्छा दुष्काळधगीत 
वितळून ठिबकू लागतील आता
२४ x ७
सो मि वर

त्यांना उत्तर द्यायला
एकच मीम 
AI वापरून बनवायचा प्रयत्न करतोय,
जी एकत्रच दाखवेल:

पाणी गायबल्या विहिरींची विषण्णता,
भेगाळल्या भूमीचा भकासपणा,
करपत्या कणसांचे कोळसे,
फुफाट्यात उडताना कोसळून पडणाऱ्या पाखरांची तहान,
आटल्या नदीपात्रांची विस्तीर्ण वाळवंटं,
टँकरकडे डोळे लावून बसलेले हताश हंडे,
जगता यावं म्हणून राहती गावं सोडणारी परागंदा पावलं,

......कुणी प्रॉम्प्ट सांगता का प्रॉम्प्ट?

लेखनविषय:

वाचने 47
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया