Skip to main content
लेखक Bhakti यांनी सोमवार, 19/10/2026 16:20 या दिवशी प्रकाशित केले.

 

’जयतु नाद हब्बे दसरा सोबगु!

जेव्हा आपण 'दसरा' हा शब्द ऐकतो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर येतो तो सोन्याचा सण, आनंद आणि उत्साहाचे वातावरण. पण जेव्हा आपण 'मैसूर दसरा' म्हणतो, तेव्हा डोळ्यांसमोर उभा राहतो चारशे वर्षांहून अधिक जुना इतिहास, हत्तींची राजेशाही मिरवणूक, लाखो दिव्यांनी झळाळणारा अंबा विलास पॅलेस आणि दक्षिण भारताचे वैभव! ही परंपरा म्हणजे 'महानवमी दिब्बा ते नाद हब्बा' म्हणजेच हंपीच्या दगडी मंचापासून सुरू होऊन मैसूरच्या भव्य राजवाड्यापर्यंत पोहोचलेल्या मैसूर दसऱ्याच्या गोष्ट ...

सिंहासन मंच राणीच्या स्नानागाराच्या अगदी ईशान्येला आणि किल्ल्याच्या तटबंदीच्या आत, वर वर्णन केलेल्या आणि अब्दुर रज्झाकने उल्लेख केलेल्या दगडी जलवाहिन्यांचे  काही अवशेष अजूनही उभे आहेत. तो म्हणाला होता, "एके काळी, तासलेल्या, गुळगुळीत आणि चमकदार दगडांपासून बनवलेले असंख्य पाण्याचे प्रवाह आणि कालवे येथे वाहत होते." या जलवाहिनीच्या अगदी उत्तरेला 'सिंहासन मंच' किंवा पेस याने म्हटल्याप्रमाणे "हाऊस ऑफ व्हिक्टरी" 'विजय भवन' चे भव्य अवशेष दिसतात. स्थानिक लोक आज याला 'दसरा दिब्बा' किंवा 'महानवमी दिब्बा' म्हणून ओळखतात. 'दिब्बा' म्हणजे मंच अथवा प्लॅटफॉर्म, ज्याचा वापर दसरा, महानवमी किंवा नवरात्री या नऊ दिवसांच्या उत्सवा दरम्यान केला जात असे. पेसच्या मते, याला 'विजय भवन' म्हटले गेले कारण कृष्णदेवराय यांनी ओडिशाच्या राजाविरुद्धच्या (इ.स. १५१३) त्यांच्या विजयी मोहिमेवरून परत आल्यानंतर हे बांधले होते. दसऱ्याच्या उत्सवाचे त्यांनी केलेले वर्णन ज्या उत्सवाचा हा मंच केंद्रबिंदू होता ते या ऐतिहासिक वृत्तांतातील सर्वात जिवंत भागांपैकी एक आहे.

महानवमी डिब्ब्याचे सर्वांत लक्षवेधी वैशिष्ट्य म्हणजे त्याची तीन स्तरांमध्ये उभारलेली पिरॅमिडसदृश रचना. भक्कम ग्रॅनाइट दगडांचा वापर करून बांधलेला हा मंच वरच्या दिशेने निमुळता होत जातो. त्याच्या खालच्या स्तराचा विस्तार सर्वाधिक असून, प्रत्येक पुढील स्तराचा आकार तुलनेने लहान आहे. या रचनेमुळे वास्तूला उंची, भव्यता आणि स्थैर्य प्राप्त झाले आहे. ही कुशलतेने कोरलेली शिल्पे आणि अलंकरण राजेशाही समारंभांपासून ते शहरी जीवनापर्यंत, राज्यात आलेल्या पूर्वीच्या परदेशी राजदूतांपासून ते शिकारीच्या दृश्यांपर्यंत सर्व काही दर्शवतात. तसेच पोर्तुगीज, अरबी आणि चिनी संबंधांपर्यंतच्या गोष्टीही दिसतात. कदाचित राजधानीला भेट देणाऱ्या परदेशी राजदूतांच्या सोयीसाठी हे एक छायाचित्र दालन म्हणून बनवले गेले असावे. या चित्रणांमधून त्यांना राजधानीत दरवर्षी होणाऱ्या भव्य उत्सवांची कल्पना येऊ शकत होती.

हे सर्व पाहताना मला आठवतो ...पर्शिया मधील पर्सेपोलिस येथील 'अपदान महाल' !!

भारतातील हम्पी -विजयनगर साम्राज्य  येथील 'महानवमी दिब्बा' यांच्या वास्तुकलेत आणि सामाजिक उद्देशात कमालीची समानता जाणवते. दोन्ही वास्तूंचे सर्वात मोठे साम्य म्हणजे, त्या एका विशाल साम्राज्याचे वैभव आणि राजाची सर्वोच्च सत्ता दाखवण्यासाठी भव्य पाषाणी चबुतऱ्यावर बांधल्या गेल्या होत्या. अपदान महालाप्रमाणेच महानवमी दिब्बाच्या रचनेतही स्तंभांचे तळ आढळतात, ज्यावरून या चबुतऱ्यावर प्राचीन काळी एक भव्य लाकडी मंडप अस्तित्वात असल्याचा अंदाज येतो. या दोन्ही वास्तूंचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या भिंती आणि पायऱ्यांवर केलेले उत्कृष्ट कोरीव काम होय. जिथे अपदान महालात राजाला नजराणा देणाऱ्या २३ देशांच्या प्रतिनिधींची शांततापूर्ण मिरवणूक दिसते, तिथे महानवमी दिब्बावर विजयनगर साम्राज्यातील सैनिक, हत्ती, घोडे आणि परदेशी व्यापारी यांच्या भव्य मिरवणुकांचे आणि लष्करी संचलनाचे चित्रण आहे. तसेच, या दोन्ही वास्तूंचा मुख्य उद्देश प्रामुख्याने मोठे राजकीय आणि सांस्कृतिक उत्सव पर्सेपोलिसमध्ये 'नवरोज' आणि हम्पीमध्ये 'महानवमी साजरा करणे आणि त्या निमित्ताने सम्राटाची लष्करी व आर्थिक ताकद जगाला दाखवणे हाच होता. मध्य आशिया आणि पर्शियाशी असलेल्या व्यापारी संबंधांमुळेच विजयनगरच्या या भव्य रचनेवर प्राचीन इराणी वास्तुकलेचा अंशतः प्रभाव पडला असावा, असे इतिहासकार मानतात.

============================================================================================

महानवमी दिब्बा रचना

उपलब्ध वर्णनांनुसार, या मंचाची उंची साधारण १० ते १२ मीटर मानली जाते. त्याच्या तीन स्तरांच्या मोजमापांबाबत वेगवेगळ्या स्रोतांमध्ये काही फरक आढळतो. एका वर्णनात खालच्या स्तराची बाजू सुमारे ३८ मीटर, मधल्या स्तराची २८ मीटर आणि वरच्या स्तराची २२ मीटर दिली आहे. तर इतर वर्णनांमध्ये वेगळी मोजमापे नमूद केली आहेत. त्यामुळे या आकड्यांना अंदाजित मोजमापे म्हणून पाहणे उचित ठरते.या मंचाची रचना केवळ भव्यता निर्माण करण्यासाठी नव्हती. उंचावरून समारंभ पाहता येणे, राजाची उपस्थिती सर्वांना जाणवणे आणि राजसत्तेचे सामर्थ्य दृश्यमान होणे, अशा अनेक उद्देशांची पूर्तता या वास्तूमधून होत असावी.

 

किल्ल्यातील अवशेषांमध्ये अशा प्रकारचे अनेक दगडी मंच किंवा इमारतींचे तळमजले आहेत, परंतु उंची किंवा सौंदर्याच्या बाबतीत या मंचाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. ही एक अतिशय भव्य आणि विस्तीर्ण रचना आहे. मूळतः याला कोरलेल्या ग्रॅनाइट दगडांचे अस्तर होते, ज्याचा काही भाग नंतर मंचाच्या समोरील म्हणजेच पश्चिम बाजूला गडद हिरव्या रंगाच्या क्लोराईट शिष्ट दगडाने पुन्हा सजवला गेला.

 

मंचाच्या मध्यभागी भोवताली फिरण्यासाठी एक गच्चीसारखा रस्ता आहे, आणि पूर्व बाजूला वरच्या मजल्यावर जमिनीच्या पातळीपेक्षा खाली एक लहान खोली आहे. या खोलीत जाण्यासाठी दोन्ही बाजूंनी अरुंद दगडी पायऱ्या आहेत.असा अंदाज आहे की दसरा उत्सवादरम्यान वापरले जाणारे सोने आणि महागडे कपडे या लहान खोलीत ठेवले जात असत. मंचाच्या पायावरील बाहेरील  विविध ओळींमधील मोकळी जागा अतिशय उत्कृष्टपणे कोरलेली असून, त्यावर सैनिक, घोडे, हत्ती, उंट आणि नृत्य करणाऱ्या मुलींच्या रांगांची शिल्पे दाखवली आहेत.

 

हजारा रामा मंदिराच्या कुंपणाच्या भिंतींवर वापरलेल्या शैलीप्रमाणेच यावरही अतिशय क्लिष्ट आणि नक्षीदार कोरीव काम करण्यात आले आहे. या विविध दृश्यांमध्ये सैनिक, घोडे, हत्ती, उंट आणि नर्तिकांच्या मिरवणुकी दाखवल्या आहेत. तर इतर काही उठाव-शिल्पांमध्ये शिकारीची दृश्ये आणि पारंपारिक प्राण्यांचे चित्रण आढळते. ग्रॅनाइट दगडाच्या कडक स्वरूपामुळे ही शिल्पे कोरताना काहीशी ओबडधोबड वाटत असली, तरी ती अत्यंत मनोरंजक आणि लक्षवेधी आहेत. यानंतरच्या काळात क्लोराईट दगडावर कोरलेली शिल्पे अधिक नक्षीदार आणि सुंदर आहेत; कदाचित येथे जिवंत राहिलेल्या सर्व प्राचीन शिल्पांपैकी ती सर्वोत्तम शिल्पकला मानली जाऊ शकते.

या काही दगडी अधिष्ठानांवर मिळालेल्या अवशेषांवरून, या इमारतींची वरील बांधकामे विटा आणि प्लास्टरमध्ये केली गेली होती यात शंका नाही. तसेच लाकडी नक्षीदार खांबांवर आधारलेली लाकडी छपरे होती, जी बहुधा पश्चिम किनारपट्टीवरील मंदिरांप्रमाणे तांब्याच्या छोट्या पट्ट्यांनी झाकलेली असावीत. अशा प्रकारे, मूळ इमारतींपैकी काही इमारती अनेक मजली आणि खूप उंच असू शकल्या असत्या. "किंग्ज ऑडियन्स हॉल" च्या बाबतीत हे स्पष्टपणे दिसून येते. अब्दुर रज्झाकच्या मते, हा दरबार किल्ल्यातील इतर सर्व उंच इमारतींपेक्षा अधिक उंचावर होता.

 हा चौथरा  त्या भव्य मंडपाचे अवशेष दर्शवतो, जिथे दरवर्षी शरद ऋतूत होणाऱ्या नऊ दिवसांच्या महान उत्सवा दरम्यान सार्वभौम राजा सोन्याचे आणि रत्नांचे शाही सिंहासन ठेवत असे. या उत्सवात विजयनगर येथे सर्व प्रमुख, सरदार आणि सेनापतींना राजाला त्यांचे भाडे -महसूल देण्यासाठी आणि आदरयुक्त निष्ठा  व्यक्त करण्यासाठी एकत्र यावे लागत असे.

=================================================================================

नुनिझ या उत्सवाचे वर्णन पुढीलप्रमाणे करतो

"हा उत्सव सप्टेंबर महिन्यात होतो, जेव्हा नऊ दिवस ते मोठा सण साजरा करतात. काही जण म्हणतात की ते हे आमच्या आईने नऊ महिने आपल्या गर्भात पुत्राला सांभाळले त्याच्या सन्मानार्थ करतात, तर काही जण म्हणतात की हे केवळ या कारणास्तव केले जाते कारण या वेळी सेनापती राजाला त्यांचे भाडे भरण्यासाठी येतात, ज्या उत्सवाचे आयोजन खालील पद्धतीने केले जाते..."

"पहिल्या दिवशी ते राजवाड्याच्या समोरील मैदानात नऊ किल्ले ,मंच किंवा भव्य देखावे उभारतात. हे किल्ले साम्राज्यातील नऊ मुख्य सेनापतींद्वारे तयार  केले जातात. हे खूप उंच असतात आणि त्यांना मौल्यवान व भरजरी कापडांनी सजवले जाते. यामध्ये अनेक नर्तिका असतात आणि विविध प्रकारच्या युक्त्या व करामती ,खेळ देखील असतात. या नऊ किल्ल्यांव्यतिरिक्त, प्रत्येक सेनापतीला आपापला स्वतंत्र किल्ला बनवणे बंधनकारक असते आणि ते हे किल्ले राजाला दाखवण्यासाठी आणतात. प्रत्येकाची स्वतःची अशी वेगळी रचना किंवा वैशिष्ट्य असते, आणि ते नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवा दरम्यान अशाच पद्धतीने येत राहतात. शहराच्या अधिकाऱ्यांनाही दररोज आपापल्या रचनांसह -देखाव्यांसह येणे बंधनकारक असते."

नुनिझने दिलेल्या वर्णनानुसार, हा उत्सव अच्युत राय यांच्या राजवटीत (इ.स. १५३०-१५४२) अशा प्रकारे साजरा केला जात असे. हा सण म्हणजे विजयनगर साम्राज्यातील प्रसिद्ध महानवमी उत्सव /नवरात्र किंवा दसरा आहे.

"रात्रीच्या वेळी, अगदी आमच्या सणांप्रमाणेच, आणि या नऊ दिवसांत ते प्राण्यांची कत्तल करतात आणि बळी देतात. पहिल्या दिवशी ते नऊ नर म्हशी (रेडे), नऊ मेंढे आणि नऊ बकरे मारतात, आणि त्यानंतर प्रत्येक दिवशी ते आधीपेक्षा जास्त प्राणी मारतात, ही संख्या नेहमी दुप्पट केली जाते.आणि जेव्हा ते या प्राण्यांचा बळी देऊन संपवतात, तेव्हा राजाचे नऊ घोडे आणि नऊ हत्ती येतात, आणि ते फुलांनी गुलाबांनी आणि समृद्ध वस्त्रांनी झुलींनी सजवून राजासमोर आणले जातात. त्यांच्यापुढे घोड्यांचा मुख्य माहुत/अश्वपाल अनेक सेवकांसह चालतो आणि ते राजाला सलाम करतात.

आणि जेव्हा त्यांचा सलाम करून होतो, तेव्हा आतून पुजारी येतात आणि ते भात व इतर शिजवलेले अन्न, पाणी, अग्नी आणि अनेक प्रकारचे सुगंध (सुगंधी द्रव्ये) आणतात. ते प्रार्थना करतात आणि घोडे व हत्तींवर पाणी शिंपडतात, अगदी (आमचे पुजारी करतात तसे) पवित्र तीर्थाप्रमाणे,आणि ते त्यांच्यावर गुलाबांचे हार घालतात. हे सर्व राजाच्या उपस्थितीत केले जाते, जो सोने आणि मौल्यवान रत्नांनी बनलेल्या सिंहासनावर बसलेला असतो. तो संपूर्ण वर्षात फक्त याच एका वेळी या सिंहासनावर बसतो.आणि सध्या राज्य करणारा राजा (अच्युत देव राय) यावर बसत नाही, कारण लोक असे म्हणतात की जो कोणी यावर बसेल तो अत्यंत सत्यवादी माणूस असला पाहिजे, जो नेहमी पूर्ण सत्य बोलतो, आणि हा राजा कधीही तसे करत नाही. हे सर्व चालू असताना, राजाच्या समोरून पूर्ण एक हजार स्त्रिया नाचत आणि वेगवेगळ्या मुद्रा ,नृत्य करत पुढे जातात."

सुमारे १५२०-१५२२ इसवी सनाच्या सुमारास सम्राट कृष्णदेवराय यांच्या काळात विजयनगरला भेट देणारा पोर्तुगीज प्रवासी डोमिंगोस पेस याच्या नोंदींमधील हा उतारा आहे. नंतर इतिहासकार रॉबर्ट सेवेल यांनी १९०० मध्ये प्रसिद्ध केलेल्या 'अ फॉरगॉटन एम्पायर: विजयनगर' (A Forgotten Empire: Vijayanagar) या त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकात याचे इंग्रजीत भाषांतर केले होते.

"तयार करण्यात आलेल्या सर्व साधनांची पाहणी  झाल्यानंतर, राजाचे सर्व घोडे तिथून जातात. हे घोडे रेशमी वस्त्रांनी पांघरलेले असतात आणि त्यांच्या डोक्यावर सोने व मौल्यवान रत्नांची भरपूर सजावट केलेली असते. त्यानंतर राजवाड्याच्या समोरील क्रीडांगणाच्या मध्यभागी सर्व हत्ती आणि बैलांच्या जोड्या येतात. हे सर्व पाहून झाल्यानंतर, राजाच्या छत्तीस अत्यंत सुंदर पत्नी सोन्याने आणि मोत्यांनी मढलेल्या आणि बारीक मोत्यांच्या नक्षीकामाने सजलेल्या अवस्थेत तिथे येतात; आणि त्यातील प्रत्येकीच्या हातात एक सोन्याचे भांडे असते, ज्यामध्ये तेलाचा दिवा जळत असतो. या महिलांसोबत सर्व दासी आणि राजाच्या इतर पत्नी येतात, ज्यांच्या हातात सोन्याचे टोक असलेल्या छड्या  आणि जळत्या मशाली असतात. आणि त्यानंतर या सर्वजणी राजासोबत आत निघून जातात. या महिला सोने आणि मौल्यवान रत्नांनी इतक्या अथांग नटलेल्या असतात की, त्यांना नीट हालचाल करणेही कठीण होते. या नऊ दिवसांच्या काळात राजाला आनंद देईल अशा सर्व गोष्टी शोधण्यासाठी त्यांना  भाग पाडले जाते.

या उत्सवांसाठी राजाकडे एक हजार मल्ल -कुस्तीगीर असतात, जे राजासमोर कुस्ती खेळतात. परंतु, ते आमच्या पद्धतीनुसार युरोपियन पद्धतीनुसार खेळत नाहीत, कारण ते एकमेकांवर प्रहार करतात आणि जखमी करतात..."

(टीप: मिस्टर सेवेल यांचे असे म्हणणे आहे की, येथील मूळ अर्थ थोडा संदिग्ध आहे, परंतु त्यांच्या मते येथे बहुदा बैलांच्या जोड्यांचाच उल्लेख असावा. मोठ्या उत्सवांदरम्यान यांना अनेकदा सुंदर रीतीने सजवले जाते.)

"ते एकमेकांवर प्रहार करण्यासाठी आपल्या हातामध्ये टोके असलेले दोन कडे बाळगतात आणि ज्याला सर्वात जास्त जखमा होतात, तो जाऊन रेशमी कापडाच्या स्वरूपात आपले बक्षीस घेतो, जसे की राजा या कुस्तीगिरांना देतो. त्यांच्यावर एक सेनापती असतो आणि ते राज्यातील इतर कोणतीही सेवा करत नाहीत. आणि हे नऊ दिवस संपल्यानंतर, राव  बाहेर पडतात आणि आपल्या सेनापतींच्या सैन्याची पाहणी करण्यासाठी जातात. या नऊ दिवसांच्या आत, राजाला त्याच्या राज्यातून मिळणारे सर्व महसूल दिले जाते.कारण आधीच म्हटल्याप्रमाणे, सर्व जमीन राजाच्या मालकीची असते आणि सेनापती ती त्याच्याकडूनच धारण करतात."

=====================================================================================

दगडांच्या सर्वात वरच्या थरावर हत्तींच्या मिरवणुकीचे नक्षीकाम केलेले आहे. टोकदार दाढी असलेले आणि पर्शियन (इराणी) पद्धतीची टोपी घातलेले दोन परदेशी दिसणारे पुरुष, सिंहासनावर बसलेल्या एका आकृत्यांच्या समूहासमोर वाकून नमस्कार करताना दाखवले आहेत. कदाचित हे दृश्य राजदरबारात आलेल्या दोन परदेशी राजदूतांच्या भेटीचे प्रतिनिधित्व करते.

या सर्व जुन्या उठावदार शिल्पांवर स्पष्टपणे जैन शैलीचा प्रभाव दिसतो. दोन्ही बाजूंचे लोक (स्त्री आणि पुरुष) ज्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने आपले केस बांधतात, त्यामुळे काही वेळा हे शिल्प पुरुषाचे आहे की स्त्रीचे, हे ओळखणे थोडे कठीण जाते. अगदी आजच्या काळातही पश्चिम किनारपट्टीवर  जैन आणि हिंदू पुरुष या शिल्पांमध्ये दाखवल्याप्रमाणे आपले लांब केस एका मोठ्या अंबाड्यासारखे  बांधताना दिसतात.

एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, विजयनगर साम्राज्यातील सर्वात जुन्या शिलालेखांपैकी एक कोरलेला दगडाचा तुकडा जुलै १८९३ मध्ये मिस्टर सेवेल यांना या व्यासपीठाच्या उत्तर-पश्चिम बाजूला सापडला होता. या शिलालेखात 'मलाधारी-देव' नावाच्या एका जैन गुरूंच्या मृत्यूची नोंद आहे, जे बहुधा म्हैसूरमधील श्रवणबेळगोळ येथील 'मल्लीषेण मलाधारी-देव' इ.स. ११२९ हेच असावेत. (एपिग्राफिया इंडिका, खंड ३, पृष्ठ १८८).
=================================================================================================

 शिल्पकारांनी या 'महानवमी दिब्बा'  च्या अवतीभोवती होणाऱ्या भव्य मिरवणुका आणि खेळांचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला आहे. या वैभवशाली शहराला त्याच्या पूर्ण वैभवाच्या काळात भेट देणाऱ्या सुरुवातीच्या युरोपीय प्रवाशांनी याचे अत्यंत जिवंत वर्णन केले आहे. या प्रवाशांनी उल्लेख केलेला आणि प्रत्यक्षात येथे शिल्पित केलेला आणखी एक सण म्हणजे "होळी उत्सव." निकोलो याने नमूद केले आहे की, "इथे आणखी तीन सणांचे दिवस असतात, ज्या दरम्यान ते रस्त्यावरून जाणाऱ्या सर्व लोकांवर, अगदी राजा आणि राणीवरही, त्या उद्देशाने रस्त्याच्या कडेला ठेवलेले केशरयुक्त पाणी शिंपडतात. सर्वजण मोठ्या हास्याने याचा आनंद घेतात." प्लॅटफॉर्मच्या समोरील किंवा पश्चिम बाजूने वर जाणाऱ्या पायऱ्यांच्या डाव्या हाताला हे शिल्प असून, यामध्ये एक तरुण सरदार नृत्य करणाऱ्या मुलींच्या समूहासाेबत या उत्सवात सहभागी होताना दिसत आहे. या नृत्य करणाऱ्या मुलींपैकी दोघींच्या हातात केशरयुक्त पाण्याने भरलेल्या पिचकाऱ्या आहेत. प्लॅटफॉर्मच्या या बाजूला नंतरच्या काळातील आणि अधिक फिनिशिंग असलेल्या शिल्पांमध्ये काही उत्तम कोरलेली मानवी शिल्पे आणि प्राणी पाहायला मिळतात.

येथील काही नक्षीकाम  देखील विशेष सुंदर आहे, परंतु दुर्दैवाने, तालीकोटाच्या विनाशकारी युद्धानंतर मुस्लिम सैनिकांकडून यातील बहुतांश कामाचे नुकसान केले गेले आहे.किल्ल्याच्या आतील अवशेषांचे एक विहंगम दृश्य या व्यासपीठाच्या वरून पाहता येते. येथून दोन उंच निरीक्षण बुरुज असलेला झनाना एनक्लोजर राण्यांचा महाल, त्याला लागूनच असलेले हत्तीखाना, हजारा रामा मंदिर आणि दणईक एनक्लोजर हे सर्व स्पष्टपणे दिसतात.तर दुसरीकडे ग्रॅनाइटचे डोंगर, खडक आणि तोरणे क्षितिजावर एक सुंदर निसर्गचित्र तयार करतात.

दगडी दरवाजा, या व्यासपीठाच्या उत्तरेकडील भिंतीजवळ जमिनीवर पडलेला आणि पूर्वी ढिगारा व झुडपांमुळे नजरेआड असलेला एक प्रचंड दगडी दरवाजा सापडला होता. तो आता 'थ्रोन प्लॅटफॉर्म'च्या सिंहासन व्यासपीठ बाजूला रस्त्याच्या कडेला उभा करून ठेवण्यात आला आहे. हा कलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे, जो पूर्णपणे एकाच अखंड खडकातून बोल्ट-सॉकेट्ससह कोरलेला आहे आणि तो फळ्यांच्या लाकडी दरवाजासारखा दिसावा म्हणून त्यावर पॅनल्स बनवले आहेत. हा दरवाजा मूळचा कोणत्या इमारतीचा होता, हे दर्शवणारा कोणताही पुरावा उपलब्ध नाही.

 

उत्खननादरम्यान या चबुतऱ्यावर सापडलेली लाकडाची राख आणि पडझडीचे अवशेष हे राजवाड्याच्या नाट्यमय अंताची साक्ष देतात. एका भीषण आगीत हे लाकडी खांब आणि छप्पर जळून खाक झाले, ज्यामुळे वरचे मजले कोसळले आणि तळघरात गाडले गेले. अलीकडेच झालेल्या उत्खननात झाडीझुडपे आणि ढिगारा हटवल्यानंतर हा इतिहास समोर आला आहे.हे साधारण पाच फूट उंच असून याचे मुख्य प्रवेशद्वार उत्तरेकडे होते. जर हे एखादे मंदिर असते, तर त्याचे प्रवेशद्वार बहुधा पूर्वेकडे असते. याच्या अधिष्ठानाचे तळभागाचे)लांब पट्ट्यांमध्ये विभाजन करण्यात आले आहे, ज्यावर नेहमीप्रमाणे दसऱ्याच्या मिरवणुकीची दृश्ये कोरलेली आहेत; तसेच त्यांच्या दरम्यान समृद्ध नक्षीकाम केलेल्या अवेलबुट्टी आणि कमळाच्या पानाच्या चौकटींच्या एकाआड एक रांगा आहेत. हे एक देखणे व्यासपीठ असून, याला उत्खनन करून शोधून काढण्यासाठी घेतलेले कष्ट आणि केलेला खर्च पूर्णपणे सार्थ ठरतो.

 ====================================================================================

पतन आणि पुर्नजीवन

१५६५ मध्ये तालिकोटच्या युद्धानंतर विजयनगर साम्राज्याचे पतन झाले, परंतु त्यांची ही सांस्कृतिक परंपरा संपली नाही. विजयनगरचे मांडलिक असलेल्या मैसूरच्या वोडेयार राजांनी हा वारसा जतन केला आणि राजा वाडियार पहिले यांनी १६१० मध्ये श्रीरंगपट्टण येथे सिंहासनारोहण करून दसरा मोठ्या थाटामाटात साजरा करण्याची अधिकृत घोषणा केली. श्रीरंगपट्टण ही राजधानी असताना जवजवळ दोनशे वर्षे हा उत्सव राजदरबारी स्वरूपात पाळला जात असे, जिथे राजा दररोज खास दरबार भरवत, सिंहासनावर बसून विधी करीत आणि महानवमीच्या दिवशी आयुध पूजा करून शस्त्रे, हत्ती आणि घोड्यांची पूजा केली जाई.

परंतु, १७९९ मध्ये टिपू सुलतानच्या पराभवानंतर ब्रिटिशांनी वोडेयार घराण्याला पुन्हा सत्तेवर आणले. यानंतर वोडेयार राजांनी आपली राजधानी श्रीरंगपट्टणहून मैसूरला हलवली.राजधानी बदलल्यानंतर, १८०५ मध्ये महाराज कृष्णराज वाडियार तिसरे यांनी मैसूरमध्ये दसरा उत्सवाची अधिकृत सुरुवात केली. त्यांनीच राजवाड्यात 'खास दरबार' भरवण्याची परंपरा सुरू केली.१८९७ मध्ये जुना लाकडी राजवाडा जळाल्यानंतर, २० व्या शतकाच्या सुरुवातीला आजचा भव्य 'अंबा विलास पॅलेस' मैसूर पॅलेस बांधण्यात आला. या नव्या राजवाड्याच्या भव्यतेमुळे दसरा उत्सवाला एक अभूतपूर्व आणि जागतिक ओळख मिळाली.

मैसूर राजवाड्याची भव्य रोषणाई आणि त्याचे व्यवस्थापन हा अभियांत्रिकीचा एक अद्भूत नमुना आहे. दसरा उत्सवादरम्यान संपूर्ण राजवाडा उजळण्यासाठी ९६,७०० पेक्षा जास्त दिव्यांचा वापर केला जातो. दरवर्षी 'पॅलेस बोर्ड' या दिव्यांची अत्यंत बारकाईने तपासणी करते आणि सुमारे १५,००० ते २०,००० खराब झालेले बल्ब बदलले जातात. या रोषणाईचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, एका गुप्त पाच सेकंदांच्या सिग्नलवर हे सर्व ९६,७०० हून अधिक बल्ब एकाच सेकंदात एकदम प्रज्वलित होतात, ज्याला पाहण्यासाठी देश-विदेशातून लाखो पर्यटक मैसूरमध्ये गर्दी करतात. केवळ राजवाडाच नाही, तर स्थानिक वीज वितरण कंपनीद्वारे मैसूर शहरातील तब्बल १४६ किलोमीटरचे रस्ते आणि १२३ चौक रंगीबेरंगी दिव्यांनी सजवले जातात.

दुसरीकडे, वोडेयार राजांचे ऐतिहासिक सोन्याचे सिंहासन विजयनगर साम्राज्यातून मैसूरपर्यंत पोहोचण्याचा प्रवास तितकाच रंजक आहे. १६१० मध्ये विजयनगरच्या सुभेदाराकडून हे सिंहासन राजा वाडियार पहिले यांच्याकडे सोपवण्यात आले आणि त्यांनी श्रीरंगपट्टण येथे यावर बसून दसरा उत्सवाची अधिकृत सुरुवात केली. पुढे हैदर अली आणि टिपू सुलतान यांच्या काळात हे सिंहासन त्यांच्या ताब्यात सुरक्षित होते. १७९९ मध्ये टिपू सुलतानच्या पराभवानंतर, जेव्हा ब्रिटिशांनी वोडेयार घराण्यातील ५ वर्षांचे बालक कृष्णराज वाडियार तिसरे यांना मैसूरच्या गादीवर बसवले, तेव्हा हे सिंहासन श्रीरंगपट्टणहून अत्यंत सुरक्षितपणे मैसूर राजवाड्यात आणण्यात आले. आज हे अमूल्य सिंहासन वर्षभर कडक सुरक्षेत 'स्ट्राँग रूम'मध्ये ठेवले जाते आणि केवळ दसऱ्याच्या १० दिवसांतच 'खास दरबार' भरवण्यासाठी बाहेर काढले जाते.

 

मैसूर दसऱ्याचे सर्वात मुख्य आकर्षण म्हणजे 'जंबू सवारी' -हत्तींची मिरवणूक, ज्याचा इतिहास आणि भव्यता अतिशय रंजक आहे. विजयादशमीच्या दिवशी निघणाऱ्या या मिरवणुकीत मुख्य हत्तीच्या पाठीवर ७५० किलो सोन्याचा अंबारी  -होडा ठेवला जातो, ज्यामध्ये धनधान्य आणि शक्तीची देवता माता चामुंडेश्वरीची मूर्ती विराजमान असते. या मिरवणुकीची सुरुवात मैसूर राजवाड्याच्या आवारात कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि वोडेयार घराण्याचे वंशज यांच्या हस्ते मूर्तीवर पुष्पवृष्टी करून केली जाते. त्यानंतर हा मुख्य हत्ती अत्यंत शिस्तीत आणि राजेशाही थाटात मैसूर शहराच्या रस्त्यांवरून सुमारे ४.५ किलोमीटरचे अंतर पार करत 'बन्नीमंटप' मैदानाकडे मार्गस्थ होतो.

या भव्य जंबू सवारीच्या सुरक्षेचे आणि शिस्तीचे व्यवस्थापन अनेक महिने आधीपासून केले जाते. मिरवणुकीचे नेतृत्व करणाऱ्या हत्तींना गर्दीत शांत राहण्यासाठी, तोफांच्या आवाजाची सवय होण्यासाठी आणि जड वजन वाहण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाते. या हत्तींच्या सुरक्षेसाठी संपूर्ण मार्गावर पोलिसांचा चोख बंदोबस्त असतो आणि रस्त्यावरील विजेच्या ताराही उंचावल्या जातात. मुख्य हत्तीच्या मागे अनेक सजवलेले हत्ती, घोडे, उंट, पारंपारिक लोकनर्तक, बँड पथके आणि कर्नाटकची सांस्कृतिक विविधता दर्शवणारे चित्ररथ चालतात. अशा प्रकारे, शतकानुशतके चालत आलेली ही शाही मिरवणूक आजही आधुनिक काळातील उत्तम व्यवस्थापनासह मैसूर दसऱ्याची शान वाढवत आहे.

 

हंपीच्या महानवमी दिब्बापासून सुरू झालेली ही ऐतिहासिक परंपरा श्रीरंगपट्टणच्या राजदरबारातून जात आज कर्नाटक सरकारचा 'नाद हब्बा' राज्योत्सव बनली आहे. काळ बदलला, राजे बदलले, शासन बदलले,पण माता चामुंडेश्वरीच्या आशीर्वादाने या उत्सवाचा शाही थाट आणि लोकांचा उत्साह आजही तसाच अखंड आहे. हा इतिहास आपल्याला शिकवतो की साम्राज्ये नष्ट झाली तरी संस्कृती कधीच मरत नाही, ती नव्या रूपाने अधिक उजळून निघते.



 


 

 

खालच्या ओळीत   भिंत खालच्या पातळीवर, व्यासपीठाच्या दक्षिणाभिमुख बाजूला आहे. प्रत्येक ओळीत एक वेगळे दृश्य आहे. या सर्वात खालच्या ओळीत राजा (डावीकडे) पाहुण्यांचे स्वागत करताना आणि लष्करी मिरवणुकीची पाहणी करताना दिसत आहे. घोड्यांच्या उपस्थितीकडे लक्ष द्या. विजयनगरला त्याचे युद्धघोडे सागरी व्यापारातून मिळत असत. ते पर्शियन आखातातून, हिंद महासागर ओलांडून, भारतीय द्वीपकल्पाच्या पश्चिम बाजूच्या बंदरांमध्ये येत असत.

जसजसे वरच्या ओळीत जाऊ तसे लिहिले आहे

2 या ओळीत शिकारीची दृश्ये दाखवली आहेत, ज्यात राजा सर्व प्रकारच्या स्थानिक प्राण्यांची शिकार करत असल्याची अनेक वेगवेगळी दृश्ये समाविष्ट आहेत.

3 या रांगेत घोड्यांची मिरवणूक दाखवली आहे. काही घोड्यांना प्रशिक्षक चालवत आहेत, तर काहींवर स्वार झालेले योद्धे आहेत. डावीकडून तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या दोन आकृत्या बहुधा मुस्लिम अरब, तुर्क किंवा पर्शियन लोकांच्या असाव्यात, कारण त्यांनी “जवळजवळ पायांपर्यंत पोहोचणारे लांब कोट घातले आहेत, ज्यांच्या बाह्या त्यांचे हात झाकतात [आणि त्यांना] दाढी व मिशा आहेत, आणि वरवर पाहता डोक्यावर एक लांब रुमाल आहे ज्याच्या मागच्या बाजूला गोंडे(?) लटकत आहेत.” (दल्लापिकोला आणि वर्गेहीस)

4. या ओळीत परदेशी लोकांशी आणि प्रदेशांशी झालेल्या संपर्काचाही उल्लेख आहे. यात एक-कुबडी उंटांची मिरवणूक, तसेच काही परदेशी संगीतकार आणि नर्तक दाखवले आहेत.  आणि त्यानंतर उत्तर आफ्रिका, मध्य पूर्व आणि मध्य आशियातील लोकांनी व्यापार आणि युद्धासाठी ते स्वीकारले.

5ही रांग हत्तींची मिरवणूक दाखवते. दक्षिण आशियातील राजे युद्धासाठी हत्तींचा वापर करत असत. कमलुद्दीन अब्दुल-रज्जाक समरकंदी सारख्या विजयनगरातील अभ्यागतांनी महानवमी उत्सवादरम्यान परेडमध्ये शेकडो हत्ती असल्याचे सांगितले.


 


-जमिनीपासून पहिल्या मजल्याच्या शिखरापर्यंत जाणाऱ्या जिन्याच्या बाजूला असलेल्या दक्षिणाभिमुख भिंतीचा हा आणखी एक तपशील आहे. खालून वर जाताना, तुम्हाला शाही शिकारी (राजा); विविध प्रकारचे कपडे घातलेले घोडे, घोडे प्रशिक्षक आणि सैनिक यांची मिरवणूक, उंटांची मिरवणूक आणि (टोकदार टोप्या घातलेले) नाचणारे तुर्की संगीतकार; आणि हत्तींची मिरवणूक दिसेल. 

 एक शिल्पपट ही शिल्पे नुकत्याच वर्णन केलेल्या शिल्पांच्या डाव्या बाजूला आहेत. सर्वात वरच्या पट्टीमध्ये राजाच्या घोड्यांच्या संचलनाचे  दृश्य आहे. त्यानंतर शिकारीचे दृश्य येते. एक माणूस वाघावर किंवा बिबट्यावर भाल्याने वार करताना दाखवला आहे, तर दोघे जण ज्यांपैकी एक धनुष्यबाणाने सज्ज आहे आणि दुसरा एका विशिष्ट आकाराच्या शस्त्रासह शिकारी कुत्र्यांची  जोडी घेऊन चालला आहे.काळवीट पकडताना दाखवले आहेत

 

. मध्यभागी एक झाड आहे, ज्यावर दोन सशस्त्र माणसांवर एका हिंस्त्र पशूने हल्ला केला आहे.झाडाच्या खाली एका बाजूला रानडुक्कर (वराह) आणि दुसऱ्या बाजूला एक क्रॉस -अधिकचे चिन्ह आहे. हे क्रॉसचे चिन्ह नक्कीच वैशिष्ट्यपूर्ण आहे, परंतु या संदर्भात ते केवळ एका सुशोभित पाण्याच्या टाकीचे कुंड किंवा तलावाचे) प्रतिनिधित्व करणारी एक पारंपारिक पद्धत आहे. त्याच्या खाली, नुनिझने पोर्तुगीज प्रवासी वर्णन केल्याप्रमाणे, राजासमोर 'नोबल आर्ट' मुष्टियुद्ध चे प्रदर्शन करणारे दोन बॉक्सर दाखवले आहेत. डाव्या बाजूला, आपल्याला असिरियन शैलीतील एक अतिशय सुंदर उठावदार शिल्प दिसते, ज्यामध्ये एक योद्धा अस्वलाच्या उघड्या तोंडात शांतपणे खंजीर खुपसून त्याची शिकार करताना दाखवला आहे, जेव्हा ते अस्वल त्यावर हल्ला करत असते. हे योद्धे जे उच्चभ्रूंचे प्रतिनिधित्व करतात..."...किंवा सेनापती आणि राजा यांचे केस वर नमूद केलेल्या 'जैन शैली'नुसार  बांधलेले दाखवले आहेत, परंतु मुष्टियोद्धे आणि शिकारी कुत्र्यांना सांभाळणारे  लहान केसांमध्ये दाखवले आहेत. त्यामुळे, कदाचित केवळ उच्चभ्रूंनाच सरदारांनाच आपले केस अशा वैशिष्ट्यपूर्ण स्त्रीसुलभ पद्धतीने राखण्याची परवानगी असावी. 'सती'च्या स्मारकांवरही  अशाच प्रकारचे योद्धा कोरलेले आढळतात,


 


 


____
 

 चित्राच्या अगदी वरच्या भागात तुम्हाला दुसऱ्या मजल्यावरील भिंतीवरील नक्षीकाम दिसेल, ज्यामध्ये कमळाच्या फुलांची पुनरावृत्ती झालेली आहे.

परंतु धनुष्य घेतलेली व्यक्ती राजा आहे. त्याने लहान धोतर परिधान केले आहे. त्याने भरपूर दागिने आणि एक कट्यार घातली आहे. त्याचे लांब केस डोक्याच्या मागच्या बाजूला अंबाड्यात बांधलेले आहेत आणि त्याला मिशा व दाढी आहे. हा पोशाख भारतीय आहे, इस्लामी नाही.

राजाला त्याच्या शिकारीत दोन शिकारी कुत्रे मदत करतात.


 


 


 


 

राजासमोर मल्लयुद्ध सादर होत आहे.
 


 

राजासमोर मल्लयुद्ध सादर होत आहे.खालपासून घोड्यांची रांग ,उंटांची रांग ,हत्तीची रांग दिसत आहे .

 



 


 


 


 


 


 


 


 


 

Hampi Ruins: Described and Illustrated is  by Albert Henry (A.H.) Longhurst,

 


वाचने 70
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

 लेखिकेचा व्यासंग,आल्यास आणी तळमळ लेखातून साफ दिसून येतो. 

असे लेख वाचल्यानंतर भटकंतीची इच्छा तिव्र  होते. बघू कधी योग येतोय.

 

जायला मिळेल अथवा नाही पण असे लेख वाचून   दुधाची तहान  ताकावर भागते.

 

खुप धन्यवाद  आणी दसऱ्याच्या हार्दिक  शुभेच्छा.