नमस्कार मित्रांनो
आपल्या अवतीभोवती दररोज असंख्य घटना घडत असतात. विज्ञान, साहित्य, कला, संस्कृती, पर्यावरण, क्रीडा, तंत्रज्ञान, सामाजिक जीवन आणि मानवी कर्तृत्व अशा विविध क्षेत्रांतील काही घटना आपल्याला आनंद देतात, काही अस्वस्थ करतात, तर काही विचार करायला लावतात.
प्रत्येक महत्त्वाची गोष्ट राजकारणाशी संबंधित असेलच असे नाही. राजकारणापलीकडेही एक विशाल, वैविध्यपूर्ण जग आहे. त्यातील वेचक बातम्या, अनोख्या घटना आणि विचारप्रवृत्त करणारे विषय एकमेकांसमोर आणावेत, या हेतूने हा धागा सुरू केलेला आहे. आणि अजुन एक आवर्जुन खुलासा करतो की राजकारण हे काहीतरी वाईट्ट आहे महत्वाचं नाही अस काहीही यातुन सुचित करायचं नाहीये. पण त्यासाठी मिसळपाववर ऑलरेडी इतर धागे मुबलक प्रमाणात आहेत. त्यामानाने अ-राजकीय (सुरुवातीला अराजकीय लिहिले होते नंतर चुक लक्षात आली आणि पुढचे अराजक टळले ते एक असो )मुद्दे बातम्या हे काहीसे वंचित दुर्लक्षित असे आहेत.
तर मुद्दा असा की कधी एखादी बातमी आपल्या मनात तरंग निर्माण करते. कधी आपण भारावून जातो, कधी एखादी विसंगती खटकते, तर कधी एखादा प्रश्न पडतो. मनात उमटलेले विचार, भावना किंवा प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी हे एक मोकळे व्यासपीठ बनावे अशी अपेक्षा आहे.
एखाद्या बातमीवर सभासदांनी मते मांडली, विचारांची देवाणघेवाण झाली आणि चर्चा रंगली, तर त्याचे नक्कीच स्वागत आहे. वेगवेगळे दृष्टिकोन समजून घेणे, हे चर्चेचे सौंदर्य आहे.
मात्र चर्चा झालीच पाहिजे किंवा प्रत्येक पोस्टवर प्रतिक्रिया आल्याच पाहिजेत, असा आग्रह नाही.
कधी एखादी बातमी वाचून केवळ आपली व्यक्तिगत प्रतिक्रिया नोंदवावीशी वाटेल. एखाद्या घटनेने मनाला स्पर्श केला असेल किंवा एखादा विचार व्यक्त करावासा वाटेल. अशा वेळी आपले दोन शब्द लिहिणेही पुरेसे आहे. एखादी रंजक घटना, अनोखा शोध, प्रेरणादायी कहाणी किंवा साधेसे निरीक्षणही येथे मांडता येईल. प्रत्येक वेळी सखोल विश्लेषणाची अपेक्षा नाही
कधी संवाद, तर कधी केवळ स्वगत — दोन्हींचेही येथे मनःपूर्वक स्वागत आहे.
तर चला मित्रहो,
राजकारणाच्या गदारोळापलीकडच्या जगात डोकावू या!
बातम्या मांडू या, प्रतिक्रिया नोंदवू या, विचारांची देवाणघेवाण करू या किंवा केवळ मनात उमटलेले स्वगत शब्दांत व्यक्त करू या.
मिसळपाव
प्रतिक्रिया
+1 अनुमोदन
अनुमोदन.
मिपाच्या संपादक मंडळास विनंती आहे की इथे येणारे राजकीय प्रतिसाद त्यांनी काढून टाकावेत. नाहीतर इथेही मिपाचे दोन्ही बाजूचे मल्ल राजकीय आखाडा सुरू करतील.
एक बातमी
मागच्या आठवड्यात एक बातमी आली आणि गेली. कदाचित फार कमी लोकांना ती समजली असेल (मराठी पेपरात आली होती)
ई मुद्रा कंपनीने आपला एस एस एल/टी एल एस सर्टिफिकेट विकण्याचा धंदा तडकाफडकी बंद केला. आपल्याला त्याचे महत्त्व कदाचित माहीत नसेल पण ही सर्टिफिकेट आपण रोज वापरतो . कोणत्याही आर्थिक गोष्टी जसे की ऑनलाईन बॅंक व्यवहार करताना ती वेबसाईट एचटीटीपीएस:// अशी दिसते तेच हे सर्टिफिकेट . ते विकणाऱ्या कंपन्यांना एक्सटर्नल सर्टिफिकेट ऑथोरिटी(सी ए) म्हणतात. ही सर्टिफिकेट सध्या कमीतकमी २५६ बिट असतात. पण ई मुद्रा ने विकलेली काही सर्टिफिकेट सिंगल किवा डबल डिजिट निघालि आणि उघडकीला आली. आता हे कसे झाले (लोकप्रिय कारण म्हणजे ईंटर्न्स मिस्टेक / नवशिक्याची चूक) तो भाग वेगळा. पण विश्वासार्हतेवरच प्रश्न चिन्ह लागल्याने तो व्यवसाय बंद करावा लागला. कंपनीची (आणि पर्यायाने भारतीय सी ए कंपन्यांची) बदनामी झाले ती झालीच.