Skip to main content
लेखक कंजूस यांनी शनिवार, 24/10/2026 23:45 या दिवशी प्रकाशित केले.

जैसलमेर आणि जोधपूर , ऑक्टोबर २०२६.

जैसलमेर आणि जोधपूर येथे ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात भेट दिली. सहल सहा दिवसांची झाली. 

भाग पहिला क्षणचित्रे 

फोटो (१)
जैसलमेर फोर्ट फेरी दोन किलोमीटर आहे. दोन तोफा, जैन मंदिरे, राजाराणी महाल आणि म्युझियम, चामुंडा आणि लक्ष्मी जी का मंदिर, सनसेट पॉईंट आरामात चालत पाहता येते. किल्ला चोवीस तास खुला असतो कारण आत लोक राहतात. फक्त राजाराणी महालास तिकिट आहे. २०० रुपये.


फोटो (२)
जैसलमेर किल्ल्यात वस्ती आहे आणि रहिवासी घराच्या ओटीवर काही कलाकुसरीच्या वस्तू विकतात. बारीक बोळ आहेत.


फोटो (३)
जैन मंदिर ( पाच आहेत.) आतमध्ये सुबक आणि खंडित न झालेल्या मूर्ती आहेत. आदिनाथ, नेमिनाथ, पार्श्वनाथ हे सर्व जितेंद्रिय असल्याने त्यांंचे स्थान देवतांच्यावरचे समजले जाते. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर विष्णू आणि शंकर आहेत. सभोवताली ब्रम्हा , महेश, विष्णूच्या खूप मूर्ती दिसतात. चिंतामणी पार्श्वनाथाच्या मंदिराला सभामंडपाला मोठा घुमट आहे आणि त्यात दहा चिंतामणी गणेश आहेत. गणेश मूर्ती रंगीत आहेत. 


फोटो (४)
हॉटेल रुमच्या खिडकीतून दिसणारा किल्ला आणि तोफेचा बुरूज. एकूण ९९ बुरूज आहेत. बाराव्या शतकात रावळ जैसलने हा किल्ला बांधला तेव्हा त्यास त्रिकुटा पहाड नाव होते. पण १९७४ मध्ये बंगाली दिग्दर्शक सत्यजित रे याने काढलेल्या सिआइडी छाप सिनेमातल्या एका मुलाच्या तोंडच्या "आमि शोनार केला देखबो" वाक्याने लोक यास शोनार किला म्हणून ओळखू लागले. तसाही हा किल्ला सकाळी/ संध्याकाळी सोनेरी पिवळ्या रंगात चमकतो.


फोटो (५)
जैसलमेर किल्ल्यावरची पूर्वेकडची तोफ.


फोटो (६)
तटबंदीच्यावर ठेवलेले दगडी गोळे आणि रूळ. शत्रूने वेढा दिला की वरून ढकलत. बुरुजांखाली वाळूचा उतार आहे त्यावरून गोळे घसरून सैनिकांवर कोसळत. 


फोटो (७)
जैसलमेर किल्ल्यात एका घराच्या बाकावरचे दगडी गोळे.


फोटो (८)
आमच्या हॉटेलपासून ( श्री गिरीराज पॅलेस) - नथमलजी की हवेली- पटवों की हवेली - सालम सिंग की हवेली - गढीसर लेक रूट ( जैसलमेर. )दोन किलोमीटर चालत.


फोटो (९)
नथमलजी की हवेली बाहेरून. जैसलमेरमध्ये लग्नाच्या आमंत्रण पत्रिका घरांच्या भिंतींवरच रंगवतात. गणपतीचे चित्र असतेच. इथे दोन दिसत आहेत.


फोटो (१०)
पटवों की हवेली. जैसलमेर


फोटो (११)
कोठारी की पटवों की हवेली प्रवेशद्वार. (जैसलमेर. ) पाच पटवा भावांच्या पाच हवेली होत्या त्यातील एकाने त्याची हवेली कोठारी नावाच्या माणसास विकली. 


फोटो (१२)
पटवों की हवेलीचे सज्जे आणि जाळ्या.


फोटो (१३)
सालम सिंग की हवेली. बाहेरूनच पाहिली. तिथला माणूस कटकट्या होता. गाइड घेऊन तिघे चौघे आले तरच प्रवेश देईन म्हणाला.नाही गेलो आत.


फोटो (१४)
रस्त्यावरची एक छोटीशी हवेली.


फोटो (१५)
हवेली म्हणजे हवेशिर घर. त्याची एक दगडी जाळी.


फोटो (१६)
जैसलमेरमधील सामान्य घरेही नक्षीदार दगडांचीच असतात.


फोटो (१७)
घढीसागर /घडीसर लेक(जैसलमेर.) आता पाणी नव्हतं परंतू नोव्हेंबमध्ये कॅनालचे पाणी भरतात मग खूप सुंदर दिसते. बोटिंगची सोय आहे पण दर महाग आहेत. तलावाच्या कडेने विश्रांतीसाठी छोट्या छत्र्या आहेत.


फोटो (१८)
जैसलमेर किल्ला - अमर सागर जैन मंदिर - साम ड्यून्स जीप पॉइंटपर्यंत कारने ३५ किलोमीटर -तिथून 4WD वाहनाने साम ड्यून्स सहा किलोमीटर., रूट. एकूण ४१ किलोमिटरस अंतर आहे. रस्ता सपाट छान आणि ट्राफिक नाही.


फोटो (१९)
साम वाळवंटाच्या वाळूत फिरणाऱ्या 4wheel drive गाड्या.( जैसलमेर)


फोटो (२०)
वाळूच्या ढिगाऱ्यावर गालीचावर लोळून सूर्यास्त बघण्याची मजा आली.


फोटो (२१)
नवीन जैसलमेर स्टेशन.


____________________________________________

जोधपूर फोटो 

फोटो (२२)
नई सडक ते मंडोर गार्डन, स्थानिक बसने वीस रुपये/- तिकिट.


फोटो (२३)
मंडोर गार्डन फेरफटका. वरच्या गढीत एक देऊळ आहे. राजे, सरदारांच्या सुबक छत्र्या( समाध्या) आहेत. 


फोटो (२४)
मंडोर गार्डनमध्ये छत्र्या ( समाध्या)आहेत. त्यातील एक.


फोटो (२५)
मंडोर छत्र्या, जोधपूर. राठोर परिवाराच्या राज्याची पूर्वीची राजधानी मंडोर होती.


फोटो (२६)
नई सडक चौराहा ते उमेदभवन म्युझियम पार्किंग. Rapido auto.


फोटो (२७)
उमेद भवन महाल, जोधपूर. फक्त म्युझिअम केलेला थोडासा भागच पाहता येतो. समोरच जोधपूर विमानतळ दिसतो. काही फाइटर जेट उडताना पाहता आली.(शंभर रुपये प्रवेश फी जास्ती वाटली.) बाकीचा भाग ताज ग्रूपचे हॉटेल आहे.काही जुन्या vintage कारस चालू स्थितीत आणि नव्यासारख्या ठेवल्या आहेत. 


फोटो (२८)
उमेदभवन पार्किंग ते मेहरानगढ पार्कींग, Rapido auto १२५ रुपये. आठ किलोमीटर.


फोटो (२९)
भव्य मेहरानगढ, जोधपूर.


फोटो (३०)
मेहरानगढचे एक प्रवेशद्वार, जोधपूर.


फोटो (३१)
मेहरानगढातील एक सुंदर दालन.


फोटो( ३२)
तलाव आणि मागे जसवंत थडा. रावल जसवंतची समाधी त्याच्या मुलाने बांधली.मेहरानगढ पार्किंगपासून सहाशे मिटरसवर आहे . तिकीट पन्नास रुपये.


फोटो (३३)
जसवंत थडा, मेहरानगढाजवळच. पांढऱ्या संगमरवरातील काव्य.


फोटो (३४)
जसवंत थडा.. मागील बाजू.


फोटो (३५)
घंटाघर, जोधपूर. घड्याळ चालू आहे. टोलेही पडतात.


फोटो (३६)
घंटाघर, सरदार मार्केट, जोधपूर. खूप वर्दळीचा भाग.


फोटो (३७)
तूरजी का झालरा ( विहीर), पाटी,जोधपूर.


फोटो (३८)
तूरजी का झालरा (पायऱ्यांची विहीर), जोधपूर.


फोटो (३९)
सरदार मार्केट परिसर, जोधपूर.


फोटो (४०)
Step well किंवा तूरजी की झालरासमोरचे एक हॉटेल, जोधपूर. या भागात फॉरिनर फार राहात होते.


फोटो (४१)
घंटाघर, जोधपूर येथून मेहरानगढात जाण्याची ऐसपैस चढण आहे. पायऱ्या नसून दगड घट्ट बसवलेले आहेत. पाऊण तासात वर जाता येते. चांगला अनुभव. किल्ल्याच्या नेहमीच दोन चार वाटा असतातच.


फोटो (४२)
प्रिया रेस्टॉरंट, नई सडक , जोधपूर. एसी हॉल, चांगले जेवण, इडली डोसे वडे,दक्षिणी पदार्थही चांगले होते. [याच्या समोरचे जनता स्वीट होम आणि रेस्टॉरंट मात्र चांगले नव्हते. बाजूचे पोकर रेस्टॉरंट महागडे, पोकर स्वीट होम अस्वच्छ परंतू पदार्थ चांगले होते. काही सटरफटर पदार्थ खत्री नमकिनमध्ये ताजे चांगले होते].


फोटो (४३)
हॉटेल रत्नावलीमधली रुम.( नई सडक , जोधपूर ) सीझन सुरू झालेला नसल्याने सर्व हॉटेले रिकामीच होती. एसी (३बेड)रुम दोन हजारपासून मिळत होती. 


फोटो (४४)
जोधपूर रेल्वे स्टेशन इमारत. पुढे मागे तीन किलोमीटरवर दोन स्टेशने आहेत. राइका बाग पॅलेस स्टेशन आणि भगत की कोठी. जोधपूरचा कारभार फार भोंगळ आहे. प्लॅटफॉर्म मिळायला एक दीड तास लावतात. 


______________________________________

भाग दुसरा

अधिक माहिती 

जायचे कसे?

जैसलमेर आणि जोधपूरला हवाई मार्गे, रेल्वेने आणि रस्त्याने सहज जाता येते. काही अडचण नाही.

केव्हा जावे?

एप्रिल ते जुलै उन्हाचा त्रास होतो. ऑगस्टला थोडा पाऊसही पडतो. सप्टेंबर ऑक्टोबर तापमान थोडे कमी येते. गर्दी नसते. नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यटन मोसम असतो प्रचंड गर्दी होते. नवरात्री, दसरा संपला की पर्यटकांचे लोंढे इकडे येऊ लागतात. हॉटेलांचे दर वाढतात. आम्ही नवरात्रीत गेलो. हॉटेल रुम्स सहज मिळत होत्या.

कुठे राहावे?( जैसलमेर)..

अमुक एक हॉटेल न सांगता विशेष भाग पाहा

१. जैसलमेर किल्ल्यातच हॉटेल्स आहेत. पण जाण्यायेण्याचा त्रास होईल.
२. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ जाणाऱ्या रस्त्यावर बरीच आहेत. सर्व जवळ पडेल. बाजार जवळच.
३. किल्ल्याच्या पश्चिमेला सामकडे जाणारा रस्ता हनुमान सर्कलवरून जातो. इकडे बरीच चांगली हॉटेल्स आहेत.
४.जर का जैसलमेरहून पुढे कुठे जाणारी गाडी पहाटे असेल तर स्टेशनच्या रिटाइरिंग रुम घेणे बरे पडेल. आणि आता स्टेशन परिसर एकदम चकाचक केला आहे.

कुठे राहावे?( जोधपूर)..

विविध भाग.

१. जोधपूरच्या पूर्व भागात एरपोर्ट आहे. तो भाग नवीन आणि स्वच्छ आहे. खूप हॉटेल्स आहेत.
२. जोधपूरचा पश्चिम भाग जुना आहे. नई सडक, हायकोर्ट रोड, चोपासनी रोड , घंटाघर, तूरजी की झालरा या भागातबरीच आहेत.
३. राइका बाग पॅलेस स्टेशन परिसरांतही आहेत.

स्थानिक प्रवास ( जैसलमेर)

ऑटो रिक्षाने हवेली आणि गडीसर लेकला जाता येईल. Sam Sand dunes फिरणे आणि राहाणे यासाठी कार आणि जीपवाल्यांचे पॅकेजच घ्यावे लागते. दर आणि प्रत्येक गोष्ट अगोदरच निश्चित करावी.

स्थानिक प्रवास ( जोधपूर)

इथे ऑटोरिक्षा सगळीकडे आहेत. साधारणपणे ५०-७५ रुपये किलोमीटरचा रेट असतो. पण Rapido appने ऑटो बोलावली तर लगेच येते आणि स्वस्त पडते. एका किलोमिटरला ५० रुपये, पाच किमिला ७५, आठ किलोमीटरला १२०रु इतकी स्वस्त आहे. शिवाय जोधपूर पर्यटन बस सर्विसेसच्या मिनीबसेस दर पाच मिनिटांनी धावत असतात. 

__________________________________

पुस्तके आणि माहितीपत्रके...

फोटो (४५)
राजस्थान पर्यटन खात्याने काढलेले मराठीतले माहितीपुस्तक आणि मोठा नकाशाही दिला होता.


फोटो (४६)
पर्यटन प्रदर्शनात मिळालेले माहिती पत्रक.


फोटो (४७)
मराठीतले उत्तम पुस्तक. चला राजस्थानला. हे वाचा, गाईडची गरज लागणार नाही.


फोटो (४८)
हे एक राजस्थानची माहिती देणारे पुस्तक रस्त्यावर मिळाले. जसजसे पर्यटक आयोजित सहलीत जाऊ लागले तसतसे त्यांचेकडील अमुल्य ग्रंथभांडार रस्त्यावर आले.


फोटो (४९)
लोनली प्लॅनिटचे जुने पुस्तक. खूप कामाची माहिती मिळते. संग्राह्य पुस्तक.


फोटो (५०)
Everyman guides यांनी जगात थोडीच पुस्तके प्रकाशित केली आहेत. भारतातील राजस्थान हे एकमेव. अगणित चित्रे आणि माहिती आहे. हे जुन्या पुस्तकांच्या दुकानात शंभर रुपयांत मिळालं होतं. 


____________________________________

यूट्यूबवर 

जैसलमेर

Jaisalmer tour plan..by .suurojitpalmal [1:00:12]
https://youtu.be/XP8Ft0RInQw?si=_WTPG4tIOaDO8_PC

जैसलमेर डेझर्ट सफारी [30:14]
https://youtu.be/DwoghCEWgT4?si=bcf5LA_ga5Xl5ydP

Jaisalmer tour package [57:07]
https://youtu.be/x4pK0b6gAyE?si=Opkn-ZI_97YHgHIb

जैसलमेर घूमने की जगह Aagam explorer [54:37]
https://youtu.be/jErI5wrt1Xc?si=QlH-CuyrsBxfNuDD

aagam explorer :पटवों की हवेली (गाईड)[19:04]
https://youtu.be/yGcWlPZH-bs?si=VuhGpJ5Hv-a4-oje

नथमल की हवेली, सालम सिंग की हवेली (गाईड)[07:04]
https://youtu.be/vxgbHOSUcBc?si=43GqWPtZZWk533xA

Haveli ...Guided by Ghia [19:45]
https://youtu.be/cPHHnnlTuEY?si=jTSfCJjTUBgLFEtC

aagam explorer :गोल्डन फोर्ट जैसलमेर फोर्ट ( गाईड ) [42:10]
https://youtu.be/YVSVY0WeKK8?si=kUiS5eGaMs7RlWnE

aagam explorer :गोल्डन फोर्ट जैसलमेर फोर्ट ( गाईड )[31:56]
https://youtu.be/bJWNPi_WyCY?si=S2NggSdlW3wLDk0A

aagam explorer :गोल्डन फोर्ट जैसलमेर फोर्ट ( गाईड )[28:12]
https://youtu.be/wZFpa260JLA?si=6zRfbGhpu_TWGgWd

लोंगेवाला वॉर म्युझिअम [21:10]
https://youtu.be/qu1lAvr7uSQ?si=CMJxlv9CC79sW1lJ

=======================

यूट्यूबवर

जोधपूर

Jodhpur Mehrangarh Aagam explorer [49:46]
https://youtu.be/4YUw322E6LY?si=BMm8ThomSMM1AG6h

2. Jodhpur tour plan..by .suurojitpalmal [32:32]
https://youtu.be/_h-YX7QR5jo?si=UhbnwKWnKHAs5ZbR

मेहरानगड Jodhpur [34:31]
https://youtu.be/28S4IeeZ6VI?si=l8d7b-5dSTvik1O-

Umaid bhavan, Mandore, kalyana lake [17:49]
https://youtu.be/9BfgAlABHqs?si=QvMv0zXsfIdyD5_J

____________________________________________

भारतातील रण राजस्थानात आहे. वाळूचे ढिगारे असणाऱ्या जागा या ठिकाणी सापडतात. 

१. साम गाव , जैसलमेर ४५ किलोमीटरवर .

२.खुरी गाव ४० किमि. जैसलमेर

३.ओशियांन , 

जोधपूरपासून साठ किलो मिटर. हे मोठे रेल्वे स्टेशन आहे. स्टेशनातूनच एक ढिगारा पश्चिमेला दिसतो. तसेच या गावात जुनी सूर्यमंदिरे आहेत.

४.पुष्कर, अजमेरजवळ.

५.खिमसर . जोधपूर-नागौर- बिकानेर रस्त्यावर.

६.किशनबाग, जयपूर येथे.

७.महाबार, बाड़मेरजवळ.

तर या ठिकाणी तंबूमध्ये राहण्याची मजा असणार. पण आम्ही फक्त दोन तास संध्याकाळी जाऊन आलो.

______________________

ऊंट ..

वाळवंट म्हटलं की उंटांची आठवण येते. परंतू आता उंटांचा उपयोगच राहिला नाही आणि ते फक्त शोभेची वस्तू झाले. जेव्हा राजस्थानी व्यापारी उंटांचा काफिला घेऊन भारतातील वस्तू अफगाणिस्तान तुर्कस्तानाच्या वाळवंटातून भूमध्य समुद्र किनाऱ्यावरच्या बेटांवर जात. तिथे चिनी, युअरोपिय देशाच्या लोकांबरोबर मालाची अदलाबदल करत. येताना मोती, काचेच्या वस्तू, यंत्रे घेऊन येत. ब्रिटिशांनी चेन्नई, कोची, मद्रास बंदरे विकसित केल्यावर मारवाडी लोक आपल्या हवेल्या सोडून तिकडे गेले. नंतर मुंबई बंदर झाल्यावर मुंबईतही आले. समुद्रमार्गे मसाले , कापड, तांदूळ, अफू यांचा व्यापार होऊ लागला. पाकिस्तानची हद्द बंद झाली. उंटांचे महत्त्व संपले. आता फक्त वाळूच्या ढिगाऱ्यांवर पर्यटकांना फिरवण्याचे कामच त्यांच्यासाठी उरले.

_______________________________

इकडे पाणी कुठून येते?

जैसलमेर, जोधपूर, बिकानेर, बाड़मेर वगैरे भागात पाऊस दोन चार सेंटीमिटर पडतो. त्यामुळे या भागाचा विकास होणे अशक्यच. परंतू पंजाबातील नद्यांवर बंधारा टाकून ते पाणी आणण्याची कल्पना निघाली आणि जवळपास हजार किलोमीटर नाल्याने इकडे पाणी आणण्यात आले. हिमालयातीलच पाणी त्यामुळे चव छान आहे. याविषयीचे विकिपान पाहा....

https://en.wikipedia.org/wiki/Indira_Gandhi_Canal

आता तर नर्मदा नदीच्या सरदार सरोवराचे पाणीही राजस्थानात पोहचले आहे. शहरांत ठिकठिकाणी असलेल्या तलावांत हे पाणी साठवले जाते.

_______________________

खाण्याचे पदार्थ

मावा कचोरी..फार गोड वाटली.

रबडीवाला घेवर.... कमी गोड भारी पदार्थ.

मखानिया लस्सी....चांगली होती सगळीकडे.

दाल पकवान ...जैसलमेर किल्लागेटजवळ सकाळी मिळत होते. मूळ सिंधी पदार्थ पण त्याची डाळ बरोबर नव्हती. उल्हासनगर किंवा ठाण्यात चांगले मिळते.

दाल बाटी..... घेतली नाही कारण कधी कच्ची असते. पोट बिघडते.

पुरी भाजी ..गट्टे का सागसह... चांगली होती.

मिरची बडा... मोठ्या मिरचांची भजी....आतला मसाला आवडला नाही. कांदे घातले होते.

फाफडा जलेबी... चांगली होती.

समोसे... काही खास नव्हते. 

दुधाच्या सायीचा एक पदार्थ मिळतो तो घ्यायचा राहिला. तो पुरीलाच घ्यावा.

केर _ सांगरीची भाजी तिकडे आवडीने खातात किंवा मोठ्या राजस्थानी थाळीमध्ये देतात. पण आम्ही केर_ सांगरीचे लोणचे मात्र आणले. ते चविष्ट लागते.

फोटो (५१)
केर-सांगरीचे लोणचे. हे आता पुण्या मुंबईतही मिळते.


फोटो (५२)
मूग डाळ हलवा. जेवणात घेता येतो.


फोटो (५३)
रबडी. 


फोटो (५४)
रबडीवाला घेवर. परतीचा प्रवास जोधपूरहून असला तर हे आणता येईल. रबडी असल्याने थंड ठेवायला पाहिजे.


फोटो (५५)
साधे घेवर. यावर रबडी घातलेली नसते त्यामुळे आठ दहा दिवस सहज टिकते. घरी आणल्यावर याच्या तुकड्यांवर आटीव दूध टाकून भिजवून खायचे.


फोटो (५६)
पोकर स्वीट होम, नईसडक जोधपूर. यांची अजून तीन दुकाने आणि रेस्टॉरंट्स आहेत.


राजस्थानातल्या वाळवंटातील झाडे:

' केर' नावाचे झाड तिकडे वाळवंटातच वाढते. त्याला करवंदाएवढी आंबट फळे येतात. याने लोणच्याला चव येते.
'खेजडी'..... . म्हणजे शमी. याच्या शेंगांना 'सांगरी ' म्हणतात. या शेंगा वाळवून लोणच्यात वापरतात. 
नीम ..कडुनिंब. सावली मिळते, लिंबोण्या पक्षी खातात.
लसोडा.... भोकर. लोणच्यासाठी उत्तम.
बाभूळ... काटक्या दात घासण्यासाठी. पाला बकऱ्या आवडीने खातात.
रोहिडा... लाकडासाठी. ही सर्व झाडे वाळवंटात जगतात. विविध ठिकाणांहून माहिती गोळा करून दिली आहे. त्यांत बदलही होऊ शकतो. 
चुका आणि सूचनांचे स्वागत.

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 107
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

सुरेख आणि तपशीलवार लिहिलंय. फोटो तर छानच.

कलाकुसर करावी तर ती राजस्थान्यांनीच. साम म्हटलं तर दारा बुलंद, वाळूची पोकळी, बालाजीची खिंड आणि शान ए जैसलमेरची आठवण येणं अपरिहार्य आहे.

तुमच्याकडची दुर्मिळ पुस्तकं बघून हेवा वाटला. बाकी मार्च आणि ओक्टॉबर पहिला/दुसरा आठवडा सहली फार स्वस्तात होतात असा माझाही अनुभव आहे.


नक्षीदार हवेल्यांचे छायाचित्रे अतिशय सुंदर, एक एक सुंदर छायाचित्र पाहात आम्हीच भटकंती करीत आहोत असे वाटले. सामान्य माणसं जागोजागी मनातल्या मनात हिशेब करीत प्रवास करतात ते तपशीलवार प्रवासवर्णन आणि आपल्या प्रवासाचा आणखी कोणाला तरी फायदा व्हावा यासाठी केलेलं व्यवस्थित मार्गदर्शन लेखनात आहे. वाळुवर लोळत सुर्यास्त बघत असलेला फोटो भारी. बाकी ते घेवड्याचा फोटो टाकायला पाहिजे होता. सफर आवडली. आभार. 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सफर आवडली बरे वाटले.

घेवरचा आणि इतर फोटो लेखात वाढवले आहेत शेवटी.


अप्रतिम फोटो!मस्त राजस्थान कलकुसर छान टिपली. खाद्यभ्रमंतीही भारी. पुस्तकं खजिना तर उत्तमच!माझ्यासाठी कर्नाटकची पुस्तकं शोधून ठेवा 👍


नेमकी व तपशीलवार माहिती दिलीत. जैसलमेर बकेट लिस्ट मध्ये आहे. त्यामुळे लवकरच जाईन. या लेखाचा निश्चित उपयोग होईल.  आपण सँड ड्यून्सचे पॅकेज घेतले होते किंवा कसे? त्याचे साधारण काय दर असतात वगैरे?